सृष्टी, मुळात सृष्टीची निर्मिती सजीवांसाठी झाली. या पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे. तसे पाहिल्यास मानव हा सर्वात प्रगत सजीव प्राणी समजला जातो. मानवाला आपल्या भावभावना शब्दातून, भाषेतून, संवादातून, कृतीतून प्रगट करता येतात. तेवढे इतर सजीवांना शक्य होत नाही. त्यांनी प्रयत्न केला तरी सर्वच प्राण्यांची भाषा सर्वांनाच अवगत नसते. असे असले तरी पूर्वी मानव इतर प्राण्यांप्रमाणेच जंगलात राहत असल्याने त्याचे बरेच प्राणी व पक्षांबरोबर (कधी कधी गरजेतून) सख्य निर्माण झाले ते आजतागायत! हे जरी खरे असले तरी मानवाचे सजीवांबद्दलचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे मानवतेचे गुणधर्म हल्लीच्या काळात ग्रहण लागल्यासारखे कमी झाले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे? इतर प्राणी पक्षांप्रमाणे इतर मानवाशी सुद्धा हल्ली एकमेकांचे पटत नाही. दुरावा निर्माण होत आहे. म्हणूनच याविषयी हा लेखनप्रपंच!
पुरातन काळापासून जेव्हा माणूस समूहामध्ये राहू लागला तिथून त्याचा विविध समाजाशी संबंध येत गेला आणि साहजिकच त्याचे सामर्थ्य सिद्ध करण्याचे प्रयत्न होऊ लागले. परिवर्तन म्हणजे बदल! परिवर्तनाची प्रक्रिया ही नैसर्गिक असते. त्याप्रमाणे परिवर्तन होत गेले आणि “बळी तो कान पिळी” या न्यायाने हे पुढे श्रेष्ठत्व सिद्ध करणे व आपले मत दुसऱ्यावर लादणे असे प्रकार वाढत गेले. गरजेतून अनुकूलन होत गेले. समाज, धर्म या संकल्पना निर्माण झाल्या. कालांतराने प्रत्येकामध्ये नियम, अधिकार आले. वेगवेगळ्या रूढी- परंपरा, चालीरीती, विविध प्रदेश वैशिष्टानुसार सुरू झाल्या. त्यात कालानुरूप भर पडत गेली. अर्थात काळ बदलत गेला तसे काही रूढी- परंपरा, चालीरीती, जुन्या काळानुसार लुप्तही झाल्या. त्यामध्ये भरही पडत गेली. काही अनिष्ट चालीरीतींबाबत, अज्ञानामुळे, चुकीच्या समजुतीमुळे त्यातून समाजामध्ये, धर्मामध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे अशा ठिकाणी त्या त्या काळामध्ये समाजामध्ये विविध संतांची भूमिका त्यांचे साहित्य हे महत्त्वाचे भूमिका बजावताना दिसून येते.
अनादी काळापासून आपल्या ऋषीमुनींनी प्रदीर्घकाळासाठी तपस्या करून अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त केले व ते वेद आणि उपनिषदे यासारख्या साहित्यातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले. गुरुकुल पद्धतीने हे ज्ञान सर्वत्र पसरत गेले. पण स्थल- कालपरत्वे भाषेमध्ये होत गेलेले बदल, भाषेची क्लिष्टता व अवघडपणा यामुळे हे ज्ञान दुर्लभ राहिले, दुर्लक्षित झाले असे मला वाटते. परंतु याच ज्ञानाचा वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या संतांनी उपयोग करून घेतला व लोकांना समजेल अशा भाषेमध्ये साहित्य निर्मिती केली. हे करताना वेद, उपनिषद, पुराणे, भगवद्गीता यांचाच वापर झाल्याचा उल्लेख आपल्याला विविध ठिकाणी आढळतो. हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान अजूनही तेवढेच प्रगल्भ उपयुक्त आणि दिशादर्शक असल्याचे दिसून येते. संत कबीर, संत तुलसीदास, संत ज्ञानेश्वर, आणि अशा अनेक संतांनी सुरू केलेली ही ज्ञानाची गंगा आजही आपल्यापर्यंत विविध मार्गाने संत साहित्यातून पोहोचत आहे. अर्थात त्याचा आपण किती उपयोग करतो यावर आपली प्रगती व आपल्याला जीवनात मिळणारा आनंद अवलंबून आहे.
हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी कृष्णाने सांगितलेली भगवद्गीता! तिचा आजही संपूर्ण जगामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर साडेआठशे वर्षांपूर्वी भगवद्गीतेचे लोकाभिमुख स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी! ही सुद्धा आज लोकांमध्ये मुखोद्गत आहे. त्यानंतर तुकाराम गाथा, दासबोध अशा अनेक साहित्य प्रकारांची निर्मिती झाली. त्याचा अभ्यास, कीर्तने, प्रवचने यातून नियमित सर्वत्र होताना दिसतो. यावरून या सर्व संत साहित्याचे महत्त्व विशद होते.
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”
या भगवतगीतेतील श्लोकाचा अर्थ आहे की, “तूला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याचे फळांवर नाही.” तुला तुझे कर्तव्य पार पाडण्याचा अधिकार आहे, पण फळ काय मिळेल याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. हा श्लोक आपल्याला कर्म आणि फळांमधील फरक स्पष्ट करतो. आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, फळांवर नव्हे.
जर आपण एखादे काम करत असू, तर आपण ते चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण ते यशस्वी होईल की नाही याबद्दल जास्त चिंता करायची नाही. एकंदरीत हा अर्थ समजण्यासाठी मानवाचे संपूर्ण आयुष्य निघून जाते पण त्याचा आत्मबोध होत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
यानंतर हेच तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मधून समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
“हे विश्वचि माझे घर”
असे म्हणताना संपूर्ण विश्व हे मानव जातीच्या कल्याणाकरिता आहे आणि मानवाने संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी भूमिका ज्ञानेश्वर माऊली व्यक्त करतात. ज्ञानेश्वर माऊलींची एकंदरीत भूमिका त्या काळातील समकालीन संतांनी सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले. संत नामदेव, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई अशी एक ना अनेक नावे सांगता येतील. शब्दांच्या मर्यादेमध्ये या सर्वांचे कार्य विशद करणे कठीण आहे. परंतु सर्वांची भूमिका मात्र विश्वबंधुत्वाची, मानवी कल्याणाची, मानवाच्या उद्धाराची होती यात शंका नाही. “ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालासे कळस” या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात,
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणवा.”
किंवा “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,
देह कष्टविती पर उपकारे”
हे त्रिवार सत्य नाकारता येत नाही. तुकाराम महाराजांच्या समकालीन रामदास स्वामींनी सुद्धा संपूर्ण भारत भ्रमण करून दासबोधातून संपूर्ण युवाशक्तीला मारुतीमय करून टाकले आणि शक्ती उपासनेला चालना दिली. हल्लीच्या काळात समर्थांनी सांगितलेलं
“आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेक”
हे वचन अधिक कालानुरूप आणि हल्लीच्या परिस्थितीत अनुकरण करण्यायोग्य वाटते. हे पटवून देताना समर्थांनी प्रपंच व परमार्थ यांची आत्मीयता निसंदीग्ध शब्दांमध्ये व्यक्त केली आहे. परमार्थाचा अनादर करून फक्त संकुचित स्वार्थीपणे प्रपंच करणारे लोक मूर्ख आहे असे समर्थ म्हणतात आणि अर्थात ते सत्य असल्याचे आपल्याच दिसून येते.
हे सर्व पटवून देण्यासाठी सर्व संतांनी विविध साहित्य प्रकारांचा उपयोग केला. अभंग, किर्तन, भारुड, गवळण, प्रवचन अशा अनेक प्रकारात मानवाच्या ज्ञानामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता या संतांच्या साहित्यात होती आणि अजूनही आहे. मात्र आधुनिकतेच्या नावाखाली विज्ञानाची प्रगती, सभोवतालचे बाह्य आकर्षण, ढोंगीपणा, अनाचार अशा विकृत बाबींचा समाजामध्ये शिरकाव होताना दिसत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी संत विचार हाच एकमेव मार्ग आहे. संत समाजाचे हित जोपासतात, समाजाला शांतता स्थैर्य प्राप्त व्हावे, लोक सदाचारी व्हावेत, नैतिक बाबीत त्यांच्या आयुष्याची कल्याण व्हावे, अशी निस्वार्थ भूमिका संतांची सर्वत्र दिसून येते. त्यामुळे संतांची परोपकारी तळमळ, जनकल्याणसाठीचे प्रयत्न या उदात्त दृष्टिकोनाचा मार्ग समाजाने स्वीकारला पाहिजे आणि त्यातूनच परिवर्तन घडवून मानवाचे कल्याण होईल यात शंका नाही.
सर्वच संतांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, कर्मकांड, भेदाभेदाला विरोध केला. मानवतावादी ज्ञानप्राप्त समाजाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु हल्लीच्या काळी मानव सुखासिन बनला आहे. बेकारी, भ्रष्टाचार, भाषावाद, प्रांतवाद, चंगळवाद, जातीय दंगली, गुन्हेगारी, आतंकवाद, पर्यावरण विषयक समस्या, शिक्षणाचा अयोग्य वापर, संस्कृतीचा पडत चाललेला विसर, यातून आपण विकासाच्या दिशेने जाण्याऐवजी अधोगतीच्या, पतनाच्या दिशेने जात आहोत. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास अशी चुकीची व्याख्या, त्यातून झालेले गैरसमज यामधून मानवाचा ऱ्हास होत आहे, असे चित्र दिसते. यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा एकदा संतांच्या साहित्याचा उपयोग करून मानवाच्या उन्नतीसाठी, दया, क्षमा, परोपकार, सहिष्णुता यासारख्या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणे अपेक्षित आहे. त्यातूनच मानवी जीवन सुखी होईल असे वाटते.
एकंदरीत मानवतेसाठी संत साहित्याची योगदान वर्णन करण्यास शब्दभंडार अपुरे ठरेल एवढे ते वर्णनातीत आहे, हेच खरे!
लेखक : कैलास विमल भाऊलाल बडगुजर
टिटवाळा
भ्रमणध्वनी : 8888284265
🧿🧿🧿🧿🧿🧿🧿
Leave a Reply