नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ७६👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७६
मागच्या भागात मी तुम्हाला अमरकंटक चा पावसाचा अनुभव सांगितला. नर्मदा माईच्या निर्णयानुसार पुढे जायचं हा निर्णय घेतला होता. तिनेआम्हाला पावसात भिजू दिलं नाही.

रूषा गावाच्या पुढे एका शिवमंदिरात आजची रात्र काढली होती. इथेदेखील अनपेक्षितपणे उत्तम भोजन व्यवस्था मंदिराच्या मागच्या भागाला असलेल्या बंगल्यात झाली होती. इथून दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादि आटोपून आम्ही पुढे निघालो खरं मात्र वेळेअभावी आम्ही कपडे धुतलेले नव्हते.आज कपडे धूणं गरजेचं होतं कारण आज कपडे धुतल्या गेले नाही तर उद्या घालायला स्वच्छ कपडे आमच्याकडे नव्हते. वाटेत कुठे हापशी लागली तर तिथे थोडा विश्राम करून कपडे धुऊन घेऊ असं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे वाटेत बऱ्याच हापश्या लागल्या. मात्र एकीलाही पाणी नाही. “शे…एकाही हापशी ला पाणी नाही, मला तर वॉशिंग मशीनची आठवण येते य”..मी अगदी सहजच बाबाला हे वाक्य बोलून गेले…

या भागात पाण्याची टंचाई असल्याचं समजलं. आम्ही सडक मार्गाने निघालो होतो त्यामुळे नर्मदामैया ही फार जवळ नव्हती. आता पाणी सापडेपर्यंत वाट पाहणे याशिवाय दुसरा इलाज नव्हता. शेवटी कनकधारा ला एका मोकळ्या प्लॉटवर एक हापशी सापडली तिला पाणी होतं, मात्र खूप पंपिंग केल्यावर अगदी थोडंच पाणी यायचं. आमच्याजवळ साठवणीला देखील काही नाही. आता कपडे धुण्या पेक्षा निदान पाण्यातून काढणे महत्त्वाचे वाटू लागले. तिथेच मोकळ्या मैदानात आम्ही सामान मोकळ केलं. धुण्याचे कपडे वेगळे केले, आणि आलटून पालटून, जोर लावून, पाणी काढायला सुरुवात केली. दोन-तीन पाण्यातून कपडे काढल्या जातील की नाही ही सुद्धा शंकाच होती. आमचे प्रयत्न सुरू होते. आणि शेजारच्याच घरातली एक बावीस पंचवीस वर्षांची मुलगी आमचा हा प्रयत्न बघत होती.

कनकधारा गाव फार मोठ असं नाही. इथे लोकांकडे मोबाईल हौसेखातर घेतलेले आहे पण नेटवर्क फारसं मिळत नाही. नाही म्हणायला इलेक्ट्रिसिटी आहे पण लाईट फारच जास्त जातात. अशा छोट्याशा गावात असताना त्या दिवशीची संध्याकाळ अतिशय अनपेक्षित अनुभवातून गेली.

अम्ही सतत पाणी काढण्याचा आणि कपडे धुण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेजारच्या घरातली ती तरुणी आमच्याकडे बघत होती तिने आम्हाला आवाज दिला “मैया जी पानी नही आयेगा. हमारे घर मे पानी भर के रखा है‌. आप कपडे धो लीजिये”… आम्ही न मागताही आम्हाला पाणी मिळालं म्हणून आनंद झाला खरा मात्र ह्या घरच्या लोकांनी कुठून तरी पाणी भरून आणलं असेल आणि ते आपण वापरावं हे काही प्रशस्त वाटलं नाही. मी तिला म्हणाले, एक बादली पाणी दे त्यात कपडे बुचकळून काढतो. उद्या पुन्हा कुठेतरी व्यवस्थित धूवून घेऊ. आमचं हे बोलणं सुरू असतानाच आतून तिची आई बाहेर आली. आणि त्यांनी आम्हाला आग्रहाने घरात बोलावलं, अक्षरशहा हात धरून ती मला घरी घेऊन आली आणि आपल्या मुलीला जे बोलली ते ऐकून आम्ही थक्कच झालो.

ती आपल्या मुलीला म्हणाली “अरे इतना सारा पानी रखा है एक बाल्टी पानी क्यू देती हो परिक्रमावासीको? पहले एक काम करो जनरेटर सुरू करो, तब तक वो बक्सा खोलो” असं म्हणत तिने नवीन कोऱ्या वॉशिंग मशीन चा बॉक्स आमच्यासमोर उघडा केला. ती पुढे म्हणाली, “गुडिया की शादी तय हुई है, उसके लिए वॉशिंग मशीन लाया है, अभी शादी को समय है, आप इस मशीन मे पुरे कपडे धोलेना,मेरी गुडिया की मशीन अच्छी और लंबी चलेगी. अगर पहली बार परिक्रमावासीओके कपडे जायेंगे तो शुभ शगुन होगा”… किती ही श्रद्धा? मुलीच्या लग्नासाठी आणलेली नवी कोरी मशीन त्या बाईने परिक्रमावासींचे कपडे धुण्यासाठी उघडून दिली… तिच्या श्रद्धेचा मान ठेवला आणि वॉशिंग मशीन मध्ये आम्ही कपडे धुतले. इतक्या छोट्या गावात जिथे मोबाईलच नेटवर्क नाही, इलेक्ट्रिसिटी चा भरोसा नाही, अशा ठिकाणी जनरेटर सुरू करून वॉशिंग मशीन मध्ये आमचे कपडे धुतल्या जावे याला काय म्हणायचं? पण हा अनुभव इथे संपत नाहीये… कारण पुढे जे काय झालं त्याने मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि ओक्साबोक्सी रडू लागले. मीच काय तिथे हजर असलेलं प्रत्येकच जण रडत होतं. सांगते.

“आज यही सो जाओ कल सुबह निकल जाना”. त्या आईंनी खूप आग्रहाने आम्हाला तिथेच थांबवून घेतलं. समोरच ओट्यावर आम्ही आमचं आसन लावलं. संध्याकाळची आरती पूजा झाली. भोजन प्रसादी साठी आम्हाला आत बोलावल्या गेलं. पंचपक्वान्नाचे भोजन आमच्यासमोर मांडून ठेवलं होतं. बटाट्याची भाजी, पुरी, खीर, शिरा आणि सुंदर सा पुलाव असं भरलेलं ताट. चविष्ट आणि पोटभर जेवण आम्हाला खाऊ घातल्यानंतर घरची मंडळी जेवायला बसलीत. त्यांच्या ताटात मात्र फक्त वरण आणि भात… त्यांची परिस्थिती सधन दिसत होती, मग तरीही ते फक्त वरण भातच का खात असावे?

“दीदी, बिटिया, आपने पुरी सब्जी खीर हलवा नही लिया? भैया जी को भी नही परोसा?” मी विचारलं… त्यावेळी तिथे घरची बाई, तिची मुलगी आणि तिचा मुलगा असे तिघे जण होते. तिघांनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि ते मुकाट्याने जेऊ लागले. मला काही समजेना,मात्र तरीही त्यांचं जेवण होईस्तोवर मी शांत बसले आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर माझा प्रश्न पुन्हा विचारला? “आपको मिठा पसंद नही है क्या दीदी?”… आता मात्र घरची मैया जी ढसा ढसा रडू लागली. दोन्ही मुलं देखील कावरीबावरी झालीत. मैया जींनी माझ्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाल्या…”आज बच्चो के पिताजी को गुजर के 17 दिन हो गये है. उनके जानेके बाद आप हमारे घर पधारे पहले परिक्रमावासी हो. मेरे पती परिक्रमावासीओकी बहुत सेवा करते थे. वे हमेशा कहा करते थे की परिक्रमा वासियों की सेवा मत छोडना. हम सब बाहर गाव गये थे तब अचानक ही हार्ट अटॅक हुआ और चल बसे. जिस दिन चल बसे उस दिन भी उन्होंने अपने हाथो से परिक्रमा वासियों को चाय पिलायी थी, तब हमारी फोन पर बात हुई थी…. आज आप हमारे यहा पधारे है तो लगता है कि आपको यहा उन्होने ही रोक लिया है…. आपको देख कर लगता है हमारे पती यही आसपास है…. लेकिन हमे माफ करियेगा, यह बात हमने आपको पहले नही बताई”…

तिचं बोलणं ऐकून मला सुद्धा अश्रू थांबवता आले नाहीत. जिचा नवरा जाऊन फक्त सतरा दिवस झाले आहेत, ज्या मुलीचं लग्न वडिलांच्या निधनामुळे लांबणीवर पडलं आहे, त्या बाईची आणि त्या लेकरांची मैय्या वर आणि परिक्रमावासींवर इतकी श्रद्धा? इतका विश्वास?… नर्मदामय्याच्या परिक्रमावासींच्या येण्याने त्यांच्या कुटुंबाला मिळालेलं समाधान हे सगळ्या पेक्षा जास्त मोठं आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी तिथेच थांबण्याचा निश्चय केला. “आप कल भी रुकोगे तो हमे बहोत अच्छा लगेगा” या विनंतीला आम्ही मान देऊ शकलो आणि त्या कुटुंबात दोन समाधानाचे क्षण देण्यासाठी नर्मदामैया ने आम्हाला तिथवर पाठवलं हे आमचं भाग्य! खरंच कमाल वाटते गं मैया तुझी… कधी तू तुझं रूप माझ्यातून दाखवते तर कधी तू तुझं रूप इतरांच्यात मला दाखवतेस…. मला भरभरून समाधान देतेस आणि कुणाच्यातरी समाधानाचं कारण मला बनवतेस… ते पुण्य तू माझ्या पदरात घालतेस.. खरंच तुझी लीला नं समजण्यासारखी आहे गं!… तिथून पाय निघत नव्हता तरीही दुसऱ्या दिवशी भोजन प्रसादी आटोपून आम्ही पुढे निघालो.. फोन नंबर एक्सचेंज केलेत. आज दोन वर्षांनंतरही दीदी माझ्याशी संपर्कात आहेत. परिक्रमावासींची सेवा आधी सारखेच आताही सुरू आहे, आणि दीदी आजही म्हणतात, “माताजी उस दिन तुम आये इसलिये हम यह सेवा आगे बढा सके… मै तो तूट ही गई थी, तुम्हारे आने के कारण मुझे सही रास्ता मिल गया”… त्यांची मुलगी गाडा सराई ला स्वतःच्या घरी आता सुखाने नांदते आहे… नर्मदा माई तू तुझ्या भक्तांना कायम साथ देत असतेच, कायम सन्मार्ग दाखवतच असते…!!

दीदींचा निरोप घेऊन पुढे निघालो, तो सहा-सात किलोमीटर अंतर चालून झाल्यावर माझं स्वेटर दिदींकडे राहिल्याचं लक्षात आलं. आजवर अनेक गोष्टी मागे सुटल्यात मात्र ज्या सुटल्यात त्या सुटल्यात.. त्यासाठी परिक्रमेत असताना परत म्हणून फिरले नाही. तसंच स्वेटरचं… जे राहीलं ते मैयार्पण… त्याचा पुढे विचारही करायचा नाही. आम्ही पुढे चालत राहिलो. साधारण खरं गहनाच्या आगेमागे असताना एक बाईक वरचा माणूस आमच्या पाशी येऊन थांबला. “तुम्हारा सामान कनकधारा में छूंट गया है ना? यही रुक जाओ सामान मिल जायेगा”… दीदींनी माझं स्वेटर एका ऑटो वाल्याला दिलं होतं. ऑटो वाल्याला एक सवारी कुठेतरी सोडून मग आमच्यापर्यंत येणं शक्य होणार होतं म्हणून समोर जाणार्‍या एका अनोळखी गाडीवाल्याला हा निरोप देऊन त्याने पुढे पाठवलं.‌‌ सात-आठ किलोमीटर तो ऑटोवाला फक्त माझं स्वेटर मला देण्यासाठी आला होता. अशावेळी नेमकं काय करावं तेच समजत नाही…. शेवटी काहीही न करता अतिशय प्रामाणिकपणे आणि आदराने नर्मदे हर करण्यापलीकडे काहीही शिल्लक उरत नाही… मी देखील तेच केलं..

खरंतर आज खर गहना होऊन देखील पुढे जाण्याची इच्छा होती. मात्र बाबाचा पाय दुखत होता, माझी लुंगी फाटली होती ती शिवून घेणं आवश्यक होतं… वाटेत लहान-लहान गावं असल्याने एखादा टेलर सापडेल असं वाटत होतं. बाबाचा आराम देखील होईल आणि लुंगीचं काम देखील होईल असा विचार करून आमचा शोध सुरू होता. मात्र ह्या सगळ्यात काहीतरी वेगळं घडायचं होतं. काहीतरी शिकवण मिळायची होती. नेमकं काय घडलं आणि नेमकी कुठली शिकवण मिळाली ते सांगणार पण पुढच्या भागात…. नर्मदे हर..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*