स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथी जाणून घेऊ त्यांचे विचार…
स्वामी विवेकानंद…
( १२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२ )
हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकार तर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
भारत भूमीसाठी तन, मन, धन व प्राण अर्पण करणारी अनेक नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यापैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद.
त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरे अध्यात्म समजावून सांगितले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रेरक विचार जाणून घेऊयात…
1) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
2) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
3) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
4) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
5) दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
6) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
7) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
8) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.
9) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
10) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्या मध्ये आहे.

Leave a Reply