नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती-👇भाग 👇२३👇 – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती-👇भाग 👇२३👇.

नर्मदे हर…. हर हर नर्मदे.!

‘नर्मदा जीवन’ शाळेत खूपच प्रसन्न वातावरण होतं. ती आश्रम शाळा होती आणि आजूबाजूच्या अदिवासी गावातली मुलं तिथे निवास आणि शिक्षणासाठी एकत्र आली होती. माझं आयुष्यच लहान मुलांच्यात गेलं आहे म्हणून असेल,मला इथे खूप खूप छान वाटलं. माझ्यात नवीन उत्साह भरल्या गेला. आता धडगाव साठी निघायचं होतं.तसं अंतर फ़ार नव्हतं पण ऊन फ़ार जाणवत होतं. खरतर नोव्हेंबर महिना होता हा तरीही ऊन फ़ार होतं.. दिवसभर पायी चालताना त्रास होत होता.

बरच अंतर चालून झाल्यावर भूकही लागली आणि आराम करायला ही निवारा हवा असं वाटू लागलं, पण काय आश्चर्य, इथे सगळी घरं उघडी,आणि घरात कुणीच नाही.कुणाच्याही घराच्या आत कसं काय जायचं आपण..भोजन प्रसादी तर दूरच पण सावलीची जागाही सापडत नव्हती.आज भोजन प्रसादीचं कठीणच झालं होतं. आता माधुकरी शिवाय पर्याय नाही पण मागणार कुणाकडे?

आम्ही प्रत्येक घरा घरांत डोकावून पाहात होतो.. ब-याच घरी फ़क्त लहान मुलं च होती.. आणि अनेक ठिकाणी घरं रिकामी पडलेली… शेवटी मयुरेश ला एक घर सापडलं.. तिथे एक बाई होत्यात घरी. निवा-याची जागा मिळाली आणि मयुरेश नी माधुकरी मागितली. तसं त्या बाईनी मक्याचं पीठ समोर आणून ठेवलं. आमच्याकडे न अन्न शिजवायला सामान न भांडी.. शिवाय मक्याच्या भाकरी येतात कुणाला? ते जाऊदे, नाही भाकरी तर जे होइल ते खाऊ एकवेळ, पण तवा, चूल, भांडी हे सामान? आम्ही आमचा प्रश्न मैयाजींना सांगितला… तिनी ते मक्याचं पीठ उचलं आणि आत घेऊन गेली.. आता जे पीठ होतं ते ही नव्हतं आमच्याजवळ, पण थोड्याच वेळात तिनी आवाज दिला.. “अब इतना सामान आपको दूंगी उससे अच्छा मैही आपको खाना बनाके खिला देती हू”…आयाती भोजन प्रसादी मिळावी, आणि आराम मिळावा अशीच इच्छा होती… ती मैयानी पूर्ण केली. त्या मैयाजींनी मक्याच्या गरमागरम भाकरी आणि तुरीच्या दाण्यांची आमटी असं जेवण करून खाऊ घातलं. अन्नदानाचं महत्त्व काय असतं ते तेव्हा खरं समजलं…. ज्या वेळी माणूस शीजवून, कष्ट करून खायच्या परिस्थितीत नसतो, अंग लाही लाही झालं असतं, घसा कोरडा पडला असतो, तेव्हा मिळालेली गुळ भाकरी सुद्धा अमृतासारखी असते…. किती किती म्हणून भरभरून सदिच्छा त्या मैयासाठी आमच्यामनातून निघाल्या असतील म्हणून सांगू! अर्थात हे सगळं नर्मादा माईनीच तिच्याकडून करवून घेतलं पण त्या दिवशी तृप्त मना नी आमच्या सगळ्यांकडूनच शब्द निघाले “ अन्नदाता सुखी भव”..आपल्या जगात आपण खरच किती “माजलेलो” असतो हे इथे आल्यावर समजतं आणि प्रत्यक्षात हा “माज” किंवा हा अहंकार कसा निरर्थक असतो हे समजू लागतं. परिक्रमावासींच्या सेवेची संधी मैयाने द्यावी हीच तिला विनंती आहे.

इथून पुढे राजबर्डीच्या आश्रमात थांबलो. अंगभर धूळ धूळ झालेली. हापशीच्या पाण्याने आंघोळ करून मग भोजनप्रसादी झाली. आज पहिल्यांदाच मी संध्याकाळी, थंड वेळेला, थंडगार हापशीच्या पाण्याने आंघोळ केली होती.बाधणार तर नाही अशी भिती होती, पण तसं काही झालं नाही. आज फ़ार थकलो होतो, निवांत झोपी गेलो. इथून पुढे सेल्कुवा, धडगाव, हरणखुरी, खुंटामोडी असा मार्ग होता. पुढचा मुक्काम कुठे करायचा असं काही ठरलेलं नव्हतं कारण आपल्याला ठरवता येत नाही असा अनुभव आधीच आला होता.

खरं तर असे अनेकदा अनुभव आलेत पण असं कुठे कुठे झालं ते नक्की आठवत नाही, पण काय झालं ते सांगते. आम्हाला असं वाटायचं बरेचदा की आम्ही फ़ारच हळू परिक्रमा करत आहोत. असं केल्याने आम्हाला चातुर्मास करावा लागेल.. चातुर्मासात चार महिने एका ठिकाणी राहायचं असतं,परिक्रमा करायची नसते. आणि तसं करणं मला तरी शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पुस्तकं समोर ठेऊन उद्या किती किमी चालायला हवं,किंवा रोज किती किमी चाललो तर परिक्रमा कधी पूर्ण होईल असा विचार बरेचदा करायचो. पण असं काही होत नाही,आम्ही ज्या दिवशी २० किमी चालायचं असं ठरवत असू त्या दिवशी काहीतरी होऊन आम्ही वीस किमी च्या आधीच मुक्काम करत असू.आणि ज्या दिवशी ठरवणार नाही त्या दिवशी जास्त चालून होत असे..त्यामुळे आजकाल आम्ही ठरवणं सोडून दिलं होतं..तो अधिकार फ़क्त मैयाचा होता.

तिनी ठरवल्याप्रमाणे पुढे आम्ही धडगावला थांबलो. इथे शूलपाणीची झाडी तशी संपली होती. म्हणजे एक भाग संपला होता असं म्हणू फ़ारतर,कारण माथासर झरवानी हा भाग अजून बाकी होताच. धडगावला आम्ही एका साधुकुटी मधे थांबलो होतो. तिथे एक दिवस थांबून विश्रांती घेऊन मग पुढे निघायचं ठरलं. आधी ते महाराज जरा कडक वाटत होते पण नंतर त्यांनी आमची छानच काळजी घेतली, आणि दुस-या दिवशी आम्ही पुढे निघालो.

तर कुठे थांबायचं हा प्रश्नच नव्हता..रस्त्याने जाता जाता एक जीप आम्हाला बघून थांबली. त्यातून धुळे जिल्ह्याचे विकास जी जोशी उतरले, सोबत श्रीपाद म्हणून एक मुलगा होता, तो पुढे वडफ़ळी नामक गावात आम्हाला सेवा देणार होता. त्यांनी सांगीतलं की कुंडल ला एका गुरुंजीकडे थांबा.ठरल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो. आम्हाला समोरच्या अंगणात आसन लावण्यास सांगितले, तसे आम्ही केले, मात्र त्या घरच्या लोकांशी गप्पा झाल्या असता त्यांनी आम्हाला स्वत:हून रात्री आपल्या घरात जागा दिली, दुस-या दिवशी ही इथेच आराम करा असे सांगितले, इतकेच नाही तर त्यांच्या दोन्ही नोकरीच्या सुनांनी पूर्ण घर आमच्यावर सोपवलं आणि दिवसभर आपल्या नोकरीवर गेल्या. नोकरीवर जाताना त्यांनी आम्हाला स्वयंपाक घरात बोलावलं, काय सामान कुठे ठेवलय ते सांगीतलं, आणि काय लागेल ते करून घ्या असं ही सांगीतलं… त्या जाताना पूर्ण स्वयंपाक करून गेल्या होत्याच, या ही उपर काही लागलं तर घ्या असं बजावून त्या गेल्या होत्या. केवढा हा विश्वास! हे परिक्रमावासी आपल्या घरची काडी ही इकडची तिकडे करणार नाहीत हा विश्वास त्यांना मैया नी नाहीतर कुणी दिला?

रात्री त्या घरचा मोठा मुलगा घरी आला. आल्या आल्या त्याने आम्हाला नमस्कार केला आणि तो रडू लागला. पसारकर काकूकडे पाहून ३ वर्षापूर्वी वारलेल्या आईची त्याला खूप आठवण येत होती. तो खूप व्याकुळ झाला होता, त्याला स्वत:ला सांभाळता येत नव्हतं. तो आमच्या कडे बघून इतकच म्हणायचा “ कैसे बताऊ, मुझे समझ नही आ रहा है… मा चली गयी मेरी.. मा चली गयी”.. पंचेचाळीशीतल्या माणसाला असं रडताना पाहून वेगळं च वाटत होतं.. आम्हा अनोळखी परिक्रमावासीं समोर रडून तो मोकळा होत होता हे महत्वाचं.!

दुस-या दिवशी आम्ही जरा उशीराच निघालो, पुस्तकात खुंटामोडी हे गाव १० किमी असं काहितरी दिलं होतं. तिथे मंदिरात सोय आहे असं समजलं होतं. रस्ता चढावाचा होता आणि साधारण ३ किमी चालून झाल्यावर रस्त्यात आम्ही विश्राम करायला जागा शोधली तर एका माणसानी आम्हाला एक मंदिर दाखवलं. आम्ही तिथे गेलो, फ़्रेश झालो आणि पुढे खुंटामोडी किती दूर आहे विचारलं असता समजलं की हेच खुंटामोडी आहे! आम्ही १० किमी चालून आलो होतो? नाही नाही… पुस्तकातलं अंतर चुक दिलं असावं.. नक्की काय होतं ते माहित नाही पण आज अजिबात थकवा आला नाही. इथे आम्हाला हरेंद्र नाईक म्हणून मोलगीचे राहणारे एकजण भेटले,, “ आप भी नाईक और हम भी नाईक, अब तो आपको हमारे घर आना ही होगा” असं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि आमचा पुढचा मुक्काम मोलगीला करण्याचं ठरलं.खुंटामोडी ते मोलगीच्या प्रवासात आधी एक आवाज ,मग एक दूधवाला, आणि मग एक डॉक्टर भेटले. यापैकी हा आवाजाचा अनुभव जरा वेगळा आहे. मोलगीला नाईंकानी केलेलं स्वागत छानच होतं पण, मोलगी ते पांढरामाती च्या प्रवासाच्या अनुभवात असं काही आहे ज्याची वाट आपण सगळेच बघत आहोत. सप्त चिरंजीवांपैकी एक अश्वत्थामा बद्दल मी काहीतरी सांगणार आहे,हे नक्की.

नर्मदे हर…हर हर नर्रमदे…
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
©सुरूची नाईक:विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:9309926559.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*