नर्मदा’परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१३.👇
*मागच्या अनुभवात मी तुम्हाला सांगीतलं की भयानक घटना घडली.. ती काय ते आता सांगते. आता तुमच्या पैकी किती लोकांचा यावर विश्वास बसेल माहित नाही पण काही चांगल्या शक्ती असतात तशा काही वाईट शक्ती ही असतात असं वाटू लागलं, अर्थात नर्मदा मैया सोबत असल्याने आमचं काही बरं वाईट नक्कीच होणार नाही याची खात्री होतीच. तरी जीवच तो, घाबरतोच थोडाफ़ार.. आणि भिती म्हणजे सुद्धा आपल्याला काही होईल अशी भिती वाटत नव्हती, मात्र हे जे काही सुरू आहे ते वेगळं आणि अनपेक्षित आणि त्याही पेक्षा अनाकलनीय आहे हे समजत होतं, बाकी काहीही समजतच नव्हतं अशीच ती घटना.*
*ब्राम्हणगावातून सुरेखा ताईच्या नातेवाईकांना निरोप देऊन आम्ही पुढे निघालो. इथून अगदी १० ते १२ किमी वर विश्वनाथ खेडा गाव आहे, तिथे काशीविश्वनाथाचं मंदीर आहे, तिथे रात्री चा मुक्काम करायचा असा विचार केला. एव्हाना रोजचं १० ते १२ किमी अंतर चालत असू, त्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे विश्वनाथ खेडा तसं आमच्या चालण्याच्या ट्प्प्यात होतं. पण तरीही आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही कारण मधे ही भयानक घटना आडवी आली.*
*तर झालं असं, आम्ही वाटेत होतो म्हणजे विश्वनाथ खेडा साधारण ४ किमी काय ते उरेलं असेल, रस्ता डोंगराळ होता आणि वस्ती नव्हती, मात्र अधुन मधून शेतं होती. रस्ता विचारत विचारत पुढे जायचं. इथे काय झालय मध्यप्रदेशात, नर्मदा नदीचं पात्र वाढवण्याचं काम सुरू आहे, म्हणजे धरणं जी बांधली आहेत ती ज्यावेळी मोकळी करणार त्यावेळी पाण्याची पातळी वाढणार आणि किना-यावरची गाव पाण्याखाली जाणार.. याला इथे “गाव डूब मे है” असं म्हणतात. आणि मग पुनर्वसित गावं तयार झाली आहेत. तर आम्हाला वाटेत तिघं तरूण मुलं दिसलीत. ती दारू गाळत होती.. त्यांना रस्ता विचारला, तर ती म्हणाली..”आप तो पुनर्वसन मे जा रहे हो, किनारे वाला गाव तो उधर है” असं म्हणत त्याने उजवी कडे आम्हाला जायला सांगितलं. त्यानी दाखवलेल्या दिशेला आम्ही साधारण ३ किमी चालून गेलो, तर तिथे एक म्हातारा माणूस बसला होता, त्याला पुढचा पत्ता विचारला, तो म्हणाला, “मंदिर तो हैम पर वो डूब मे है, इसलिये वहा कोई जाता नही, आपको न सोने को मिलेगा न खाने को.. अब तो गाव मे ३ ही मकान बचे है… गुंडो का राज चलता है वहा… कुछ हो गया तो क्या करोगे, आप तो पुनर्वसन मे ही जाओ…*
आता तिथे काहीच नाही म्हंटल्यावर काय करायचं? न लाईट आहे म्हणे, आणि न काही सोय..मंदिर पण बंद, आणि स्मशान पण लागूनच आहे असं ही त्यानी संगीतलं..शिवाय “गुंडाराज चलता है” असं ही तो म्हणाला.. आमच्यात एक मोठे गृहस्थ होते, ते म्हणाले, इतक्या पोरी बाळी सोबत आहेत, आपण पुनर्वसन ला जाऊ…आम्ही पुन्हा पुनर्वसीत गावाकडे निघालो… ती दारू गाळणारी मुलं आता तिथे नव्हती, त्यांचं सामान होतं, मात्र तिथे एक आणिक म्हातारा बसला होता… त्याला विचारलं….
तो म्हणाला “किसने बताया आपको…मंदिर तो शुरू है.. मै तो अभी उधरसे ही आया हू…आपको नाले के पास बताया होगा ये बात, है ना… अरे आपको जिसने बताया वो तो आदमी नही है..चकोडा है… ऐसे ही बताता है” चकोडा म्हणजे चकवा, दिशाभूल करणारा…. बापरे, असं खरच असतं? मग आम्ही त्याला त्या तीन मुलांबद्दल विचारलं..तर म्हणाला “कौनसे लडके, यहा तो मै ही बैठता हू..आपको गलत फ़एमी हुई होगी..यहा कोई तीन लडके नही थे”
आता हे ऐकून आम्ही अजूनच दांदरलो… आम्ही त्या तीन मुलांशी बोललो होतो! आम्ही त्याला म्हंटलं “आप चलो हमारे साथ. हमे मंदिर तक छोड दो” तो हो म्हणाला… जरा हायसं वाटलं. तो पुढे आणि आम्ही मागे असं पुन्हा एकदा डूब गावाकडे चालू लागलो…वाट्लं चला, हा आहे, आता निदान निवारा तरी मिळेल, फ़राळाचं सामान आहे आपल्याकडे, त्यामुळे जेवण नसलं तर नसलं.. काही अंतर चालून तो म्हणाला, “अब यहा से सीधा सिधा जाना, मुझे घर जाना है, मै जा रहा हू” त्याला थांबायचा खूप आग्रह केला पण तो निघून गेला… मग आम्हाला एक चुन्यानी आखलेली लाईन दिसली, लाईन काय वाटच दिसली, अगदी बाणानी मार्ग पण दाखवला होता त्यावर..
वाटलं चला, परिक्रमा वासींसाठीच असावा, आम्ही त्या मार्गाने चालू लागलो, पण गाव काही येईना..मी सगळ्यात पुढे होते.. मी समोर जाऊन जरा बघायचं ठरवलं… पुढे एका ठिकाणी ती चुन्याने आखलेली वाट दिसेनाशी झाली होती…ती कुठेच जात नव्हती, मात्र तिथून पुढे बरच दूर एक छोट्सं मंदिर होतं… अगदी लहान, म्हणजे रस्त्यावर किंवा गावाबाहेर फ़क्त देवाची मूर्ती बसेल इतकं छोट्सं मंदिर नसतं का बांधलेलं… तसं.. आणी त्यामागे लाकडाचे ढीग रचले होते… ते पाहून मी मागेच वळले! आपली जबरदस्त दिशाभूल होते आहे हे समजत होतं, किंबहुना ती केली जातेय हे ही समजत होतं. आम्ही रामरक्षा आणि नर्मदाष्टक या दोन्ही चा जप सुरू केला..आणि सगळ्यानी एकत्र येऊन ठरवलं की आता पुनर्वसीत गावातच जायचं.. काही नाही तर निदान माणसं तरी दिसतील….
वाटेत पुन्हा ती तीन मुलं दिसलीत.. न विचारताच म्हणालीत “डूब मे जाओ..इधर तो पुनर्वसित गाव है” आम्ही लक्षच दिलं नाही आणि, एकदाचं पुनर्वसीत गावात येऊन पोचलो. इथे आल्यावर छान व्यवस्थित गाव दिसलं तेव्हा जिवात जीव आला. लोकांशी चर्चा केल्यावर समजलं, असा अनुभव या भागात प्रत्येक परिक्रमावासीयाला कमी जास्त प्रमाणात येतो, मात्र इजा किंवा इतर त्रास होत नाही, दिशाभूल मात्र होतेच…! मात्र माई सोबत असते, ती वाट दाखवते. कुणी तिकडे डूब मधे जातं कुणी इकडे येतं..खरं तिथेच सोयी आहेत, हे ही समजलं.
इथे आलो खरं, पण पुढे निवारा मिळणं काही सोपं नव्हतं.. भरपूर त्रास झाला.. कसा ते सांगते पुढच्या अनुभवात.. एक मात्र नक्की, आजचा दिवस खूप खूप विचित्र होता. केवळ आम्ही परिक्रमावासी आणि मैयाची लेकरं म्हणूनच आमचा निभाव लागला असणार.. अर्थात पुढचा त्रास भितीदायक नसला तरी विचित्र मात्र होता, कसा ते सांगते…लवकरच
नर्मदे हर. हर हर नर्मदे..
©सुरूची नाईक,देवा तुझा मी सोनार:9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply