नंदुरबार – स्वातंत्र्यपूर्व काळात चले जाव आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद शिरिषकुमार मेहता यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त शहीद शिरिषकुमार मित्रमंडळातर्फे बालवीर चौकात प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले. शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी बालवीर चौकात हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक दिलीप बडगुजर यांच्या हस्ते हुतात्मा शिरीषकुमार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी हुतात्मा शिरीषकुमार आणि सहकाऱ्यांनी 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या बलिदानाची माहिती दिली तसेच 28 डिसेंबर 1926 रोजी मेहता कुटुंबात शिरीषकुमार यांचा जन्म झाला. त्यांनी शालेय जीवनात देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवून छातीवर गोळ्या झेलल्या. त्यांच्या बलिदानामुळेच नंदनगरीचे नाव हिंदुस्तानात पोहोचले. युवकांनी शहिदांच्या त्यागाची प्रेरणा घेण्याचे आवाहन महादू हिरणवाळे यांनी केले. याच कार्यक्रमात पत्रकार व स्वीकृत नगरसेवक दिलीप बडगुजर यांचा सत्कार मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे यांनी केला. अभिवादन कार्यक्रमास गवळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल हिरणवाळे, विलास चव्हाण, संजय चौधरी, डॉ. गणेश ढोले, सुदाम हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, तेजस ढोले, धीरेंद्र हिरणवाळे,यश चौधरी, हिमांशू भैयाजी आदींसह नवी भोई गल्ली परिसरातील शालेय विद्यार्थी, बालगोपाल आणि नागरिक उपस्थित होते. फोटो ओळी – नंदुरबार शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी उपस्थित नगरसेवक दिलीप बडगुजर सोबत महादू हिरणवाळे, विलास चव्हाण, विठ्ठल हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे, गोपाळ गवळी, तेजस ढोले आदि.




Leave a Reply