नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ८२👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती:भाग-८२.
तिनी मुलाला बोलावून आणलं. त्याला मुलाला आधी बाबाने प्रेमाने विचारपूस केली. म्हणतो उर्मट उत्तर देऊ लागला. नंतर मात्र बाबाचा पारा चढला आणि आपल्या मोठ्या दमदार आवाजात बाबा ने पोराला समजवायला सुरुवात केली. काय करायचं काय नाही ते सांगितलं तरीही त्याची उत्तरं कमी होईना. शेवटी वीस-बावीस वर्षांच्या तरुण मुला पुढे हात टेकले आणि शेवटचा उपाय म्हणून त्याच्याशी काहीही न बोलता त्याच्या आईला सामान भरायला सांगितलं स्वतःचं. बाबा म्हणाला.”माता जी आप हमारे साथ चलो… क्यू इस लडके की पीछे पडे हो? तुम्हारी खाने पीने रहने की व्यवस्था कर देंगे…इसको जो करणा है करने दो..तुम हमारे साथ चलो” बाईसुद्धा आतून एक गाठोडं घेऊन आल्या आणि आमच्या बरोबर चालू लागल्या. आधी मुलाने काहीही हरकत घेतली नाही, मात्र आई खरोखरीच जाते हे पाहून तो नरमला. उद्या पासून कामावर जाईन तू जाऊ नको म्हणून आईला थांबवू लागला…. बाबाने आपला फोन नंबर त्या बाईंना दिला, आणि सांगितलं, ज्या दिवशी हा मुलगा पुन्हा काम सोडेल केव्हा गैर जबाबदार होईल तेव्हा तुम्ही मला फोन करून माझ्याकडे निघून या…. पुढे दोन तीन दिवसानंतर बाईंचा फोन आला… कोणाच्यातरी फोन वरून त्या बोलत होत्या. मुलगा कामावर जाऊ लागला होता. पुढे मात्र काही फोन आला नाही…

या परिक्रमेत आम्ही सततच घेतच आलो होतो. आज मात्र आमच्याकडून कोणाचं भलं होतं आहे हे पाहून खूप आनंद झाला. आतापर्यंत प्रेमाची एकच बाजू माहीत होती ती म्हणजे घेण्याची… आता देण्याची बाजूही समजू लागली होती…”इदम् न मम” शिकले होते मी आधी.. मात्र आता याहूनही पुढे जाण्याची वेळ होती… इदम् न मम हे म्हणताना देखील मी माझ्या मनाला “हे माझं नाही” असं समजावत होते मात्र आता हे जे काही आहे ते ज्याचं आहे त्यास मिळो ही भावना मनात येऊ लागली… आता “माझं आहे” किंवा “माझं नाही” ह्या विचारातला सुद्धा ‘माझं’ हा शब्द उतरवून काढावा कोणीतरी असं वाटू लागलं होतं.
थोडं वेगळ्या पद्धतीने सांगते. जे उदाहरण देते आहे ते फारच वेगळं आहे पण त्यावेळेला माझ्या मनात तेच उदाहरण आलं होतं. इलेक्ट्रिक ची मेन लाईन, घरातली छोटी-मोठी बटणं, आणि विजेची उपकरणे, या तिन्ही चा विचार केला तर आपली भूमिकाही छोट्या-मोठ्या बटनांचा सारखी आहे. वीज आपल्याकडे येते आहे, आणि ज्या उपकरणाला गरज पडेल तिथे ती आपल्याकडून जात आहे इतकीच आपली भूमिका…. आता ह्या इलेक्ट्रिकच्या बटणाने वीज ‘माझी आहे’ किंवा वीज ‘माझी नाही’ या दोन्हीचा विचार करायला हवा का? मेन लाईन कडून वीज घेऊन तिला विजेच्या उपकरणाकडे वळवणं एवढंच त्या बटनांचं काम असतं. तिथे अधिकार कोणता?
या माताराम कडून निघाल्यानंतर एकच विचार मनात येत होता.. ‘जो जे वांछिल तो ते लाहो…’ ईश्वरा, माझ्यासाठी काय जे तू वाढून ठेवलं होतंस, आहेस ते माझ्यासमोर आहेसच… त्याहून जास्त किंवा कमी असं मला काहीही नको आहे. किंबहूना ज्याप्रमाणे मी समाधानी आहे त्याप्रमाणे ज्याचं त्याचं समाधान ज्याला-त्याला लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना….अर्थात कोणाच्या तरी समाधानाचं निमित्त होणं हे योगायोग म्हणून ठीक आहे हो, पण फक्त त्यासाठी केवळ झटत राहणे म्हणजे संतपण… आणि तितकी कुवत किंवा लायकी आपली नाही, मात्र आजपर्यं मी फक्त माझा विचार करत आले, माझ्या मनात माझ्या शिवाय इतर कुणाला ही कधीही माझ्या इतकी जागा मी उदार पणे देऊ केली नाही, जिथे तिथे सर्वप्रथम मी मलाच ठेवले , अशा मनात, हे ईश्वरा आधी तू ‘इदम् न मम’ हा मंत्र पेरलास, आणि नंतर यज्ञात आहुती देताना ‘स्वाहा’ म्हणतो तसं सगळं वाहतं करण्याचा एक विचार…आचरण नाही हं, फक्त विचार माझ्या मनात अगदी अलगद पणे कसा आणून सोडलास याचं मला नवल वाटतं… आणि ह्या एका विचाराने, (आचरनाणे नाहीच नव् बरं, फक्त विचाराने म्हणतेय, कारण जे झालं तो निव्वळ योगायोग होता, आम्ही काहीही केलं नव्हतं) फक्त विचाराने जर माझ्या मनाला, आत्म्याला, परमसुखाच समाधान मिळत असेल तर ते आचरण किती आनंददायी असेल नाही? अर्थात ते तसं वागण्यासाठी कमालीचं अलिप्त पण, करुणा, जिद्द, विश्वास, सद्भावना, प्रयत्न , शुचिर्भूत अंतरात्मा आणि प्रेम हे सगळचं अत्युच्च कोटीचं असावं लागतं. आणि आपण सगळेच आपली स्वत:ची पायरी पूर्णपणे ओळखून असतो. आपण कसे आहोत हे आपल्याला प्रत्येकाला व्यवस्थित माहित असतं फक्त आपण त्याचा मनापासून स्वीकार करत नाही. दुस-या समोर तर नाहीच, मात्र स्वत: समोर देखील आपण आपल्या स्वत:ला आपण जसं आहोत तसं स्वीकारत नाही, आणि तितकं जरी आपण करू शकलो तरी आपण समाधानाचे धनी होऊ हे मला समजलं …. अजून फक्त समजलंय… इम्पलीमेंट झालं नाहीये हं!
आम्ही पुढे चालत होतो तसं आभार हळूहळू भरून येत होतं. आम्हाला सूर्य कुंडला पोहोचायचं होतं. कॅनॉल पासून थोडं पुढे जाऊन उजवीकडे एक फाटा होता तिथे गेल्यावर सूर्यकुंड अजूनही तीन-साडेतीन किलोमीटर दूर आहे हे समजलं. वाटेत एक छोटसं गाव आलं. आभाळ इतकं भरून आलं होतं की कुठल्याही क्षणी ते कोसळणार. आज आम्हाला कदाचित गावातच थांबावं लागणार की काय असं आम्हाला वाटलं मात्र सूर्य कुंडला पोचलो तर बरं होईल असा विचार मनात येत होता. आम्ही एक नजर आभाळाकडे टाकली… हलके हलके तुषार बरसायला सुरुवात झाली होती. आम्ही अजूनही चालतच होतो. .. मध्ये मध्ये सर येईल आता असं वाटायचं ,दोन-चार थेंब पडले की थांबून जयची… कोणीतरी वरून या ढगांची चावी अजून पूर्ण सोडली नाहीये, धरून ठेवली आहे असं सारखं राहून राहून वाटत होतं. आणि होतही तसंच… आम्ही सूर्य कुंडला पोहोचलो, धर्मशाळेत बाहेरच्या ओट्यावर चपला काढल्या, बॅग ठेवल्या, आणि खूप वेळ धरून ठेवलेला पाऊस जोराने बरसू लागला. ढगांनी भरलेलं गाठोडं माझ्या मैयानी हाताने घट्ट धरून ठेवलं होतं आतापर्यंत आणि आम्ही पाऊल टाकताच ते गाठोडं संपूर्णपणे रितं केलं की काय असं वाटलं.
सूर्य कुंडला पोहोचण्याच्या आधीचा एक अनुभव सांगणार आहे. सूर्य कुंडाच्या महाद्वारा बाहेरचा परिसर आणि त्या परिसराशी माझा असलेला निकटचा संबंध, याबद्दलचा अनुभव… सूर्यकुंड येथील हनुमान मंदिर… आणि ह्या मंदिराचं आजपर्यंत न उलगडलेलं रहस्य.. केवळ ते बघण्यासाठी आम्ही उद्याचा संपूर्ण दिवस सूर्यकुंड ला थांबणार होतो. इथल्या मारुतीरायाची गंमतच निराळी आहे. तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही! अगदी सकाळ दुपार संध्याकाळ सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रकाराला पडताळून बघाल! असं काहीतरी इथे रोज होत असतं! आणि तेच बघण्यासाठी मी थांबले होते…. सांगणारे पण पुढच्या भाग-८३.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*