प्रेक्षकांच्या अभिरुचीची अवहेलना करणाऱ्या हिंदी मालिका मला कधीच बघाव्याशा वाटत नाहीत पण झी वाहिनीवरील 'पवित्र रिश्ता' मालिकेतला अबोल, बुजरा 'मानव' खूपच भावला नी तो मालिकेत असेपर्यंत मीही आपसूक त्या मालिकेचा प्रेक्षक झालो. हा तोच 'मानव'-- सुशांत नावाचा. नावाप्रमाणेच शांत नि सुलक्षणी असा त्याचा वावर त्यावेळेस खरंच खूप अपील करायचा. त्याचा 'धोनी- अॅन अनटोल्ड स्टोरी' पहिला नि त्याचा निस्सीम चाहता व्हायला त्याने भाग पाडलं. त्या सिनेमात मला सुशांत दिसलाच नाही, दिसला तो केवळ धोनी. इतकं धोनीचं पात्र त्यानं त्याच्या आत जिरवलं, रुजवलं आणि स्क्रीनवर फुलवलंसुद्धा! सिनेमा पाहणाऱ्याला जेव्हा अभिनेत्याऐवजी त्यानं साकारलेलं पात्र दिसतं तेव्हा त्याच्या अभिनयात जान आहे असं समजावं. त्याने साकारलेल्या धोनीत त्याची मेहनत स्पष्ट दिसत होती. आपल्या धाकड अभिनयाची भुरळ घालून सुशांत दिगंताच्या प्रवासाला शांतपणे निघून गेला अगदी अविश्वसनीयपणे ! त्याचं असं अचानक जाणं खरंच खूपच धक्कादायक होतं
यश, ऐश्वर्य, सन्मान, सौंदर्य सारं असूनही सुशांत का बरं रुसला असावा या दुनियेवर? (अर्थात पोलिस तपासात यथावकाश ते कळेलच.) रूढार्थाने ज्याला सुख म्हणतात अशी सारीच भौतिक सुखं पायाशी लोळण घेत असताना का बरं आयुष्याची संहिता अर्धी अधुरीच वाचून त्याला अवचितपणे एक्झिट घ्यावीशी वाटली असेल? कितीही विचार केला तरी डोक्यात उगवतात ती विषम अंगापिंडाची प्रश्नचिन्हंच! अशी अनेक प्रश्नचिन्हं पूर्णविरामाच्या प्रतीक्षेत सोडून सुशांतचा आत्मा पंचप्राणांच्या कवेतून अलगद निसटून परमात्म्याच्या चरणात विलीन झाला यावर विश्वास बसतंच नाहीये.
'प' ची बाधा झालेलो आपण प्रत्येक व्यक्तीला पैसा, पद, पत आणि प्रतिष्ठा या परिमाणात आपापल्या सोयीनुसार सोयीस्कर मोजपट्ट्या लावून ज्याची त्याची प्रतवारी ठरवत असतो. आणि खरी गफलत इथेच होते. 'असत्' वरून 'सत्' ठरवण्याच्या आपल्या आतताई उथळपणामुळे असे अनेक आपल्याच आजूबाजूचे सुशांत असा टोकाचा मार्ग स्विकारायला मजबूर होतात.
काही मचूळ आणि गढूळ डबकी असणारे सोडता प्रत्येकाच्या आत भाव-भावनांनी भरलेली एक नितळ नदी वाहत असते. जिला एखादा तरी हळवा कोपरा असतोच. आपण या नदीचा शोध घ्यायला हवा. तिचा हळवा कोपरा शोधून तळ गाठायला हवा. सुशांतच्या बाबतीत नेमकं तेच झालं नसावं. त्याच्या मनातल्या लपवलेल्या हळव्या काचा शोधण्याची तसदी कोणीही घेतली नसावी. त्याच्या नितळ मनाच्या नदीचा भिजका कोपरा म्हणजे त्याची आई होती जिच्या जाण्यानंतर त्याला प्रचंड एकटेपणा जाणवायला लागला असावा. आणि नेमक्या याच वेळी आवश्यकता होती त्याच्या मनाचा तळ शोधण्याची आणि त्याला मानसिक, नैतिक आधार देण्याची. पण भोवती शुष्क मनाची माणसं असणं हे त्याचं दुर्दैव!
हल्ली ना... आपण सारेच आपला केंद्रबिंदू सोडून केवळ भौतिकतेच्या परिघावर परिवलन करतोय. या जागतिकीरणाने तर आपल्याला माकड केलंय. आपण सारखं या गरजेवरून त्या गरजेवर उड्या मारत चाललो आहोत. इतक्या की जणू या उड्यांची स्पर्धाच लागलीय असं वाटावं. आणि आपण ह्याने दिवसेंदिवस अधिकच भेसूर आणि निर्दयी होत चाललोय हे आपल्या गावीही नाही. आता वेळ आलीय थोडी उसंत घेण्याची. जरा आपल्या आतल्या 'मी' ला चेतवण्याची, चाचपण्याची आणि स्वतःलाच खणून काढण्याची! खरं तर आपण स्वतःचंच उत्खनन करायला हवं, अंतर्मुख व्हायला हवं, दुनियेला वाचता वाचता स्वतःलाही वाचायला हवं. स्वतःशी बोलायला हवं. कारण ज्याला स्वतःची संगत आवडते त्याला जगण्याची कला गवसते. जीवन भोगायला नाही तर उपभोगायला हवं. एकदा आपल्याला आपल्यातलं स्फुल्लिंग सापडलं की मग आपण या दुनियेचा राजा होऊन जगू. सुशांतच्या निमित्तानं आता तरी आपण भौतिकतेचा हव्यास सोडून आत्मिक परमानंदाचा ध्यास घ्यायला हवा कारण ' जिंदगी के अलावा सब कुछ झूठ है मेरे यार!'
' जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए बाबूमोशाय!' हा डायलॉग जगणाऱ्या या सुशांतची आणि मेलेल्या आत्मविश्वासाच्या समिधा मेंदूत घेऊन जिवंत प्रेतांसारखं जगणाऱ्या आपल्याही भोवतालच्या सर्व *सुशांतची* जिंदगी बडी आणि लंबीही होऊ दे रे करुणाकरा... आता ही एकच मागणी पूर्ण कर बस्स!
--- योगेश जाधव, भाटपूरे
ह.मु. चोपडा.

टिप : सदर लेख हा जीवनात नवी ऊर्जा प्रवाहित व्हावी, जीवन अनमोल आहे त्याचा आनंद घ्या, नैराश्य झटकून टाका ही आर्त साद घालतो. धन्यवाद.

Leave a Reply