नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇१६👇 – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇१६👇.

लोहा-याला जाताना लांबच लांब रस्ता लागतो, तो काही केल्या संपेच ना. वाटेत एक छोटं मार्केट लागलं. आम्ही ब-याच दिवसांनी जरा बरं मार्केट पाहिलं. पुढे शूलपाणी ची झाडी येणार होती, काही नाही तर निदान औषधं तरी घ्यावी म्हणून आम्ही एका औषधाच्या दुकानात शिरलो. मी च आधी गेले, कारण माझ्याकडे विषेश काही औषधं नव्हते. तिथे औषधं घेतले आणि मागे वळून पाहीलं, एक बरीच म्हातारी, भगव्या रंगाची साडी नेसलेली सन्यासीण तिथे बसली होती. तिने माझी चौकशी केली, माझ्या डोक्यावरून हात फ़िरवला आणि लोहा-याला माझ्या कुटीतच थांबा असं निमंत्रण दिलं. ती पायी पायीच पुढे निघून गेली…ती म्हातारी बाई पायी चालतेय हेच आश्चर्य तेव्हा वाटत होतं. मात्र त्याही पुढे अजून एक आश्चर्य चकित करणारा प्रसंग झाला.

हा लोहा-याचा आश्रम आम्हाला सांगीतला त्यापेक्ष खूपच दूर निघाला. म्हणजे आम्हाला सांगितलं २ किमी आणि हा ६ किमी तरी असेल, आम्ही ही आपलं चलतोय, चालतोय तरी आश्रम यायचं नाव नाही. शेवटी एकदाचा आश्रम आला. कपिल मुनिंनी बांधलेला आणि त्यांनी साधना केलेला हा आश्रम. अतिशय प्रसन्न आणि रमणीय स्थान हे. आम्ही तिथे गेलो असता तिथे एक सुंदर कुटिया होती त्यातून एक मैयाजी बाहेर अल्या आणि म्हणाल्या “सब माताराम इधर आसन लगायेंगे”.. आम्ही सांगीतल्या प्रमाणे आत आसन लावलं आणि तिथल्या मुख्य माताजींच्या दर्शनाला आत गेलो. बघतो तर काय, मला मेडीकल च्या दुकानात भेटलेल्या याच त्या माऊली! त्या माऊली आमच्या जरा आधी पायी निघाल्या आणि आमच्या बरच आधी येऊन पोहोचल्या सुद्धा.. आम्ही येण्या आधी त्या माऊलींचं संध्याकाळचं मैया स्नान आणि साधना आटोपली होती. रस्ता ही एकच होता… आम्ही त्यांना त्यांचं वय विचारलं “सौ को ४ कम” असं सांगीतलं त्यांनी! म्हणजे ९६ वयाची ही बाई, तिथे मेडीकल च्या दुकानात मला भेटते, आणि आमच्या तास भर आधी पायी चालत आश्रमात येते म्हणजे काय? तिच्या पयावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि विचारांना घुटमळूच दिलं नाही.

याच रस्त्यात एक मजेशीर अनुभव आला. काय होतं नं की आपण सतत नर्मदे हर चा जप करत असतो. त्यामुळे आपल्या तोंडून बरेचदा उत्स्फूर्तपणे नर्मदे हर च बाहेर पडतं. अगदी कुणी समोर दिसलं की नर्मदे शिवाय दुसरं काहिही निघत नाही. गंमत अशी झाली की रस्त्यात माझ्या मागे एक काळं-करडं कुत्र सारखं येऊ लागलं. नुसतं आलं तर ठिक आहे, ते भुंकायचं अधुन मधून, त्याला हकलंलं की जायचं पण पुन्हा यायचं. आणि एकदा तर ते झेप घेऊन माझ्या आंगावरच आलं… मी खरं तर “आई गं” किंवा “ए अरे अरे” असं काहितरी ओरडायला हवं होतं, पण माझ्या तोंडून “नर्मदे हर” निघालं आणि हे कुत्रं “स्टॅच्य़ू” म्हणावं नं त्याला तसं एकदम भुंकायचं ही थांबल आणि आंगावर यायचं ही थांबलं… मी दोन तीनदा मग नर्मदे हर म्हणून बघायचे… ते आलं की मोठ्याने नर्मदे हर म्हणणार आणि ते लगेच भेदरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत जागच्या जागी उभं राहणार…. हे असं चार पाच दा झालं! एक तर त्याला मैया समजवत होती किंवा मैया त्याला रागवत होती … अजून काय असेल?

अजून काय असेल याचं उत्तरही त्याच प्रवासात मिळालं. गाई आणि विषेशत: म्हशी आम्हाला बघून बिथरत असत असं मी बरेच दा नोटीस केलं होतं. आम्ही समोर दिसलो की त्या सैरावैरा धावत असत..मग आम्ही ही बिथरत (भितीने, एखादीचा शींग लागलं की परिक्रमा अर्धवट सोडावी लागेल ही भिती, आता दुखायची , मरायची भिती फ़ारशी वाटायची नाही) असू! एकदा मी एका गुराख्याला विचारलं, “हमारे हाथमे जो लकडी है उससे डरते है क्या मवासी?” तर तो जे म्हणाला ते ऐकून आम्हाला खूप वेगळं आणि छान ही वाटलं. कारण आम्हाला आजवर अनुभव येत होते पण त्यामागचं कारण इतकं स्पष्टपणे समजलं नव्हतं. तो गुराखी म्हणाला, “डंडे तो इन्हे रोज ही पडते है, डंडे से ये नही डरते. आपके सफ़ेद कपडों से भी ये नही डरते. ये तो आपसे डरते ही नही है. आपके साथ बहोत सारी शक्तीया चलती रहती है जो आपकी रक्षा करती रहती है, ये उनसे डरते है. आप देखना मैया, काले जानवर ज्यादा डरते है, सफ़ेद कम डरते है, क्यो, मालूम है? इन्होने पिछले जन्म मे काले काम ज्यादा किये है इसलीये इनको काला रंग मिला.. और इनको इनके बुरे काम का दंड भी मिला है, और वो भी उन शक्तीयोंसे जो आपके साथ चल रही है. इसलिये ये ज्यादा डरते है, पर आपको डरने की कोई जरूरत नही है. मा नर्मदा आपके साथ साथ चल रही है, वो आप पर कोई संकट आने ही नही देगी”……

खरं हे असं असतं किंवा परिक्रमेबाबत असं म्हणतात हे माहीत होतं.. पुढे मला ते अनुभवायला देखिल मिळालं ..पण ती वेळ आली की मी ते लिहिनच… आत मात्र लोहा-राच्या पुढचा प्रवास आणि अनुभव आधी लिहिते.

कपिल आश्रमात ज्या मैयाजी होत्या त्या कपिलदुलारी माताजींच्या शिष्या. कपिल मुनिंची सेवा करणा-या माताजी म्हणजे कपिलदुलारी माता. इथे अजून एक गम्मत ऐकली, बघायची संधी आली नाही. असं म्हणतात की इथे सात गायी आहेत, त्यांना सात नद्यांची नावं दिली आहेत. माताजी त्यांना खोलीतूनच आवाज देतात, तशी ती ती गाय उठून माताजींजवळ येते आणि मग माताजी दूध काढतात. मात्र आम्ही कपिल आश्रम सोडून पुढे निघाल्यावर कुणीतरी ही माहिती आम्हाला दिली आणि त्यामुळे त्या गोमतांचं दर्शन काही होऊ शकलं नाही.

पुढे शेताततलाच रस्ता होता. मझ्याजवळचं पाणी संपलं होतं. तिथे एक नाग मंदिर दिसलं म्हणून मी तिथे जरा विसावले, आणि आजूबाजूला बघू लागले. २ ते तीन मिनिटातच झाडीतून एक शेतकरी बाहेर आला आणि म्हणाला “ लो, तुम्हारे लिये जल लाया हू” त्याला कसं कळलं मला पाणी हवय? बाकी कुणी कुणी आजूबाजूला नसताना हाच कसा काय होता तिथे? झाडीतून कसा आला हा, आणि पाणी भरलेली पेप्सी ची बाटली कशी आली याच्या जवळ? हे असले प्रश्न पडत राहतात, त्या प्रत्येक प्रश्नाला नर्मदे हर असं उत्तर द्यायचं.. थोडा वेळ आश्चर्य वाटतं , मग सवय होते….मात्र हे नेमकं का होतं हे आत त्या गुराख्याने सांगीतलं होतं.

पुढे कठोरा मोहिपुरा मार्गे आम्ही दत्तवाडयाला जाऊन पोचलो. तिथे फ़ार रमणीय आश्रम आहे. तिथे इतकं छान वाटलं की दोन रात्री आम्ही तिथेच मुक्कम केला. इथे अंगणात एक मोठं शिवलिंग आहे. बाजूला बसून पूजा करायला जागा आहे. त्या ठिकाणी वेगळेच व्हायब्रेशन्स जाणवतात. खूप प्रसन्न आहे. मुख्य म्हण्जे इथे आसन लावण्याची व्यवस्था पहिल्या माळ्यावर आहे आणि आजुबाजूला झाडी नसून मोकळं माळरान आहे. त्यामुळे पहिल्या माळ्यावरून नजर जाईल तितक्या दूर फ़क्त नर्मदा माईच दिसते. तिथे बसून राहावं असंच वाटू लागतं.

इथे एक गम्मत झाली बरं का… मी वरच्या माळ्यावर बसून मैयाकडे बघत होते, आणि मला माईच्या आरतीचे सूर ऐकू येऊ लागले.. आता दुपारचे चारच जेमतेम वाजत आले होते, या वेळी आरती कोण करतय म्हनून माझी नजर शोध घेऊ लागली मात्र कुणी दिसेच ना. माझी पावले आरतीच्या दिशेने, आवाजाच्या दिशेने वळू लागली, मी खाली उतरले, आश्रमाच्या मागच्या दाराने बाहेर गेले तसा आरतीचा आवाज अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला मात्र दिसत कुणीच नव्हतं… मी अगदी मैयाच्या पाण्यापर्यंत गेले, आजूबाजूला सगळीकडे पाहीलं, पण आता आवाज कुठून येतोय हे ही समजत नव्हतं. माझ्या चारही बाजुंनी आवाज आल्यासारख वाटत होतं. तिथेच एका दगडावर मी बसून राहीले.. आधी आरती झाली, मग अष्टक झालं, टाळ वाजवल्याचा अवाज पण येत होता… हळू हळू तो आवाज क्षीण होऊ लागला आणि नर्मदे हर चा जप ऐकू येऊ लागला… बॅग्राऊंड ला मैया ची आरती..अडीच तास कसे निघून गेले समजलं नाही… माझ्याकडून चक्क जप करवून घेण्यात आला होता!! माझं भान हरपलं होतं की काय, ते माहीत नाही… पण आरतीसाठी आश्रमात माझी शोधाशोध सुरु झाली, मी बाहेर गेल्याचं कुणीतरी माझ्या सोबतच्या मंडळी ला सांगीतलं आणि मला बोलावायला सुरेखा ताई आली तेव्हा समजलं की अडीच तास निघून गेले आहेत…. नर्मदे हर चा जप आणि आरती अजूनही हळू आवाजात ऐकूच येत होती….मग मला मोठ्या महारांजाच्या आरती मधले शब्द आठवले.. “मन हे स्थीर करूनी पहा, रेवा तीरी सद्गुरू ला”….हा अनुभव खूप वेगळा होता, आणि हवाहवासा पण! मात्र पुढच्या अनुभवात म्हणजे राजघाटच्या प्रवासात “जे याचि देही याची डोळा” बघता आलं ते काही औरच होतं… प्रवास आणि तो अनुभव, पुढच्या लेखात सांगते.
©सुरूची नाईक:देवा तुझा मी सोनार-9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*