सा. युवा गर्जना संपादकीय युवा गर्जनाची दुसर्‍या तपपूर्तीकडे वाटचाल – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार


साप्ताहीक ‘युवा गर्जना’च्या प्रारंभाला आज तेरा वर्षे पूर्ण झाले असून आता हे साप्ताहिक १४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही तपपूर्तीची वाटचाल केवळ आणि केवळ आपल्या सर्व हितचिंतकांच्या, जाहिरातदारांच्या आणि मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ शकली म्हणून आधी आपल्या सर्वांचे जाहीरपणे आभार मानतो. आपण पाठबळ दिले आणि आपण सर्वांनी विश्‍वास वाढवला म्हणूनच साप्ताहिक ‘युवा गर्जना’ला दुसर्‍या तपपूर्तीची वाटचाल सुरु करणे शक्य झाले आहे. आवर्जून उल्लेख करावा ते असे, की कोरोना महामारीचे संकट सगळ्या व्यवसायांना उध्वस्त करणारे ठरले. मार्च २०२० पासून ऑक्टोबर २०२० पर्यंत प्रत्येकाला जीव मुठीत धरुन फिरावे लागले. परिणामी जगण्याचे तंत्र बदलले. शिवाय व्यवसायांचे रुळ बदलले. कोणी पटरीवरुन घसरले तर कोणाला अजुनपर्यंत पटरीच सापडलेली नाही. वृत्तपत्र क्षेत्राचे तर शब्दशहा बारा वाजले. माणूस माणसापर्यंत जाऊ शकत नाही म्हटल्यावर प्रिंट पोहोचणे अशक्यच होऊन बसले. मोठे वृत्तपत्र जेमतेम तगले. लहान वृत्तपत्र संपल्यात जमा झाले. आज जे काही जिवंत दिसत आहेत ते खरेतर आचके देत आहेत. सरकार किंवा लोकप्रतिनिधी नावाचं कोणीही वृत्तपत्रांच्या पाठीशी उभे राहिलेले नाही, ही मोठे शाेकांतिका आहे. म्हणूनच हजारो पत्रकारांवर बेकारीची कुर्‍हाड पडली. या सर्व पार्श्वभूमीवर आम्हाला ‘युवा गर्जना’हे साप्ताहिक वाचकांच्या हाती नियमितपणे देता आले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात महत्वपूर्ण माहिती देऊन सेवा बजावत आली. आई चामुंडा मातेच्या कृपेशिवाय हे शक्यच नाही, म्हणून आम्ही मातेचे त्रिवार आभार मानतो. आज वृत्तपत्र क्षेत्रात आधीपेक्षाही प्रचंड चिंताजनक वातावरण बनले आहे. घटलेला जाहिरातींचा ओघ, शासनाकडून जाहिरातींचे मिळणारे तुटपुंजे सहकार्य आणि व्यापारी व व्यावसायिकांनी तसेच जनतेनेसुद्धा वृत्तपत्राकडे फिरवलेली पाठ, याचा प्रत्येक दैनिकाला आणि प्रत्येक साप्ताहिकाला परिणाम भोगावा लागत आहे. विभागीय बड्या वृत्तपत्रांचे काय आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे काय, दुखणे आणि चिंता एकसारख्याच बनल्या आहेत. आवक घटली म्हटल्यावर वृत्तपत्रांना स्वतःचा खर्च काढणे अशक्य बनले आहे. दैनिक चालवणे किंवा साप्ताहिक चालवणे म्हणजे अकारण हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. स्वतःचा खर्च निघत नाही म्हटल्यावर नफा राहणे किंवा फायद्यात राहणे दूरचीच गोष्ट बनली आहे. अशावेळी सुज्ञान वाचकांनी आणि हितचिंतकांनी जाहिरात स्वरुपातील मदतीचा हात सढळपणे द्यावा; ही अपेक्षा करतो. तथापि मनातली आवड, जिद्द, काहीतरी करुन दाखवण्याची ऊमेद विचित्र असते. माणसाला कधीही दुःखांची, वेदनांची किंवा साहित्य साधनांच्या कमतरतेची जाणीव ती होऊ देत नाही. वाटेवर कितीही काटे बोचले तरी चालत राहण्याचे सुचवत रहाते. बळ देत रहाते. ‘युवा गर्जना’च्या वाटचालीचे हेच गमक आहे. पैसा कमावण्यासाठी किंवा दहशत माजवण्यासाठी ‘युवा गर्जना’ स्थापन झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार शहराच्या प्रश्नांना हात घालता यावा, विकासात्मक गोष्टींना प्रसिद्धी देता यावी, सकारात्मक दृष्टीकोन नागरीकांना प्रेरित करीत राहावा या दृष्टिकोनातून ‘युवा गर्जना’मधून सकारात्मक वृत्त प्रसारणाचे काम सातत्याने केले जात आहे. अकारण कोणाला त्रास देणे, बदनाम करणे किंवा धाकदपटशा दाखवून पैसा कमावणे या प्रकारची पत्रकारिता ‘युवा गर्जना’च्या माध्यमातून झालेली नाही. याला कारण आपण सर्व जाहिरातदार वाचक आणि आमचे हितचिंतक मित्र कारणीभूत आहेत. आपणा सर्वांचा आदरयुक्त वचक आमच्या कामावर राहिला आहे आणि तो तसाच पुढेही राहील याची आजच्या वर्धापन दिनानिमित्त ग्वाही देतो. आमच्या गळ्यात नंदुरबारचे लाडके नेते मा.श्री.चंद्रकांतजी रघुवंशी आणि अन्य राजकीय मित्रांच्या आशीर्वादामुळे स्वीकृत नगरसेवकपदी सेवा करता आली. सत्ताधारी गटात समवेत लोकहिताचे काम करण्याची संधी मला दिली गेली. याबद्दल त्या सर्वांचे आणि मित्र गणांचे जाहीर आभार मानतो. याचा उल्लेख मुद्दाम येथे करुन एक संपादक या नात्याने असेही नमुद करतो, की साप्ता.‘युवा गर्जना’ निपक्षपणे बातम्या देणे मात्र चालूच ठेवेल. आमच्या सकारात्मक पत्रकारितेला आपले बळ लाभत राहो, अशी अपेक्षा करुन पुन्हा एकदा सर्वांचे या वर्धापन दिनी आभार मानतो… जय हिंद, जय महाराष्ट्र!

1 Comment

  1. साप्ताहिक युवा गर्जना पत्रकाची १3 वर्ष सेवा होऊन १४ व्या वर्षात पदार्पण अनेक अडचणींचा सामना करून झाला कोरोना काळातही साप्ताहिक सुरु होते त्याबद्दल संपादक श्री दिलीप भाऊ बडगुजर व त्यांचा टिमचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply to Dharmendra Popatrao Badgujar sir Cancel reply

Your email address will not be published.


*