सहज सुचलेले
बरेच दिवस मनात विचार येतोय की इतरवेळी अगदी सहज सुलभतेने आढळणारे सर्दी, पडसे, ताप, खोकला हल्ली दुर्मिळ झालेले दिसतात आणि गल्लोगल्ली अगदी घरोघरी थैमान घालत असलेल्या बीपी, शुगर-डायबेटीसची हल्ली दातखिळीच बसलेली वाटते. कोरोनाच्या भीतीने या सर्वांचीच पाचावर धारण बसलेली दिसते. मृत्युच्या भीतीने या सर्वांनी माणसाला अर्धमेला करुन ठेवल होत व माणसाला कणाकणाने मारत ते सर्व मजा करत होते. पण या कोरोना ने डायरेक्ट मृत्युचा शॉर्टकट आणल्यापासून या सगळ्या भ्रष्टाचा-यांचे वांधे झालेत त्यामुळे ते कांदे सोलत यातून काही मार्ग निघेल का? याचा विचार करत चिंताग्रस्त झाले आहेत. हेही दिवस जातील या न्यायाने ते आशावादी आहेत. चार दिवस ……चे प्रमाणे सध्या कोरोनाचे दिवस आहेत त्यामुळे मौनं सर्व साधनम् हाच उत्तम मार्ग. पण यामुळे माणसालाही या सर्वांची (रोगांची) लायकी ओळखण्याची ही उत्तम संधी आहे. शेवटी लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे या न्यायाने माणसाने जगलं पाहिजे आणि त्यासाठी झुंजार बनून या सर्वांशी दोन हात करण्यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. रोग येतील आणि जातील आपण मात्र कणखर राहिले पाहिजे. शेवटी सगळ्यांच कल्याण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. सर्वांच कल्याण करणा-याचे कल्याण केल्याशिवाय भगवंताला चैन पडणार नाही. भले त्यासाठी अवतार घ्यावा लागला तरी चालेल आणि भगवंताला अवतार मानवी देहातूनच घ्यावा लागेल, नव्हे तर आपल्या सभोवती अनेक मानवी देहात भगवंत अवतरित झाले आहेत. पण कुणाला दिसतात, कुणाला नाही एवढेच! त्यासाठी आपली पुण्याची पोतडी कमी पडली अस समजा किंवा आपल्या भगवंत दर्शनाची वेळ अजून आली नाही असे असेल. असो पण भगवंत आपल्याला निराश करणार नाही हे मात्र खरे! कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या न्यायाने माणसाने कर्म सोडता कामा नये. कर्माचा असा डोंगर उभा केला पाहिजे की तो ओलांडताना कोरोनालाही घाम फुटला पाहिजे आणि मग यावरच आपटून आपटून त्याचा अंत झाला पाहिजे. अशाच तत्वज्ञान व आशावादातून माणसाची जडण-घडण होत आलीय आणि माणसाचा इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. पुढच्या प्रवासाचा मार्ग स्पष्ट दिसत नसला तरी तो बनवता येतो अस आपला इतिहास सांगतो. अंधारातून जाणा-या वाटेवर कुठेतरी प्रकाश भेटणारच. आजच्या अंधःकारातच उद्याच्या उषःकालाची बीजे रोवलेली असतात पहाट होण्यासाठी रात्र होणे आलेच! निसर्गनियमाला वेसण घालणे अद्यापपर्यंत मानवाला जमले नाही व जमणारही नाही. याबाबत आतापर्यंतच्या वाटचालीत निसर्गाने मानवाला अनेकवेळा नामोहरम केले आहे, अगदी चितपट! आताही निसर्ग मानवाला अनेक प्रकारे अनेक धडे एकाच वेळी शिकवत आहे. इतरवेळी शेजारी कोणी मेल्यावरही विचारपूस न करणारा माणूस हल्ली अगदी दूरवर कुणी मेलं तरी हळहळताना दिसतो. रोज उठल्याबरोबर फक्त आपल्याच नादात चालणारा व केवळ आपल्याच वर्तुळात जगणारा माणूस हल्ली उठल्याबरोबर जगाचा गोषवारा बघत असतो. आजूबाजूला काय चाललय याची चाचपणी करतो. सगळ्यांच कसं होईल याची चिंता करत काहीच नाही करता आल तर किमान काहीतरी केलं पाहिजे अशा विचारांचे मेसेज एका ग्रुपवरुन दुस-या ग्रुपवर फॉरवर्ड करतो. हेही नसे थोडके आजची ही कोरोनामुळे माणसात हरवलेली, विस्मृतीत गेलेली पण आता थोडीफार रुजत चाललेली मानवता उद्या प्रचंड वृक्ष झाल्याशिवाय रहाणार नाही अशी आशा करायला हरकत नसावी. म्हणूनच निसर्गाला आव्हान देण्यापेक्षा त्याच्याच न्यायाने जगण्याची वाट धुंडाळणे श्रेयस्कर नाही का? मानवाने नको त्या सवयींचा गुलाम होण्याऐवजी निसर्गनियमांचा सेवक होवून निसर्गाशी एकरुप होण्यास काय हरकत आहे. भगवंताला इतरत्र धुंडाळण्यापेक्षा तो सर्वत्रच आहे म्हटल्यावर सर्वत्रच तो असेल ना! आपण त्या दृष्टीने पहात नाही किंवा आपल्या दृष्टीकोनात अजून ती दिव्यदृष्टी आली नाही.
असो, प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने सर्वांना ही जगण्याची वाट पहाण्याची दिव्यदृष्टी मिळून आनंदफुले मिळोत व उद्याचा भविष्यकाल सुगंधी होवो ही शुभेच्छा
©️ स्वलिखित
कवी विभास/कैलास बडगुजर, टिटवाळा


Leave a Reply