स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते असे म्हणतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा सहभाग महत्त्वाचा असतो.असेही म्हणतात. या स्त्रीचे महत्व लक्षात घ्यावे तेवढे थोडेच!
पूर्वीच्या काळी महिला अशिक्षित होत्या असे सांगतात. तसे पाहिले तर पुस्तकी शिक्षण नसले तरी अनुभवाच्या पाठशाळेत या महिला अनेक वर्ग उत्तीर्ण झालेल्या होत्या, असे दिसते. (त्या काळी बाळंतपण करणाऱ्या स्त्रिया या हल्लीच्या सर्जन असलेल्या डॉ. पेक्षा अधिक निष्णात होत्या.) त्या काळात शालेय शिक्षण हे केवळ अध्यात्मिक ग्रंथाशी मोठ्या प्रमाणात संबंधित होते. दैनंदिन जीवनाशी संबंधित शिक्षण हे दैनंदिन कृती मधूनच दिले जात असे. यामध्ये प्रत्यक्ष अनुभव हाच या शिक्षणाचा पाया होता. त्यामुळे हे शिक्षण अधिक दृढ होते, असे वाटते.
नंतरच्या काळात इंग्रजांनी आणलेली शिक्षण पद्धती सर्वत्र वापरण्यात आली आणि त्यातून पुस्तकी शिक्षण सुरू झाले. त्याचा प्रत्यक्ष परिणाम हल्ली आपल्यासमोर आहे. यामधून बऱ्याच स्त्रियांनी लक्षणीय ज्ञान मिळवले, प्रगती केली. पण मोठ्या प्रमाणात या कागदी शिक्षणाच्या जोरावर बऱ्याच महिला आपल्या मूळ कर्तव्यापासून दूर जाताना दिसतात किंवा आपल्या जबाबदारीपासून मुक्त होताना दिसतात. तसे पाहिले तर शिक्षण, त्याचा उद्देश हा केवळ ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात आपले जीवन अधिक सुखकर करण्यासाठी व्हायला पाहिजे. पण झाले भलतेच! शिक्षणामुळे स्त्री पुरुषांपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकडेच कदाचित काही वेळा जास्त लक्ष केंद्रित झालेले दिसते. मध्यंतरी शिक्षण व ज्ञानाचा उपयोग स्त्री अपत्य नको यासाठी केला गेला. तेव्हा त्यासाठी पुरुषांना दोषी ठरवण्यात आले. मात्र त्याचे मूळ स्त्रीच असल्याचे आपल्या लक्षात येईल.
कालांतराने आज स्त्रिया अधिकाधिक शिक्षण घेत आहेत. बऱ्याच क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींचे यश सहज लक्षात येण्यासारखे आहे. परंतु याप्रमाणे शिक्षणात भरारी घेतल्यानंतर आपले पुढील आयुष्य अधिकाधिक सुखी आणि समाधानी करण्यासाठी बऱ्याच वेळा या मुली लग्न न करण्याचा निर्णय घेतात किंवा लग्न केले तरी त्यांचे पुढील सर्व नियोजन अगोदरच निश्चित असते. लग्नानंतर दोघंही नोकरीला असूनही एकच अपत्य पाहिजे. दोन अपत्ये सांभाळणे अवघड आहे. आर्थिक खर्चही न झेपणारा असतो, अशी विचारसरणी दिसते. यामुळे आपला भविष्यातील प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे याची कल्पना येते. शिक्षणामुळे आपण ज्ञानी होण्यापेक्षा जास्त आत्मकेंद्री होत आहोत असे दिसते. शिक्षणामुळे मानवाची प्रगती होण्याऐवजी मानवतेचा ऱ्हास होताना दिसतोय आणि अर्थात याचा केंद्रबिंदू भविष्यात स्त्रीच ठरेल यात शंका नाही. कारण नवनिर्मिती ही स्त्री मुळे शक्य आहे आणि त्यापासून स्त्री दूर गेल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्येचे कारण स्त्रीच ठरेल.
एकंदरीत काल, आज आणि उद्या चालू असलेले कालचक्र याचा केंद्रबिंदू हा स्त्रीच आहे. त्यामुळे शिक्षणामुळे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ आधुनिकतेसाठी न करता भविष्यातील समस्या आणि त्यांचा उलगडा करण्यासाठी करायला हवा. त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलायला हवी. आपली वैचारिक पातळी उंचावायला हवी. भूतकाळातील अनुभवाच्या शिदोरीवर, वर्तमान काळाच्या समस्यांवर मात करून, उत्तुंग भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी वाटचाल करायला हवी. त्यासाठी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा!! 🌹🌹
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265





Leave a Reply