नर्मदा परिक्रम:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२२.👇
नर्मदा माईनी दर्शन दिल्याचं मागच्या अनुभवात सांगितलं होतंच.. तिथून पुढे आधीच निघालेले मयुरेश जी बसलेले मला दिसले. मग आम्ही सोबत पुढे निघालो. जरा अजून पुढे जात नाही तर एक म्हातारे आणि आंधळे बाबा पाणी घेऊन बसलेले दिसले.
परिक्रमावासी थकून येतात आणि त्यांना पाणी मिळावं म्हणून हे आंधळे बाबा कुठुनसे पाणी भरून आणतात. बंदच काय तर उघड्या डोळ्यांनी ही जिथे चालणं कठीण तिथे हा आंधळा मटका भर पाणी आणून फ़क्त परिक्रमावासींसाठी बसलेला असतो हे बघून आपल्याला डोळे आणि हातपाय असूनही आपण काहीच करत नाही याची लाज वाटते. बाबांचा प्रसाद म्हणून आम्ही घोट घोट पाणी प्यायलो..त्या बाबांनी अंगात एक जाकिटासारखं काहितरी आणि खाली पंचा असं घातलं होतं. आम्ही पुढे निघालो आणि मयुरेश जी अचानक मागे वळले.. आपल्या अंगावरचं उपरणं काढून त्यांनी त्या अंध बाबाच्या खांद्यावर घातलं, डोळे पुसले आणि काहिही न बोलता पुढे चालू लागले….तो क्षण अंतर्मुख करणाराच होता. त्या वेळी मला फ़ारसं समजलं नव्हतं पण नंतर जाणवलं… तो मयुरेश जींना त्यावेळी कसलातरी झालेला साक्षात्कारच असला पाहिजे..
पुढे आम्ही शांतीलाल पावरा यांच्या घरी पोहचलो. एक साधारण २० फ़ुट बाय १५ फ़ूट ची जागा, म्हणजे त्या शांतीलाल चं पूर्ण घर.. कदाचित अजूनही लहान.. या घरात २-३ गायी, ८-१० बक-या, कोंबड्या, मांजरी, असंख्य उंदीर, आणि कुत्रे यांच्याशीवाय शांतीलाल, त्याची बायको, आणि ८ मुले राहात होती. शांतीलालचं सगळ्यात लहान मूल म्हण्जे २१ दिवसांची मुलगी. तिच्या अंगावर कपडा नाही. एका सिंथेटीक फ़ाटक्या साडीमधे तिला गुंडाळून ठेवली होती.बाकी मुलांच्या अंगावरचे कपडेही फ़ाटलेले होते.२१ दिवसांची बाळंत बाई कामाला लागलेली होती. ते सगळं पाहून खरं तर दारिद्र काय असतं ते समजत होतं.. पण आता आम्हाला श्रीमंती काय असते हे बघायला मिळणार होतं.
आम्ही आजची रात्र तिथे राहणार म्हनजे आमची भोजन प्रसादी तिथेच होणार. शांतीलाल कडे घरी फ़क्त ३ किलो तांदुळ आणि थोडीफ़ार चवळी ची डाळ होती. एवढ्याश्या अन्नात आम्ही ११ अणि ते ७ अश्या १८ जणांच पोटभर जेवण होणं अशक्य होतं. शिवाय परिक्रमावासी थकून आले होते, भुका लागल्या होत्या. शांतीलालच्या बायकोनी तांदुळाचा डबा आमच्यासमोर आणून ठेवला आणि म्हणाली- “मैयाजी इतनाही चावल है घर मे. आज आप भोजन पा लो, हम आज नही पायेंगे, कल पा लेंगे” – हो, आमच्यासाठी ती आणी तिची मुलं उपाशी झोपायलाही तयार होती. घासातला घास देणं वेगळं पण आपल्याकडे काहिही नसताना आपल्या समोरचं ताट समोरच्यांना आदरानी खाऊ घालून स्वत: उपाशी राहणं हे जमण्यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते. ज्यांच्याकडे धन आहे त्यांच्याकडे ही श्रीमंती असेल की नाही माहित नाही पण हा शांतीलाल मी पाहिलेला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. अंगावर घालायला कपडा नाही पण मन सोन्याहून चकचकीत आणि मोलाचं सुद्धा… मन खूप भरून आलं..
आमच्या जवळ एक कोरी ओढणी होती. त्या ओढणीचे सुरेखाताईनी झबले आणि टोपरे कापून दिले. मी सुरेखाताई आणी मयुरेश दादा आम्ही ते शिवले, अगदी हातानी, सुईदोरा घेऊन, मोबाईल च्या आणि मेणबत्तीच्या प्रकाशात. दुसर्या दिवशी सकाळी आम्ही शांतीलाल च्या बायको ला बसवलं, तिला आणि त्या छोट्या बाळाला औक्षवाण केलं. आमच्या जवळ जे काही थोडफ़ार होतं त्यातून काही पैसे जमा केले आणि हे झबलं टोपरं आणि पैसे त्या बाळाच्या अंगावर घातले.. तिचं नाव ठेवलं रेवा.. आमची रेवा…
ह्या आमच्या रेवाला आम्ही आता यापुढे केव्हा बघू आम्हाला माहित नाही. पण ह्या रेवा ला आम्ही विसरणं शक्य तरी आहे का? जीचे चे आईवडील. स्वत: उपाशी राहून, घासातला घास काढून आम्हाला भरवतात त्यांच्यापोटी रेवा च जन्म घेऊ शकते ना? काही तासांचा आमचा हा सहवास पण इथून पाय निघत नव्हता.. त्या घराशी, रात्रभर अंगाखांद्यावर नाचत असलेल्या उंदरा मांजरांशी, गुरांशी, अगदी भिंतीशी सुद्धा जन्म जन्मांतरीचं नातं आहे असं वाटू लागलं होतं. पण परिक्रमा पुढे न्यायला हवी होती आणि आम्हाला अजून मोठ्या बिकट रस्त्यावर वाटचाल करणं भाग होतं.
सकाळी लवकर निघालो, हा भला मोठा डोंगर जो चढून आलो होतो तो आता उतरायचा होता.आधी वाटलं होतं चढण्यापेक्षा उतरणं सोपं जाईल. पण तसं नव्हतं. एका वेळी अर्धेच पाऊल मावेल अशी वाट होती. मुरुमाची खडी होतीच. उतरताना सगळा तोल समोरच्या बाजूला जात होता. अशा वेळी पाय घसरला तर मोक्षच! मी बूट काढून घेतले होते, दुसरा पर्याय नव्हता. हा जवळ जवळ १२ किमी चा शेवट्चा टप्पा होता. तो कुणाचाही “शेवटचा टप्पा” ठरेल असाच होता. त्याचं नाव होतं “भमाना” आणि मी त्याला “भयाणा” म्हणू लागले होते, भयानक असाच होता तो! पडण, सावरण अधुन मधुन होत होतं पण कुणाला फ़ारसं लागलं नव्हतं. मात्र त्या पडण्यातलं एक पडणं माझ्या आणि स्मीता साठी शेवटचं ठरलं असतं.
आम्ही एक एक पाऊल उतरत होतो, इथे दोन्ही बाजूला दरी होती मात्र डावीकडे काहीच आधार नव्हता आणि उजवीकडे किंचीत उंचवटा, म्हणजे लहान मुल पलंगावर झोपलं असेल तर ते पडू नये म्हणून आपण कशी उशी लावतो न अडकण म्हणून, साधारण तसा उंचवटा होता, मग पुढे खोल. आम्ही रांगेत उतरत होतो पण एकमेकांमधे अंतर ठेवून होतो, जेणेकरून एकाचा धक्का दुस-याला लागून तोल जाऊ नये. स्मीता पुढे होती आणि मी मागे. सुरेखा ताई बरीच मागे होती आणि मयुरेश पुढे.. उतरता उतरता माझा पाय जोरात घसरला.. माझ्या पाठीला बॅग असल्याने माझी पाठ अन मान वाचली, मी जमिनीवर आडवी पडले आणि घसरू लागले, अगदी लहान मूल घसरगुंडी वर घसरतात तशी… किती प्रयत्न केले तरी मला थांबताच येईना… नशीब की मी उजव्या बाजूच्या त्या उंचवट्याचा आधारानेच घसरू लागले आणि डावीकडे माझे पाय फ़ेकल्या गेले नाही ..नाहीतर मी घसरत घसरत खाली दरीत गेले असते. मी पडलेली पाहून सगळेजण जागीच स्थीर झाले …दुसरं काहीच करता येणं शक्य नव्हतं. अगदी एक पाऊलही उचलून माझ्या दिशेला टाकणं सुद्धा कठीण.. माझा अंत सगळे बघणार पण कुणी काहीही करू शकणार नाही हे मला माहित होतं…मी पडले होतेच आणि आता मी स्मीता ला जाऊन आदळणार होते. मी जवळ जवळ १०-१२ फ़ुट घसरून स्मीता ला जाऊन आदळले… स्मीता मात्र सावध होती म्हणून बर झालं.. ती चटकन गुढघ्यावर बसली आणि मला धरलं.. तिनी धरल्यामुळे मी थांबली, नाहीतर तशीच अजून किती खोल गेली असती मैयाच जाणे! मला थांबलेलं पाहून सगळ्यांच्या जिवात जीव आला आणि मग सगळे अगदी सावध आणि बहुतांश वेळा बसून बसून च उतरत होते. मी इतकी घसरून खाली गेले पण मला फ़ारसं लागलं नाही, थोडं खरचटलं. पाणीवरच्या बॅग चा खूप फ़ायदा झाला, माझ्या पाठीच्या कण्याचं रक्षण आणि स्पीड ला थोडा अडसर हे दोन्ही फ़क्त बॅग मुळे शक्य झालं.
मी मनातून घाबरले होते. माझे हात पाय आता लटलटत होते. इथून पुढचा उतार अजूनच कठीण होता. एक पाऊलही पुढे टाकायची माझी हिम्मत होत नव्हती. इथेच बसून राहावं असं वाटू लागलं.
खाली बघितलं तरी माझे डोळे फ़िरायला लगले होते, अजूनही इतकं उतरणं बाकी होतच. पण मैया कनवाळू आहेच. मागे येत असणा-या पोर्टर प्रेम नी मला बघीतलं आणि तो धावत पुढे आला. त्या मंडळीना ब-यापैकी सवय असते.
त्याने मला बॅग मागितली, आणि मी नाही म्हणाले…. मग त्याने माझा हात धरून मला उठवलं आणि हात धरुन धरून १५- २० पावलांपुढे असलेल्या एका दगडावर नेऊन बसवलं… मग तो पुन्हा मागे गेला आणि मागच्यांना घेऊन आला… असं करत करत त्याने तो उरलेला भमाना मला हात धरून धरून पार करून दिला…माझी परिक्रमा पूर्ण होणार होती, कारण आज मला काहिही झालेलं नव्हतं.
भमानाला उतरल्यावर आता चालायची इच्छा होत नव्हती. जवळच आश्रम असेल असं वाटत होतं पण तसं नव्हतं.
आता मुक्कामाला पोहोचायला अजूनही आठ दहा किमी चालून जाणं बाकी होतं. संध्याकाळ्च्या आत मुक्कामाला पोचणं आवश्यक होतं कारण हा सगळा कच्चा आणि जंगलातला रस्ता होता. तसं भमाना गाव होतं, पण तिथे सोय नव्हती. तावसे काका काकूंना मात्र भमाना मध्ये जागा मिळाली, आम्ही बाकीचे तसेच मजल दरमजल करत पुढे जाऊ लागलो.
प्रत्येक स्थानाला काही महत्व असतं, काही ठिकाणचे कंपनं सुखावह असतात तर काही ठिकाणचे भयाण असतात. मुख्य म्हणजे असे टप्पे जर वारंवार, अगदी एका पाठोपाठ एक आले की विचित्र आणि कन्फ़्युस्ड वाटू लागतं. तसाच हा दहा किमी चा रस्ता होता. कधी छान वाटायचं तर कधी भयाण… पण फ़ायनली आम्ही सावरीयाला नर्मदा जीवन शाळेत जाऊन पोहोचलो..मित्रांनो, इथे पोहचलो पण हा ही आदिवासी भागच बरं का! म्हणजे अजून शूलपाणी ची झाडी संपलेली नाही, मात्र आता उंच चढ आणि तार संपले होते. मैयाचं हृदय अजूनही पूर्ण पार व्हायचं होतं. नर्मदा जीवन शाळेतला मुक्काम आनंदमयी होता पण पुढे बोरी गावात आलेला अनुभव अजूनच वेगळा होता. मैया तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतेच… कसं ते सांगते बोरी गावाच्या अनुभवात, मात्र पुढच्या भागात.
नर्मदे हर
©सुरूची नाईक-विदर्भगट:देवा तुझा मी सोनार-9309926559.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply