नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५८
मागच्या भागात मी तुम्हाला डिमांवर बद्दल सांगितलं होतं. रामसिंग दुबे यांच्याकडे आम्ही राहिलो होतो, आणि हा मुक्काम अचानक झाला होता. आता पुढे सांगते. इथून पुढे आम्ही पिथोडा होलीपुरा मार्गे नांदनेर ला गेलो. वाटेत बुधनी, सरदार नगर, जैत ही गावं लागतात.
पिथोडा ला पोहचते वेळी आम्हाला बर्यापैकी झाडी जंगल मार्ग लागला. अतिशय प्रसन्न अस वातावरण होतं दिवसभर आणि इथे आम्ही राहिलो होतो ते ठिकाण आधी जरा वेगळं वाटलं पण नंतर मात्र खूप आवडलं. किन-या किना-याने जाताना इथे खूप गमती जमती झाल्या बरं का! एक बगळ्या सारखा दिसणारा पक्षी आमच्या सोबत सोबत चालू लागला इथे, अहो म्हणजे तरी १.५- २ किमी असेल.. हा नं आमच्या समोर समोर उडत होता, थोडं समोर जाऊन अगदी वाटेवर बसायचा, आणि आम्ही त्याच्या जवळ गेलो की उडून जायचा.. मजा वाटली बघून. इथे मोकळा मोठा पण कच्चा रस्ता आणि अगदी बाजूला मैया. त्या मैयाकडून येणारं वारं आमच्यात जणू कसलीशी ताकत भरत होतं. खूप प्रसन्न आणि शांत वातावरण, आपोआप जप केल्या जात होता इथे…एका ठिकाणी तर मी चक्क खाली बसले आणि त्या मैया कडे दोन्ही हात पुढे करून तिला एक करकचून मिठी मारून घेतली…. हो न ! तिनी कवेत घेताल्यासारखं वाटलं मला. ही प्रसन्नता काहीतरी वेगळी होती बरं का, स्थान महात्म्य असेल की काय माहित नाही.. पण म्हणजे कसं सांगू? बघा जेव्हा आपली छान झोप झाली असेल आणि अगदी सकाळी सकाळी उठल्यावर खूप उत्साह वाटत असेल नं तसं, किंवा अनपेक्षित पणे काही हवं हवं सं वाटणारं मिळावं तसं काहीसं…मन नुसतं हसतच होतं आनंदानी… पावलं टाकल्या जात होती पण त्या चालण्यात कसलीही उताविळता नव्हती, उलट आहे ते सगळं अगदी पिऊन टाकावं असं वाटत होतं..
याच रस्त्यावर नं एक अजून गम्मत झाली बरं का….मैयाच्या पलीकडच्या काठावरून बक-याचा एक कळप सुद्द्धा आमच्या सोबत चालतोय की काय असा भास होत होता, आणि कुणी माणूस आहे असा भास झाला म्हणून बाबाने जोरात नर्मदे हर केलं.. इथे पात्र खूप लहान नाहीये, पण खूप मोठही नाही, त्यामुळे आवाज गेला असावा आणि सगळ्या बक-या पण ओरडल्या, त्यात त्या माणसाचा आवाज काही आला नसावा असं वाटून बाबा पुन्हा नर्मदे हर म्हणाला…पुन्हा बक-यांचा आवाज आला, आणि मग नीट पाहिलं तर तिथे कुणी माणूस नव्हताच…. त्या बक-या कदाचित असंच, म्हणजे नर्मदे हर ला प्रतिसाद म्हणून नसतील ही आवाज देत, पण आम्हाला वाटलं आमच्याच हाकेला प्रतिसाद दिला…आणि मग अजून मजा येऊ लागली….
इथे याच रस्त्यावर अजून एक गंमत पाहिली. दोन बेलाची झाडं होती.. म्हणजे त्यांची मुळं आणि बुंधे वेगळे होते. त्यांना फांद्याही वेगळ्या फुटल्या होत्या पण पुढे दोन झाडांची मिळून एक फांदी तयार झाली होती, फोटो काढलाय मी, देते इथे… सृष्टीत असं ही असतं.. आपण नाही का बघत कधी हात चिकटलेले जुळे भाऊ वगैरे, तसं…
तर अश्या अनेक गमती जमती बघत बघत अगदी आनंदात आम्ही पिथोद्याला येऊन पोचलो. इथे लोकांनी आम्हाला रामसिंग भाई चं घर दाखवलं… इथेही रामसिंग भाईच! हे एकटे इथे थांबून शेती बघतात आणि परिवार जबलपूर ला असतो. इथे यांच्याकडे यांच्या स्वयंपाक घराचा ताबा त्यांनी माझ्या हाती सोपवला. रात्री बराच वेळ गप्पा झाल्यात आणि आता आसन लावायचं तर लाईट गेले. जी खोली आमच्यासाठी तयार करायची होती त्यात सगळा भुसा भरलेला….आणि आता तो काढून दुसरीकडे नेण काही शक्य नव्हतं. बरं बाहेर झोपायाचं म्हटलं तर हवी तशी जागा नव्हती, गायी म्हशी बांधलेल्या होत्या, आणि आता रात्री अंधारात आपण कुणाला किती त्रास द्यावा असं वाटलं.. आपण टोर्च लाईट मध्ये करून घेऊ भुसा बाजूला, असं म्हणून आम्ही त्या खोलीत गेलो, आणि बाकी मंडळी पण आपापल्या घरी गेली.
आम्ही आत गेलो तर भरपूर भुसा खोलीभर पसरला होता, खोली म्हणजे व-हांडाच हो, ५ बाय ७ च्या आसपास लहानशी ती खोली, तीन बाजूनी भिंत, एका बाजून जाळी, आणि वर कौलं, ती ही काही ठिकाणी निघालेली… तर आता तो भुसा झाडू नी एका कोप-यात सरकावायाचा आणि मग तिथे अंथरूण घालायचं.. पण आम्हाला तसं करताच आलं नाही..तो भुसा जसा झाडायला सुरवात केली तसं आम्हा दोघांनाही खूप शिंका येऊ लागल्या… आम्ही बाहेर आलो आणि कुडकुडना-या थंडीत जरा वेळ बसलो, पण ते ही सहन होईना… आता काय करावं… मग जरा शोधलं काही दिसतय का तर प्लास्टिक च्या पोत्याची शिवलेली दोन मोठी कापड सापडली… तेच कापड घेऊन आत गेलो… भुसा खोलीभर पसरला होताच, अगदी बराच होता, त्यावरच हे अंथरलं आणि त्यावर आमचे अंथरूण घातलं, आणि दुसरं कापड जाळीला बांधल, आणि छांन झोप झाली.. अजिबात थंडी वाजली नाही… मैयांनी तो भुसा आमच्या थंडी साठीच अंथरून ठेवला असावा..दुसया दिवशी रामसिंग भाई नी स्वत:च्या हातांनी आमच्या साठी बालभोग तयार केला आणि तो खाऊन आम्ही पुढे निघालो.
पुढे साततुमडी निनोरा करत सप्त धारा ला आलो. ही गावं नं अगदी चित्रामधल्या पेंटिंग सारखी गावं आहेत, प्रत्येकच घर कसं सुंदर लीपाई पोताई केलेलं..एका घरातून नं खूपच खमंग वास येत होता, भूक बळावली असेल.. मला लोणचं तेल पोळी च आठवली अगदी… पण तिकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघालो… निनोरा ला एका घरी चहा ला बोलावलं असता तिथल्या मैया जी नी चहा सोबत खायला म्हणून चक्क पोळ्या आणल्या होत्या आणि ताटलीत आंब्याचं लोणचं! आता खरं मला इच्छा ही झाली नव्हती बरं, आठवण आली होती, आणि ती ही त्या खमंग वासामुळे… माझ्या मनात एकदाही असं आलं नाही की आपल्याला लोणचं तेल पोळी हवी आहे…आणि पुढच्याच गावात ती मिळावी ही..खरच सांगते, या वेळी मला फक्त आठवण झाली होती…इच्छा खरच झाली नाही….असो
मग आलो सप्त धाराला… हा रस्ता अगदीच एकट आहे. पण इथून दिसणारं मैयाचं रूप फारच वेगळं आहे.. अशा एका ठिकाणी तिच्या सात धारा वेग वेगळ्या दिसून पडतात अगदी.. बघत रहावसं वाटतं..इथेच एका ठीकाणी एक चौकोनी चबुतरा आहे आणि त्या वर शिवलिंग बसवलेलं आहे, बाजूलाच दुसरा छोटा सां चबुतरा ही आहे.. हे अगदी रस्त्याच्या मध्य भागी बरं का… आणि रस्त्याच्या कडेला एक झोपडी आहे, पडवी असलेली, आणि झोपडीच्या मागे सगळी शेतं…बाबा पडवीत जाऊन बसला आणि मी त्या छोट्या चबुत-यावर जाऊन बसले आणि आम्ही दोघं ही मैयाचं ते विलोभनीय बघत बसलो. अचानक कुठून आणि कसा काय माहित नाही, एक भला मोठा बैल धावत माझ्या दिशेनी येऊ लागला, तशी मी चबुत-यावर चढून उभे राहिले, मला वाटलं मी वर चढून उभी झाल्यावर तो काही करू शकणार नाही, पण हे सगळं इतक्या क्षणार्धात झालं की विचार करायला वेळ मिळाला नाही आणि हा आडवा उभा प्राणी माझ्या दिशेनी शिंग उभारू लागला, त्याचे पुढचे दोन पाय चबुत-यावर, आणि मी मात्र पलीकडच्या भागाने खाली पडले…. तसा तो ही उतरून माझ्या दिशेनी येऊ लागला… त्या महादेवाला मी ११ प्रदक्षिणा नक्कीच घातल्या असतील त्या दिवशी… अतिशयोक्ती सोडून द्या, पण बाबा या नंदी मागे दंड घेऊन धावत होता तरी याला काही परवाच नाही.. तो बाबावर धावून जात नव्हता, माझ्याच मागे येत होता, त्याच्या आणि माझ्या मध्ये तो महादेव काय तो होता बस.. जर हा नंदी त्या महादेवाच्या चबूत-यावर चढला असता तर काही माझी खैर नव्हती… पण त्याला तेवढं उंच चढता येईना बहुधा… एक क्षणभर तो नंदी जरा थांबला असेल आणि तो क्षण साधून मी झोपडीकडे धावले, एव्हाना माझा आरडा ओरडा ऐकून झोपडी चं दार उघडून तिथे राहणारा एक माणूस बाहेर आला होता आणि तो ही या नंदी ला पळवून लावण्याला मदत करत होताच..मी सरळ झोपडीत शिरले आणि दर बंद करून घेतलं… खिडकीतून बघितलं तर हा नंदी झोपडीच्या मागच्या बाजूच्या शेतांकडे निघून गेला होता.. तो खूप दूर निघून गेलाय याची खात्री झाल्यावरच मी झोपडीच्या बाहेर आले… पण असं का झालं याचं कारण मला आजवर समजलं नाही. म्हणजे आम्ही दोघं ही होतो नं तिथे, मग या नंदी ला माझ्याशीच काय वैर? पण असं होतं बहुधा, कारण माझी लहान बहिण गायत्री देशमुख हिला सुद्धा असा अनुभव आलाय..कुठे आला ते मला आता आठवत नाही, पण तिला तर अश्याच नंदी ने शिंग मारून खाली पाडलं होतं… मी तेवढी वाचले बाई.. असो..
इथून पुढे जाताना खूप शेतातून आणि उंच सखल म्हणजे कुठे चढाई तर कुठे खाली उतरून जावं लागतं. तेव्हा शेताला पाणी दिलं होतं आणि सगळीकडे नुसताच चिखल होता त्यामुळे अगदी शेताच्या किना-यावरून जावं लागत होतं. एक सांगू का, या भागातल्या प्राण्यांच माणसाशी किंवा परिक्रमा वासीशी, किंवा माझ्याशीच असेल पण काहीतरी नातं नक्की होतं, किंवा हे इथले प्राणी असेच असतील की काय देव जाणे… मागे लागणारे… कारण आता माझ्या मागे अजून एक प्राणी लागला..एका ठिकाणी अगदी दोन तीन दिवसांचं बकरीच पिलू खेळत होतं.. आम्ही जवळून गेलो आणि ते मागे मागे येऊ लागलं.. मग त्याची सोबत करायला कुठूनशी आणिक पिल्लं… ही पिल्लं आम्हाला पुढे जाऊ द्यायची, आणि मग में में करत मागून पायात पायात करायची. यात एक अगदी लहान पिल्लू होतं ते तर असं हक्कानी माझ्या पायाशी यायचं… रस्त्यात चिखल होता, आणि चढ उतार खूप होते, ह्या पिल्ला ला बरेच ठिकाणी चढता यायचं नाही, तेव्हा पिल्लू अक्षरश: मला किंवा बाबा ला आवाज द्यायचं आणि मग आम्ही त्याला कडे वरवर धरून चालायचं… जवळ जवळ २ तास ते पिलू आमच्या बरोबर होतं आणि मग बाकी पिल्लं निघून गेल्यावरही होतं.. किती हकलावं याला की “जा बाबा तुझ्या आईकडे परत” पण हे काही जायला तयार नाही, याचा मालक कोण काही माहित नाही, मग एका ठिकाणी एक ओढा पार करून जायचं होतं, तेव्हा मन कठोर करून त्याला कडेवर न घेताच पुढे निघून गेलो…काय ऋणानुबंध असतात माहित नाही… त्या नंदीला माझा भयंकर राग असावा, मला अगदी जीवानिशी संपवायला निघाला होता तो, आणि हे कोकरू मला सोडायला तयार नव्हतं… हक्क गाजवत होतं माझ्यावर.. परस्पर विरोधी… म्हणजे एक नक्की.. मी कुणाला तरी अगदी तुटेस्तोवर दुखावलंय आणि कुणावर तरी निस्सीम प्रेम पण केलंय… सगळीच कृपा तिची आहे.
पण बुधनी सरदार सरोवर आणि नांदनेर ला जे काही अनुभवलं त्यात पुन्हा एकदा माईच्या असीम कृपेची पावतीच मिळाली जणू… आणि एक कान उघडणी पण झाली माझी…सौम्य शब्दात चांगलाच रागावलं त्या मैयांनी मला.. “चुकातेयेस तू बेटा, वेळीच सावर” असा संदेश दिला..
सांगते ५९ व्या भागात
सुरुची नाईक


Leave a Reply