“महिला कर्तृत्ववान आहेत का?” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

महिला कर्तृत्ववान आहेत का? हा विषय जरा विचित्र पण विचार करायला लावणारा आहे. कर्तृत्ववान म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ? इथे कर्तृत्व मोजण्याची आजकाल प्रत्येकाची वेगळी पध्दती आहे. अनेक निवडणूका एकाच पक्षात राहून जिंकणाऱ्याला कर्तृत्ववान म्हणायचे की प्रत्येक निवडणूक नविन पक्षातून लढून विजयी होणाऱ्याला? की कायम अपक्ष राहून निवडणूक जिंकून पाहिजे त्याला पाठिंबा देऊन स्वार्थ साधणाऱ्याला कर्तृत्ववान म्हणायचे? असाच काहिसा संदिग्ध हा प्रश्न वाटतो. आपल्या इशाऱ्यावर नवऱ्याला नाचवणाऱ्या स्त्रियांना कर्तृत्ववान म्हणावे की नवऱ्याच्या इशाऱ्यावर नाचूनही आपल्या कार्याचा ठसा चिरकाल स्मरणात राहिल असे कार्य करणाऱ्या महिलांना कर्तृत्ववान म्हणावे? की आणखी काही? एकंदरीत प्रश्न संदिग्ध आहे पण उत्तर शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न

महिला कर्तृत्ववान आहेत का? अर्थातच होय. मातोश्री जिजाऊच्या राज्यात हा प्रश्न पडतोच कसा ? सावित्री बाई फुलेंपासून अंतरळारवीर कल्पना चावलापर्यंत आणि अशिक्षित, पण प्रतिभासंपन्न बहिणाबाई पासून पंतप्रधान प्रतिभाताई पाटील यांचेपर्यंतचा प्रवास पाहिल्यावर महिलांच्या प्रगतीविषयी, कर्तृत्वाविषयी शंका ती कोणती ? राणी लक्ष्मीबाईंचा लढाऊ वारसा असणारे एक ना अनेक सुपुत्र ज्या मातांनी या भरतभूमीला दिले त्यांच्याविषयी असा प्रश्न निर्माण होतो याचे थोडे अप्रूप वाटते. पण सत्य बोचरे असते हेही तितकेच खरे आहे असाही विचार मनाला स्पर्श करुन जातो आणि मन सुन्न होते. एकंदरीत स्त्रीची कर्तृत्ववान भूमिका ही एक ‘मातेची’ तसेच कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या एका ‘पत्नीची’. आजपर्यंत भारताचा जो काही विकास झाला आहे तो केवळ कोणत्यातरी मातेने घडवलेल्या कर्तृत्ववान मुला किंवा मुलीमुळेच ! आज जगभरात कुठेही जो काही आपला कर्तबगारीचा झेंडा फडकतो त्यामागे असलेल्या ‘कर्तृत्ववान स्त्री’ मुळेच यात तिळमात्रही शंका नाही, तसेच नव्या पिढीला संस्कारातून घडवणारी स्त्री आज पैसा, प्रसिध्दी, गरजांची पूर्तता यासाठी पतीच्या खांदयाला खांदा लावून अर्थाजन करते आहे. एका दृष्टीने कर्तृत्ववान ठरते आहे पण एका गोष्टीला न्याय देता-देता दुसऱ्या गोष्टी मात्र हातातून निसटत आहे. आपल्या मुलामुलींना संस्कार देण्यात कमी पडत आहे. गरजेमुळे, परिस्थितीमुळे आई-मुलांमधील दुरावा वाढत आहे त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा कमी होत आहे. संस्काराअभावी नवी पिढी दिशाहीन होत आहे. नको त्या संस्काराचे लोण वाढत आहे. एकलकोंडा स्वभाव, त्यामुळे एकमेकांविषयीचा आदर कमी होत आहे. ‘पैशाने सर्व काही मिळवता येते’ या विचारसरणीचा प्रभाव वाढतो आहे. याला स्वतः ‘आई’तील महिलाच बऱ्याच वेळा जास्त कारणीभूत ठरत आहेत, हेही वास्तव आहे. अनेक प्रकारची घुसमट, कुचंबणा, उपासमार, अत्याचार सहन करुनही ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ अशी परिस्थिती असूनही असीम त्याग, संयम, तीव्र सहनशक्ती यांच्या सहाय्याने एखादयाच्या खांदयाला खांदा लावून अर्थाजन करणारी स्त्री हीच आजच्या अंध:कारातून उद्याची पहाट खुलवू शकते. एक स्त्रीच आपले आजचे स्वप्न उद्या प्रत्यक्षात उतरवू शकते हेच खरे. एकंदरीत,
या जगी जन्मास यावे
स्वतःसाठी ते काय जगावे
सुख-दुःख ते द्यावे घ्यावे
इतरांसंगे सूर जुळावे
आहे सगळे सोबती क्षणाचे
नाही इथे काही स्वत:चे
तुझे नी माझे नसे कुणाचे
आहे सर्व क्षणकाळाचे
तोचि देतो तोचि घेतो
तोचि फुलवितो आणि झुलवितो
का व्यर्थ क्षण दवडावे
असेल त्यातच धुंद लहरावे
धुंद होऊनि प्रेममय व्हावे
सुगंधासि या जगी अर्पावे
अशी एकंदरीत स्त्री कहाणी असेल तर तिला कर्तृत्ववान म्हणावेच लागेल ना ? आणि म्हणूनच तिला हे नम्र अभिवादनही….!!!

लेखक – कवी विभास/ कैलास भाऊलाल बडगुजर
३०४, अमृत सिद्धी संकुल, टिटवाळा (पूर्व)
तालुका – कल्याण, जिल्हा – ठाणे
भ्रमणध्वनी 8888284265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*