नर्मदा परिक्रमा–एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१४👇.
तर कसं बसं आम्ही त्या चकोड्या ला पार करून विश्वनाथ खेडा पुनर्वसन गावी येऊन पोहोचलो. तोवर संध्याकाळचे ६-६.३० झाले असतील. आता गरज मुक्कामाची.. तिथे एखादं देऊळ असेल ते पाहू, असं ठरवलं. देऊळ होतं, तिथे गेलो असता तिथल्या पुजा-यानी सांगीतलं आत जागा नाही. आम्ही ५ जण होतो. काका काकू. आणि आम्ही तिघी मुली, मी सुरेखा आणि स्मिता कुलकर्णी. आता जागाच नाही म्हंटल्यावर काय करणार.. सगळं सामान घेतलं आणी दुस-या निवा-याच्या शोधात निघालो. भोजन प्रसादी आज मिळेल असं काही वाटत नव्हतं आणि जणू मिळणार नाहीच याच विचारात आम्ही सोबत असलेली फ़ळं किंवा फ़राळाचं खाऊन घेऊ असं ही मनोमन ठरवून टाकलं होतं. आता निवारा मिळणं आणि प्रात:विधी साठी जागा मिळणं हे महत्वाचं, कारण आम्ही गावात होतो. एखाद्या आश्रमात, किंवा गावाबाहेर असताना वावरात प्रात:विधी ला जाणं शक्य असतं.. इथे गावात कसं काय जमणार? तेव्हा जागा अशीच हवी असणार होती जिथे निदान ही सोय तरी असेल…
मग शोधता शोधता एक अजून मंदीर सापडलं. ते छान ऐस पैस होतं. संत राम महाराज म्हणून होते, त्यांनी बांधलेलं राजाराम मंदिर हे. मंदिर म्हणजे एक मोठा वरांडा, आणि त्याला कमरेपर्यंत जाळी चारी बाजूनी, बाकी भिंत वगैरे काही नाही. म्हणजे थंडी पासून बचाव होणार नव्हताच, आणि अजून परवानगी मिळाली नव्हती. त्याच मंदिराच्या अगदी समोर एक शिवाचं मंदिर होतं, पण ते अगदीच उघडं होतं… राजाराम मंदिरात कुणीही नव्हतं म्हणून शिव मंदिरात गेलो, तिथे पुजारी होता, त्याला विचारलं… तो म्हणाला, मेरे यहा रह सकते हो पर यहा नीचे डालने के लिये कुछ नही है, और मै तो सुबह तीन बजे भजन करता हू, आपको उठना पडेगा… म्हणजे हा पण पर्याय गेला..आम्ही खूप थकलो होतो… शेवटी आता कुणी नसलं तरी राजाराम मंदीरात डेरा टाकायचं ठरवलं आणि कुणाच्याही परवानगी शिवाय आम्ही आत जाऊन आसनं लावले. अजून भोजन प्रसादी आणि प्रात:विधी चा प्रश्न होताच! पण आता निदान रात्र कुठे काढायची हे नक्की करणं गरजेचं होतं.
तेवढ्यात तिथे एक माणूस आला, तो जरा विक्षीप्त वाटत होता. खरं सांगायचं संध्याकाळ्च्या त्या चकोड्या पासून आम्हाला हे गावच विचित्र वाटू लागलं होतं. कधी एकदा रात्र सरते आणि आपण इथून निघून जातो असं वाटू लागलेलं. तो माणूस आम्हा तिघींकडे टक लावून बघत बसला… आणि काही केल्या तो तिथून जाईना.. जवळ जवळ तास भर त्यानी तिथेच असं बघत बघत घालवला असेल. मग तो निघून गेला आणि अर्ध्याच तासात परत आला. त्याच्या हातात चहाची किटली होती. त्यानी आमच्या साठी चहा आणला होता. खरं तर तो चहा प्यावा की नाही असंच वाटत होतं पण तेवढ्यात त्या देवळाचा पुजारी आला. त्यानी मात्र आमचं स्वागत केलं. आमची चौकशी केली आणि आम्हाला खाली घालायला जाड सतरंजी आणी पांघरुणं पण देवळातल्या खोलीतून काढून दिली. देव्हारा उघडून दिला आणि “ तुम्हारे मोबाईल चार्ज करके ताला लगा देना” असं म्हणून किल्ली सुद्धा आमच्याच जवळ दिली.
हे गाव न खरच काहीतरी वेगळं होतं. आधी इथे पोहोचताना झालेला गोंधळ, मग निवाऱ्या-साठिचा त्रास आणि मात्र त्या नंतर झालेली मदत, सगळच विलक्षण… काय झालं, हा पुजारी परत जात नाही तोच समोरच्या देवळातला पुजारी आला, त्यानी एक किल्ली आणून दिली, “ सामने टॉयलेट है, आप लोग जा सकते हो, बाथरुम भी है” असं सांगीतलं… बराच वेळ पासून तग धरून बसलेल्या आम्ही मुली आधी त्या दिशेला धावलो. अंधार दाट झाला, ये जा पांगली की बाजूच्या रिकाम्या प्लॉटवर नेचर्स कॉल आटोपायचं आणि तोवर तग धरायची असं च ठरलं होतं, आणि दुसरा पर्याय ही नव्हता, पण हा ही प्रश्न आपोआप सुटला होता. यानंतर मात्र कहर च झाला… तिथे एक मैयाजी आल्या आणी आम्हाला सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण देऊन गेल्या. आम्ही भोजन प्रसादीला गेलो तेव्हा समजलं, बाईचा स्वयपाक, घरच्यांची जेवणं सगळं झाल्यानंतर आम्ही आल्याची बातमी त्यांना समजली. सगळं स्वयंपाक घर आवरून बंद केल्यानंतर, पुन्हा आमच्यासाठी या मैयाजींनी स्वयंपक केला होता..
“ हमारे घर आजाओ ना सामान लेके”
असं ही त्या विनवत होत्या, पण पुजा-यानी केलेल्या मदतीचा तो अपमान झाला असता म्हणून आम्ही मंदिरातच झोपायचं ठरवलं, मात्र दुस-या दिवशी सकाळी आंघोळ आणि बालभोगासाठी इथेच या असा मैयाजिंनी हट्टच धरला आणि छान गरम पाण्याची आंघोळ मिळाली. अगदी थोडावेळ आधी पर्यंत “इथून कधी जातो” असं वाटणारं गाव मैयाजींच्या आणि इतर मंडळींच्या सहकार्याने का होईना आता छानसं गाव वाटू लागलं होतं. सकाळी छानसा बालभोग करून आम्ही पुढे निघालो.
आता आम्हाला ब-यापैकी चालायची सवय लागली होती. जप होत रहावा म्हणून आम्ही मागे पुढे होऊन चालत असु. मी आणि सुरेखाताई पुढे, काका मधे आणि काकू आणि स्मिता मागे असे काहीसे आम्ही मागेपुढे झालो होतो. माझी आणि सुरेखा ताईची स्पीड ब-यापैकी मॅच होत होती, आम्ही हाकेच्या अंतरावर असायचो.
परिक्रमेत असे काही अनुभव येतात की त्यांचं नक्की कारण ठरवणं किंवा शोधून काढणं काही शक्य नसतं. असं का झालं असावं हा फ़क्त अंदाज आपण बांधत राहत असतो, आणि कालांतराने तो ही बंद होतो.. हे आपल्या बुद्धीच्या आकलना बाहेर आहे हे समजायला जितका वेळ लागेल तितकच काय ते…पण एक गोष्ट समजते.. आपलं नं काही तरी देणं घेणं जिथे कुठे शिल्लक असेल तिथे आपण न ठरवता कसे काय जाऊन पोचतो हे ती मैयाच जाणे, पण पोहोचतो मात्र नक्की. म्हणूनच परिक्रमा जरी एक असली तरी प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.
आमचा बालभोग छान झाला होता, आम्ही दोघी पुढे निघालो होतो, आणि आमची मागच्यांशी चुकामुक झाली. आमचे रस्ते बदलल्या गेले होते. फ़ोन वर जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा समजलं की ते तिघं पार वेगळ्या रस्त्याला लागलेले आहेत, आणि आम्ही वेगळ्या रस्त्याने जात आहोत.अर्थात रस्ते जरी वेगळे होते तरी पुढे आम्ही कुठेतरी भेटणार होतो, पण या वेगळ्या रस्त्यात त्यांच्या वाट्याचे अनुभव त्यांना मिळणार होता आणि आमच्या वाटचे आम्हाला…का झाल्या आमच्या वाटा वेगळ्य़ा? कशा झाल्या? काय वेगळे अनुभव आले त्यांना आणि आम्हाला..? ते पुढच्या भागात सांगतेच..
©सुरूची नाईक:देवा तुझा मी सोनार-9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply