“मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार” – श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

दिशा शिक्षणाची!

10वी, 12वीचे निकाल लागले की नेहमी प्रमाणे धावपळ सुरू होते, हे नेहमीचेच! तसे महत्वाचे सुद्धा! पण तरीही आपण
“तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हे विधान फक्त ऐकतो आणि सोडून देतो. पण स्वतःच्या जीवनाचा “शिल्पकार” होण्याचा प्रयत्न करत नाही. कारण ते कष्टप्रद वाटते. त्याऐवजी पूर्वी लहान मुलांना चालताना आधार म्हणून पांगुळगाडी देत असत, त्याच पद्धतीने इतरांच्या शिक्षण मार्ग निवडी नुसारच आपणही सरधोपटपणे शिक्षण घेतो. तसेच हल्ली आपले शिक्षण चालू आहे असे मला वाटते. अमुक टक्के म्हणजे अमुक शाखेला प्रवेश हे ठरलेले! यात इतर प्रकारच्या संधी, आपली आवड, क्षमता यांचा विचार होत नाही. यासंदर्भात दरवर्षी अनेक मार्गदर्शक व्याख्याने होतात. आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. ‘हे काय आम्हाला शहाणपण शिकवणार, आम्हाला आमचे भवितव्य कळते’ असे म्हणून आपण ‘आपले तेच खरे’ या न्यायाने आपल्या शिक्षणाची दिशा ठरवत असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध अनेक संधी आणि मार्ग यांची माहिती घेण्याऐवजी आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर केवळ टाईमपास करणे, व्हिडिओ, रील्स पाहणे, गेम खेळणे यासारख्या निरुपयोगी तत्वांसाठी करत असतो. त्यामुळे आपल्या भवितव्याची अवस्था काय होईल याचा आपण विचार करत नाही. एकंदरीत शिक्षण आणि विचार यांची फारकत झालेली दिसून येते. त्यामुळे बऱ्याचदा निर्णय चुकलेले दिसून येतात. शिक्षणाची योग्य दिशा आपले भवितव्य ठरवण्यासाठी महत्त्वाची असते. ही दिशा भरकटल्यानंतर कालांतराने आपल्याला झालेला पश्चात्ताप गेलेली वेळ पुन्हा आणू शकत नाही. (माझ्या जीवनातील प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बी. एड ला माझ्या बरोबर असणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी फारच थोडे आज अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
इतरांच्या पावलावर पाऊल ठेवून हजारो, लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च करताना भविष्यातील होणारा अपेक्षाभंग आपल्याला बऱ्याचदा दिसत नाही, असा अनुभव आहे. केवळ पदवी घेतली की नोकरी मिळेल आणि नोकरी मिळाली ती खुर्चीवर बसून आरामात करायची आहे असा एक गोड गैरसमज झालेला दिसतो. एका ठराविक क्षेत्रातच नोकऱ्या उपलब्ध आहेत, इतर कोणत्याही क्षेत्रात तशी संधी नाही. जास्तीत जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्यांचे क्षेत्र हेच शिक्षणासाठी उत्तम असते, असा आणखी एक दुसरा समज! अशा प्रकारे दिशाभूल झाल्यामुळे भविष्यकाळात अनेकदा बेकारी ही निश्चितच! त्यासाठी देश, सरकार जबाबदार नसून 90% जबाबदारी स्वतःची असते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतल्यास होणाऱ्या निवड प्रक्रियेत आपल्याला यश हमखास मिळते. मात्र तसे नसल्यास आपल्याला नोकरी मिळणे दुरापास्त ठरते. प्रत्येक क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. केवळ कागदी पदवी भविष्यात उपयुक्त ठरत नाही. प्रत्यक्ष मुलाखतीवेळी आपला हजरजबाबी पणा आवश्यक असतो. विचारलेल्या प्रश्नांची अचूक व संयुक्तिक उत्तर देणे ही सुद्धा एक कला व कौशल्य असते. त्यामुळे जरी पुढे नोकरी मिळाली तरी त्यामध्ये समाधान आपल्या सोबत असेल की नाही यासाठी वैयक्तिक आवड, निवड, छंद हे महत्त्वाचे ठरतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व सारखे नसते आणि त्यामुळे इथे सगळा गोंधळ होतो. सध्या आयटी क्षेत्र म्हणजे सर्वोत्तम असा समज सर्वत्र झालेला दिसतो. मात्र त्या क्षेत्रातील फायद्याप्रमाणे अडचणी तसेच इतर क्षेत्रांमधील संधी दुर्लक्षित होत आहे. अशा संधी हे इतर जाणकार मिळवतात आणि पुढे यशस्वी होतात. आपण मात्र अपयशाने खचून माघार घेतो आणि आपल्याच पदरी अपयश का? हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत राहतो. याबाबत अनेकांना दोष देत राहतो. पण खरी चूक आपले स्वतःची पहिल्या पायरीतच झालेली असते. आता पुन्हा माघारी येणे शक्य नसते. खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे आपले जीवन मात्र भरकटलेले असते. एकंदरीत योग्य वेळी, योग्य विचार करून योग्य दिशेने शिक्षणाची पाऊलवाट चालणे आवश्यक असते, हे महत्त्वाचे!
आयटी, मेडिकल आणि इंजिनिअरिंग, काही प्रमाणात फार्मसी हे क्षेत्र सोडून इतरही अनेक क्षेत्र उपलब्ध आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत तंत्रज्ञान प्रगतीमुळे अनेक क्षेत्र उपलब्ध झाले आहे होत आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांचा शोध घेऊन आपल्याला योग्य क्षेत्र निवडणे हे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी पुन्हा माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे शक्य आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर, उपलब्ध संधी, गरज यानुसार योग्य क्षेत्राची निवड ही आपल्याला भविष्यकाळात यशदायी ठरू शकेल.
केवळ नोकरी हा पर्याय विचारात न घेता व्यवसाय, सेवाकेंद्र, विक्रीव्यवसाय या संदर्भातील पर्याय विचारात घेतले पाहिजे. दिवसेंदिवस सरकारी नोकरी मिळणे कठीण होत आहे. खाजगी नोकरी, त्यामधील स्पर्धा मिळणारे मर्यादित वेतन, त्यातील अटी व अडचणी या सर्व बाबींचा विचार करून आपल्या क्षमतेनुसार अनेक पर्याय विचारात घेऊन शिक्षण घेणे सध्या आवश्यक ठरत आहे. वयाच्या 30-35 वर्षे पर्यंत अनेकजण नोकरीची वाट पाहत घरी बसून असल्याचे निरीक्षणे आहे. अर्थातच हे भयावह आहे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये याकरिता दहावी, बारावीनंतर योग्य पाऊल उचलणे आवश्यक ठरते. काही अतिशय कमी आर्थिक खर्चाचे व कमी कालावधीचे शिक्षण मार्ग उपलब्ध आहेत त्यांचा विचार होणे आवश्यक ठरते. विद्यार्थ्यांची कलचाचणी व्यक्तिमत्व आवड निवड क्षमता आपली आर्थिक क्षमता 👉तसेच शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, आपली गरज, घरातील जबाबदारी👈 याबाबतही विचार करून योग्य शिक्षण क्षेत्र निवडणे म्हणजे वेळेचा सदुपयोग करणे होय आणि मग आपले जीवन स्वतःच घडवणे सहज शक्य होईल. त्यानंतर आपण म्हणू शकतो “मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार”

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

(सोबत उदाहरणादाखल 2 तक्ते दिले आहेत, या शिवाय इतर मार्ग सुध्दा शक्य आहेत. )

2 Comments

Leave a Reply to Kailas Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*