१२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती : राष्ट्रीय युवा दिवस यानिमित्त स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी वाक्यं – श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, नाशिक

१२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती…

स्वामी विवेकानंद यांच्या वाणीची भुरळ आजही जगभरातल्या युवकांना पडली आहे. स्वामी विवेकानंद यांचं व्यक्तीमत्त्वच तसं होतं.

त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. आजही त्यांची वाक्य किती प्रेरणादायी आहेत याचा प्रत्यय ती वाक्यं वाचल्यावर येतो. अनेकदा युवा वर्ग हा विविध पातळ्यांवर संघर्ष करत असतो. संघर्ष करणाऱ्यांनी स्वामी विवेकानंदांची वाक्य वाचली तर लढण्याची प्रेरणा मिळते.

स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी वाक्यं…

एकाग्रतेने वाचन करा, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ती ध्यानधारणा, ध्यानधारणा केल्याने आपण इंद्रियांवर संयम ठेवू शकतो

ज्ञान हा वर्तमान काळ आहे, मनुष्य त्याचा अविष्कार करतो ही बाब विसरु नका

उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमची लक्ष्यप्राप्ती होत नाही

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकणं बंद करु नका, अनुभव हा आपला गुरु आहे ही बाब विसरु नका

लोक तुमची स्तुती करोत किंवा निंदा, लक्ष्य तुम्ही गाठण्याची तुमची वाट बिकट असो किंवा सुकर तुम्ही तुमचा योग्य मार्ग सोडू नका

ज्या क्षणी एखादं काम करण्याची घोषणा कराल त्याच क्षणी ते काम सुरु करा नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही

एकावेळी एकच काम हाती घ्या आणि ते तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, ते काम पूर्ण होईपर्यंत सगळ्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरुन जा

तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढेच मोठे यश तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा

ज्यादिवशी तुमच्यासमोर कोणतीही समस्या नसेल त्यादिवशी ही बाब निश्चित झाली असेल की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात

स्वामी विवेकानंद यांची वाक्यं आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात.

जगाला हिंदूधर्मा बद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा असे योग आणि वेदाच्या माध्यमातून ओळख करून दिली. हिंदू धर्माची व्याख्या नव्याने जगासमोर मांडली. अनेक संस्कृतींचा आदर करवयाला शिकवणारी, सामावून घेणारी भारतमाता आणि तिच्या संस्कृतीचा प्रभाव स्वामीजींच्या विचारातून जगभर पसरला. वेळ प्रसंगी स्वामीजींनी भारत भ्रमण करताना आदर्श संस्कृतीच्या मुळावर बसलेली थोतांडांची धूळ झटकून काढली. स्वामीजींचे विचारच इतके प्रभावी होते कि नैराश्यात गेलेल्या युवकांची नौका पैलतीरी नेली. स्वामीजींच्या विचारातील राष्ट्रोत्थान, आध्यात्म व धर्मांची शिकवण आजच्या तरुणांनी अंगीकृत केली पाहिजे. कोलकत्ता शहरात 12 जानेवारी 1863 ला एक तेजस्वी युगपुरुषाचा अवतरण झाले. आई भुवनेश्‍वरीदेवी फार धार्मिक व सात्विक होत्या तर वडील विश्‍वनाथ दत्त हे पेशाने वकील होते त्यामुळे कुटुंब सदन होते. कुटुंबात जन्मलेल्या बालकाचे नाव नरेंद्र ठेवले पुढे तेच स्वामी विवेकानंद झाले. वयाच्या 7 व्या वर्षी शाळेत गेलेला नरेंद्र शाळेत जाऊन बेशिस्त झाला म्हणून त्यांच्या आईने त्यांना घरीच शिकवले. पुन्हा शालेय जीवन सुरु झाले. गायनाचे धडे घेतले तसेच त्यांनी मल्लविद्या हि पारंगत केली शरीर हि कमवले तसे ते बुद्धीने चाणाक्ष हि झाले यांनी खेळ, गायन, शास्त्रीय संगीत बरोबर इतिहास, समाजशास्त्र, कला विषयां बरोबर वेद, उपनिषिदे, रामायण, महाभारत, गीता आदी ग्रंथांचे वाचन हि केले. जीवनात कमी वयात अनेक विद्या मध्ये ते पारंगत व निपुण झाले. हिंदूस्थान हा त्या वेळी पारतंत्र्यात होता. औद्योगिक क्रांती, स्वातंत्र्य चळवळ व समाजसुधारणेच वारे वाहत होते. मुर्ती मध्ये देव नाही. स्त्री शिक्षण व अस्पृशता निवारण कार्य वेगाने सुरू होते. या सार्‍या मनातील द्वंदवांना उत्तर हवे होते. यासाठी त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व स्विकारले. रामकृष्णांचा सानिध्याने विवेकानंद ज्ञानयोगी झाले. विवेकानंदाचे बुद्धीचातुर्य व तेज पाहून नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठी जन्मला असून हिंदू धर्म व हिंदूस्थानचा नावलौकीक जगभर नेशील हे रामकृष्ण यांचे भविष्य पुढे खरे ठरले. पुढे वडिलांचा मृत्यू व रामकृष्ण परमहंस यांच्या समाधीस्ततेने ते एकांकी होत संन्यासी मार्ग स्विकारला. त्या वेळी स्वामीजी 25 वर्षाचे होते. त्यांनी आता भारत भ्रमण सुरू केले अनेक धर्मस्थळांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पायी फिरले. हे फिरत असताना भारतीय जीवन जवळून पाहिले. गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृशता, मागासलेपणा याबरोबर राजेशाही जगणार्‍या लोकांचा एशोआरामही पाहिला. या प्रवासात त्यांनी अंधश्रदेवर प्रहार केले त्याची ओजस्वी वाणी एकूण लोक त्यांना विवेकानंद म्हणू लागले अखेर ते कन्या कुमारीला पोहचले त्यांनी ध्यान धारणा व मनन केले त्यावेळी अखेर 1893 सालच्या अमेरिकेतील धर्म परिषदेला जाण्याचे निश्‍चित झाले.
अमेरिकेत होणार्‍या धर्म परिषदेला स्वामीजी जाण्यासाठी खेतडीच्या महाराजांनी त्यांना आर्थिक मदत दिली. शिवाय भगवे वस्त्र व भगवा फेटा दिला. अमेरिकेत पोहचल्यावर अनेक संकटे झेलत स्वामीजी न्यूयॉर्क शहरात राहिले. त्यांना परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तेथील प्रा. राईट यांनी मोलाचे सहकार्य केले. अखेर 11 सप्टेंबर 1893 शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेचा दिवस उजाडला. यात प्रत्येक धर्माचे धर्मगुरू व चार ते पाच हजार नागरिकही उपस्थित होते. प्रत्येक धर्माच्या धर्मपंडितांना आपला धर्म इतर धर्मा पेक्षा कसा चांगला आहे. हे सांगत होते. परंतु जेंव्हा स्वामीजी उभे राहिले माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनींनो ” हे वाक्य उचारताच सार्‍या सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. हिंदू संस्कृतीचे, सभ्यतेचे, सर्वसामावेशकता व सहिष्णुतेचे दर्शन सार्‍या जगाला झाले. त्यांनी हिंदुधर्मावरील परिपूर्ण असे भाष्य केले त्यांचे चैतन्यपूर्ण व ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. 17 दिवस हि धर्मपरिषद चालली होती यात एकच स्वामीजींचे विचार प्रकटीकरणावर लक्ष वेधून राहिले होते. 11 सप्टेंबर हा दिवस विश्‍वबंधुत्व दिन म्हणून साजरा होत असतो. स्वामीजींच्या स्नेहपूर्ण पंक्तीने त्यांचे चाहते वर्ग वाढले व एका संन्याशाला पाहण्यासाठी लोक लांबून येऊ लागले अनेक स्त्री, पुरुष त्यांचे शिष्य झाले. त्यापैकी मार्गारेट एलिझाबेथ नोबल होत हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव परंतु भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यास दीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले. स्वामीजींनी हिंदूधर्म व त्याचे तत्वज्ञान व वेदांचा पसार जगभर केला. अमेरिकेत व्याख्याने व शिकागो मध्ये अभ्यास वर्ग तर मठ हि स्थापन झाले. अमेरिका व युरोप खंडात प्रवास करून ते भारतात परत आले.
स्वामीजी 1896 मातृभूमीवर परतल्यानंतर प्रथम रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भारत आणि भारताची उन्नती हा व्याख्यानाचा विषय घेत देशभर दौरे करून शांती व समतेचा संदेश दिला. स्वामीजी मानव सेवेलाच ईश्‍वर सेवा समजत, दरिद्रीनारायण हाच त्यांचा ईश्‍वर होत. त्यांनी भारतीयांच्या मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीची इच्छा निर्माण केली. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत। उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका. या विचाराने तरुणांना जागे केले. तरुणांना अंधश्रध्दा मधून जागे करण्यासाठी बल हे सुख आहे, चिरंतन व शाश्‍वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुखकष्ट होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. अविरतपणे कार्य करणे म्हणजे शक्ती होय. गुप्त, गूढ गोष्टींच्या मागे लागणे आणि खुळचट समजुती बाळगणे ही दुरबलतेची लक्षणे सांगितली. पुस्तकी ज्ञान माणसाला रोजनदारी मिळवून देईल पण राष्ट्रप्रेम, मानवसेवा हि ईश्‍वर प्राप्प्ती देणारी आहे. माणूस निर्माण करणारे आणि चरित्र घडवणारे शिक्षण त्यांना अपेक्षित होते त्यांच्या मते माणसात असलेल्या परीपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. कर्मकांड व भोंदूगिरीची प्रचंड चीड स्वामीजींना होती. त्यांनी शरीरास व आत्म्यास प्रबळ करण्याचे सांगितले. मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानावर जाऊन खेळा. खेळ व मैदान यांचे महत्व सांगितले. तरुणांना जागे करत तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असल्याचे सांगितले. तरुण, उत्साही, शक्तिमान, सुदृढ व बुद्धिमान असला पाहिजे तोच देशसेवेसाठी पुढे येतो स्वामीजींनी पारतंत्र्यात असताना चेन्नई येथील भाषणात तरुणांनोयेथू न पुढे 50 वर्ष आपली भारत माता आराध्य दैवत असली पाहिजे. इतर देव देवता बाजूला राहूद्या. दिन दुबळ्यांची सेवा मानव सेवा देव सेवा असून एकमेकांच्या द्वेष कारणांचे फळे भोगत आहोत एकसंघ पणा अंगिकारला पाहिजे. 1897 मध्ये प्लेगची साथ पसरली, तेव्हा स्वामीजींनी दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी संघटना उभी केली. 1899 साली उदबोधन हे नियकालिक सुरु केले. नोव्हेंबर 1898 मध्ये भगिनी निवेदितांच्या बालिका विद्यालय स्थापन झाले. यात लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठीच ही शाळा होती. स्वामीजींनी स्त्री शिक्षणाला खूप महत्त्व दिल. त्यांच्या मते ज्या देशांनी स्त्रियांचा सन्मान केला तेच देश जगात सर्वश्रेष्ठ झाले. ज्या देशातील स्त्रिया दुखी आहेत तो देश कधीही पुढे जाऊ शकत नाहत्यांनी स्त्री सबलीकरणाचा मुद्धा हाती घेऊन अस्पृश्यता व स्त्री शिक्षणाचे कार्य केले. हिंदु समाज पददलित असेल; पण घृणास्पद नाही. तो दीन असेल, दु:खी असेल; पण बहुमूल्य अशा पारमार्थिक संपत्तीचा उत्तराधिकारी आहे. धर्माच्या क्षेत्रात तो जगद्गुरु होऊ शकतो, अशी त्याची योग्यता आहे. धर्म संकल्पनेत त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन होता. तो सर्‍या जगाने स्विकारला. जगाला दीन, दुबळ्यांची सेवा हीच ईश्‍वर सेवा ईश्‍वर सेवा प्रत्येक प्राणी मात्रात ईश्‍वर अंश आहे. असे सांगणारा युगनायक, युगपुरुष, तपस्वी, संन्यासी योद्धा, निस्सीम देशभक्त अखेर कोलकत्ता शहरातील बेलूर मठात 4 जुलै 1904 रोजी समाधिस्त झाला. मानवी जीवनाला अत्यंत मोलाचे असे संजीवन देऊन कार्य आटोपले.संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. विजय आपलाच आहे, निश्‍चिंत रहा, कार्य करीत रहा, थांबू नका, सेवा करीत रहा व निर्भय व्हा.’ एवढे जरी आपण आत्मसात केले, तरी त्यांना मोठी आदरांजली ठरेल. मनुष्याने त्याच्यातील दुबळेपणा झटकून देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले स्फूर्तीदायी विचार आजच्या तरुणांनी अंगीकार केला पाहिजे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*