✳️✳️दिन विशेष-भाग-४✳️✳️ आज ३० जून भारताचे थोर नेते,अर्थतज्ज्ञ दादाभाई नौरोजी यांचा आज १०६ वा स्मृतिदिन🙏 – बडगुजर. इन

✳️✳️दिन विशेष-भाग-४✳️✳️
आज ३० जून
भारताचे थोर नेते,अर्थतज्ज्ञ दादाभाई नौरोजी यांचा आज १०६ वा स्मृतिदिन🙏
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला.
वडील नौरोजी पालनजी दोर्दी आणि आई माणेकबाई. दादाभाई चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीतही माणेकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण घेण्यास उद्युक्त केले. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय यांमधून शिक्षण घेऊन १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. १८५० साली एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होत.
दादाभाई १८५५-५६ च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले. १८६५-६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५ साली लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्या समवेत दादाभाईंनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापली. १९०७ पर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. १८६२ मध्ये दादाभाई ‘कामा अँड कंपनी’ तून बाहेर पडले आणि त्यांनी ‘दादाभाई नौरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःचीच कंपनी उभारली. १८७३ मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे (फॉसेट कमिटी) दादाभाईंनी साक्ष दिली.
ही समिती देखील त्यांच्या परिश्रमांचेच फलित होते. भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारे मधील दादाभाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेले भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. निरनिराळी मंडळे, समित्या व संस्था ह्यांमधून त्यांनी दिलेली व्याख्याने दादाभाई नौरोजीज स्पीचेस अँड रायटिंग्ज ह्या शीर्षकाने ग्रंथनिविष्ट झाली आहेत.एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता.जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला.’द स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ह्या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या.अशा या महान अर्थशास्त्रज्ञाचे ३० जून १९१७ रोजी निधन झाले.
दादाभाई नोरोजींच्या १०६ व्या स्मृतिदिनी निमित्त विनम्र अभिवादन.🙏🌹🙏

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*