नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७५
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला दम्हेडी पासून ते अमरकंठ पर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. जलाल शेख ऑटो वाला, मुसलमान मुलांनी राम कुटिर पर्यंत केलेली सोबत, राम कुटिर मध्ये भोजन प्रसादी, चहा, काहीही न मिळून सुद्धा आम्ही उपाशी झोपलो नाहीत तो अनुभव,राम कुटिर पासून ते अमरकंठ पर्यंतच्या जंगल भागात पांडुरण्याचे भेटलेले रामदास महाराज, तो अनुभव याबद्दल सांगितलं होतं. चितळे माईंची दुकानातली भेटही सांगितली होती.चितळे माईंकडे तीन दिवस कसे आनंदात गेले ते सांगितलं होतं आणि चितळे माई मला रागावू लागल्या तिथं येऊन आपण थांबलो होतो. आता तिथून पुढे सांगते.
झालं असं की आम्ही तीन दिवस थांबून झालं होतं. माईंच्या आग्रहाखातर अजून एक दिवस आम्ही अमरकंटक ला माईंच्या आश्रमात थांबलो होतो. त्यानंतरचा हा दिवस. आता मात्र पुढे जाणं भाग होतं. मी सकाळपासून कामाला लागले होते. माई अजूनही अधून मधून आग्रह करतच होत्या. मी निघते म्हंटल्यावर त्या रागावल्या. म्हणाल्या,”मी तुझी बॅग बाहेर नेऊन देते, आता काही तू आत येऊ नकोस.. जायचंय ना तुला जा मग….”… तिथून पुढे खरी गंमत सुरू झाली. आम्ही बॅग भरून बाहेर काढली, सगळ्यांचे निरोप घेतले आणि आंगणा बाहेर रस्त्याला लागतो तोच पाऊस सुरु झाला. पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही पुन्हा आत मध्ये आलो. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही पुन्हा बाहेर पडलो. पण हे काय! बाहेर पडताच पुन्हा पावसाला सुरुवात! हे असं कमीत कमी चार ते पाच वेळा झालं. मी आत आले की माई विचारायच्या “काय झालं जात का नाहीयेस तू”, आणि मी निरुत्तर! सकाळी सात वाजल्यापासून तर साडेदहा वाजेपर्यंत हे असंच सुरू! शेवटी मी माईंना म्हणाले, नक्की काय करावं मी? जावं का थांबावं? मनातून विचार येतो, पुढे निघावं, असं वाटतं मैयाच सांगतेय… पाऊस येतो तेव्हा वाटतं मैया म्हणते जाऊ नको…. यावर काहीतरी उपाय सांगा! मी काय करू मला काही समजत नाहीये….
माई म्हणाल्या “अग मग विचार मैयाला तुला नक्की काय हवय ते”. ठरलं!मैयाला विचारायचं!! मी उजव्या हाताची दोन बोटं बाहेर काढलीत. एका बोटावर ठरवलं ‘जायचं आहे’ आणि दुसऱ्या बोटावर ठरवलं ‘जायचं नाही’. आश्रमाच्या बाहेर गेले. मैया किनारी बसून तिला प्रार्थना केली. म्हटलं तू सांगशील तो शेवटचा निर्णय. मग पाऊस येऊ देत की ऊन वारा… तू जो निर्णय घेशील तो कुठल्याही परिस्थितीत मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन, अर्थात तू पाठीशी आहेस म्हटल्यावर तुझा निर्णय पूर्ण होईलच. मी दोन बोटं मैयाच्या पाण्यात बुडवलीत आणि तात्काळ पाठमोरी फिरून समोरून येणाऱ्या अनोळखी बाईला एक बोट धरायला सांगितलं. तीने जे बोट धरलं त्यावर होतं ‘जायचं आहे’. निर्णय झाला होता. कितीही पाऊस आला तरी आता मी पुढे निघणार होते. चितळे माईंना सांगितलं, त्यांचे आशीर्वाद घेतले, आणि पुन्हा एकदा बॅग घेऊन आश्रमाच्या बाहेर पडलो. मागच्या चार पाच वेळां सारखं याही वेळेस पावसाला सुरुवात झाली. मात्र अगदीच थेंब-थेंब पाऊस असल्याने आम्ही पुढे निघालो… काही अंतर पाऊस आला नाही, मात्र तेव्हा आम्ही जे अनुभवलं ते खरोखर अविश्वसनीय आहे. पाऊस पडत होता, मात्र आमच्यावर पडत नव्हता. आम्ही पावसाच्या पुढे होतो. आमच्यापासून एक-दीड किलोमीटर मागे बघितल्यावर त्या भागात पाऊस पडतो आहे हे स्पष्ट दिसत होतं. आम्ही पुढे पुढे पाऊस मागे मागे… आज आम्ही जवळजवळ तीस किलोमीटर चाललो होतो. रुषा च्या थोडं पुढे कुठेतरी एका शिवमंदिरात सोय झाली. तो अनुभव थोडा विस्तारपूर्वक पुढे सांगते मात्र मंदिरात पाऊल ठेवेपर्यंत पाऊस नव्हता आणि मंदिरात पाऊल ठेवताच धो-धो पावसाला सुरुवात झाली. ‘जायचं आहे’ हा तिने दिलेला निर्णय होता. त्याप्रमाणे आम्हाला थेंबभरही पाऊस लागणार नाही याची तिनेच काळजी घेतली. थोड्याच वेळात अमरकंटक होऊन माईंचा फोन आला, तुम्ही गेले आणि पंधरा मिनिटात गहू पाऊस सुरू झाला असं त्यांनी सांगितलं.
अमरकंटक होऊन पुढे रुषा पर्यंत येताना आम्ही सडक मार्गे आलो होतो. जप व्हावा म्हणून बाबा पुढे आणि मागे असं नेहमीप्रमाणे सुरू होतं. सडक मार्ग असल्यामुळे बाबा जरा निवांतपणे पुढे गेला आणि मीही माझ्या स्पीडने हळूहळू मागे जात राहिले. आमच्यात आता साधारण एक किलोमीटर अंतर असेल. पावसाळी वातावरण, डांबरी रस्ता आणि आजूबाजूला जंगल. प्रसन्नता होतीच. मी जप करत करत पुढे जात होते आणि अशातच रस्त्याच्या कडेवरून अचानक एक माकडांचा घोळका माझ्या बाजूने आला. ती माकडं रस्त्याच्या मध्यभागी येऊन बसली. जणू काही वाट अडवत असावीत अशा पद्धतीने. मी शांतपणे तिथेच उभे राहून त्यांच्या जायची वाट बघत होते. थोड्या वेळात माकडांचा अजून एक मोठा घोळका आला आणि तो माझ्या मागच्या बाजूने गेला. मात्र तीही माकडं रस्त्याच्या मध्यभागी बसून होती. सगळी मिळून जवळजवळ शंभर माकडं तरी नक्की होती. मी ह्या माकडांच्या मध्ये होती. यांनी मला चहूबाजूंनी घेरलं होतं आणि आता मला पुढे जायचं होतं. माझ्या हातात दंड होता मात्र या माकडांना त्याची भीती वाटेल, की मी त्यांच्या वर शस्त्र उगारलं आहे असं वाटेल याचा अंदाज मला घेता येत नव्हता. मी पुढेही जाऊ शकत नव्हते, मी मागेही जाऊ शकत होते आणि बाबा मात्र बराच पुढे निघून गेला होता. पुढे जाणं भाग होतं. मी डोळे बंद केले मैयाचं नाव घेतलं आणि एक एक पाऊल पुढे टाकू लागले. ही मर्कट मंडळी जागची हलली देखील नाहीत. त्यांच्यामधून वाट काढत काढत मी पुढे निघून गेले. या मंडळींनी माझ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. जणू त्यांना मी दिसतच नव्हते इतकं दुर्लक्ष. मै याची सोबत होती हे काही वेगळं सांगायला नकोच!
आता तो मंदिराचा अनुभव विस्तारपूर्वक सांगते. आम्ही रुषाच्या पुढे आलो होतो. इथे आभाळ फारच भरून आलं असल्याने आणि आम्ही थकलो असल्याने आता रुषा नंतर जे गाव येईल तिथे थांबून जाऊ असं ठरलं. मात्र पुढचं गाव लवकर येईना. हे मंदिर दिसलं आणि इथेच मुक्काम करायचा असं ठरलं. मंदिर अगदी लहान. फक्त प्रदक्षिणा करता येईल एवढीच जागा. हरकत नाही!आम्ही आपलं सामान ठेवलं. अजून अंधार पडायला वेळ होता त्यामुळे आसन काही लावलं नाही. मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला एक मोठी विहीर होती तिथेच संध्याकाळचं स्नानादी आटोपलं. या भागात घरंही अगदी मोजकीच होती कारण गाव बरच लांब होतं. संध्याकाळचं पूजापाठ करून झालं आणि आता पोटातली भूक आवाज देऊ लागली. आजूबाजूला मात्र फारसं कुणी दिसत नव्हतं दुकानं वगैरे देखील नव्हती आम्ही वाट बघायचं ठरवलं.
साधारण आठ वाजता एक बैलगाडी मंदिरासमोर येऊन थांबली. एक माणूस आत आला नमस्कार केला आणि देवासमोर आम्ही दिवा लावला आहे का असं त्यांनी विचारलं. तो आला तसा तो निघून गेला त्यानंतर थोड्यावेळाने मंदिराच्या मागच्या अंगणातून एक बाई आली आणि “महाराज भोजन कर लिजिए म्हणून आम्हाला बोलावू लागली”. मंदिराच्या मागच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात एक छोटसं फाटक होतं आणि मागे सगळी झाडी होती. त्या झाडीच्या मागे एका घराचं मागचं छोटं फाटक होतं त्यातून आम्ही त्या बंगलेवजा घरात गेलो. मंदिर आणि या घराच्या मध्ये एक छोटीशी गल्ली होती, मात्र झाडीमुळे ह्या मंदिराच्या इतक्या जवळ हे बंगलेवजा घर असेल हे कुणाला सांगता देखील येणार नाही, असं हे घर झाकल्या गेलं होतं. आम्ही मंदिरात आलो आहे याची खबर या घरातील बाईंना कशी मिळाली ते आम्हाला माहीत नाही. तसा विषयही निघाला नाही. त्यांनी भोजन प्रसादिला बोलावलं आणि आम्ही भोजन प्रसादिला गेलो एवढच. मंदिरात प्रदक्षिणा मार्गातच आम्ही आसनं लावलीत. आजचा दिवस अनपेक्षितपणे छानच झाला.
दुसर्या दिवशी सकाळी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काल आमचे कपडे धुऊन झाले नव्हते. त्यामुळेच आज कपडे धुणं आवश्यक होते. मात्र रामनगरच्या पुढच्या भागात पाण्याची टंचाई असल्याचं समजलं. कित्येक हापश्या बघितल्या पण त्यांना पाणीच नव्हतं. आम्ही कनकधारा पर्यंत पोहोचलो. इथे एका हापशी ला पाणी लागलं. मात्र खूप पंपिंग केल्यावर अगदी बारीक धार येत होती. आमच्याकडे पिण्याच्या पाण्याच्या बाटली व्यतिरिक्त साठवणीसाठी काहीही नव्हतं. असं असताना देखील इथे जो अनुभव आला ते पाहून आनंदाने रडावं का दुःखाने रडावं हेच कळेना. श्रद्धेला सीमा नाही इतकं मात्र समजलं… नक्की काय झालं ते सांगते पुढच्या भागात.. नर्मदे हर.


Leave a Reply