नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती-भाग:७९.
..तुम्ही दक्षिणा दिली आहे. आता यात काय ते तुम्ही परत घेऊन जा. थोडं थोडं नावापुरतं वाटल्यास आम्ही खातो. असं आम्ही त्या आजोबांना सांगितलं. आम्हाला वाटलं त्या पिशवीत नक्कीच चिवडा, फळं किंवा तत्सम सामान असेल. मात्र त्या पिशवीमध्ये जवळ जवळ एक किलो तांदूळ एक किलो मुगाची डाळ, एक पाव तेल, हळद, तिखट, मीठ, मसाला, बटाटे, वांगे, कांदे, असं खिचडीला लागणारं रीतसर सामान आमच्या दोघांसाठी वेगवेगळे पॅक करून दिलं होतं.तेलाच्या प्लास्टिकच्या बाटल्या व्यवस्थित पॉलिथिन मध्ये बंद करून रबर बैंड लावून दिल्या होत्या. आणि हे सगळ आम्ही घेऊन जावं म्हणून ते आजोबा आम्हाला आग्रह करत होते. साधारण सत्तरीच्या आसपास त्यांचं वय असेल. आम्हाला दक्षिणा दिल्यानंतर हे आजोबा 20 किलोमीटर मागे घरी जाऊन हे सगळं सामान घेऊन आले होते. “बहुत दूर से सिर्फ आपके लिये लाया हु, आप कृपया रख लीजिए और बना के पास लिजीये तो हमे अच्छा लगेगा”.. असे आग्रह मोडवण्यासाठी खूप कठोर हृदय लागतं हो!आणि मैयाच्या सान्निध्यात हृदयाची कठोरता अगदी पूर्णपणे धूवून निघालेली असते. आमचा नाईलाज झाला आणि तेवढी वजनी बॅग घेऊन आम्ही पुढे चालू लागलो.मात्र त्या वेळी आजोबांच्या चेहऱ्यावर जे आनंदाचे,सेवेचे भाव दिसत होते त्या आनंदापुढे तीन-साडेतीन किलो वजन म्हणजे काहीच नाही!*
याच रस्त्यावर पुढे एक कार येऊन आमच्या जवळ थांबली. खिडकी खाली करून आतल्या माणसाने आम्हाला खिडकीजवळ बोलावलं.शंभर शंभर रुपये दक्षिणा आमच्या हातावर ठेवली. इतकी दक्षिणा नको असं म्हटल्यावर कार मधला साठीच्या आसपासचा माणूस आम्हाला म्हणाला “नर्मदा मैया की हम पर बहुत कृपा है. उनकी वजहसे आज मै जिंदा हू. उनके भक्तो के लिए जितना करुंगा उतना कम है, मुझे तो आपकी बहुत सेवा करनी है, वो तो हम करेंगे. यह रुपये तो कुछ भी नही”… आम्ही रात्री कुठे थांबणार आहोत अशी चौकशीही त्या माणसाने केली. आम्हालाच काही कल्पना नसल्याने “मालूम नही” असंच उत्तर आम्ही दिलं… “मै आपको धुंड लुंगा” तो म्हणाला. ते स्कूटर वाले आजोबाही असंच म्हणाले होते… पण ह्या कार वाल्या माणसाबद्दल एक शंका मनात आली. हा माणूस कार मधून उतरून खाली देखील आला नाही. त्याने आम्हाला खिडकीपाशी बोलावलं… सेवा करायची आहे असं म्हणतो मात्र वागणुकीतून तसं दिसत नाही असा विचार मनात येऊन गेला. तो तसाच ठेवून आम्ही पुढे निघालो.
आम्ही सक्का या गावाला पोहोचलो. तिथे एका चहा वाल्याने आम्हाला चहा ला बोलावलं. डावीकडे आत एक दीड किलोमीटरवर एक मंदिर आहे तिथे तुम्ही राहू शकता असं त्याने सांगितलं. मात्र एक माणूस आम्हाला बोलवायला आला. “आप हमारे घर चलीये यही सामने तो है…” हे घर श्री नायक यांचं. त्यांच्या घरी गेल्यावर जी काही सेवा मिळाली त्यामुळे मन भारावून गेलं. कोण खरंच कुठल्या परिस्थितीत असतो आणि तरीही कशी सेवा, निस्सीम भक्ती आपल्यापुढे येते याचे आलेले प्रत्येक अनुभवच वेगळे आहेत. या नायक कुटुंबातल्या मुलीची गोष्ट सांगितली तर अंगावर काटा येईल. तो कार मधला माणूस उतरून खाली का आला नाही त्याचंही उत्तर मिळालं. “मै आपको धुंड लूंगा, अभी तो बहुत सेवा करनी है” असं म्हणणारा कार मधला माणूस आम्हाला पुन्हा भेटला का? आमच्या मनात येऊन गेलेल्या विचारांच्या मागे इतकं काही असू शकतं याचा उलगडा आम्हाला झाला खरा पण तो कसा झाला हे पुढच्या भागात सांगणार आहे. तोवर नर्मदे हर


Leave a Reply