कै.स्व. गोकुळ कौतिक बडगुजर यांना एका नातवाने वाहिलेली आदरांजली – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, चिंचोली

               एखादी व्यक्ती  आपल्या आयुष्यातून निघून जाणे  फारच दुःखद असते.मग ती व्यक्ती कोणीही असो. त्या व्यक्तीशी  असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही.  अशावेळी  भावनांना  केवळ अश्रुंवाटेच नाही तर  शब्दातूनही  मार्ग मोकळा करून द्यावासा वाटतो.  ती व्यक्ती गेल्यानंतर  शब्दांच्या भावनेतून  व्यक्त व्हावेसे वाटते.आयुष्याच्या एका वळणावर आपल्यापासून  कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत  आपल्या भावना  आपण व्यक्त  केल्याच पाहिजे. माझ्या जीवनातून  माझे आजोबा  स्वर्गीय  गोकुळ बाबा कायमचे दुरावले.  त्यांच्या आठवणीत त्यांच्यासाठी लिहिलेला हा भावपूर्ण  श्रद्धांजलीपर लेख होय. 
           माझे आजोबा ज्यांना सर्वजण प्रेमाने आण्णा म्हणायचे.  आण्णांचा जन्म 1937 च्या गोकुळाष्टमीला डांगरी तालुका अमळनेर येथे अत्यंत साध्या कुटुंबात हलाखीच्या परिस्थितीत झाला. चार भाऊ आणि एक बहीण अशा परिवारासोबत जीवन जगत असताना, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अण्णांनी संसारिक गाडा चालविण्यासाठी अनेक प्रकारची कामे केली. 

                 माझा जन्म झाला त्या दिवशी म्हणजे 15/7/1980 या रोजी आण्णांना सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे येथे रोडबिगारी म्हणून नोकरी प्राप्त झाली. आण्णा मोठ्या गर्वाने सांगायचे माझ्या नातवाचा जन्म माझ्यासाठी फार भाग्यशाली आहे की मला त्याच दिवशी नोकरी मिळाली. आणि सांगावयास अभिमान वाटतो कि ज्या दिवशी मला नोकरी मिळाली म्हणजे 15/7/2002  त्याच दिवशी आण्णा आपल्या रोडबिगारी नोकरीवरून निवृत्त झाले. 
          आण्णांची सुरुवातीचे दिवस अत्यंत दयनीय अवस्थेत गेले. मारवड मध्ये त्यांनी 10 वर्षे सालदारकी करून आपला चरितार्थ चालविला. त्यानंतर फागणे बाळापूर येथे श्नी.माधवराव कौतिक बडगुजर यांच्या आश्रयानेआपले डांगरी हे गाव सोडून राहावयास आले. आण्णांनी काही वर्ष धुळे येथील कृषी शाळेमध्ये सुद्धा माळी म्हणून नोकरी केली. त्यामुळे आण्णांना कृषी संबंधित सर्व प्रकारच्या कार्यांची माहिती उत्तम प्रकारे होती. या माहितीच्या जोरावरच त्यांनी जुग पध्दतीने दुसऱ्याची शेती केली व ज्या ठिकाणी उत्पन्न निघत नव्हते अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतले. 

       आण्णांना दोन मुले एक स्वर्गीय सुभाष गोकुळ बडगुजर आणि आमच्या आई म्हणजे सौ.भिकुबाई चिंधु बडगुजर होय.आईच्या अगोदर आण्णांना जेवढीही मुले झाली त्यांचे निधनच व्हायचे.एकही मुल वाचत नव्हते. म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी नवस केले. भिक्षा मागून संसारिक वेल फुलविली.यामुळे पहिल्या वाचलेल्या मुलीला त्यांनी भिकमागुन मिळालेली  म्हणून भिकुबाई हे नाव दिले. 

                       आण्णांचा स्वभाव तापट .बाहेरून नारळासारखे टणक व आतून प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. बाळापुर फागणे येथे राहायला आल्यानंतर त्यांनी जागा विकत घेऊन स्वतःच्या हाताने कुठलाही गवंडी न लावता घर बांधले. यात त्यांना  आमच्या आजींची  मोलाची मदत झाली. मला आजही आठवते माझ्या बालपणी मी आजीसोबत म्हणजे ग भा. शांताबाई गोकुळ बडगुजर यांच्यासोबत सरकारी धान्य गोडाऊन मध्ये जात असे. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे साहेबांच्या घरी धुणीभांडी करून आजीने मुलांना लहानाचे मोठे केले. 

“””शून्यामधूनी विश्व निर्मुनी
किर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ माया प्रीती देवूनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाले आण्णा, तुम्ही जीवनी””……..
आण्णांचे शिक्षण म्हणजे जेमतेम चौथी पाचवी पर्यंतचे. परंतु आण्णा ज्या पद्धतीने मोडी लिपी लिहायचे. त्यांच्या त्या सुंदर हस्ताक्षराचे कागद माझ्याकडे आजही आहेत. ही कागदे बघितल्यानंतर मला त्यांच्या हस्ताक्षराचा मोह आवरता येत नाही. बोरूने लिहिलेल्या मोडी लिपी मधील त्या कागदामध्ये सुरुवात व शेवट आपल्या सारख्यांना अजूनही समजायचा नाही. मोडी लिपी वाचण्याचे तंत्र आण्णांनीच मला शिकविले. शिक्षणावर सुरुवातीपासूनच त्यांचा विश्वास असल्यामुळे आण्णांचे वाचन नेहमी सुरू असायचे.हातात पडलेला कुठलाही कागद पेपर असो की वृत्तपत्र ते नित्यनियमाने रोज वाचत असायचे.

कै.स्व. गोकुळ कौतिक बडगुजर
              आण्णांच्या अंगी चातुर्य व सृजनशीलता होती आण्णा आम्हाला नेहमी ते कामाला असलेल्या मारवाडीची गोष्ट सांगायचे. एकदा त्या वाण्याने गोदामात खारीक भरून ठेवली होती. रात्रीच्या आलेल्या पावसात ती खरीक संपूर्णत:भिजली. फार मोठे नुकसान झाले. परंतु वाण्याने खजूर म्हणून ही ओली खारीक कशी विकली याची गोष्ट आण्णा नेहमी गमंतीने सांगायचे. रोडबिगारी म्हणून काम करत असताना सुद्धा अण्णांना आलेल्या अनेक लहान-मोठ्या प्रसंगांच्या गोष्टी आण्णा आम्हाला नेहमी सांगायचे. मोठमोठ्या अभियंते व कारागिरांना न  जमणारे कामसुद्धा त्यांनी अत्यंत कुशलतेने कुशाग्र बुद्धिमत्तेने चपळाईने व सृजनशील पद्धतीने पार पाडली. एकदा असेच कुठल्याश्या नव्यानेच बांधलेल्या  सिमेंट पाईपच्या पुलाला मोठे भगदाड पडले.  दोन-तीन ट्रॅक्टर वाळू आणि सिमेंट घालून  सदर भगदाड बुजविण्याचा गवंडी तसेच अभियंत्यांनी प्रयत्न केला.  परंतु दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी भगदाड पडलेले दिसले.तेव्हा रावसाहेबांनी  आण्णांना विचारले अण्णा काय केले पाहिजे. आण्णांनी सांगितले की मला फक्त दोन मजूर द्या मी एका दिवसात हे काम पूर्ण करतो. आण्णांनी मोठ्या चातुर्याने जिथे मोठ्या प्रमाणावर मजुरी व कच्चामाल लागेल असे हे काम अत्यंत कमी खर्चामध्ये  व कुशलतेने करून दाखवले. तेव्हा रावसाहेबांनी आण्णांना दिलेले बक्षीस आण्णा  नेहमी बोलून दाखवायचे.आजही आमच्या शेतात आण्णांनी वय वर्ष 70 असतानासुद्धा बांधकाम केलेला गुरांचा गोठा जसाच तसा आहे. यामुळे त्यांच्या त्या कामातुन आम्हाला नेहमी प्रेरणा मिळायची व मिळत असे. यामुळे घरातील लहानसहान कामे आपण स्वतः केलीच पाहिजे ही जाणीव लहानपणापासून आमच्यात निर्माण झाली. 

              आण्णांच्या जीवनात अति दुख:द प्रसंग सुद्धा घडले. आण्णांच्या हयातीतच आण्णांच्या एकुलत्या एका मुलाचे निधन झाले. हा फार मोठा आघात आण्णांच्या मनावर झाला. परंतु त्यातून केवळ तेच सावरले असे नाही तर त्यांनी आपल्या नातवंडे व सुन यांनाही सावरले. शिकविले. मोठे केले. आण्णांचे प्रेम व आपुलकीचे वागणे अजूनही आठवते.आमच्या आईंना एकमेव भाऊ गेल्याचे दुःख निश्चितच होते. परंतु या भावाची उणीव आण्णांनी नेहमी भरून काढली. दर वर्षी प्रत्येक रक्षाबंधन व भाऊबीजेला आण्णा कुठल्याही परिस्थितीत आईला भेटायला आणि ओवाळून घेण्यासाठी यायचे. परंतु आता नेहमी आमच्या आईला भावाची उणीव भासेल हे मात्र नक्कीच आहे. आम्हा नातवंडांना सुद्धा आण्णांनी कधीच मामा ची कमतरता भासू दिली नाही .प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी आण्णांनी मामांची कर्तव्ये सुद्धा प्रभावी पार पाडली.

         आण्णांना न आवडणाऱ्या गोष्टी कधीच पटत नसायच्या.मुलीने व  सुनेने नेहमी मुलीसारखे व सुनेसारखेच राहिले पाहिजे. हा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. यामुळेच कि काय संदीप आणि आमच्या मामी तसेच त्यांच्या सुनांना नेहमी आण्णांचा धाक असायचा. आण्णांना दुसऱ्यांच्या घरी जास्त दिवस राहणे सुद्धा आवडत नव्हते. कुठला आणि कुठलाही बहाणा करून ते नेहमी आपल्या गावी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करायचे 

               मानवाचं जीवन हे फार क्षणभंगुर आहे. खुप खोलवर विचार केला तर जन्मापासून ते मरणापर्यंत  आपलं जीवन फक्त एक श्वासाच आहे. बहिणाबाई  यांच्या शब्दात सांगायचे झाले तर  ..........

“आला सास गेला सास
जिवा तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं
एका सासाचं अंतर “”…….

        हेच श्वासाचं अंतर सुफल व आनंददायी जगल पाहिजे. आपल्या जवळ श्वासं किती बाकी आहेत हे आपल्याला माहित नसतं. परंतु जे आपल्या हातात आहे. ते तरी आपण गुण्यागोविंदाने जगलं पाहिजे. हेच आण्णांच्या जीवनावरून आपल्याला दिसून येते. आण्णांनी जमवलेली मिळकत  कदाचित थोडी असेल  परंतु त्यांची बचत आणि संग्रह करून ठेवण्याची प्रवृत्ती  ही आजच्या कोरोना काळातील  पार्श्वभूमीवर  सर्वांना पटण्यासारखी आहे. आण्णा माणूस या नात्याने  अत्यंत उत्तम होते. दाराशी आलेल्या  प्रत्येकाला आदर व आपुलकीने विचारपूस करून चहा पाणी देण्याची त्यांची नेहमीची रीत होती. यथायोग्य पाहुणचार केल्याशिवाय  घरी आलेल्या पाहुण्याला ते कधीही परत जाऊ देत नसत. कोणत्याही माणसाचा दर्जा हा  त्याच्या जातीवरून  आणि मिळकती वरून  कधीच ठरत नसतो. तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना.कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो धर्माचा नाही. 

             सर्वांना एकच गोष्टीचा चटका लागुन जातो. तो म्हणजे आण्णांचा जन्म हा आजपासून 83 वर्षांनी म्हणजे 1937 मध्ये गोकुळ अष्टमीला झाला होता.आणि नेमके या वर्षाच्या गोकुळाष्टमीला म्हणजेच दिनांक 11/8/2020 रोजी आण्णांचे निधन झाले. यामुळे आण्णांचा वाढदिवस साजरा करावा की मृत्यु दिवस हा फार मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. आण्णा नेहमी  श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून गोकुळ अष्टमी ला  उपवास धरायचे आणि केवळ रात्री  बारा वाजता उपवास सोडायचे. शेवटी.............

याच साठी
केला होता अट्टाहास
शेवटचा दिवस गोड व्हावा……

म्हणूनच की काय जन्माच्याच दिवशी मृत्यू येणाऱ्या भाग्यवंतांमध्ये अण्णा जाऊन पोचले.

     आण्णांनी फुलवलेल्या गोकुळ नगरीचे नंदनवन आज त्यांच्या जाण्याने रिक्त झाले आहे. आण्णांच्या मागे  त्यांच्या धर्मपत्नी, सुनबाई, तीन नातवंडे, तीन  नातसुना, मुलगी ,जावई, दोन पणतू, भाऊ, पुतने ,असा मोठा परिवार आहे.भारत प्रकाश आणि धनंजय या तीन भावंडे व त्यांच्या कुटुंबावर, डांगरी वरोळे परिवारावर कोसळलेल्या या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच प्रार्थना .परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच आदरांजली. शेवटी एवढेच म्हणेन ..........

“”साथ सुटली लाख-मोलाची
छाया आटली वटवृक्षाची
गेला आधार अण्णांचा
हरपले गंध स्नेहाचे
लोपला सागर करूणेचा
हास्य लोपले प्रकाशाचे
निघूनी जाण्याने तुमच्या
नेत्र होती ओले आमुचे
स्वजनांचे गेले प्रेरणास्थान
लोपले दैवत आमचे
लोपले दैवत आमचे……..

स्वर्गीय आण्णांना एका नातवाची हीच भावपूर्ण शब्द श्रद्धांजली……. ओम शांती शांती शांती…..

प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर चिंचोली
(8999459858)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*