नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग👇६५.👇
नर्मदा माई चे ऋण तर फेडणे अशक्य आहे, किंबहूना तिची कृपा अशीच बरसत रहावी हेच खरं! तरीही गावात गेल्यावर नऊ कन्यांना भोजन तयार करून खाऊ घालू ही इच्छा तीव्रतेने मनात आली.
अजून गाव बरंच दूर होतं. आम्हाला गावात जायला तास-दीड तास नक्की लागणार होता. त्यानंतर आसन लावायचं, अंघोळ पूजा करायची, आणि मग भोजनाची व्यवस्था होईल. आज काही नऊ कन्यांना जेवायला घालता यायचं नाही, ते उद्या सकाळ वर सोडावे असा विचार करत करत आम्ही गावाकडे जात होतो. गाव बरंच जवळ आलं होतं आणि अचानक दहा-बारा मुलं मुली नर्मदे हर हर नर्मदे हर हर करत आमच्या जवळ आलीत…
“कहा जाओगे माताजी? किसके घर रहोगी मैया जी?” असा प्रश्न त्यातील मोठ्या म्हणजे दहा-बारा वर्षाच्या मुला मुलींनी विचारला. “आश्रम कहा है गाव में?” मी पण माहिती काढायला सुरुवात केली… तेव्हा त्यातली सगळ्यात मोठी मुलगी म्हणाली “आप हमारे घर चलो…”आम्ही तिच्या मागे मागे जाऊ लागलो. गावात गेल्यावर बघू काय करायचं ते असं ठरवलं, मात्र या मुलीकडून उद्या कन्या भोजनासाठी साठी नऊ कन्या मिळवता येतील का याचा प्रयत्न मी करू लागले. “बेटा जी मुझे कल कन्या भोज करना है नौ कन्या को खाना खिलाना है, तुम तुम्हारे दोस्तो को लेकरं आओगी?” मी तिला विचारलं… ती म्हणाली “आप हमारे ही घर चलो, हमारे घर कन्याये है उनको खाना खिला दे ना… मुझे दो बहने है, और मेरे दोनो चाच को तीन-तीन बेटिया है. हमारे घर मे हम नौ बहने और एक भाई है…..” तिचं हे बोलणं ऐकून काय आनंद झाला म्हणून सांगू! बरमान च्या त्या छोट्या मैया बद्दल बोलू? की आम्हाला शोधत येणाऱ्या या आठ बहिणीबद्दल बोलू? नऊ पैकी आठ इथे माझ्या अवतीभोवती होत्या आणि एक तीन वर्षाची असल्यामुळे आपल्या आईजवळ आपल्या घरी होती. आता मात्र आम्ही तिच्याच घरी जायचं ठरवलं.ठरल्याप्रमाणे गुरसि ला सरपंच अली ठाकूर यांच्या घरी आम्ही गेलो आणि दुसर्या दिवशी सकाळी यथेच्छ कन्यापूजन आणि कन्या भोजन केलं. त्या नऊ कन्यांनी ही अतिशय शांततेने, आनंदाने अगदी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. यापेक्षा मोठं भाग्य ते काय? एक छोटी कन्या मैया स्वतःहून सांगून जाते की तुझ्या हातून नवदुर्गा जेवणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत, तुझ्या भाग्यात हे लिहिलेलं आहे आणि जेव्हा तुला शक्य असेल तेव्हा ते कर असं सांगितल्यानंतर लागलीच म्हणजे त्याच दिवशी या नवदुर्गा स्वतःहून मला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि माझ्याकडून त्यांची पूजा आणि भोजन करवून घेतात.
सरपंच आली ठाकूर यांच्या घरचा मुक्काम हा खूप छान होता अगदी छोटसं घर त्यात बागडणार्या या नऊ मैया जी, तीन अन्नपूर्णा जी यांच्या सान्निध्यात तो दिवस खूप छान गेला. पुढे रामपुरा आणि रोहिणी ला देखील अनुभव आलेच…तसा रमपुरा चा अनुभव आपल्या अनुभव कथनाच्या सुरुवातीला मी सांगितलेला आहे. गुरूपासून तुम्ही कुठेही पळून जाऊ शकत नाही याची आलेली प्रचितीच ती…तिथून पुढे रोहणी ला खरंतर थांबायचं नव्हतं पण अंधार होत आला होता त्यामुळे थांबावं लागलं आणि ते सुद्धा एका दिव्य पुरुषाच्या आशीर्वाद अचानक पणे मिळाला…..कसं ते सांगते पुढील भाग ६६ मधे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply