येणारे पर्व तरुणांचे
तरुणांबद्दल लिहतोय म्हणजे तरुण दिशाहीन झालेत किंवा बिघडलेत असे काही नाही. माझा विषय, आशय आणि कल थोडा वेगळा आहे. तरुणाई म्हन्टले की मला आठवतात ते “स्वामी विवेकानंद” आणि तरुणांबद्दलची त्यांची तळमळ. ते एक आदर्श गुरू आहेत.
आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे, पण तरुणांना फितवणारे खूप आहेत व त्यांचा दुरुपयोग घेणारे असंख्य म्हणून अशी प्रार्थाना करतो की तरुणांना तेजस्वी गुरू मिळोत आणि सकारात्मक विचारांची ताकद लाभो. व्यक्तीविकास आणि समाज विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते.
आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्वाची आणि “कन्फ्यूज़” झालेल्या तरुणांना मार्ग दाखविण्याची. आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळया पक्ष व इतर संघटना वेगवेगळया नावांनी केवळ नावापूरत्या अस्तित्वात आहेत. या संघटनांचा सहभाग समाज उन्नतीसाठी फारच कमी दिसून येतो किंबहूना बऱ्याचदा अशा संघटनांचा वापर स्वार्थासाठी व समाजात दुफळी माजविण्यासाठी केलेला दिसून येतो.
आजची राजकिय, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता मनातून वाटत आहे की तरुणांना मार्गदर्शन करण्याची व त्यांच्यातून कुशल नेतृत्व व परिपूर्ण व्यक्ती निर्माण करण्याची जवाबदारी खरोखर स्वत:ला लोकप्रतिनिधी, समाजसेवक, शिक्षक, पत्रकार व कार्यकर्त्यांची आहे. कारण देशाची मोठी ताकद असलेल्या तरुणांना जर असेच प्रभावहीन, नेतृत्वहीन व दिशाहिन ठेवले तर उद्याचे चित्र आजच्यापेक्षा अधिक किचकट असणार आहे.
आजचा तरुण स्वत:ला डिफरंट समजतो, त्याची मानसिकता ही ग्लोबल आहे! बी प्रॅक्टिकल . . . . . बी पर्टिक्यूलर असं म्हणणारा हा वर्ग आहे, पण म्हणून डोळे झाकून कोणालाही फॉलो करू नये आणि आपण देखील समाजात घडणाऱ्या घडामोडींकडे उघडया डोळयांनी लक्ष देऊन समाजविधायक कार्यात सक्रिय सहभाग घेवून भावी पिढीसमोर एक आदर्श निर्माण करुन त्यांना प्रेरणा देणे महत्वाचे आहे.
आजचा तरुण “स्मार्ट” आहे, आणि असलेच पाहिजे, पण स्मार्टनेस आणि झगमगाट यातला फरक देखील ओळखायला पाहिजे. आज “फोटोजनिक” असून चालत नाही तर प्रतिभायुक्त असेल तरच प्रधान्य मिळते व हेच वास्तव आहे.
आजचा तरुण “स्मार्ट” आहे व स्वत:च्या व्यक्तित्वाचे कमी-अधिक प्रमाणांत त्यांना स्पष्ट भान असले तरी हे व्यक्तित्व फुलविण्यासाठी केवळ करियर, पैसा, ऐषआरामाची जिंदगी एवढंच महत्वाचं नाही तर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी विचारमंथन व स्वत:ची भूमिका या गोष्टी देखील आवश्यक आहेत, पण याचे दुर्लक्ष तरुणाई करत आहे. या कडे दुर्लक्ष केल्यास देश मात्र स्मार्ट बनू शकत नाही.
देश विधायक कामात, राजकारणात आणि समाजकारणात तरुणांचा सहभाग अतिशय कमी होतोय आणि नि:स्वार्थीपणे मतदान करणाऱ्या तरुणांची संख्याही अल्प आहे चालली आहे. बऱ्याच शिक्षीत तरुणांची मतदार यादीत नावेही नाहीत आणि ह्याचा फायदा (गैरवापर) सर्रासपणे बोगस मतदानाद्वारे उठविला जात आहे. भारतासारखा तरुणांच्या देशात सध्याच्या समाजकारणांत व राजकारणात तरुणांचे प्रतिबिंब पडलेले दिसत नाही, याच्याने शहर व पर्यायाने देश खचतो.
आतापर्यंत विविध बदल घडत आलेत व तरुणांनी सध्य परिस्थितीत झालेल्या विविध बदलांचा सकारात्मक उपयोगही केलेला आहे. आपल्या कामाच्या व्यापातून ही असे तरुण सामाजिक बांधिलकी पार पाडताना दिसत आहेत. आपल्या कलेतून, व्यवसायातून हे तरुण आपले कर्तव्य निभावत आहेत. समाजात जे क्रांतिकारी बदल होत आहेत त्या अशा तरुणांचा वाटा सिंहाचा आहे.
मित्रांनो शेवटी इतकेच सांगतो की येणारे पर्व हे तरुणांचे आहे व येणारा काळ हा बदलाव आणि प्रचंड संघार्षाचा आहे, हा संघर्ष जिंकण्या-हरण्यासाठी नसून विकासाला जिवंतपणा देण्यासाठी आणि शहराला व पर्यायाने देशाला गती देण्यासाठी आहे.
श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू. अ. भा. ब. स. युवक समिती सदस्य अध्यक्ष चामुंडा माता प्रतिष्ठान, सोनशेलू


Leave a Reply