शैक्षणिक गुणवत्ता विकासाला जबाबदार कोण ? – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, जळगांव

गुणवत्ता हा संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा वैशिष्ट्य होय. गुणवत्ता ही व्यक्तिनिष्ठ असली,तरी सुद्धा ग्राहकांचे परिपूर्ण समाधान हेच गुणवत्तेचे पूर्णतः निर्धारक घटक असतात. शैक्षणिक गुणवत्तेला कारणीभूत असलेल्या घटकांचा विचार करतांना त्या शाळेतील भौतिक संसाधने व संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व समाज हे घटक डोळ्यासमोर येतात. या घटकांच्या कृतिशील कार्य प्रवृत्तीवरच शाळेची गुणवत्ता ही अवलंबून असते.

शाळेच्या भौतिक साधने व सुविधांच्या कमतरतेचे गोडवे न गाता उपलब्ध साधन सामग्रीचा नियोजनपूर्वक व महत्तम उपयोग करण्यावर भर दिला गेला पाहिजे. शाळेत प्रोजेक्टर असून त्याचा उपयोग एखाद-दुसरा शिक्षकच करत असेल तर अशी महागडी साधने नंतर धूळ खात पडतात.ग्रंथालय हे शालेय समृद्धीचे प्रतीक असतात. ग्रंथालयातील ग्रंथांचा प्रयोगशाळेतील उपकरणांचा किती शिक्षकांनीआणि विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययन व अध्यापनात उपयोग केला हे महत्त्वाचे आहे.आधुनिक काळात नष्ट होणारी वाचन संस्कृती वाढवावी. मुख्याध्यापक हा संस्था आणि शासन यातील दुवा असतो. कुठल्याही व्यक्तीपेक्षा संस्था श्रेष्ठ असते. मुख्याध्यापकांनी व्यवस्थापक मंडळाशी संघर्ष येऊ देणे म्हणजे त्यांनी स्वतःची अकार्यक्षमता मान्य करणे असते.
शैक्षणिक गुणवत्ता विकासातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी होय. त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वातूनच शाळेचे व्यक्तिमत्व झळकत असते. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शाळेवर असते.या गुणांचा विकास करण्यासाठी शाळेने सहशालेय व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे.


केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानाला प्राधान्य न देता,आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक शाळाबाह्य परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवुन शाळेचा नाव लौकिक वाढवला पाहिजे.
विद्यार्थ्यांना शिक्षक व शाळा अखंड भरभरून देत राहील व विद्यार्थी ओंजळ भरभरून घेतील असे शालेय वातावरण हवे. शिक्षकांचे आचरण सुद्धा आदर्शव्रत असले पाहिजे शिक्षक वर्गाबाहेर, शालेय परिसरात व शाळेबाहेर, समाजात कसा वागतो ? त्यातून शिक्षकांचे मूल्यांकन तो करत असतो. योग्य आदर्शामुळे जीवन गंधित होते. मनाचा विकास होतो. दृष्टी विशाल बनते. संकुचितता गळुन जाते, आणि मन निर्मळ बनते.जर त्याचे आचरण व कर्तव्य नैतिकतेने समृद्ध असेल तर तो आपल्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. विद्यार्थ्याने पर्यावरणातून, समाजातून अवगत केलेले ज्ञान, कला आणि क्रीडा कौशल्यांच्या प्रकटीकरणाची संधी शाळेने दिली पाहिजे.
विद्यार्थ्यांचे अध्ययन गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करावे. तपश्चर्या शिवाय कर्तुत्व सिद्ध होत नाही.नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की यशाचे गमक हे यशच असते .विद्यार्थ्यांच्या शिस्तीतून शाळेचा आरसा प्रतिबिंबित होत असतो. अशा वेळेस शिक्षकांना योग्य तो मान देणे, गुरुजनांच्या आज्ञेचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य आहे याची जाण त्याला व्हायला हवी.

शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासाची सर्वतोपरी जबाबदारी पार पाडणारा व नामानिराळा घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षकासाठी एज्युकेटर हा शब्द वापरला जातो. परंतु तो शब्द फार व्यापक असून इतर सर्व घटकांचा समावेश त्यात होतो. मात्र शिक्षकाचा समावेश होत नाही.प्राचीन भारतीय संस्कृतीत शिक्षक धर्माला हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. अनेक वर्षापासून शिक्षकांच्या भूमिकेला बदलत्या व गतिमान काळामुळे आव्हाने मिळत आहेत. ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ व यामुळे भार वाढला आहे. केवळ अध्ययन-अध्यापन हेच शिक्षकाचे काम न राहता समाज जीवन समृद्ध करणारी नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन ठेपली आहे. यासाठी नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन केले पाहिजे. अन्यथा समाज स्वास्थ्य हानिकारक झाल्याशिवाय राहणार नाही.
नवीन अभ्यासक्रम गठित करत असताना शाळेतील किती शिक्षक आपले त्यावरील मत व्यक्त करत असतात ? नोंदवत असतात.? शिक्षकांना सतत अध्ययनशील राहून नवनवीन विचार व कल्पना आत्मसात कराव्या लागतील . यासाठी त्याने पाठ्यपुस्तका बाहेरील व्याप्ती कडे लक्ष दीले पाहिजे.अशा अध्ययनरत समाजाचे अभ्यास केंद्र म्हणून शाळा जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा खऱ्या अर्थाने शैक्षणिक विकास साधेल.

संगणकामुळे माहिती संग्रहण व संशोधन अधिक सोयीस्कर झाल्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये नॅनो-तंत्रज्ञानाचा उदय झालेला आहे. आजच्या युगाला पिटर ड्रकर यांनी द एज ऑफ डीसकंटिन्युटी म्हणजेच अनिश्चित्तेचे युग असे म्हटले आहे.तर टॉफलर यांनी सुद्धा उगवणारा प्रत्येक नवा दिवस हा माणसाला फ्युचर शॉक देणारा ठरणार आहे असे मत व्यक्त केले आहे. कोरोणाच्या महामारीने नवनवीन तंत्र साधनांच्या माहितीचे दालन शिक्षकांना उघडे करून दिले. त्यापैकी किती एप्सचा आपण प्रत्यक्ष उपयोग करत आहोत ? शिक्षकांची जबाबदारी आज वाढली त्याने यंत्र साधन रुपी हार्डवेअर चा उपयोग करण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती केली पाहिजे.


आपल्या विषयातील नवीन तंत्रज्ञानाची कौशल्य शिकवित असताना ती आपण आत्मसात केली आहेत का ?इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गांना ई-मेल ब्लॉग रायटिंग शिकवीत असतांना.आज किती शिक्षकांचे स्वतःचे ब्लॉग, स्वतःची यूट्यूब चैनल, स्वतःची वेबसाईट आहे ?आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. आपला निबंध, संशोधन किंवा एखादा लेख शैक्षणिक मासिकांमध्ये आला पाहिजे म्हणून किती शिक्षक धडपड करतात ?निबंध, वकृत्व, सृजनात्मक अध्ययन-अध्यापन स्पर्धांमध्ये किती शिक्षक सहभागी होत असतात ?.प्रत्येकाला मिळालेले गुण म्हणजे जन्मजात दैवी संपत्ती असते असे नाही. तर ते गुण आत्मसात करणे सहज प्रयत्नसाध्य आहे.
शिक्षक समूहातील एक कायमस्वरूपी चिघळत जाणारी जखम म्हणजे वरिष्ठ कनिष्ठ ,सीनियर जुनियर हा मतभेद होय.खरंतर आपण वरिष्ठ किंवा सीनियर म्हणून जेव्हा मिरवत असतो, तेव्हा त्याचा अर्थ प्रगल्भतेशी जोडला गेला पाहिजे. जो जेवढा वरिष्ठ तेवढ्या वरच्या पातळीवरील जबाबदारी व कर्तव्य त्याने स्वीकारली पाहिजेत आणि आपल्या वर्तनातून व समृद्ध प्रगल्भतेतून इतर सहकार्‍यांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. परंतू”आम्ही हेच करत आलो आहोत आता आमचे वय झाले आहे” ,म्हणून कोणतीही जबाबदारी कनिष्ठांकडे सोपवण्याची प्रवृत्तीच अधिक दिसून येते. व्यक्तीच्या गुणवत्तेला आणि प्रगतीला वेळ, काळ, स्थळ आणि वयाची मर्यादा नसते. त्यासाठीचे स्वातंत्र्य,संधी व प्रोत्साहन मात्र त्याला मिळायला हवे. नवीन उपक्रमांची, योजनांची आखणी करतांना जुनिअर व्यक्तीला सुद्धा मत मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. कारण पिंडा पिंडा मती भिन्न असते.

5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा उद्देश सांगताना मधुकरराव चौधरी यांनी””हा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे बलशाली समाजाच्या व तेजस्वी राष्ट्राच्या निर्मितीचे महान कार्य करण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांनी अंगीकारली आहे त्यांच्या कल्याणाविषयी सर्व समाजाने काहीसे अंतर्मुख होऊन चिंतन करावे “” परंतु या दिवसाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाच्या औपचारिकता पलीकडे काहीच केले जात नाही. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आडमुठे धोरणाने अडवणूक झालेल्या शिक्षकांची संख्या फार मोठी आहे. कोरोनासारख्या महामारीच्या आजारातून वाचलेल्या शिक्षकांच्या मेडिकल बिलासाठी सुद्धा टक्केवारीने मलिदा मागणाऱ्यांची कमतरता इथे नाही. अशा नैराश्याच्या वातावरणात गुणवत्ता फुलणार तरी कशी ? भ्रष्टाचाराने लिंपित झालेल्या हातांनी भ्रष्टाचार मुक्त भारत घडणार तरी कसा ?.
आतापर्यंत बघितलेल्या सर्व घटकांना एका माळेमध्ये बांधण्याचं काम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मुख्याध्यापक व यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासाला संपूर्ण तह: जबाबदार मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकच आहे. वरील सर्व घटकांचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्याचे सर्व वैधानिक व कायदेशीर अधिकार मुख्याध्यापकांना आहेत. परंतु हे नियंत्रण म्हणजे उद्दिष्टापासून दूर चाललेल्या कृती किंवा कार्यक्रमांना पुन्हा योग्य दिशेला आणणे असते. मुख्याध्यापक हा शिक्षकांचाच नेता असतो हे त्यांनी विसरू नये.

शाळेच्या दैनंदिन कार्याची विभागणी करताना मुख्याध्यापकांनी प्रत्येकाचे दायित्व घ्यावे. केवळ शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विविध समित्यांची निवड केली म्हणजे आपले काम संपले असे नाही. योग्य जागी योग्य मनुष्य हे धोरण राबविले पाहिजे. मतभेद टाळावे. कारण जरी मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण असले तरी त्याला मर्यादा असतात आणि कुणाबद्दल विपरीत कल्पना करण्याचा आपणास कुठलाही अधिकार नसतो.

शाबासकी शिवाय केलेली सेवा म्हणजे गुन्हाच असतो. एखाद्या शिक्षकाने चांगले काम केले असल्यास चारचौघांमध्ये,विशिष्ट कार्यक्रमांमध्ये त्या गोष्टींचा, त्या शिक्षकांचा गौरव किंवा नामनिर्देश होणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेवटी प्रत्येक व्यक्ती हा कौतुकाचा भुकेला असतो. मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला स्पर्श करून त्यांच्या सुख-दुःखात सतत सहभागी असले पाहिजे.

मुख्याध्यापकांनी सांगितलेले काम एखादा शिक्षक टाळाटाळ करत असेल तर त्यामागे त्या शिक्षकांमध्ये असलेल्या कौशल्यांचा अभाव हे कारण नसून, त्याचे खरे कारण संस्थेच्या कार्यप्रणालीत दिसून येते. असे मत एडवर्ड डेमिंग यांनी मांडले आहे. ती कारणे मिटवली पाहिजे. खलील जिब्रान च्या भाषेत सांगायचे झाल्यास वर्क इज लव, मेड विजीबल आपल्या कार्यावरील निष्ठा त्यांच्या आचार विचार व कृतीतून व्यक्त झाली पाहिजे.

प्रत्येक गोष्टीतील सौंदर्याचा शोध व आनंदाचा बोध घेण्याची रसिकवृत्ती त्यांच्यात हवी. अलीकडच्या काळात कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून प्रत्यक्ष वर्गावर शिकवणारा अध्यापन नैपुण्यधारक मुख्याध्यापक सापडणे दुरापास्तच आहे.त्यातून विषयाचे ज्ञान व शिकविण्याशी असलेली नाळ कायम ठेवता येते.विद्यार्थ्यांशी जवळीक साधता येऊन आपल्या सखोल व विस्तीर्ण ज्ञानाने इतर सहकार्‍यांवर प्रभाव टाकता येतो.

मुख्याध्यापकांचे पाठ निरीक्षण म्हणजे केवळ शिक्षकांना त्रास देण्याचे व बदला घेण्याचे अस्त्र न वाटता त्यातून शिक्षकांना आपल्या तोकड्या ज्ञानाची व चुकांची जाणीव होणे महत्वाचे आहे. यासाठी स्वतः त्यांनी आदर्श पाठाचे आयोजन करावे. शाळेच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेचे नेतृत्व मुख्याध्यापक करत असतो.शिक्षकांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आणि मायेने फिरवलेल्या हाताने सर्व काही साध्य करणे सोपे होते.शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीची, समर्पित शिक्षकांची ओळख शासनाला करून दिली पाहिजे. शिक्षकांमध्ये काही उत्कृष्ट लेखक, भाषणकार असतात. केवळ चार ओळींचा स्व मूल्यमापनाचा गोपनीय अहवाल भरून शिक्षकांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. शिक्षकांचे खुले वस्तुनिष्ठ आणि विश्वासनिय मूल्यमापन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांचीच आहे.यासाठी त्यांच्या संशोधन, लेखन,प्रकाशन,उच्च शैक्षणिक पदवीची किंवा सेवा हे घटकही विचारात घ्यावे. यासाठी शिक्षकांना नेहमी प्रेरित व प्रोत्साहित करून त्यांच्या संशोधनाचा उपयोग शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करून घ्यावा.

शैक्षणिक गुणवत्ता विकासातील सतत दुर्लक्षित राहिलेला परंतु तेवढाच महत्त्वाचा घटक म्हणजे समाज होय. परकीय देशांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या गरजा विचारात घेऊन अभ्यासक्रमाची रचना आपल्या भारतासामध्ये करणे कधी शक्य होईल? पूर्वीच्या काळी जीवन स्थिर होते. त्यामुळे शाळेचे स्वरूप सुद्धा मर्यादित होते. मात्र अलीकडील काळात समाजाच्या शिक्षणाकडून अपेक्षा वाढल्या आहेत यामुळे शाळा म्हणजे समाज परिवर्तनाचे साधन बनले पाहिजे. तर संस्थाप्रमुख हा त्या परिवर्तनाचा पाईक झाला पाहिजे. संपूर्ण जग आज वैश्विक खेडे बनले आहे. म्हणून “शाळा प्रत्येक घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे” असे विनोबा भावे यांनी म्हटले आहे ते यामुळेच. आपल्या मुलांमध्ये असलेले व आपल्याला न दिसलेले गुण शाळेने दाखविण्याचे अप्रूप पालकांना वाटायला पाहिजे. शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी ही शाळेची आहे असे पालक मानतात. परंतु दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ पाच तास आपला मुलगा शाळेत असतो हे मात्र तो लक्षात घेत नाही.

माध्यमिक शिक्षण आयोग 1952 मध्ये सुद्धा शाळा व लोकसमुदाय यांचा परस्परसंबंध जितका वाढेल त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना समाजाची, समाजाच्या गरजांची व समस्यांची जाणीव होईल असे म्हटले आहे. मुख्याध्यापकांनी हेतुपुरस्कर माजी विद्यार्थी, समाजातील समाजसुधारक, थोर नेते, यांच्या कार्याचा, तद्वतच विविध सामाजिक संस्थांचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता साधण्यासाठी करून घेतला पाहिजे. समाजातील लोक आपली ध्येय व उद्दिष्टे निश्चित करतात व त्यांची पूर्तता शाळेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतात. यासाठीच शाळेला समाजाची प्रतिकृती असे म्हणतात.

कोरोनामहामारीच्या पार्श्वभूमीवर, भविष्य काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या येणाऱ्या साथींच्या आजारांवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी शाळेने व समाजाने एकत्रित समाज प्रबोधन पर अशा कृती कार्यक्रमांची आखणी केली पाहिजे. समाजाचा शाळेतील सहभाग किती, कसा आणि कुठपर्यंत घ्यावा याविषयी अजूनही शिक्षण तज्ञांमध्ये एकवाक्यता झालेली दिसून येत नाही.पाठ्यपुस्तकातील पर्यावरण व औद्योगिक यंत्र कौशल्यांची माहिती क्षेत्रभेटी व सहलीतून देण्याचे सत्र मुख्याध्यापकांनी योजावे.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान अनुभवांमृत व त्याचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठीतांच्या मुलाखती आयोजित कराव्यात. मुख्याध्यापकांनी थोडे नियमा बाहेर गेले तरी चालेल. त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता साधण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र असली पाहिजे. आजच्या शिक्षक दिनानिमित्ताने ती इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये जागृत होवो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

लेखन – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर
( 9421184495 )

प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*