एका सैनिकाची पत्नी होणे म्हणजे फार मोठा धीर आणि संयम अंगी बाळगणे याची जाणीव मला मुळीच नव्हती. शरद आणि माझ्या जीवन वेलीवरती दोन नाजूक फुले केव्हा आणि कशी उमलून मोठी झाली ,हे कळलेच नाही. आतापर्यंत शरद रावांची ड्युटी फक्त मिलिटरी कॅन्टीन
असलेल्या ठिकाणी लागत होती. त्यामुळे कॅन्टीन कॉटर मधील खोलीमध्ये आयुष्य उत्तम रीत्या सुरु होते. वेगवेगळ्या प्रांतातील सैनिक पत्नींची मैत्री वाढलेली होती. एक वेगळे अनामिक नाते तयार झाले होते.
एक मात्र निश्चित परमेश्वर सुखाचे क्षण जास्त काळ उपभोगू देत नाही. त्यातच आता मात्र शरदरावांच्या ड्युटी ठिकाणी बदलीचे वारे वाहायला सुरुवात झाली. शरद रावांची बदली होण्याची चर्चा जोर धरू लागली होती. कोणत्या गावी बदली होईल म्हणून मनात एक धाकधूक सुरू होती. त्यात अचानक एक दिवस पंजाब मधील सीमारेषेवरील गावात बदली होण्याचे आदेश प्राप्त झाले. शरदरावांनी माझी समजूत काढली. “मी आठ दिवस बदली झालेल्या ठिकाणी जाऊन, तेथील परिस्थिती बघतो. एखाद कॉर्टर किंवा खोली मिळते का? ते बघतो”. असे म्हणून
शरद राव बदलीच्या गावी निघून गेले.
घरात बदलीच्या सुरू असलेल्या चर्चेतून एव्हाना मुलांना कळून चुकले होते की, आपल्या वडिलांची बदली झालेली आहे .रोज फोन कॉल करून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ,शरद राव मुलांची व माझी खुशाली विचारून चौकशी करत होते. बदली झालेल्या गावी कुठलेही कॉर्टर शिल्लक नसल्यामुळे आम्हाला एका खेडेगावात खोली करून राहावे लागणार हे निश्चित होते.
ड्युटी करून उरलेल्या वेळात शरद राव खोली बघण्यात व्यस्त असायचे. मात्र अजून कुठलीच व्यवस्था होत नव्हती. त्यात एके दिवशी अचानक पुलवामा हल्ला झाला आणि सीमारेषेवरील सैनिकांची ड्युटी
वाढविण्यात आली. मोठ्या प्रमाणावर गस्त सुरू झाली. ड्युटीची कुठलीच वेळ निश्चित नव्हती. ठिकाणही निश्चित नव्हते. दोन्ही देशांमधील परिस्थिती अधिक तांणली जाऊ लागली. आता तर शरद राव यांचे घरी फोन करणे सुद्धा कमी झाले. एक आशा होती की जवळ मोबाईल असल्यामुळे कधीही केव्हाही फोन करून विचारपूस करता
येत होती. परिस्थिती अवघड असल्याचे कळत होते. कधी
युद्ध सुरू होईल याचा भरवसा नव्हता. एक दिवस मात्र अचानक दुपारी दोन वाजता शरद राव यांचा फोन आला.” माझा फोन ऑफिसमध्ये जमा केला जाणार आहे. शेवटचा एक फोन करण्याची साहेबांनी परवानगी दिली. म्हणून मी फक्त तुला फोन करत आहे. आता मला तुझ्याशी फोनवर बोलता येणार नाही. आपल्या मुलांची काळजी घे. परिस्थिती शांत झाल्यानंतर मी पुन्हा फोन करेल. तोपर्यंत वाट बघ.” हे शब्द ऐकताच पायाखालची वाळू सरकली. बोलता-बोलता रडू कोसळले. परंतु तोंडात आलेला हुंदका तसाच दाबून ठेवला. मन घट्ट
करून परमेश्वराकडे शरदरावांच्या खुशालीची प्रार्थना करू लागली.
आता लक्ष फक्त टीव्हीवरील बातम्यांकडे लागले होते. या बातम्यांमधून परिस्थिती किती बिकट आहे. याची जाणीव होत होती. क्षणाक्षणाला काळीज तुटायला लागले. बातम्या बघून डोळ्यातील धार अधिकच न खंड पडता आपसूक वाहू लागली. दुपारचे दोन वाजले सोनूची
शाळेतून परत येण्याची वेळ झाली होती. सोनू दाराशी आला. कसेतरी डोळे पुसून मी दरवाजा उघडला. सोनूला जेवायला दिले. पण डोळ्यात आलेले आसव लपवणार तरी किती? इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या सोनुने पुन्हा पुन्हा विचारले .”आई तू का ग रडतेस?” सात वर्षाच्या
चिमुकल्याला आपला बाबा युद्धा वर गेलेला आहे हे सांगावे तरी कसे. म्हणून मी सोनुला म्हणाले ,”बाळा मी काल तुझ्या शाळेत आली होती ना. तुझ्या बाईंनी तू अभ्यास करत नाही. म्हणून सांगितले. मला खूप रागावले. म्हणून मला रडायला येत आहे. ” आपल्या चिमुकल्या हाताने आईचे डोळे पुसत सोनू म्हणायला लागला “आई, नको ना रडू,मी अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळवणार.” असे म्हणून सांत्वन करू
लागला.
दिवेलागणीची वेळ झाली. मात्र पावले काही करून किचन कडे वळत नव्हते. चार वर्षांची चिमुकली मीनू ,मात्र मला पप्पांशी फोनवर बोलायचे आहे. म्हणून हट्ट करू लागली. बेटा पप्पा आज मोबाईल घरीच विसरले. ड्यूटीवरुन आले की मग तुझ्याशी बोलतील. असे म्हणून मी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती आज अधिकच हट्टी झाली होती.तू खोटे बोलत आहेस. मला पप्पा रोज याच वेळेस फोन करतात. काही केले ती ऐकायला तयार नव्हती. डोळ्यातील असवं आणि राग, एकत्र अनावर झाल्याने माझा हात अचानक या
चिमुकलीवर उठला. हुंदके देत देत न जेवता ती तशीच झोपून गेली. दोन्ही पिल्लांना छातीशी कवटाळुन, मी हुंदके देत राहिली.रात्री-बेरात्री जाग आल्यावर टीव्हीचा आवाज कमी करून, मी एकसारख्या बातम्यांचे चैनल वर फेरफटका मारू लागली.
ऐन तिशीतल्या तरुणपणी असा प्रसंग माझ्यावर ओढवेल याची कधी कल्पना केली नव्हती. मनात काहूर माजले होते. नको नको ते विचार सुरु होते. आपसूकच परमेश्वराकडे, शरदरावांच्या खुशालीची प्रार्थना सुरू होती.जन्मदात्या आई वडील ,यांना फोन न करता आपल्या चिमुकल्यांची आणि कुटुंबाची काळजी लागलेल्या शरद रावांनी फक्त पत्नीलाच फोन केला होता. जन्माच्या नाडी पेक्षा आज पोटाच्या चिमुकल्यांनी बापाचं काळीज तुटलं असावं,म्हणूनच तर त्यांनी मला फोन केला असावा. याच एका विचाराने मी सारी रात्र जागून काढली.
माहेर आणि सासर हुन येणाऱ्या फोन वर बोलताना, आपसूकच डोळे पाणावत होते. बोलणे कमी आणि रडण्यात जास्त वेळ कधी जात होता कळत नव्हता. परमेश्वरा युद्ध थांबवा,म्हणून मनामनातून विनंती सुरू होती. आजचा दुसरा दिवस मात्र मला फार मोठा जाणवत होता. काही केल्या दिवस जात नव्हता.मुलांना शाळेत सोडल्यानंतर दिवसभर मी टीव्हीसमोर बसून होते. युद्धजन्य परिस्थिती संपली आहे. ही बातमी ऐकण्यासाठी माझे डोळे आणि कान उत्सुक होते.परंतु परिस्थिती बिकट असल्याचे वृत्त बातमीच्या चैनल वर झळकत होते. रडून-रडून डोळे पार टपोरे झाले होते. वडिलांनी केलेल्या व्हिडिओ कॉल मधून त्यांना याची जाणीव झाली होती. म्हणून त्यांनी मला धीर देत, भावाला माझ्याकडे पाठवले. बारा तासाच्या प्रवासानंतर,भाऊ आल्यावर त्याच्या गळ्यात पडून मी ओक्साबोक्शी रडत होते आणि तो मला धीर देता
देता स्वतःही रडत होता. भावाच्या येण्याने चिमू आणि सोनुला आनंद झाला. माझे मन मात्र अजूनही टीव्हीकडे लागलेले होते. तीन दिवसानंतर संध्याकाळी शरद राव यांचा फोन आला. परिस्थिती निवळली असून, चिंता करण्याचे कारण नाही. मी लवकरच एक-दोन दिवसात घरी येईल. या बातमीने मनातील सर्व काहूर संपला. पण डोळे मात्र अजूनही कासावीस आहेत, एकाच प्रतीक्षेत…
शब्दांकन :- प्रा. मिलिंद बडगुजर.

एक सैनिक जवान देशा बद्दलचं प्रेम,कर्तव्य दक्ष जवान,एकिकडे
ऐन ३० वर्षीय पत्नी दोन लहान मुलांना न दिसणारा बाप,आपल्या आईवडिलांना न दिसणारा मुलगा हे दृश्य कसं मन हेलावून टाकणारा प्रसंग आणि आम्ही आपापल्या घरांतच भांडणे, आनंद वगैरे माझा भारतीय ???विर जवानांना कोटी कोटी प्रणाम भारत ?? माता की जय
Nice reply sir