नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग👇६३👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग👇६३.👇
नर्मदे हर…
मागच्या भागात मी तुम्हाला अनघोरा या जागेबद्दल सांगत होते. या जागेची आकृती समोर निमुळती आणि मागे उंचावर त्रिकोणाकार आहे. इथे या टेकडीला माती खोदून केलेल्या छोट्या पायऱ्या आहेत. रमणीय ठिकाण आहे हे. मागच्या भागात मी असं सांगितलं होतं की या जागेला एक रहस्य आहे, ते आता इथून पुढे सांगते.आम्ही अगदी बोरासला होतो तेव्हापासून उन्मेशानंद यांच्याशी फोनवर बोलणं सुरू होतं. आम्ही जितकं त्यांना भेटायला उत्सुक होतो तितकच ते देखील आम्हाला भेटायला उत्सुक होते. आम्ही इथे पोहोचण्याआधीच आम्ही इथेच राहावं हा निर्णय त्यांनी त्यांच्याकडून घेतलाच होता. खरंतर सकाळी चोरास होऊन निघाल्यावर दोनच तासात अनघोरा इथे आम्ही पोचलो होतो. त्यामुळे भोजन प्रसादी घेऊन पुढे निघायचं असा एक विचार मनात येत होता. मात्र जसजसं हे स्थान नजरेच्या टप्प्यात येऊ लागलं तसतसं या स्थानाबद्दल काहीतरी विशेष जाणवू लागलं हे नक्की. हे स्थान एकदम असं नजरेसमोर दिसत नाही. इथे नर्मदा मैया ने वळण घेतलेलं आहे. त्यामुळे थोडं वळल्या नंतर दूर उंचावर भगवे झेंडे दिसलेत. तरीही इथवर पोहोचायला अजून किमान अर्धा तास तरी लागणार होता. इथे वळणा अलीकडे बराचसा खडकाळ मार्ग आहे. थोडा विश्राम म्हणून आम्ही इथे थांबलो तेव्हाचा अनुभव सांगते. खरं तर या अनुभावा नंतरच या स्थानाकडे विशेष म्हणून लक्ष गेलं.जरी हे स्थान समोर दिसत होतं तरी ते बरच लांब होतं. उंचावर असल्यामुळे आणि मैया ने वळण घेतलं असल्या मुळे ते पलीकडच्या तटावर आहे की काय असा भास होत होता. अर्थात आपल्याला जायचं आहे ते स्थान हे नसून, हे स्थान दुस-या तीरावर आहे असाच आमचा समज झाल्याने त्या आकर्षणाकडे सुरवातीला मी फारसं लक्ष दिलं नाही, मात्र आम्ही ज्या दगडाळ भागात बसलो होतो त्या दगडातून हलके हलके कंपन जाणवू लागले तेव्हा जरा नीट लक्ष दिलं तर कुठून तरी अगदी हळू पण तीव्र स्वराचा घंटा नाद येतोय हे जाणवू लागलं आणि त्या घंटा नादाच्या संपता संपता मी बसले तो खडक किंचित थरथरतोय की काय असा भास झाला. हा घंटा नाद उंचावरून येणा-या या देवळातून येत होता.शेतातून वाट काढत काढत आणि वळण पार करत जेव्हा आम्ही पुढे सरकलो तेव्हा हे स्थान पलीकडच्या तीरावर नसून इकडेच आहे आणि आपल्याला इथेच जायचं आहे हे समजलं. या स्थानाच्या खालपर्यंत आम्ही पोचलो. इथे मैय्याच्या वाळूतून पुढे उंच निघालेली लालसर मातीची एक छोटीशी टेकडी आहे त्यावर हे स्थान. आम्ही अजून स्थानावर पोहोचलो नव्हतो तरीही खाली सुद्धा आम्हाला या स्थानाची विशेष अशी कंपन जाणवत होती. आम्ही पोहोचलो त्या वेळेला इथला भाग हा जास्तच सोनेरी वाटू लागला होता. सूर्य महाराजांनी आपल्या कनक रश्मी कदाचित इथे थोड्या जास्त वेळ रेंगाळू दिल्या असतील.या छोट्याशा टेकडीच्या डाव्या बाजूला मातीत खणून तयार केलेला एक जिना होता तो चढून आम्ही वर गेलो. आमच्या स्वागतासाठी महाराज उभेच होते. नर्मदे हर झालं आणि पहिलेच वाक्य ते बोलले ते असं. “ताई सामान वगैरे ठेवा इथे आज काही तुम्हाला जायचं नाहीये”.. त्यांचं ते हक्काने सांगणं इतकं प्रेमाचं होतं की थांबण्या शिवाय पर्याय नव्हता. भोजन प्रसादी आटोपली आणि सत्संगाला सुरुवात झाली तेव्हा या जागेचे रहस्य समजलं.ते रहस्य सांगण्याआधी या महाराजांचं इथे येणं कसं झालं ते सांगते. हे महाराज अगदी तरुण. पस्तिशीच्या आतले. तसे व्यवसायाने वकील होते आधी. मात्र ह्या वकिली पेशात कराव्या लागणाऱ्या खर्‍या-खोट्या व्यवहारांना कंटाळून ते भ्रमंतीला निघाले. बरंच फिरल्यानंतर कधीतरी या जागी आले आणि त्यांना या जागी विशिष्ट काहीतरी आकर्षण जाणवलं. काहीतरी दृष्टांत झाला आणि त्यांनी इथेच राहायचं ठरवलं. इथेच एका छोट्याश्या गुहेत तब्बल तीन वर्ष तपस्या केली. गावातले गावकरी शंका घेऊ लागले. गावकऱ्यांना वाटायचं हा तरुण संन्यासी इथे काहीतरी खोदकाम करतोय आणि याला काहीतरी खजाना सापडला आहे, म्हणून तो इथेच राहण्याचा आग्रह धरतोय, आणि म्हणून ते बराच त्रास देखील द्यायचेत. मात्र स्वामींचा आशीर्वाद आणि मनोबल यावर ही तपस्या पूर्ण झाली असता अचानक स्वामी समर्थ उन्मेशानंद महाराजांच्या स्वप्नात आलेत. “या छोट्याशा टेकडीवर हनुमानाच्या रूपात माझी स्थापना कर” असा आदेश दिला. त्रास देणारे गावकरी देखील बदलले आणि आता महाराजांच्या मदतीला आणि मारुतीच्या दर्शनाला पूजेला, येऊ लागले. एक दिवस अचानक “इथे गोशाला करावी” असाही स्वामींचा आदेश झाला आणि स्वामींच्या आदेशाप्रमाणे गोशाला ही तयार झाली. “इथे परिक्रमावासी यांची सेवा झाली पाहिजे, तपस्या झाली ती पुरे झाली आता सेवाच कर” ,असा पुन्हा एकदा स्वामी समर्थांचा आदेश झाला आणि मग उन्मेशानंद हे संपूर्णपणे नर्मदापरिक्रमा वासियांची सेवा करू लागले.महत्वाची गोष्ट अशी की या टेकडीच्या आजूबाजूला देखील अनेक छोट्या मोठ्या टेकड्या आहेत जिथे अनेक वेळा अनेक आश्रम तयार झाले आणि अनेक वादांमध्ये आपसातल्या भांडणांमध्ये लयीला सुद्धा गेलेत. अनेकांनी उन्मेशानंदाना त्रास देऊन ही जागा बळकावण्याचा देखील प्रयत्न केला मात्र स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तयार झालेल्या या आश्रमाला आपल्या जागेवरून कुणीही हलवू देखील शकलं नाही.स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची प्रचंड कंपन इथे जाणवतात. ज्या गुहेमध्ये उन्मेशानंद महाराजांनी तपस्या केली त्या गुहेत आजही स्वामींच्या पूजा अर्चा नियमित पणे सुरु असते. त्याच गुहेच्या वरच्या अंगाला आता एक छान स्वयंपाक घर तयार केलय. स्वामी समर्थांचा आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद असल्यासारखं हे स्वयंपाक घर! इथे कधीही कशाचीही उणीव जाणवत नाही, आणि हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे.संपूर्ण परिक्रमेत कधीही आणि कुणीही खाल्ला नसेल असा खाऊ आम्हाला इथे मिळाला, आणि हा खाऊ तयार करण्यासाठीची एकही गोष्ट आश्रमात नसताना देखील हा खाऊ तयार झाला आणि आम्ही पोटभर खाल्ला देखील…. इतकंच कशाला? मैयांनी माझ्याकडूनच हा खाऊ तयार करवून घेतला.तुमची उत्सुकता फार शिगेला लावतेय का मी? सांगते. मी न्यूट्रिशन मध्ये पीएचडी केलय म्हटल्यानंतर महाराजांच्या मनातले अनेक विचार बाहेर आलेत. तिथल्या आदिवासींसाठी काही तरी करण्याची तळमळ ते मला सांगू लागलेत. निदान त्यांच्या पोषण आहारा बद्दल विशेषत:, लहान मुलीं बद्दल काही करता येईल का असा प्रश्न जेव्हा त्यांनी माझ्यापुढे मांडला तेव्हा मी त्यांना अनेक पाककृती सांगितल्या. “त्यातल्या काही पाककृति तुम्ही मला शिकवाल का”? असं म्हटल्यानंतर ह्या खाऊची वेळ आली बरं का!इथे तयार होणाऱ्या काही वनस्पतीं पैकी मोहाची फुलं ही सहज मिळणारी आणि अतिशय पौष्टिक असे मी महाराजांना सांगितलं. मोहाची काय काय पदार्थ तयार करू शकता येतील यावर विचार करताना मोहाची खीर, मोहाचे साधे लाडू आणि मोहाचे तीळ घातलेले लाडू असे तीन प्रकार मी त्यांना सुचवले. “तू तर जाशील ताई, मग मी हे कुठून शिकू? त्यामुळे तू काही जाऊ नको आणि हे पदार्थ मला शिकव” अशी गळ च् घातली महाराजांनी…. आश्रमात मोहाची फुलं नव्हता, गूळही नव्हता आणि तीळ देखील नव्हते. खरं सांगायचं तर त्या दिवशी दूध देखील नव्हतं. “तू फक्त थांब ताई आपण उद्या सगळं करूयात”, असं म्हणत महाराजांनी मला थांबूनच घेतलं… उद्या कशाला ताबडतोब दुधाची व्यवस्था झाली, मोहाची भरपूर म्हणजे ५ किलो तरी नक्की असतील, आश्रमात येऊन पडलीत, चांगले चार किलो तीळ देखील आश्रमात कोणीतरी आणून दिले. आणि हे सगळं अगदी लगोलग. म्हणजे आता फक्त करणं तेवढं काय ते शिल्लक राहिलं होतं.नुकतीच संक्रांत होऊन गेली असल्यामुळे तिळाचे लाडू हा एक महत्वाचा भाग होता. महाराजांना गेल्या काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत असल्यामुळे महाराजांसाठी खास शेंगदाणे आणि मोह घातलेले लाडू तयार करायचं मी ठरवलं होतं. आणि खीर तर करायचीच होती, मग काय लागले मी कामाला. ज्या स्वयंपाक घरात महाराजांशिवाय कोणीच जात नाही ते अख्खं स्वयंपाक घर माझ्या ताब्यात दिलं महाराजांनी. इतकंच नाही तर “तू सांग ताई तुला काय हवंय” असं म्हणत अगदी लहान भावासारखे मला हवं त्या वस्तू काढून देऊ लागले… चार किलो तिळाचे आणि मोहाचे लाडु, मोह दाणे आणि गुळ यांचे लाडू शिवाय दूध आटवून आटवून घट्टशी तयार केलेली खीर, हे सगळे प्रकार होईस्तोवर संध्याकाळ झाली. आता मुक्कामाला आलेल्या परिक्रमावासी यांची भोजन प्रसादी करायची, तीसुद्धा माझ्या हातची झाली.त्या रात्रीला कोल्हापूर, पंढरपूर, पुणे असे मिळून जवळजवळ तेरा एक परिक्रमावासी असू आम्ही. खड्या आवाजातली हनुमानाची आरती, हनुमान चालीसा आणि अखंड हरिपाठ यांच्या आवाजात आधीच पवित्र असलेल्या ते स्थान एखाद्या तेजोमय ताऱ्यासारखं पावित्र्याच्या कंपनांनी लखलखू लागलं.या सगळ्यांमध्ये मी एकटीच माताराम. मग सगळी पुरुष मंडळी जेवायला बसलेली आणि मी वाढायला हातात घेतलेलं. मी आणि महाराज आम्ही दोघं मागवून बसलोत. मात्र या सगळ्यांची भोजन प्रसादी झाल्यानंतर महाराजांनी आधी मला ताटावर बसवलं, मला हवं नको ते बघितलं आणि माझं भोजन प्रसादी जेवून होईस्तोवर ते जेवायला बसले नाहीत. या सगळ्या दिवसभरात महाराजांनी मला कितीदा तरी म्हटलं असेल, “ताई असं एक दिवस राहून चालणार नाही हं! माहेरपणाला कधी येणार आहेस? आज तुझ्याकडून खूप काम करून घेतलं, आता आराम करायला ये काही दिवस परिक्रमा झाल्यानंतर”! माझं अजून तरी जाणं झालं नाहीये पण तो गोडवा…. खाऊचा आणि प्रेमाचा, आणि हो महाराजांच्या रूपात मिळालेल्या भावाचा, तो मात्र अमिट आहे हे नक्की.अरे हो एक राहीलच की सांगायचं… इथे मी एकटी माताराम आणि बाकी सगळे पुरुष मंडळी, ही पुरुष मंडळी वर बांधलेल्या खोलीवजा जागेत आणि अंगणात अशी असं लावून झोपलेत. खरं तर आम्ही परिक्रमावासी. तेव्हा आम्ही ही तिथेच आसन लावण्याच्या तयारीत होतो. पण उन्मेशानंद माराजान्नी मला अचानक बोलावून घेतलं. “ताई इकडून मागून उतरून या खोलीत ये” असं म्हणाले. मी खोलीत गेले तो सुबक अशी स्वामींची मूर्ती तिथे होती, मित्या मूर्तीकडे बघत असताना अचानक महाराज म्हणाले, “ तुमचं आसन तुम्ही वर नका लावू, इथे लावा महाराजांच्या समोर”…अन मला बाबाला स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या समोर म्हणजेच जिथे उन्मेशानंद महाराजांनी तपस्या केली त्या खोलीमध्ये असन लावायची संधी मिळाली.दुस-या दिवशी महाराजांनी स्वत:च्या हाताने भोजन प्रसादी करून जेवू घातलं. तळहाताच्या फोडासारखं माहेरवाशिणी ला जपणा-या भावाची, आणि अंगणभर, घरभर हवं तसं बागडणा-या बहिणीच्या माहेराची भेट माझ्या पदरात घातली. अनघोरा मधले हे दिवस कसे गेले काही समजलंच नाही…. भरभरुन द्यायचं म्हटलं की देव काय काय अन किती किती देईल काही सांगता यायचं नाही बघा….दुसऱ्या दिवशी इथून जेव्हा पुढे जायला निघालो तेव्हा महाराज आमच्यासोबत काही अंतर पायी चालत आले आणि त्या वेळेला इथल्या जागेच्या त्रिकोण आकाराबद्दल त्यांनी जे दाखवलं त्यातून इथल्या जागेच्या रहस्याच्या शेवटच्या भागाचा उलगडा झाला. ही जागा नुसतीच त्रीकोणाकार नसून हिच्यात दुरून पाहिल्यानंतर गोमुखाच दर्शन होतं. कदाचित म्हणूनच इथे गोशाला करावी असा स्वामी समर्थांचा आदेश देखील महाराजांना झाला. महाराजांची तपस्या, स्वामी समर्थांचा आशीर्वाद, गोमुखा कार जागा गोशाला, नर्मदामैया, महाराजांनी नर्मदामैया मधील छोटे-छोटे दगडं गोळा करून त्यापासून स्वतःच्या हाताने बनवलेली शिवमुर्ती,हे असं इतकं भरभरून असल्यावर तिथल्या कंपन्यांमध्ये त्याची जाणीव होणार नाही असं कसं होईल?अन्घोरा गुरसी बरमान करत आम्ही रमपुरा ला आलो, मात्र बरमान चे आजोबा, गुरसी चं देऊळ आणि रमपुराला आलेला अनुभव हे मी पुढील ६४ मधे सांगणारं.!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*