“घर”- लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

‘घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती’
पण मग कसे असावे घर? घर म्हणजे काय? मी आणि माझे कुटुंब, म्हणजे फक्त मी, हम दो हमारा/हमारी एक, एवढेच आणि यांचा निवारा म्हणजे घर का? घर आणि कुटुंब या एकमेकांशी जवळीक असणाऱ्या गोष्टी. घरात राहणाऱ्या कुटुंबामुळे घराला घरपण येत असते. पण हल्ली कुटुंब फक्त कागदोपत्री राहिले आहे असे वाटते. दोघं नोकरीला, मुलगा किंवा मुलगी शाळा- क्लास इत्यादी मध्ये कायम गुंतलेले. नोकरी निमित्त परगावी असल्यास आई-वडिल गावी, त्याची विविध कारणे, काही खरी काही खोटी, अस एकंदरीत चित्र. बर जे कुटुंबातील सदस्य आहेत तेही फक्त रात्रीची झोप टाळता येत नाही म्हणून तेवढ्यापुरते एकत्र! अन्यथा प्रत्येक जण स्वतंत्र, प्रत्येकाचे मोबाईल विश्व वेगळे! एखादी गोष्ट मोबाईल वरील सगळ्या ग्रुपला माहित झालेली असते पण घरात कुणालाच सूतराम कल्पनाही नसते, अशी स्थिती आहे. घराचे घर पण पूर्णपणे जाऊन ब्लॉकचे बंदिस्त जीवन आले, खुराड्या सारखं जगणं झाले. एकंदरीत जगणं हे एक यांत्रिक काम झाले आहे. माणूस हा यंत्राप्रमाणे चालतोय. सगळ्या वेळा ठरलेल्या. त्यासुद्धा मोबाईल कडून नियंत्रित! इतर कुणाचे काही चालत नाही.


घरात कोणी काही सांगितलं ते ऐकण्याची शक्यता कमीच पण तेच मोबाईलवर काही ऐकण्यात आले की लगेच त्यानुसार वर्तन करायला तयार! कुठे हरवलयं घराचे घरपण? जन्माला आलेल्या नव्या जीवाला आपुलकीचा जिव्हाळा, माया, ममता, वात्सल्य हे मिळणे कठीण झाले आहे. त्याऐवजी त्याच्या आजूबाजूला मोबाईलचे फ्लॅश आणि शक्य झाल्यावर हातात मोबाईलच मिळतो. आमचा बाळ्या किती छान मोबाईल ऑपरेट करतो याचं कौतुक पाहून भविष्यातील अंध:काराविषयी शंका निर्माण होते. पण हल्लीच्या हुशार पिढीला शिकवणार कोण? मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाला काही सांगण्यास, समजवण्यास अर्थच राहिलेला नाही. प्रत्येक जण आपणच हुशार आणि आपल्याला सर्वच समजत याच न्यायाने स्वतःला हवं तसं वागण्याचा प्रयत्न करतो म्हणण्यापेक्षा तसेच वागतो. ते मूल थोडं मोठं झाल्यावर शाळेत प्रवेश, अभ्यासाचा आटापिटा, आपण त्या वयात काय करीत होतो याचा पूर्णपणे पडलेला विसर, हल्ली खूप स्पर्धा आहे, असे पूर्वी नव्हते हा युक्तिवाद आणि हे करताना मुलांची होणारी गळचेपी किंवा आमचा एकच दिवटा/दिवटी आहे म्हणून होणारे विरुद्ध टोकाचे अतिलाड! या मधला सोयीस्कर मार्ग दुर्लक्षितच! एखाद्याने तोही मार्ग स्वीकारलाच तर मुलांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे शेवटी कोणत्याही मार्गाने अपयश पदरी पडते असे चित्र दिसते आणि शेवटी अपेक्षाभंग होतो. एकंदरीत यात दोष कुणाचा हा न सुटणारा प्रश्न! एकंदरीत आई-वडिलांचा कुटुंब आणि कुटुंबाविषयीचा दृष्टिकोन हा पूर्णतः बरोबर आढळत नाही. प्रत्येकाची संकल्पना बहुतांश वेगळी आणि अपूर्ण असल्याचे दिसून येते आणि त्यातून पुढे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात आणि परिणामी सुख, समाधान, आनंद, आपल्यापासून बराच दूर असल्याचे आढळून येते. एकंदरीत आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा सयुक्तिक आढळत नाही किंवा त्याविषयी आपल्याला जन्मापासून मिळत आलेले ज्ञान तेवढे हितकारी नाही किंवा परिपूर्ण आयुष्याची संकल्पना त्यातून विकसित होत नाही. त्यामुळे पूर्वी दिले जात असणारे शिक्षण जेवढे परिपूर्ण अनुभवसंपन्न होते तसे आताचे शिक्षण अनुभव विरहित असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा शिक्षण म्हणजे काय? उपयुक्त शिक्षण कोणते? ते कसे द्यावे असे शिक्षणाविषयी प्रश्न निर्माण होतात. आपण त्याकडे केवळ आर्थिक सुबत्ता मिळवण्याचा मार्ग म्हणून पाहिले असता आपले आयुष्य दिशाहीन होत असल्याचं दिसून येते. एकंदरीत आपल्या पूर्वजांनी अनेक अध्यात्मिक ग्रंथातून दिलेले ज्ञान खूपच उपयुक्त, मार्मिक आणि परिपूर्ण आहे. पण अध्यात्म हा साठी ओलांडल्यानंतरचा विषय आहे असे त्याकडे पाहिले जाते, तसा चुकीचा समज आहे आणि इथून आपल्या अधोगतीला सुरुवात होते, असे मला वाटते. खरं पाहता हे सर्व ज्ञान शिक्षणामध्ये समाविष्ट होण्याची खरी गरज आहे. किंवा त्यापेक्षा सोपे घरातूनच सर्व शिक्षण दिले गेले पाहिजे. संस्कार व ज्ञानाच्या काही गोष्टी मुलांना आई- वडिलांकडून देणे अत्यावश्यक आहे. मुलांच्या संगोपनातील एक महत्त्वाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमात वेळ नसणे, हे तितकेसे सयुक्तिक कारण ठरत नाही. एकंदरीत घराचे घरपण हरवण्यास आपण प्रत्येक जण जबाबदार आहोत. आपल्या शिक्षणाविषयीचा चुकीचा समज, स्पर्धायुक्त जीवनाची धावपळ, त्यामुळे चुकीच्या मार्गाने होणारी पळापळ, यातून आपले जीवन दिशाहीन झाले आहे त्यासाठी प्रत्येकाने याबाबत चिंतन करण्याची गरज आहे. तरच आपल्या जीवनाला आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्यास यशस्वी ठरू शकतो.

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

2 Comments

Leave a Reply to Dr Dilip Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*