नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ६१
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला नांदनेर च्या दोन पिंडी बद्दल सांगत होते. तर इथे अंकित कडे माझा वाढदिवस साजरा होत होता आणि त्या आधी नमस्कार करून येऊ म्हणून मी मंदिरात गेले होते. अंकित म्हणाला ”आपको अगर जाने की जल्दी नही हो और आपके भाग्य मी लिखा हो तो आपको एक चमत्कार दिखाता हु” आम्हाला काही घाई नव्हती आणि असेच विलक्षण अनुभव मिळणं म्हणजे तर भाग्य च होतं…
आम्ही थांबलो…अंकित नी घरी फोन करून उशीर होईल असं सांगितलं आणि म्हणाला” अब ध्यान लगाकर बैठो.. जो भी होगा उसे सिर्फ महसूस करो.. और फिर बताना…. बहोत आनंद आयेगा… लेकीन ध्यान लगना जरुरी है, तभी चमत्कार मिलेगा…
मी, अंकित, बाबा आणि मंदिराचे पुजारी असे चौघही आम्ही तिथे बसलो. इथे खूप शांतता आहे… मी फक्त काय होणार आहे याच्या विचारात होते मात्र हळू हळू डोळ्यासमोर निळ्या लाल रंगाची ज्योत मंद मंद प्रकाश देत होती आणि नंतर ती प्रखर होऊ लागली. दरम्यान किती वेळ झाला असेल माहित नाही पण ह्या ज्योतीचा हळू हळू आकार बदलत गेला आणि ओंकार उमटत गेला. यात आत निळसर रंग आत आणि लाल रंग बाहेर असं रूप दिसू लागलं. हा आकार मोठा मोठा होत गेला आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर मोठ्या रुपात येऊन स्थिर झाला.. मला आता या ओंकारा शिवाय काहीच दिसत नव्हतं…. आणि हळू हळू अगदी क्षीण असा एक ध्वनी ऐकू येतोय असं मला वाटलं…
हा ध्वनी या आकाराच्या मागून कुठूनसा येत होता आणि मागे मात्र फक्त अंधार होता. आता माझं लक्ष पूर्ण आणि पूर्ण या ध्वनिकडे गेलं आणि डोळ्या समोरचा आकार जसा पुसट पुसट होत गेला तसा तसा त्या आकारा मागचा ध्वनी हळूहळू प्रखर होत गेला.
आता माझे कान फक्त आणि फक्त तो एकमेव आवाज ऐकू शकत होते मात्र तो आवाज बाहेरून आत येत नव्हता तर आतून बाहेर येत होता असा भास होऊ लागला. त्यानंतर फक्त त्या आवाजाचं अस्तित्व जाणवू लागलं, बाकी काहीही डोळ्यासमोर येईना. हा आवाज तार सप्तकातला ओंकार ध्वनी होता. कानांना सहन होईल इतकाच हा आवाज होता मात्र अतिशय तीव्र होता. हळु हळु तो आवाज माझ्या संपूर्ण देहभर किंवा मनभर किंवा माझ्या आजूबाजूच्या सृष्टीमध्ये भिनू लागला. फक्त तोच आवाज…. अगदी घनदाट होत गेला…. त्यानंतर तो आवाज आणि दुसरं काहीही नाही…
त्यानंतरचं मला फारसं आठवतच नाही… फारसं काय काहीच आठवत नाही….. तो आवाज खोल आत रुजे पर्यंत काय ते आठवतंय… त्यानंतर बाबाने मला हात लावून, हलवून जेव्हा उठवलं तोच क्षण आठवतो आहे. डोळे उघडता क्षणी तो आवाज बटन दाबल्या सारखा बंद झाला आणि क्षणभर सगळ्या जगाची विस्मृती झाल्यासारखं झालं. डोळे उघडले त्याक्षणी माझ्यासमोर त्या दोन शिवपिंडी होत्या आणि ह्या दोन पिंडी हा मधून ओंकार स्वर निघून एकमेकांवर आपटूनएक मोठा ध्वनी तयार झाला होता असं मला वाटून गेलं.
त्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट मी एकही शब्द बोलली नसेन. मी हातानेच थांबा अशी खूण केली, मला अजून काही वेळ तिथेच त्याच अवस्थेत बसावसं वाटत होतं किंबहुना काय करावं, उठावं, बसावं, बोलावं की अजून काही करावं…. हे ही सुचतच नव्हतं. तो आवाज बंद झाला असला तरी त्याचं असणं अजून मिटलं नव्हतं… माझ्या मेंदूचा काही भाग बधिर झाल्यासारखं वाटलं आणि थेंब-थेंब पाणी जसं हळूहळू एखाद्या भांड्यात साचत जातं तसं हळूहळू आजूबाजूच्या अस्तित्व त्या बधीर झालेल्या मेंदूच्या भागात पुन्हा थेंबा थेंबा सारखं गळू लागलं. जवळ-जवळ वीस-पंचवीस मिनिटांनंतर अंकितने माझ्याकडे फक्त पाहिलं आणि म्हणाला “लगता है तुम्ही ओंकार ध्वनी सुना है……. अब मुझे आपको किसी चमत्कार के बारे में बताने की जरूरत नही…” अंकित म्हणत होता तो चमत्कार कदाचित हाच असेल किंवा अजूनही काही असेल तर मला माहित नाही परंतु माझ्यासाठी ही अनुभूती मला कुठल्यातरी शून्यात नेऊन सोडणारी होती. या शुन्याबाहेर बाहेर काही काही नसावं, आणि असेल तर ते अशाश्वत आहे किंवा ते नाहीच किंवा तो भ्रम आहे आणि हे शून्य अतिशय विलक्षण असं काहीतरी आहे.. सांगण्याच्या पलीकडचं, शब्दातीत, फक्त असं आरपार छेदून जाणारं किंवा विरघळवून टाकणारं….वेगळच, जिथे काही उरतच नाही असं कदाचित….
इतकच समजत होतं… त्याचं नक्की विश्लेषण मला करता येणार नाही कारण कदाचित ते माझ्या आकलनाच्या पलीकडचं होतं. मात्र ती बधिरता जाणवावी, म्हणजे त्या अवस्थेतून डोळे उघडून मी जरी बाहेर आली होती तरी ती बधिरता मला जाणवत होती इतकी बधीर मी झाले होते… अर्थात ज्या वेळी ती बधिरता कमी होऊ लागली त्यावेळी ती बधिरता आली आहे हे जाणवलं… तोवर मी कुठे होते..काय होत होतं …ते ही मला माहित नाही…
ज्यावेळी आम्ही ध्यानाला बसलो होतो तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ दोन तास उलटून गेले होते. अंकित ची आई आमच्या जेवणाची वाट पाहात बसली असणार होती आणि म्हणून तिथून निघुन आम्ही अंकित कडे येऊन पोहोचलो. आमच्या मागोमाग ह्याच मंदिरातले पुजारी मसाले भाताचा डब्बा घेऊन आले, म्हणाले “ध्यान मे बैठने से पहले बना लिया था आपको देना भूल गया अब आपके लिए लेकर आया हु……” ते बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक जाणवली.. ते फक्त हसत होते, माझं गुपित समजल्यासारखे…..
हे असे अनुभव कदाचित त्या त्या जागेवरील वेगवेगळ्या शक्तींच्या प्रभावामुळे येत असतील. हा अनुभव वेगळा होता मात्र याला मिळतेजुळते असे अजून अनुभव मला येऊन गेले होते.
तुम्हाला आठवत असेल तर दत्त वाड्याच्या आश्रमातून मैया किनारी मी आरतीच्या आवाजाच्या मागेमागे गेले होते होती आणि एका दगडावर बसले होते. ध्यान लागलं की माझा जप सुरु ते काही समजलं नाही पण कुठेतरी मी हरवून गेली होती हे नक्की. त्यानंतर मला सुरेखाताई शोधत-शोधत आली होती… कुठल्यातरी वरच्या भागात लिहिलय बघा मी.. पण आजचा अनुभव वेगळा होता.
साम्य होतं ते माझ्या हरवण्यात. दुसऱ्या परिक्रमेत सुद्धा गोमती संगम म्हणजे येथे गोमती आणि नर्मदा माईचा संगम होतो त्या ठिकाणी किनाऱ्यावर एक आश्रम त्या आश्रमातही मला अशापैकीच एक अनुभव आला, पण तो दुसऱ्या परिक्रमेचे अनुभव लिहिल त्यावेळी लिहिल त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं की या अनुभवा मागे काहीतरी प्रचंड शक्ती असते ज्याचा प्रभाव आपल्यावर पडून आपल्याला हरवायला होतं विसरायला होतं. असं काहीतरी असावं… तेव्हा त्यावेळची मनाची अवस्था असावी किंवा एकाग्रता असावी, काय ते सांगता येत नाही मात्र विलक्षण असतं…. विलक्षण असतं अगदी… इतकंच सांगू शकेन.
आमचं जेवण झालं. नर्मदामैय्या ने माझा वाढदिवस अगदी आनंदात आणि एक वेगळा अनुभव देऊन साजरा केला आणि साधारण बारा च्या सुमाराला आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
पुढे कुसुमखेडा, भारकच्छ, सनखेडा, सतरावन, करत करत आम्ही कीवली ला येऊन पोहोचलो… आणि त्या पुढचा मुक्काम अलीगंज ला केला. या मुक्कामात अनुभव म्हणून फारसा आला नाही पण आनंद मात्र खूप मिळाला. अलिगंजला मात्र गंमत झाली…सांगते पुढच्या भागात…


Leave a Reply