माझा भारत ‘सुंदर’ केव्हा होईल ? – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

एक विचार

भारत माझा (कधी-कधी) देश आहे. मी भारतीय असल्याचा मला (फक्त) अभिमान आहे. लहानपणी शाळेमध्ये म्हटलेल्या प्रतिज्ञेतील यापुढील वाक्य फारशी आठवत नाही. तशी लक्षात ठेवावीशी वाटत नाही आणि तसा प्रयत्नही केला नाही कारण मला सगळे कसे ‘स्वच्छ, सुंदर’, ‘सहज’ उपलब्ध आहे. पारतंत्र्याचा अनुभव असल्यामुळे कदाचित स्वातंत्राचे महत्त्व कळलेच नाही, हेच खरे असावे. अनुभवा-सारखा गुरु नाही हेच खरे नाही का?

माझा भारत स्वच्छ, सुंदर, सुजलाम, सुफलाम असावा, असे (फक्त) मला वाटते. पण भारताचा नागरीक या नात्याने माझेही काही कर्तव्य आहे याचा मला (अगदी) सहजपणे विसर पडतो. म्हणूनच वरच्या मजल्यावरून किंवा घरातून बाहेर पडताना कच-याची पिशवी (अगदी सहज रस्त्याच्या कडेला टाकतो, बाजारात भाजीपाला घ्यायला जाताना ‘आठवणीने’ कधीच पिशवी घेऊन जात नाही. आणि मग त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी पावसाळ्यात गटारी तुंबल्याने शहरात सर्वत्र पाणी झाल्यावर वरून बोंब आणि मनोमन सुट्टी मिळाल्याचा एक वेगळाच आनंद मनात असतोच. फार कशाला उन्हाळ्यामध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाला रंगीबेरंगी पिशव्यांची अनेक फळे लटकलेली पाहून मी चकितही होतो, असो.

मी माझ्या मुलांवर संस्कार (चांगले?) करतो. ती चांगली शिकावीत म्हणून काबाडकष्ट करतो. त्यासाठी अगदी सारं काही (प्रसंगी कॉपीसुध्दा) पुरवितो. आपला तो बाळ्या आणि शेजारच कारटं या न्यायाने त्याचे लाड पुरवितो. नको नको त्या गोष्टींना महत्त्व देऊन, त्याचा बौद्धिक, शारिरीक, मानसिक विकास करण्याऐवजी भौतिक सुविधा (मोबाइल….) पुराविण्याकडे माझा जास्त कल असतो. एकंदरीत त्याच्यासारख्या सुपुत्राला जन्म देण्याचा मला अभिमान असला तरी त्याला बिघडवण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. आणि तो बिघडल्यावर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या न्यायाने तो सभोवतालच्या परिस्थितीने बिघडल्याचा आव मी आणत असतो.

त्याचे शिक्षण झाल्यावर (ओळखी-पाळखीने, रिझर्वेशन सीटमुळे, डोनेशन भरून) तो कामाला चिकटल्यास मला आनंद होतो. सरकारी नोकरी असल्यास तर मी बेहद खुश होतो. इमाने इतवारे नोकरी केली तर आनंद आहे, पण पगाराव्यतिरीक्त इतरही मिळकत असल्यास मला जास्त आनंद होतो. ती मिळकत कशी येते ते विचारण्याचे धारिष्टय माझ्यात नसते किंवा तशी गरज मला वाटत नाही. माझा मुलगा ऑफिसमध्ये सही करून (फक्त) दिवसभर इतर उद्योग जास्त करतो हे सांगताना मला विशेष कौतुक वाटते किंवा फारसे दुःखही होत नाही. माझा मुलगा खूप कष्ट न करता खूप काही कमवितो यामध्ये मला त्याची हुशारी दिसते किंवा तो तसे करत नसेल तर तो मला निर्बुध्द, आळशी वाटतो. तो फारच प्रामाणिक असेल तर मला त्याच्या भविष्याची काळजी वाटते. पुढे त्याचे कसे होणार ही चिंता मनात घर करते. माझा मुलगा पोलिस असेल व लोकांकडे हप्ता मागत असेल तर मला त्यात वावगे वाटत नाही. कारण रस्त्यावर दुकान टाकून किंवा इतर अनेक मार्गानी लोक कायद्याचा भंग करीत असतात. त्यामुळे दंड म्हणून त्यांच्याकडे हप्ता मागण्यात कसला आलाय कायदेभंग? आणि अनेक बेकायदेशीर कामे करणा-या राजकारणी लोकांना तर आम्ही कायदेशीर व सरकारतर्फे सुरक्षा पुरवितोच ना ? त्याबद्दल सरकार पोलिसांना किती तुटपुंजा पगार देते? अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. अर्थात पांघरुणच तोकडे आहे त्यामुळे एकीकडे झाकलं की दुसरं अंग उघडं पडतच, त्याची लाज कशी बाळगायची ?

माझ्या मुलीच्या लग्नाला मुलावाल्यांनी हुंडा मागू नये, कारण माझी मुलगी सुंदर व शिकलेली आहे. पण मी मात्र माझ्या मुलासाठी हुंडा मागायला मोकळा आहे. कारण माझा मुलगा गुणसंपन्न आहे आणि समोरच्या मुलीवाल्यांना माझ्या मुलासारखा दुसरा जावई मिळणारच नाही. माझ्या मुलीला सासरच्यांनी सासुरवास करू नये. आमच्या घरी मात्र सर्व आवश्यकच आहे. सुनेला वळण लावायचे आहे. ती इथे नवीन आहे. म्हणून तिला तसे वाटते. वगैरे वगैरे

एकंदरीत मीच माझ्या मुलाच्या जीवनाचा शिल्पकार असून माझा मुलगा जेव्हा मला सांभाळणार नाही. बेघर करीन तेव्हा मात्र मला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होण्याची वेळ येवू शकते. मात्र माझ्या महान भारत देशाचा आदर्श नागरीक घडविण्यासाठी एवढा त्याग करणे क्रमप्राप्तच नाही का? माझा भारत देश ‘सुंदर, आदर्श, महान होण्यासाठी त्या भारताचा एक भाग, एक नागरीक या नात्याने मीही असे ‘महान’ असले पाहिजे, नाही का ?

जय हिंद !

कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा भ्रमणध्वनी 8888284265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*