।। माझा अनमोल खजिना ।। – श्री. दिनेश बडगुजर, ठाणे

माझे वडील स्व.भगवान गुरुजी (दादा) अचानक सोडून गेल्यावर, माझ्या वाटणीवर आलं एकमेव दशकांपूर्वीच, जुनं लाकडी कपाटं. ते उघडता क्षणी मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो. कपाटातली एक एक चीज दादांचा आयुषपट उलगडू लागली. सर्वप्रथम हाती लागलं एक कापडात बांधलेलं खुप जुने बाड. त्यात होत्या शेकडो जुन्या लग्न पत्रिका, ज्यात दादांनी रचलेली “मंगलाष्टके”. प्रत्येक पत्रिकेत वेगळे, अनोखे आणि परिपूर्ण अलंकारांनी नटलेले. नंतर हाती आल्या शेकडो फोटो फिल्म निगेटिव्हज. दादांना भटकंतीचा आणि फोटोग्राफी ची आवड होती. त्यांनी अनमोल क्षण, प्रसंग आणि प्रेक्षणीय स्थळे बंदीस्त करून ठेवले होते. मी एक वर्षाचा असतानाचा फोटो काढला होता ते मला प्रथमच समजले. माझ्या लाडक्या मामाच्या (माझे सासरे) लग्नाचे फोटो माझ्या दादांनी काढले होते ते स्वतः मामा पण विसरून गेले होते, असे खुप सारे क्षण अचानक समोर आले. माझ्यात फोटोग्राफी चा वारसा दादांकडूनच आला आहे. मग हाती लागली ती आता लुप्त झालेली असंख्य पोस्ट कार्डे. दादांनी वेगवेगळ्या वेळी वेग वेगळ्या व्यक्तींना लिहिलेली आणि त्याला आलेली उत्तरे. ती वाचता वाचता खुप गोष्टी समोर आल्या, जसे की त्यानी श्रीमंत सावकारांच्या घरी दूरच्या नदीवरून कावड नी भरलेले पाणी, सायकल वरून तालुक्यात वाटलेले पेपर व दुध. हे सर्व का तर त्यांच्या वडिलांचं छ्त्र ते फक्त एक वर्षाचे असताना हरवले होते. मग घरातील सर्वात लहान असूनही, 10 जणांचं कुटुंबा साठी एक वेळेच्या भाकरी साठी. हे सर्व कष्ट करून ते सातवी प्रथम वर्गात पास झाले आणि मग लागली प्राथमिक शिक्षक ही नोकरी. ही नोकरी आणि बाकीचे छोटेमोठे काम सांभाळून त्यांनी चिकाटीने BA (Honors) B.ed ही पूर्ण केले. आणि पदवीधर संघटनेचे चिटणीस म्हणून शेवट पर्यंत निस्वार्थी काम केले.

मग अचानक हाती आलेत ते त्यांनी कोरलेले खुप जुने Stencil पेपर्स आणि त्यांनी स्वतः घरीच बनवलेली पोळपाट लाटण्या सारखी so called प्रिंटिंग मशीन ! आजच्या पिढीला विश्वास बसणार नाही की त्याने खर्च प्रिंट काढता येतात. दादांचा हस्ताक्षर टाईपरायटर पेक्षा सुंदर होते. Stencil पेपर वर ते स्वतः पहिली ते सातवी चे परीक्षा पेपर कोरून काढत मग घरीच प्रिंट काढून, गठ्ठे सायकल वर बांधून पूर्ण तालुक्यातील 72 शाळांमध्ये वेळेत वाटून येत असत. किती ती आपल्या कामावरील श्रद्धा आणि प्रेम. आज कोण करेल हा सर्व उपद्व्याप?

कपाटातील चीजा अजून संपायच नाव नव्हतं. दोन वेस्स्थणात ठेवलेले अलबम मिळाले. एकात होता देशोदेशी ची पोस्टाची तिकीट संग्रह आणि दुसऱ्या त होता नाणी संग्रह. ज्यात इतिहास कालीन, ब्रिटिश कालिन तसेच 70 च्या दशका पर्यंत ची नाणी होती. आश्चर्य म्हणजे त्या संग्रहात एक सुवर्ण मुद्रा आणि खणखणीत चांदीचा बंदा रुपया होता. मला अजूनही समजले नाही की दादा हे सर्व उद्योग कधी करायचे, तेही खेडोपाडी ची नोकरी सांभाळून?
माझे दादा सर्वार्थाने एक आदर्श व्यक्तिमत्व होते, साण-थोर त्यांचे मार्गदर्शन आणि मदत मागायला निःसंकोचपणे यायचे. त्यांनी माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडविले जे आज आयुष्यात सर्वोच्च पदावर आहेत.
आता वेळ होती ती त्या खजिन्यात अजून काय आहे ते बघण्याची. मग हाती लागले ते त्यांनी वापरलेले बांबू चे बोरू आणि 3-4 काचेचे शाई भरण्यासाठी च्या अतिशय सुंदर दौती, त्यांचे पेन, त्यांचा BA (Honors) B.Ed पदवी लिहिलेला रबर स्टॅम्प. त्या काळी BA(Honors) ही अतिशय सम्मान जनक पदवी होती.
मग निघाले एक कार्ड बोर्ड चे बनवलेले सोनेरी मखर. मला आठवले की मी खुप लहान असताना त्यांनी मला गणपती बसविण्याच्या वेळेस बनवुन दिले होते. त्या काळी गणपती भिंतीत असलेल्या कोनाड्यात बसवत असत. आज हे सर्व लुप्त झालंय.

दादा, आज जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने तुमची खुप खुप प्रकर्षाने आठवण येते आहे. तुमची कमी कशानेही भरून येणार नाही. दादा, मी आज कुठल्याही मंदिरात गेलो तर मला मूर्तीच दिसत नाही हो…डोळ्यासमोर येतो तो फक्त तुमचा हदमुख, निरागस, प्रसन्न चेहरा !
तुम्ही माझ्यासाठी सोडून गेलेल्या अनमोल खजिन्यात सर्वात अनमोल चीज आहे ती म्हणजे तुमचा गुरुमंत्र- “कामात बदल म्हणजेच आराम”. तुम्ही दाखवून दिलेल्या मार्गाने मी चालण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही मला बोट धरून चालायला शिकविले परंतु मला तुमच्या वार्धक्याची काठी बनायचे भाग्य लाभले नाही.

दादा, तुम्ही जिथे कुठे आहेत तिथे तुम्हाला आई मुक्ताई सदगती देवो हीच प्रार्थना.

तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या आणि माझ्या परिवारावर आहे.
पितृदिनाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. तुमच्या आठवणी हाच माझा अनमोल खजिना आहे.
सदैव तुमच्या आठवणीत, तुमचा संजू (दिनेश बडगुजर, ठाणे)

कै. भगवान बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*