अमरावती येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाल भाऊ भेरडे कालवश – श्री. सुरेश शुल्क, अमरावती

गोपाळ भेरडे चा अकाली मृत्यू माझ्या मनाला खुप चटका लावून गेला. ही दुःखद बातमी समजली तेंव्हा विश्वासच बसेना.शेवटी ईश्वरी इच्छेपुढे कोणाचेही चालत नाही त्याचा माझा सम्बन्ध जवळपास 40 वर्षापासूनचा. त्यामुळे त्याचा जीवनपट नजरेसमोर आला. सायकल पंक्चर दुरुस्ती पासून आपल्या आयुष्याची 50 वर्षांपूर्वी सुरवात करणारा गोपाळ , कामगार पुढारी , ठेकेदार , पत्रकार , संपादक , गरज़ूना पाणी पुरवठा करणारा असे टप्पे गाठत गेला. कुठलेही नवीन कार्य हाती घ्यायचे असेल, कुठली समस्या असेल किंवा निर्यय घ्यायचा असेल तर तो मला सांगत असे. विचारत असे. दरवर्षी दसऱ्याला सोने देण्यासाठी येण्याला त्याने खंड पडू दिला नाही. ठेकेदारांमध्ये, कामगारांमध्ये , पत्रकारांमध्ये त्याचे चांगले सम्बन्ध होते. सूतगिरणीचे आंदोलन त्याने यशस्वी केले. त्यासाठी मोर्चे काढले ‘ उपोषण केले. कामगार सुद्धा त्याचेवर प्रेम करीत असत.

तो भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. प्रसंगी काही मतभेद झालेही असतील पण त्याने कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. पक्षातील इतर उमेदवाराच्या निवडणुकीत हिरीरीने भाग घेतला. फरशी स्टॉप वरील हनुमान मंदिर व पहेलवान बाबाचे दर्शनाचा नेम त्याचा कधी चुकला नाही. त्याची आवडती बॉबी गाडी त्याने शेवट्पर्यंत सांभाळून ठेवली. या बॉबीच्या आवाजावरूनही त्याचे आगमनाचे संकेत मिळत असत. तिची निगा राखण्यासाठी सुटे भाग मिळविण्याचा सतत प्रयत्न तो करत असे. अरे हिला विकून टाक म्हटले तर ती माझी जीवनसाथी आहे. विकणार नाही असे म्हणत असे. शहरात बॉबी कुठेही नजरेस पडत नसतांना हा मात्र थाटात तिच्यावर फिरत असे.

त्याला दादा म्हटलेले विशेष आवडत नसे. थोडे फार असे वागणे असले तरी गोपाळ भाऊ म्हणणे त्याला आवडे. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणी त्याला अटक झाली तेंव्हा त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी शेकडो लोकांचा मोर्चा पोलीस स्टेशन वर गेला होता. त्याचे साप्ताहिक लोकपाल त्याने बरेच वर्ष प्रकाशित केले. लघु व मध्यम वृत्तपत्र संघाचाही गोपाळ पदाधिकारी राहिला.

त्याची पत्नी शारदाने त्याला शेवट पर्यंत मोलाची साथ केली.हा सतत बाहेर राहत असल्याने ती याचे व्यवहाराची व घराची पूर्ण जबाबदारी सांभाळत असे. अतिशय शांत ‘ सुस्वभावी व मनमिळाऊ अशी शारदा सम्पूर्ण परिसरात लोकप्रिय आहे. ती भाजप माजी नगरसेवक आहे. तिला मागील निडणुकीत पक्षाने उमेदवारी देऊ केली होती पण प्रकृतीचे कारणानं तिने विनम्रपणे नकार दिला.

दिसायला हा माणूस जरी पाच फूट दोन इंच होता तरी 6 फुटाचे माणसांवर सुद्धा चाल करायला मागे पुढे पाहत नसे. या साहसी वृत्तीमुळे त्याचे सम्पर्कातील लोकांना त्याचा आधार वाटतं असे. पोटी मुलबाळ नसताना परिचयातील मुलगी दत्तक घेऊन तिचा या दोघांनी सांभाळ तर केलाच पण तिचे स्वखर्चाने थाटात लग्न करून दिले. आज ती सुखी जीवन जगत आहे. त्याचा मदतीसाठी हात नेहमीच समोर असायचा. केवळ कोरोना बंधन असल्याने लोक अंत्ययात्रेत अधिक लोक येऊ शकले नाही. अन्यथा मार्गांवर लोक प्रचंड गर्दीने दिसलें असते.

आमच्या मित्रमंडळी मध्ये येक महत्वाची व्यक्ती म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. राजापेठ फाटकाजवळ गोपाळचे येक छोटेखानी साधे ऑफिस होते. पण ते सतत गजबजलेले असायचे. कोणी काम घेऊन येणार , कोणाची समस्या तर कोणती भानगड मिटविणे व चांगल्या कामासाठी मदत करणे हा त्याचा नेम असे.

आमच्या मित्र मंडळींमध्ये सर्वश्री हरिभाऊ दातेराव , भास्कर भेरडे , शरद दातेराव , नरेश वर्मा , हरिहर दातेराव , विश्वास देशमुख , अरविद पोंगशे, नरेंद्र ओबेराय , चेतरामाजी किरणापुरे , वासुदेव भेरडे , हरिभाई भोयर आदी सर्व लोक गोपालवर निस्सीम प्रेम करीत असत. गोपाळ गेल्यामुळे आम्हा सर्वांनाच दुःखद धक्का बसला आहे. आॅलराउंडर गोपाळची सतत उणीव जाणवेल. सर्व मित्र मंडळींचे वतीने विनम्र श्रद्धांजली ??????

  • सुरेश शुक्ल (जेष्ठ पत्रकार) अमरावती.

1 Comment

  1. ? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ?
    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व
    त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! ओम शांति !!

Leave a Reply

Your email address will not be published.


*