२७ मे – थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आज स्मृतिदिन.! – बडगुजर. इन

आज २७ मे – थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा आज स्मृतिदिन.!
लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत,संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते.त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर याठिकाणी झाला.
लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले.तेथे केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले.सन १९२३ साली कोलकात्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली.इंग्लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांचा स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला.
प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते.ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. परिणामतः राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा या वातावरणातून शास्त्रीजींना लाभली.महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदुधर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले.१९३० व १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना दोन्ही वेळी ६-६ महिन्यांचा कारावासही भोगावा लागला.तर्कतीर्थांच्या नेतृत्वाने प्राज्ञ पाठशाळेला एका व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्राचे स्वरूप लाभले.वाईमध्ये हरिजन विद्यार्थ्यांचे वसतिगृह,हातबनावटीचा कागद कारखाना,अद्ययावत मुद्रणालय इत्यादी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे अमलात आणले.
वाईच्या महाविद्यालयाचेही ते संस्थापक-सदस्य होते.प्राज्ञ पाठशाळेतर्फे धर्मकोशाच्या संपादनाचे मौलिक कार्य त्यांनी हाती घेतले. या कोशाचे ११ खंड प्रसिद्ध झाले असून त्यांत कुटुंबसंस्था,हिंदुसंस्कार,जाती, विवाह,मालमत्ता याचप्रमाणे हिंदुधर्मविधी,नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान इत्यादी विषयांसंबंधी प्राचीन शास्त्रांतील ग्रांथिक माहिती व्यवस्थितपणे संकलित केलेली आहे.शास्त्रीजींनी व्याख्याने,परिषदा इत्यादी निमित्ताने भारतभर प्रवास केला.अमेरिका,ब्रह्मदेश, रशिया तसेच यूरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यांनी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून किंवा स्वतंत्रपणे निमंत्रित म्हणूनही भेटी दिल्या.भारतीय संविधान संहितेचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले.
थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्री यांचे पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*