नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ८०👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇८०.👇

नर्मदे हर हर
मित्रांनो, माझ्या प्रिय वाचकांनो आज आधी तुम्हा सगळ्यांचे मला आभार मानायला हवेत.मागचा भाग म्हणजे आपल्या अनुभव कथन मालिकेचा ५० वा भाग होता. नर्मदा मैयाच्या एका लहानश्या लेकराचे बोबडे बोल हे अर्धशतका पर्यंत जाऊन पोहोचतील असं कधीही मला वाटलं नाही, मात्र तुम्ही वाचकांनी दिलेल्या प्रतिसादातून मला दर वेळी नवी उर्जा मिळत गेली आणि प्रत्येक वेळी एका नव्या भागाचं सृजन होत गेलं. त्यामुळे या अनुभवकथन मालिकेच्या वृद्धी चं सगळं सगळं श्रेय माझ्या वाचकांना, आणि माझ्याकडून तुम्हाला आवडेल अशा भाषेत, तुम्हाला आवडेल अश्या शैलीत लिहवून घेण्याचं कार्य करणा-या माझ्या नर्मदा माई ला. मला समजलेली (खर तर अजूनही नक्की माहित नाही) नर्मदा मैया तुमच्या समोर माझ्या माध्यमातून मांडून ती माई मला पुन्हा एका पुण्याकर्माशी जोडतेय आणि तिची कृपा दृष्टी माझ्यावर कायम ठेवते आहे हेच खरं. या अनुभव मालिकेचे किती भाग आहेत असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. त्याचं उत्तर अजूनही माझ्याकडे नाहीये, कारण अजूनही माझं लिखाण पूर्ण झालेलं नाहीये. ते आता त्या मैयावर सोडून मी फक्त लिहिण्याचे कार्य सुरु ठेवतेय. तिला जितकं माझ्याकडून लिहवून घ्यायचं असेल तितकं ती लिहवून घेईल, काही राहिलंच शिल्लक तर “नर्मदे हर”.. अजून काय…नाही का?

*परिक्रमेच्या वाटचालीचा आढावा घेत असता ओंकारेश्वर पासून निघून, शूलपाणीची झाडी, समुद्र पार करून महेश्वर पर्यंत येणं म्हणजे जवळ जवळ अर्धी परिक्रमा होत आलीये. आणि आता महेश्वर च्या पुढे जाऊन अमरकंटक आणि मग फिरून पुन्हा ओंकारेश्वर अशी अर्धी अजून बाकी आहे. ही अनुभव मालिका मी रोजनिशी सारखी लिहिलेली नाही त्यामुळे तारीख वार वेळ यावर भर नं देता अनुभव आणि निसर्ग यावर काय तो भर दिलेला आहे. बरेचदा एका पाठोपाठ एक असे सतत अनुभव येत राहिलेत आणि बरेचदा काहीही अनुभव न येता दिवस सरत गेले. जेवढे जमतील तेवढे लिहिले आणि बाकी चे मैयार्पण झालेत. त्यामुळे आता पुढे येणारे अनुभव आणि आतापर्यंत आलेले अनुभव एकसारखेच असतील, तितकेच प्रभावी असतील किंवा काहीतरी नवीन असतीलच असं सांगता यायचं नाही. अमुक अनुभव मोठा आणि अमुक लहान हे असं वर्गीकरण परिक्रमावासी ला करताच येत नाही. कारण आलेला प्रत्येक अनुभव हा त्या त्या वेळी मिळत असलेल्या समाधानाचं प्रतिक असतो. त्या त्या परिस्थितीशी तितकाच जुळलेला असतो. अगदी रस्ता चुकणे, आणि कुणीतरी येऊन रस्ता सांगणे हा अनुभव प्रत्येकालाच येतो, तरीही त्या वेळेची परिस्थिती मात्र भिन्न असते आणि म्हणून तो अनुभव एक वेगळा अनुभव म्हणून गाठीशी राहात असतो. हे सगळं मी का सांगतेय? तर एक वाचक म्हणून तुम्ही जेव्हा माझ्या अनुभवांच्या माध्यमातून मैयाची अनुभूती घेता त्यावेळी तुमच्या जाणीवेशी मी देखील नकळत जोडली जातेच नं? तुमच्या त्या जाणीवा जश्या आतापर्यंत जपल्या गेल्या तश्या आताही जपल्या जाव्या, आणि आता पर्यंत, म्हणजे अर्ध्या वाटे पर्यंत तुम्ही जशी साथ मला करत आला आहात तशी साथ मिळत राहावी या साठी हा सगळा उहापोह. यापुढे काय असा प्रश्न तुमच्या मनात प्रत्येकच भागा अखेरीस असतो,तसाच तो माझ्याही पुढे असतोच…. अनुभव माझे असतात पण ते मांडताना प्रामाणिक पणा खेरीज दुसरं काहीही येवू नये, अहंकाराचा स्पर्श देखील येऊ नये हेच सतत मनात असतं…त्यामुळे त्या माई ला स्मरून, आणि तिच्यावर सोपवून मी फक्त कागदावर उतरवण्याचे काम करत असते… आणि म्हणूनच मी देखील तुमच्या इतकीच अजाण असते. तरीही नम्र विनंती इतकीच की हे प्रेम असं कायम राहू द्या…
क्रमश: भाग ८१.
नर्मदे हर हर…
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*