पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दत्तक योजनेतून शिष्यवृत्ती प्रदान…!

“एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ !” या वचनाप्रमाणे समाजातील गुणवान व प्रतिभावान विद्यार्थी कोणत्याही सामाजिक, आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी बडगुजर समाज सरस्वती मिशन टीम नेहमी सामाजिक कर्तव्य बजावत असते व अविरत कार्यही करीत असते.

      बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्था टीमने पूर्वी केलेल्या आवाहनानुसार ... शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पण आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडसर निर्माण होणाऱ्या समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मिशन टीमने विद्यार्थी दत्तक संकल्पना मांडली होती. 

      "विद्यार्थी दत्तक योजना" अंतर्गत या वर्षी सरस्वती मिशन टीम प्रतिनिधी सौ. स्वातीताई व डॉ दिलीप धोंडू बडगुजर, अमरावती यांनी  पितृछत्र हरपलेल्या व इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीच्या  पालकांच्या अकाउंटला या वर्षाची ₹ १००० ही आर्थिक मदत पाठवली. या समाजशील दाम्पत्याकडून ही शिष्यवृत्ती सदर मुलीस १२ वी पर्यंत देण्यात येणार आहे. 

      कु.हर्षदाच्या वडिलांचे  झाडावरून पडून अपघाती निधन झाले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात आईवर दोन्ही मुलांची जबाबदारी येऊन पडली. मिशन प्रतिनिधींना जेंव्हा ही बाब कळली, तेंव्हा एका मिशन प्रतिनिधीने वस्तुस्थिती जाणून घेतली. सदर कुटुंबाची परिस्थितीची हलाखीची असल्याची खात्री झाली. चर्चेअंती  सामाजिक कार्यकर्त्या सौ स्वाती ताई आणि डॉ दिलीप बडगुजर यांनी सदर मुलीस दत्तक घेतले.

      बडगुजर समाज हा उदार मतवादी व सत्पात्री दान देणारा समाज आहे. याची पुन्हा प्रचिती आली. कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले श्री बापू किसन बडगुजर यांनी याच कुटुंबातील लहान मुलाला दत्तक घेत या वर्षाची ₹११०० ही राशी त्या मुलाच्या पालकांच्या बँक खात्यावर जमा केली.

     सामुदायिक जीवनातील माणुसकी पर्व जपणाऱ्या या समाज हितैषी उपक्रमामुळे सामाजिक कार्याला एक गुणात्मक व सकारात्मक आयाम देण्याचा प्रयत्न होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे नैतिक बळ वाढविण्यासाठी निश्चितच ही जमेची बाब आहे.

       समाजातील जे गरजू आहेत, अशा मुलांसाठी सरस्वती मिशन टीम विविध उपक्रम राबवित असते. त्यास समाजातील दातृत्व मूल्य जपणाऱ्या समाज बांधवांकडून नेहमीच प्रतिसाद मिळत आलेला आहे.

      समाजात पितृछत्र हरपलेल्या गरजू कुटुंबाला सदर दत्तक योजनेतून मदत हवी असल्यास ती उपलब्ध करून दिली जाईल, असे आवाहन सरस्वती मिशन टीमकडून करण्यात येत आहे...!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*