नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ८.👇
नर्मदे हर…
पसारकर काका त्यांचे जोडे शोधू लागले होते ते काही सापडेना. वयस्कर गृहस्थ,अनवाणी चालणं कठीण होतं पण इलाज नव्हता. ते अनवाणीच चालू लागले. मागून मोटर सायकलवर एक माणूस आला आणि विचारलं “काका जी कल तो जूते थे? आज क्या हुआ?” आता इतक्या परिक्रमावासिंमध्ये हे काका त्या माणसाच्या लक्षात होते खरच? की तो माणूस उगाच म्हणत होता? की अजून काही?… हो अजूनच काही होतं हे! काकांनी जोडे अदल बदल झाल्याचं सांगितलं. तो माणूस म्हणाला, “दुकान तो दो गाव दूर है, आपके रास्ते भी नही है, आईये आपको गाडीपर ले चलता हुं!” दोन गाव दूर हा माणूस स्वत:चा वेळ, पेट्रोल खर्ची घालून काकांना घेऊन जायला स्वत: हून तयार झाला… पण इथे अजून एक पंचाईत… गाडीवर बसायचं नाही असा काकांचा नियम… मग आता काय? त्यावरही त्या माणसाने उपाय काढलाच! त्याला जणू मदत करायचीच होती. काका गाडीवर बसत नाही म्हणाले तर हा माणूस म्हणतो, “ काकाजी आप चलते रहिये, मै दुकानदार को लेकर आता हुं” तो गाडीवर गेला, दुकानदाराला घेतलं आणि सोबात ३ ते ४ वेगवेगळ्या साईझ चे आणि प्रकारांचे जोडे घेऊन आला. दुकानदाराला परत सोडला आणि काकांच्या जोड्यांचे ही पैसे घेतले नाहीत, पण काकांनी काही एक रकम बळजबरी त्याला दिली.
इथे काय होतं माहितीये का? हे लोक इतका जीव लावतात नं की पैसे देऊ करणं हे सुद्धा अपमान केल्यासारखं वाटू लागतं. त्यांनी केलेलं हे प्रेम, दिलेला हा आदर आणि केलेली मदत या सगळ्यांनी आपण भूतलावर नाही हेच जाणवू लागतं. अतिशय नि:स्वार्थ प्रेम असतं हे. जीवाभावाचे आणि जन्माचे नाते जुळतात इथे. आणि खरं सांगू का, ती नर्मदा माईच त्या त्या रुपात आपल्या बरोबर येत असते.! सांगा नं हजारो परिक्रमा वासी वर्षातली ८ महिने परिक्रमा करत असतात..एकाही परीक्रमावासियाला कधीही उपाशी राहावं लागत नाही, कधी कुठलाही त्रास होत नाही आणि काहीही अडचण आली तर ती विनासायास दूर होते. हे सामर्थ्य कुणाचं? इतक्या परीक्रमा वासियांची जवाबदारी कोण घेतं? कधी कुणाच्या तर कधी कुणाच्या रुपात येऊन, कधी गतजन्माचे राहिलेलें देणेघेणे म्हणून, तर कधी कृपा म्हणून ती नर्मदा माईच हे सगळं घडवून आणते असते नं?
खरच या मोटार सायकल वाल्याने आदल्या दिवशी काकांना जोडे घालून पाहिलं असेल? काल काका जोडे घालून चालत होते आणि दुस-या दिवशी त्यांच्या पायात जोडे नाही इतकी छोटीशी गोष्ट इतक्या बारकाईने त्या माणसाने लक्षात ठेवली असेल? आणि कशासाठी? तो माणूस खरच तो माणूस असेल का? मला तरी वाटतं की ती माझी मैयाच असली पाहिजे. काकांचे जोडे सेट झाले, तो माणूस आला तसा मदत करून निघून गेला. आमच्या गाठीशी ही मैया भेट मात्र कायम देऊन गेला.
पुढे देखील असे अनेक अनुभव आलेत आणि प्रत्येक अनुभवातून मैयाची आपल्याला साथ आहे हे जाणवू लागलं. एक वेळ तर अशी आली की या मैया भेटीची ओढ लागू लागली. काहीतरी अडचण यावी म्हणजे मैया कुठल्यातरी रुपात येऊन ती दूर करेल असं वाटू लागलं आणि तिनी तशी भेट दिली की मग दुसरं काही नको असायचं त्यावेळी. बघा नं किती कमाल आहे, देवाकडे आपण काय मागतो, देवा संकट दूर कर, प्रवास सुखकर होऊदे मात्र या प्रवासात आम्ही संकट मागत होतो, “ देवा काहीतरी अडचण येऊ दे”! कारण ती दूर होणार हा विश्वास इतका प्रचंड वाढला आहे की ती दूर होण्याबद्दल ची काहीही मागणी आमच्याकडून होत नव्हती…
सियाराम बाबांच्या दर्शनानी मन प्रसन्न झालं च होतं. इथून पुढे १५ की मी वर लेपा नावाचं गाव आहे. इथे आजचा मुक्काम करायचा असं ठरलं. लेप्याला जाताना वाटेत एका दुकानात पाणी प्यायला थांबलो असता त्या बाईनी भरपूर ताक आग्रहाने प्यायला दिलं.पुढे वाटेत एका बाईनी केळी दिली आणि त्यानंतर बिस्किटाचा पुडा मिळाला. १५ किमी च्या अंतरात इतकं खायला मिळालं की भूक लागायाला सुद्धा वेळ मिळत नसे . पोट रिकामे होइच ना.
मी आणि सुरेखा ताई जरा मागेपुढे झालो. चित्रा ताई बरीच मागे होती. नाम जप करत करत चालायाचं होतं, आणि सोबत चाललं की गप्पा होत असत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला उसाची शेती होती. माणसाच्या उंचीच्या दुप्पट तरी उंच असेल. वात साधारण ४ फुट असावी. आजूबाजूचं आणि समोरचं पण काही ही दिसत नव्हतं. झाडात खुसफूस खुसफुस व्हायचं तेव्हा थोडं बिचकायला व्हायचं पण भिती अशी वाटली नाही. जेव्हा मला थोड्सं दचकायाला झालं तेव्हाच माझ्या मागून एक बाई लाकडाची मोळी डोक्यावर लादून माझ्या मागून आली आणि म्हाणाली “पंछी घर बनाते है घास मे, उनको खानेके लिये लोमडी आती है, इन्सान को तकलीफ नाही देती” आणि मग पुढे उसाची शेती संपे पर्यंत ती बाई माझ्या सोबत होती. पुढे एका मारुती मंदिरा जवळ मी थांबले आणि ती निघून गेली. त्या मंदिरापाशी कमालीची शांतता होती. बाम्बू च्या झाडांमुळे थंडही वाटत होतं. मी हनुमान चालीसा म्हंटली, थोडा आराम केला आणि पुढे निघाले. आतापर्यंत मला नेटवर्क नव्हतं मात्र थोडं पुढे गेले आणि मांगीलाल वर्मा यांचा फोन आला “दीदी कहां तक पोहोचे? हनुमान मंदिर दूर से दिख जाये तो बताना, मै लेने आ आउंगा” मी मन्दिराहून पुढे आल्याचं मी सांगितलं तसा तो तातडीनं मला घ्यायला आला. तो गाडीवर आला होता आणि मी पायी. त्यांनी मला गावापर्यंत सोबत केली आणि मग चित्रा ताई आणि सुरेखा ताईला घ्यायला गेला. लेने क्यू आये ? विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा उभा राहिला. ज्या हनुमान मंदिरा पाशी मी १५ मिनिट थांबले होते तिथेच आदल्या दिवशीच एका महिलेवर बिबट्या ने हल्ला केला होता. तो बिबट्या जखमी असावा असा गावक-यांचा अंदाज होता आणि म्हणून च एकट्या दुकट्या ने तिथून जाऊ नये असे गावक-यांचे मत होते आणि हेच सांगायला मांगीलाल मला सतत फोन करत होता. मला दचकायला झालं तेव्हा ती बाई अचानक आली होती मागून… खुसफुस पण ऐकली होती मी.. पण मैयांनी मला भिती वाटू दिली नाही आणि ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता तिथे मी अगदीच निवांतपणे बसून हनुमान चालीसा म्हंटला होता….हे सर्व काय आहे याचा विचार करण्यापेक्षा आलेला अनुभव अनुभवून मैयाला हात जोडणं मला जास्त सोपं आणि सुखकर होतं.मैया आपल्या सोबत आहे याची खात्री पटत जात होती.
*मांगीलाल ला माझा फोन नंबर अविनाश कडून मिळाला. अविनाश जे अन्नछत्र चालवतो त्यातलं एक लेप्याला आहे. मांगीलाल या अन्नछत्राची पूर्ण जवाबदारी सांभाळतो आहे. इथे मांगीलाल ने जो पाहुणचार केला त्याला तोड नाही. दालाबाटी बटाटे वडा आणि भात असा हा बेत होता. इथे मध्यप्रदेशात शाही पाहुणचार म्हणजे दाल बाटी हे ठरलेलं आहे. खूप आपुलकीनी मांगीलाल आणि परिवाराने आमची सेवा केली. परिक्रमावासी म्हणूनच नाही तर आपल्या लेकी सारखं त्या माई नी आमचं केलं. माहेरवाशीण कशी बागडते माहेरी, तसं तिथे आमचं होत होतं. आता पुढे जाणं भाग होतं. दुस-या दिवशी मी आणि सुरेखा ताई पुढे निघालो. कालचा बिबट्या चा प्रसंग ऐकून चित्रा ताई फार घाबरली होती. तिनी पुढचा प्रवास गाडीनी करण्याचा निर्णय घेतला शाली वाहन पर्यंत तिला मांगीलाल नी गाडीवर सोडून दिलं. मात्र या पुढच्या प्रवासात जे अनुभव आम्हाला आले ते चित्रा ताई अनुभवू शकली नाही याचं वाईट वाटत राहिलं. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असे अनुभव येत असतात हे महत्वाचं. त्यात आपला काहीही सहभाग नसतो. पुढचा अनुभव-भाग-९.
*नर्मदे हर.*
©सुरूची नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply