नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ७१👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग क्रमांक:-७१

नर्मदे हर.

मागच्या भागात मी तुम्हाला बिझौरी च्या मुक्कामाबद्दल सांगितलं होतं. माझा रुमाल घेऊन काकांच्या डोक्याला बांधणाऱ्या आजीबद्दल सांगितलं होतं. आता पुढे चलू यात.

विक्रमपूर साधारणपणे दहा-बारा किलोमीटर दूर असेल. हा रस्ता हायवे आहे. अनेक पूल रस्त्यावर बांधलेले आहेत आणि आजूबाजूला पर्वत असल्यामुळे रस्ता निसर्गरम्य आहे. सगळीकडे नीलगिरीची झाडे कुणीतरी उभी करावी तशी रांगेत लागलेली आहेत. गंमत म्हणजे त्यांची उंची सुद्धा जवळ जवळ सारखी. त्यांच्याकडे पाहून मला शाळेत प्रार्थनेसाठी उभ्या असलेल्या मुलांची आठवण झाली.

तर या रस्त्यावरून मी आणि बाबा आम्ही रमत गमत जात होतो. एवढ्यातच आमच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची मोठी गाडी येऊन थांबली. त्यात होते डॉक्टर पंकज जैन आणि डॉक्टर श्वेता जैन. ही दोघं जबलपूर ची राहणारी. श्वेता लहान मुलांची डॉक्टर तर पंकज जी सर्जन. आम्हाला आनंदाने, रमत गमत चालताना पाहून दोघे उतरून खाली आली. नर्मदे हर झालं थोड्याफार गप्पा झाल्या. जवळच्याच एका छोट्याश्या टपरीवर त्यांनी आम्हाला चहा पाजला. आम्ही तुम्हाला जोगी टीकरिया पर्यंत सोडून देतो, आम्हाला दिंडोरी ला जायचय असा दोघांनी खूपच आग्रह धरला पण आम्ही गाडीमध्ये बसत नाही म्हंटल्यावर डॉक्टर श्वेता म्हणाल्या “मग मी देखील तुमच्यासोबत पायी चलेन”. मग मी बाबा आणि डॉक्टर श्वेता पाई चालू लागलो. डॉक्टर पंकज गाडी घेऊन थोडं अंतर पुढे जायचे आणि तिथे थांबून आमची वाट बघायचे. अगदी विक्रमपूर येईसतोवर डॉक्टर श्वेता आमच्याबरोबर पाई चालत राहिल्या. विक्रमपूरला मात्र आता उशीर होईल असं म्हणत डॉक्टर पंकज ने डॉक्टर श्वेताला गाडीत बसवून घेतलं आणि आम्हालाही आग्रह करू लागले. आम्ही नकार दिलेला पाहून निदान तुमचं सामान तरी आम्हाला द्या आम्ही ते जोगी टीकरीया ला सोडतो असा हट्टच धरला. माझ्या पाठीवरचे सामान मी कोणालाही देणार नाही हे शूलपाणी च्या झाडी पासून मी ठरवलंच होतं. त्यामुळे माझा तसा संकल्प आहे म्हटल्यावर बाबाचं सामान आम्ही गाडीत टाकलं. ठरल्याप्रमाणे पंकज आणि श्वेता जैन यांनी जोगी टिकरीयाला ललिता बाईंच्या आश्रमावर आमचं सामान नेऊन पोहोचवलं. जैन दंपत्याला मुल-बाळ नाही मात्र गरीब लहान मुलांची सेवा करण्यातच मला आनंद मिळतो हे श्वेता ताईंचे वाक्य! “श्वेता खुश असली की मी ही खुश असतो, आम्हाला दोघांना कदाचित गरीब मुलांचा सांभाळ करण्यासाठीच देवाने निर्माण केल आहे त्यामुळे आम्हाला मुल नसण्याचा त्रास आता आम्हाला होत नाही. आधी फार वाईट वाटायचं, आता उलट बरं वाटतं की कुठल्याही जबाबदारी विना आम्ही आमचा संपूर्ण वेळ, संपूर्ण लक्ष, आणि संपूर्ण पैसा गरीब मुलांच्या स्वास्थ्यासाठी खर्च करू शकतो. एकच काय, तर ही सारी सारी मुलं आमचीच आहे असं मला नेहमी वाटत असतं. देव करतो ते योग्यच करतो फक्त त्याचा निर्णय आपल्याला समजायला वेळ लागतो हे आम्हाला पक्क समजून आलय.”

खरंच आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांच्या कडून खूप खूप शिकण्यासारखं असतं. गरीब मुलांच्या स्वास्थ्याचा वसा घेणार हे दंपत्य! कुठली संस्था नाही की कुठली पब्लिसिटी नाही. औषधांच्या बॅगा च्या बॅगा यांच्या गाडीत असतात. आठवडाभर आपापल्या क्लिनिक मध्ये काम केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ही दोघं कुठल्यातरी आदिवासी गावाच्या दिशेने पुढे निघतात आणि आदिवासी गावांची किंवा गरीब मुलांची विनामूल्य सेवा सतत दोन दिवस करून रविवारी रात्री पुन्हा जबलपूरला आपल्या घरी पोहोचतात. सेवा करायला पैसा लागत नाही सेवा करणारं मन असावं लागतं सेवा करणारं हृदय असावा लागतं…. सेवा करावी हे फक्त तुमच्या मनानं घेतलं पाहिजे…खरंच डॉक्टर श्वेता डॉक्टर पंकज बरोबर घालवलेला फार थोडा वेळ मला फार मोठी गोष्ट शिकवून गेला.

पुढे ललिता बाईंकडे फार चांगली सोय झाली. तसा आश्रम सांभाळणारे अविनाश सोळंकी दुबई वासी. यांच्याबद्दल तुम्हाला मी या अनुभव मालिकेच्या सुरुवातीच्या भागांमध्ये सांगितलं होतं.

अरे हो कृष्ण कन्हैया ची गोष्ट राहिलीच नाही का सांगायची!

जोगी टिकरिया च्या साधारण तीन-चार किलोमीटर आधी असेल. एक छोटीशी चहाची टपरी आणि बाजूलाच बिस्किटे चिवडा असे मिळणारे छोटंसं दुकान होतं. आम्ही पाणी प्यायला म्हणून येथे थांबलेलो. पाणी पिऊन चार पावलं पुढे जात नाही तो दोन अडीच वर्षाचा एक छोटासा बालक धावत धावत आमच्या मागे आला. त्यांनी माझी ओढणी धरली आणि म्हणाला “आओ मैयाजी, चाय नाष्ता करलो” त्याचे बोबडेसे बोल मात्र मोठ्यांसारखे शब्द ऐकून त्याची जरा गंमत वाटली, पण तो इतक्यावर थांबला नाही. तो काही माझी ओढणी सोडायला तयार नव्हता आणि आम्हाला खेचत पुन्हा तो त्या दुकानात आम्हाला घेऊन गेला. या एवढ्याश्या बाळाला परिक्रमेबद्दल अनेक गोष्टी माहित होत्या हे बघून आम्हाला आश्चर्यच वाटलं. “अरे मा कुछ बिछा दो मैया जी के लिये कुरसी मे थोडे ना बैठेंगे” तो बोलू लागला… “दादी गुड चाहिये” आता त्याने त्याच्या आजीला हुकुम सोडला. पाणी आणि गुळाचा खडा घेऊन त्याची आई बाहेर आली आणि आमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून म्हणाली “ये तो अपने दादाजी की कॉपी करता है; इसको सब मालूम है, पूछो आप, देखो कैसे जवाब देगा” .. बघावं विचारून, “बाबाजी जोगी टिकरीया कितना दूर है? मी गंमत म्हणून विचारून पाहिलं, “६ किलोमिटर…” त्यांनी चटकन उत्तर दिलं. काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे त्याच्यासाठी अगदी रोचेचच असलं पाहिजे. त्याच्या तोतड्या बोलातून गोडवा ओतप्रोत बाहेर पडत होता. हा काही साधासुधा बालक नसावा. इतक्या लहानपणापासून सतत येणाऱ्या जाणाऱ्या नर्मदा परिक्रमा वासींशी यांचा संपर्क. रोजच हा येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासी ना चहाला आग्रह करतो असं याचे आजोबा सांगतात. वय वर्ष जेमतेम अडीच, तीन च्या वर अगदी नक्की नाही… काय ही मैया ची कृपा… इतक्या लहान वयापासून तो मैयाच्या आणि मैया भक्तांच्या इतक्या जवळ आहे. त्याच्याशी अगदी मनभर गप्पा मारून तास-दीड तासाने आम्ही तिथून निघून मग जोगी टिकरीया ला पोहोचलो. तुमच्या साठी त्याचा फोटो पण दिलाय बघा मी.

जोगी टिकरिया पासून पुढे मैया किनाऱ्याने मार्ग आहे. शेतातून आणि पुढे छोट्या छोट्या टेकड्या चढून उतरून आम्ही अशा एका ठिकाणी आलो जिथे पुढे रस्ताच नव्हता. आम्ही अगदी मैय्याच्या किनाऱ्यावर आणि पलीकडच्या किनार्‍यावर दूरवर दिंडोरी गाव वसलेलं दिसत होतं. पण आता जायचं कुणीकडे? काही ठिकाणी शेतीला कुंपण लावलेली होती. एक ओढा मैया येऊन मिळत होता तो पार करूनच जाणं आवश्यक वाटत होतं. इथून खरी एक गंमत सुरू झाली.

मागच्या भागात म्हणाले होते न मी अविश्वसनीय असं काहीतरी घडलं त्याची सुरुवात म्हणजे हा ओढा.

इथे आम्ही थोडावेळ आराम करत बसलो. या ओढ्याला साधारण गुडघ्याइतके पाणी असेल. पाय ओले करायचा कंटाळा आलेला म्हणून मी बसले खरंतर. आणि तिथे बसल्या बसल्या दगडांचा छोटासा ढीग तयार केला… तो ढीग बघून बाबा बोलला, “वा काय मंदिर बांधलय ताईंनी…. चला आता नर्मदा मंदिरात जायचं पुढे, नाहीतर याच मंदिरात राहायला लागेल”… मी पण थट्टा मस्करीत बाबाला बोलून गेले, “हो मग राहील नं ह्याच मंदिरात, नाहीतर असं करेन जिथे कुठे मी राहील ना तिथे हे मंदिर पण येईल माझ्यासोबत”… या बोलण्याला काहीही अर्थ नव्हता. ही केवळ थट्टामस्करी. मात्र यानंतर आपल्यासोबत खरंच कोणीतरी चालतंय असा भास वारंवार होऊ लागला. ते लक्षात कसं आलं माहिती आहे का?

आम्ही पुढे चालू लागलो. देवरा गाव थोडं समोर होतं त्याआधी लंबे नारायण गुफा म्हणून एक गुहा लागते. शेतात काम करणाऱ्या एका माणसानं सांगितलं “वहा के दर्शन करना और वही रुक ना आज रात.” आम्ही दर्शनाला आत गेलो, मात्र गुहेच्या तोंडाशी असताना तिथल्या साधू महाराजांकडे बघताक्षणी इथे राहायचं नाही असा विचार माझ्या डोक्यात डोकावला, खरंतर काहीही कारण नव्हतं, आणि पुढच्याच क्षणी बाबा मला म्हणतो “अगं इथे नकोय राहायला हं, मला या साधू महाराजांकडे पाहून अचानक काही तरी झालं आणि वाटलं इथे नकोच राहायला, खूप स्ट्रॉंग फीलींग आलंय त्यामुळे आपण इथे राहणार नाही पुढे जाऊ”. दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच विचार आला वाटलं कोईन्सिडन्स आहे… दर्शन घेऊन पुढे निघालो.

देवरा गावाच्या तोंडावर असतानाच पुन्हा एक गंमत झाली. मी बाबाला म्हणाले आज आपल्याला निवारा शोधायला लागणार नाही सापडेल आपोआप, आणि त्याच क्षणी बाबा म्हणाला बघ गावात गेल्या गेल्या दुसऱ्या-तिसऱ्या घरातून आपल्याला बोलावणं येईल. पुन्हा एकदा आम्ही दोघांनी एकच विचार मांडला तोही एकाच वेळी… आणि गंमत अशी की हे विचार इतके इंस्टंट मनात येत होते की जणू कोणीतरी दुसरं च आपल्याला काहीतरी सांगतय…. आणि त्याहून अविश्वसनीय म्हणजे हे एक सारखे विचार आमच्या मनातत एकाच वेळी यायचे. कोइंसीडन्स काय दोनदा होत नाही? असेल कोइन्सीडन्स…असं म्हणून आम्ही पुढे निघालो. दोन-तीन घर सोडले न सोडले तोच एका माताजींनी आवाज दिला. “अरे बाबाजी, मैया जी कहा जा रहे हो? अभी तो शाम होने को है यही रुक जाओ हमारे घर”…. मी आणि बाबांनी एकमेकांकडे पाहिलं… जसं आमच्या मनात आलं होतं तसं झालं होत़ं…. अगदी तिसऱ्याच नाही, पण अगदीच चौथ्याच घरातून आम्हाला आवाज देण्यात आला होता.

आम्ही घरात केलो चहापाणी झालं समोरच्या खोलीतच आमच्यासाठी सतरंजी अंथरली. घरातल्या बायका भोजन प्रसादी ची तयारी करू लागल्या. त्यांच्या घरातली एकंदर परिस्थिती पाहता मनात विचार आला, जेमतेम दोन खोल्यांचे घर आपण जर येथे यांच्या घराच्या समोरच्या खोलीत झोपलो तरी या मंडळींना स्वयंपाक घरात झोपण्या शिवाय पर्याय नाही… थोडसं वाईट वाटलं मला, आणि नेमका तेव्हा बाबा म्हणाला “घर लहान आहे यांचं, आपण अंगणात लावू आसन. मी म्हणतो त्यांना तसं”, ..अरे हे काय? पुन्हा आमच्या दोघांच्या मनात एकच विचार मात्र यावेळी हा कोइंसिडन्स नाही हे ठरवणारी अजून एक घटना घडली. ज्या मैयाजींनी आम्हाला आत बोलवलं होतं त्या आल्या आणि म्हणाल्या, “यहा पे आपको परेशानी हो रही होगी तो सामने वाला घर बंद है उसको खुलवा देती हू आप वहा सोना आराम से”, ..आतापर्यंत फक्त आमच्या दोघांच्या मनात एक सारखे विचार येत होते आता मात्र त्या माताजींनी ही आमच्या विचाराला दुजोरा दिला. आम्ही हो म्हणालो आणि समोरचं घर उघडून साफ करायला त्यांचा मुलगा किल्ली घेऊन गेला. घरात लाईट नव्हते त्यामुळे एक कंदील घेऊन त्या मुलाने एक खोली स्वच्छ करून दिली. भोजन प्रसादी झाल्यानंतर आम्ही आराम करायला समोरच्या घरी गेलो. तिथे पुन्हा गंमत झाली.

घरात पूर्ण अंधार. आमच्या जवळचा टॉर्च आणि आमचा मोबाईल. या घराच्या पायऱ्या चढताना जागा माहीतिची नसल्यामुळे थोडं डगमगले मी, ते पाहून बाबा म्हणाला, “जंगलात नाही घाबरलीस आणि अंधाराला घाबरतेय का? हनुमान चालीसा म्हण घरात भीती वाटत असेल तर…” खरंतर भीती वाटण्याचे काही कारण नव्हतं. मला भीती वाटतही नव्हती. पण तरी का कोण जाणे, बाबा असं बोलून गेला.

तसं आमच्या संध्याकाळच्या आरती पूजेमध्ये रोजच हनुमान चालीसा असायचाच, तरीही बाबा म्हणाला म्हणून आणि मी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली उगाचच…मला हनुमान चालीसा फार आवडतो, म्हणून! आम्ही आत गेलो. सतरंज्या अंथरुन ठेवलेल्या होत्याच. आमच्या स्लीपिंग मॅट आणि पांघरूणं काय ती काढायची होती. मोबाईलचा टॉर्च लावला, आणि प्रकाशाचा झोत समोरच्या भिंतीवर पडला. भिंतीकडे नजर गेली तो जे पाहिलं ते खूप विलक्षण होतं. भिंतीला टेकून खुद्द मारुतीराया उभे होते. मारुती रायांचं खूप विलोभनीय चित्र भिंतीला टेकवून उभं केलं होतं. जणू मी हनुमान चालीसा म्हटला म्हणूनच मारुतीराया समोर येवून उभे राहिले. असे एकामागोमाग एकेक प्रसंग घडत राहिले. मनात एखादा विचार येतो, कधी बाबा बोलून दाखवतो, कधी समोरच्या बाई बोलतात, कधी आम्ही दोघही एकाच वेळेस बोलतो, कधी साक्षात मारुतीराया समोर येतात आणि हे सगळं आपोआप घडत नाही सारखं कोणीतरी सुचवल्या सारखं होत असतं इतक्या सगळ्या प्रसंगानंतर खरंच हे जाणवू लागलं की नक्की, नक्कीच कुणीतरी हे करवून घेणारं, हे घडवून आणणारं असलं पाहिजे.

असे आणि याहूनही वेगळे, अजूनही अनुभव आलेच.. कंचन पूर, शिवाला घाट, दम्हेडी.. तीन ठिकाणाचे तीन अनुभव… आणि तिन्ही अगदीच वेगळे… सांगणारे, पण पुढच्या भागात..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*