जळगावची शान,बडगुजरांचा अभिमान, निर्विकार आणि निरागस व्यक्तिमत्व, कविता माझा श्वास आहे असं म्हणत आपल्या शब्दांना मोहिनी घालणारे, श्री. निंबा पूना बडगुजर यांच्या शाहिरी मानवंदना या काव्यसंग्रहातील बहिणाबाई चौधरी यांच्यावर लिहिलेल्या पोवाडा या गीताचा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या प्रथम वर्ष कला मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यासाठी सर्वप्रथम त्यांचे शतशः आभार.
अत्यंत कमी शिक्षण म्हणजे केवळ जुन्या काळातील मॅट्रिक एवढेच शिक्षण घेऊन सुद्धा आजच्या उच्चशिक्षितांना लाजवेल अशा प्रकारची लिखाणशैली आण्णांची आढळून येते. असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये साहित्यिक गुण असतात, परंतु प्रत्यक्ष कागदावर उतरवताना मात्र प्रत्येकाची दमछाक होत असते. बालकवी पासून ते ना धो महानोर अशा अनेक कवींच्या मनातील काव्ययात्रा ही साहित्य पुस्तकातून, वाङ्मयातून येणाऱ्या भावी काळामध्ये अखंडित चालू राहावी ही तळमळ मनाशी धरून अण्णांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात 2011 मध्ये सप्तरंग आणि 2018 मध्ये भावतरंग हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.त्यांच्या 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या शाहिरांना मानवंदना या तिसऱ्या काव्यसंग्रहात देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 75 देशभक्तांवरील कविता (पोवाडा ) फार प्रसिद्ध झाल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये स्वतः कुलगुरूंनी या काव्य पुस्तकाचे स्वखर्चाने प्रकाशन करून माजी स्वातंत्र्यसैनिकांना वाटप केले. आण्णांची कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये निवडली गेली.या माध्यमातून बडगुजर समाजातील एका काव्य उपासकाच्या प्रतिभेचा सूर्य या ठिकाणी प्रकाशित होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
मुळगाव बोरनार आणि एरंडोल येथील रहिवासी श्री. निंबा पुना शेठ बडगुजर यांनी 28 वर्ष म्हसावद येथील आरोग्य केंद्रामध्ये सुरुवातीला मलेरिया सर्वेलन्स वर्कर म्हणून 1972 पासून आपल्या व्यवसायिक जीवनाला सुरुवात केली. शेवटी 2007 यावर्षी ते आरोग्य सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झाले. आरोग्य, सामाजिक जनजागृती, आणि शिक्षण प्रबोधन यावर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. दिलेले काम सांभाळून सन 1989 मध्ये आदर्श उपकेंद्र राबवून त्यांनी जिल्हा प्रशिक्षण पथक मार्फत सेवक सेविका यांना मार्गदर्शन करणारे ट्रेनर म्हणून काम केले. त्यांनी केलेल्या या कार्याची पावती म्हणून जागतिक आरोग्य दिनानिमित्त आकाशवाणी केंद्रावर त्यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत त्यावेळच्या आरोग्य मंत्री ललिता राव यांनी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन 1982 मध्ये सन्मान केला होता. आण्णांनी अनेक साहित्य संमेलनांमध्ये भाग घेऊन सन्मान पत्रे मिळवलेली आहेत.
आण्णांच्या कविता या अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. त्यात आरोग्य पत्रिका पुणे, दैनिक लोकमत, दैनिक देशदूत, साप्ताहिक शिवानी समाचार, पाक्षिक बडगुजर दर्शन, बडगुजर समाजदूत, गावकरी तरुण भारत, देशोन्नती, बातमीदार, खानदेश वार्ता, एरंडोल वार्ता, वार्तादूत धरणगाव, शब्दाई पुणे, अंकुर चाळीसगाव, पुढचं पाऊल औरंगाबाद, दिवाळी विशेष अंकांमधून प्रसिद्धी सप्तरंग हा काव्यसंग्रह 15 ऑगस्ट 2011 यावर्षी प्रकाशित झाला.
2006 मध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते त्यांना रत्नागिरी येथे राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच सिने अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा बाड यांच्या हस्ते हैद्राबाद येथे प्रतिभा सन्मान राष्ट्रीय पुरस्कार हा मनुष्यबळ अकादमी मुंबईतर्फे देण्यात आला. अण्णांना राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार औरंगाबाद येथे देण्यात आला. राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार युवाशक्ती सामाजिक संस्था नाशिक यांच्यातर्फे 2020 मध्ये देण्यात आला.खानदेश साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य धुळे यांच्यामार्फत साहित्य सेवा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ येथे कॉम यांच्या वतीने मनोहर मनो युवा मासिका सतत ज्येष्ठ नागरिकांसाठी लेखन करत असल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट साहित्यिक हा पुरस्कार नांदेड या ठिकाणी 2023 मध्ये प्रदान करण्यात आला. आण्णांना आतापर्यंत जवळपास 60 ते 80 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
वाटलं होतं कविता हा शब्दांचा खेळ असतो
वाटलं होतं कविता हा शब्दांचा खेळ असतो
एखादी उपमा एखादा विचार एकत्र केला की साऱ्यांचा मेळ बसतो …….
पण कविता करणं एवढं सोपं नसतं
कधी विचारांची शृंखला जोडावी लागते. तर कधी भावनांची कास धरून अनुभवांच्या फुलांनी शब्द सजवावे लागतात. तेव्हा कुठे कविता तयार होते. भावनांची व्यापकता, भक्तीरस, समर्पण, प्रेमामधील सौंदर्य, नात्याची बांधिलकी, निसर्ग सौंदर्य, आत्मभाव, स्वतः प्रतीचा शोध, दृष्टीतील सौंदर्य, विचारांना योग्य आणि सुदृढ कसं बनवावं या साऱ्याच भावनांनी आण्णांच्या कविता ओतप्रोत भरलेल्या आहेत.
असं म्हणतात की जगण्याचा सूर पक्का असेल तर तुमच्या शब्दांना नेमका अर्थ प्राप्त होत जातो. भाव भावनांशी इमान सांगणाऱ्या आण्णांच्या कविता आहेत . आणि या भावनांना एक अस्सल आत्मस्वर आहे. गरीब आणि श्रीमंत, निसर्ग आणि मानव या नात्यातील दीर्घ भावनिक चढ-उतार हे त्यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अशाच ताकदीच्या कवितांचे सादरीकरणही हे उत्तम विचार करतात म्हणून त्यांच्या कविता या वाचकांच्या काळजापर्यंत पोहोचतात. आयुष्याचा अर्थ शोधत असताना काळाच्या तीनही पटलावर जी आढळ उभी राहते ती असते कविता आणि अशा कविता आदरणीय आण्णांनी लिहिल्या.
आण्णा नेहमी म्हणत असतात की चांगले कार्य करत रहा. याची दखल कुठे ना कुठे घेतली जात असते. यामुळेच त्यांची बहिणाबाई यांच्या जीवनावर लिहिलेली सखोल अशी कविता ( पोवाडा.)कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्भूत केली आहे. बडगुजर समाजा साठी ही अत्यंत उल्लेखनीय अशी बाब आहे. त्यासाठी समस्त बडगुजर समाजाच्या वतीने त्यांचे शतशः आभार. त्यांच्या हातून या पुढील काळामध्ये अशाच विविध विषयावरील काव्य लेखनातून समाजाची देशाची सेवा घडत राहो याच सदिच्छा.या काव्यप्रतिभेच्या शब्द सारथ्याला आमचा मानाचा मुजरा….
स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने रोवला
आण्णा आज तुम्ही झेंडा ………
तुमच्यासाठीच आज मांडला
मी हा शब्द सुमनांचा सडा………
पुनश्च आपणास अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन :प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव ( 9421184495 )
समर्पित कवी श्री.निंबा पुना बडगुजर – 9637079688
Leave a Reply