- सकल भारतीयांना…
जागतिक नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दि.१९ नोव्हेंबर!
जागतिक नागरिक दिन!
जागतिक नागरिक दिनाच्या निमित्ताने आज आपण भारतीय संविधानातील नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांविषयी हितगुज करणार आहोत!
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता व त्यायोगे एकता असे अनेक मानवतावादी पैलू असलेल्या आपल्या भारतीय संविधानाला व भारतीय लोकशाहीला मानाचा मुजरा करुन सुरुवात करु या!
आपल्या भारतीय संविधानानाने भारतीय नागरिकांना प्रदान केलेले हक्क आधी आपण पाहु या व नंतर आपली एक भारतीय नागरिक म्हणून जेवढी कर्तव्ये आहेत, ती आपण लक्षात घेवू या!
नेमके हक्क म्हणजे काय?
याचा विचार केला असता वैयक्तिक व समुदायाच्या भल्याकरता असणा-या स्वातंत्र्याला हक्क असे म्हणतात!
भारतीय घटनेने प्रदान केलेले हक्क हे “भूभागाचे मुलभूत कायदे” यामध्ये अंतर्भूत केले असल्याकारणाने ते मुलभूत असून न्यायालयाद्वारे प्रवर्तित केले गेले आहेत.
तरीही, हे हक्क अपरिवर्तनशील किंवा घटनादुरुस्तीपासून मुक्त नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे!
आपल्या भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मुलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत-
१) समानतेचा हक्क
२) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
३) शोषणापासून संरक्षणाचा हक्क
४) धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
५) सांस्कृतिक व शैक्षणीक हक्क
६) संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
७) मालमत्तेचा हक्क
(हा हक्क ४४ व्या संविधानिक दुरुस्तीनुसार मुलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला आहे.)
आपण हक्क जेवढ्या हक्काने बजावतो, तेवढयाच हक्काने व जबाबदारीने आपण आपली कर्तव्ये ही करायलाच हवीत हे निश्चित!
आपल्या भारतीय राज्यघटनेतील मुलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत-
१) संविधानाचे पालन करणे, संविधानाने पुरस्कृत व उभ्या केलेल्या आदर्श संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
२) राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण व संक्रमण करणे.
३) देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे.
४) देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास सदोदित तयार राहणे.
५) धर्म, भाषा, वंश, जात, प्रदेश वगैरे भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व भ्रातृभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणत असतील अशा प्रथा बंद करणे.
६) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे मोल जाणून ते जतन करणे.
७) अरण्ये, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे.
८) विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारकवृत्ती यांचा विकास करणे.
९) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, हिंसाचाराचा निगृहपुर्वक त्याग करणे.
१०) आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिध्दी यांच्या चढत्या क्रमात श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक क्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.
११) वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. (८६ वी घटनादुरुस्ती, २००२)
एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून हक्क व कर्तव्ये बजावतांना आपण भारतीय संविधानानाचे प्रत्यक्ष पालन करावयास हवे!
हे भारतीय संविधानानाचे पालन योग्यरित्या व दैनंदिन जीवनात सहज व्हावे यासाठी आम्ही एकदा “आम आदमीची आचारसंहिता” ही अत्यंत महत्त्वाची पोस्ट दिली होती.
आजच्या नागरिक दिनानिमित्ताने आज आम्ही पुन्हा सदर पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे विषद करीत आहोत!
आपल्या या भारतातील प्रत्येक नागरिक हा आधी भारताचा आम आदमी असून भारतीय राज्यघटना ही प्रत्येक आम आदमीची आचारसंहिता आहे!
ही आचारसंहिता प्रत्येकाने वाचलेलीच असेल असेही नाही म्हणून आम्ही राज्यघटनेचा आधार घेत थोडक्यात पुढीलप्रमाणे आम आदमीसाठी सर्वसाधारण आचारसंहिता देत आहोत, आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने ही सर्वसाधारण आचारसंहिता कसोशीने पाळण्याचे आवाहनही करीत आहोत!
आचारसंहिता म्हणजे नियमावली!
ही नियमावली आदेशाच्या स्वरुपात न देता, जणू आम आदमी हा एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून प्रतिज्ञा घेत आहे अशा स्वरुपात आम्ही देत आहोत…!
- आम आदमीची सर्वसाधारण आचारसंहिता! *
१) मी ह्या भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे तहहयात पालन करीन. कुठल्याही कायद्याचे कधीही उल्लंघन करणार नाही.
भारतीय राज्य घटनेचे सुव्यवस्थित पालन करीत गाव/ तालुका यांचा, आपल्या दूरदृष्टीकोनातून विकास घडवून आणणा-या लोकप्रतिनिधीला निवडून आणण्यासाठीच मी माझा मतदानाचा हक्क वापरेन.
लोकप्रतिनिधीला मतदान करतांना मी जात/समाज/धर्म यांचा विचार न करता केवळ आपल्या परिसराच्या विकासावर भर देईन.
मतदानाचा हक्क बजावतांना मी माझ्या वैयक्तिक स्वार्थाचा विचार करणार नाही! अथवा कुणाच्या खोट्या भूलथापांनाही कधीच बळी पडणार नाही!
२) मी भारताला शांततेच्या मार्गाने सदैव प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करीन.
३) मी भारतीय मातीशी,राज्यघटनेशी आणि पर्यायाने माझ्या कर्तव्यबुध्दीशी एकनिष्ठ राहिन, या एकनिष्ठतेसाठी वेळ आली तर प्राणांचीही पर्वा करणार नाही!
४) मी स्वतःच्या तसेच इतरांच्या सप्त स्वातंत्र्यांचा मान ठेवीन व इतरांच्या स्वातंत्र्याला धक्का लागेल असे कोणतेही वर्तन करणार नाही.
५) मी भारताच्या एकता व अखंडतेसाठी जीवनभर वचनबध्द राहिन.
६) मी कोणतीही जात, वंश, धर्म यांबाबतीत भेद करणार नाही. इतरांच्या जाती/वंश/धर्म इत्यादींचा सन्मान करीन. जाती/वंश/धर्मनिरपेक्षता आचरणात आणेन.
७) मी कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नाही. वैयक्तिक वा सार्वजनिक मालमत्तेला देशाची मालमत्ता समजून ती जतन करीन.
८) मी कौटुंबिक, सामाजिक वा देश यांच्याबाबत कोणत्याही विघातक कार्यात सहभागी होणार नाही. अफवा पसरविणे, दंगल वा जाळपोळ-लुटालुट करणे मी देशविघातक कार्य मानेन.
९) मी स्री-पुरुष समानता मानून दोघांशी समानतेने वागेन. मुलगा-मुलगी हा भेद विसरुन जाईन.
१०) मी कोणतीही अंधश्रध्दा न पाळता डोळसपणाने जगेन.
११) मी श्रमाला कनिष्ठ न मानता विधायक श्रम करण्यास लाजणार नाही.
१२) मी कोणी ज्येष्ठ असो वा कनिष्ठ, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
१३) मी इतर व्यक्ती, समाज, देश, प्राणी, वनस्पतीं व निसर्ग यांच्याप्रती संवेदनशीलता बाळगेन. दर वाढदिवशी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करीन.
१४) मी कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही या बाबत कसोशीने प्रयत्न करेन.
१५) मी सर्व कामे वेळेआधी वा वेळेवर पूर्ण करीन.
१६) मी इतरांना त्रास होईल असे वर्तन कधीच करणार नाही.
१७) मी नीटनेटकेपणा/ व्यवस्थितपणा याबाबत गांभीर्याने लक्ष देईन.
१८) मी घर, परिसर व सार्वजनिक स्वच्छता ठेवीन. तसेच वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करेन.
१९) मी रहदारीच्या नियमांचे संपूर्णपणे पालन करेन.
२०) मी माझे शरीर व आत्मा यांना देशाची संपत्ती मानून व्यसन वा आत्महत्या यांचा कधीही स्विकार करणार नाही. आलेल्या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी संयम व सहनशक्ती या सदगुणांचा आत्मविकास करीन. मनाची शांती ढळू देणार नाही.
२१) मी माणूस म्हणून जगेन आणि माणूसकीनेच वागेन.
बघा!
प्रत्येक भारतीयाने ही आचारसंहिता पाळायचे ठरविले तर आपला देश सहजपणे विकसित होईल…!!
एक सभ्य महासत्ता बनण्यासाठी!!!
आता समारोपाच्या चारोळीकडे वळू या!
- नागरिक दिन! *
लोकांनी लोकांसाठी चालविलेली लोकशाही,
नको स्वातंत्र्याचा गैरफायदा ना दंडेलशाही;
हक्कासोबतच कर्तव्याची देवू आपण ग्वाही,
“भारत एक महासत्ता”, गरजतील दिशा दाही!
सकल भारतीयांना पुनश्च..
जागतिक नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेख संकलन – श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

Leave a Reply