सुर्यास्त :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

सूर्यास्त, सूर्याचे मावळणे हा निसर्गचक्राचा एक नियमित भाग! उद्याच्या प्रकाशमय सूर्योदयासाठी आजची अंध:काराकडची वाटचाल आवश्यक आहे. आजच्या अंध:कारातच उद्याचा उष:काल लपलेला आहे हे निश्चित. तसं आपला आयुष्य म्हणजे एक निसर्गचक्रच! जन्म आणि मृत्यू एक अटळ सत्य. त्याशिवाय जगाचा हा गाडा चालणार कसा? समजा मृत्यूच थांबला तर? अगदी थोड्या दिवसात सर्वत्र अराजक माजेल. हे असं काही होऊ नये म्हणूनच निसर्गाने सर्वच कसं अगदी नियंत्रित ठेवलं आहे. पण त्यासाठी मृत्यूला कवटाळणे आलेच. त्याशिवाय पुढची पायरी शक्यच नाही. त्यामुळे त्यापासून दूर जाता येत नाही. त्याची भीती बाळगून उपयोग नाही. त्याच्या केवळ भीतीनेच गर्भगळीत होण्यापेक्षा मग त्याला मित्रच मानले तर? सर्व काही सोपं होऊन जाईल आणि जीवनातलं भय संपून जाईल. जीवन सुखकर होईल. आज ना उद्या त्याला भेटायचेच आहे हे एकदा मनाला पटलं की जगणं सोपं होईल. नाही का? एकदा हे पटलं की मग ही भेट सुंदर कशी बनवता येईल? याचा विचार करता येईल. या ठरलेल्या भेटीला अधिकाधिक रंगतदार बनवता येईल. सप्तरंगांची उधळण करता येईल, अगदी चित्रातल्याप्रमाणेच! जसे सूर्य मावळला म्हणजे सर्व काही संपले असं नाही. उद्याचा उष:काल आहेच. तसेच आपले जीवन संपले म्हणजे सारे काही संपले असे नाही. जाता जाता उद्याच्या सूर्योदयासाठी आपण आभाळ मोकळे करून जातोय, हेही तेवढेच एक पुण्य कर्म, नाही का? आयुष्यभर केवळ मिळवतच राहायचं, साठवतच राहायचं, असं नाही. जसा सूर्य सुद्धा मावळतिला रंगांची उधळण करून जातो, आनंद देऊन जातो. तसे कधीतरी, काहीतरी दिलेही पाहिजे. एकंदरीत त्यागातच समाधान आहे, हेच खरे!

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*