नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५६ – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५६

नर्मदे हर..

मागच्या भागात मी तुम्हाला जयंती माता मंदिरात आलेला अनुभव सांगत होते जेव्हा ऐन थंडीत मला थेंब पडतील इतका घाम आला, माझ्या हृदयाची गती थांबेल असं वाटू लागलं आणि एका भयानक दु:खद सत्याचा परिचय जवळून झाला तो अनुभव आता मी तुम्हाला सांगते.

तर जयंती माता मंदिरात आम्ही गेलो तेव्हा पासून चे अनुभव सांगते. बावडी खेडा गावा नंतर जयंती माता चं जंगल सुरु होतं. तसा इथे रस्ता मोठा आहे, टू व्हीलर देखील जातात, मात्र आजूबाजूला भरपूर झाडी आणि जंगल आहे. तर इथे बावडी खेडा ला आम्ही दुपारी दोन वाजता पोहोचलो. इथून पुढे जयंती माता मंदिर साधारण ७ किमी असावं. आम्ही जायचं ठरवलं आणि पुढे निघालो. हळू हळू झाडी दाट होत गेली आणि कच्चा रस्ता लागला. वाळू चा रस्ता होता, कारण काही अंतर पुढे एक नदी लागत होती. मी आणि बाबा हळू हळू रमत गमत जात होतो. कारण सात किमी अंतर आमचं पूर्ण होईलच असं आम्हाला वाटत होतं. मी रेती मध्ये उमटलेले चाकांचे ठसे बघते होते, आणि अचानक मला काहीतरी दिसलं… मी बाबाला दाखवलं आणि मन धस्स झालं.

गाड्यांच्या येण्या जाण्यामुळे असेल, किंवा दव पडल्यामुळे असेल , वाळू ओलसर होती आणि त्या ओलसर वाळूत मोठ्या आकाराचे जनावराचे ठसे दिसत होते, ते ही अगदी नुकतेच उमटलेले. आता आम्ही फक्त ते ठसे बघत बघत पुढे जात होतो कारण पुढे जाण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. ते ठसे झाडी च्या दिशेला गेले आणि दिसेनासे झाले. तिथून पुढे जेम तें १० पावलं चाललो नसू आम्ही आणि अत्यंत वेगळा वास येऊ लागला. हा वास कशाचा आहे हे आम्हाला समजलं होतं… आम्ही झपाझप पण सावध पणे पुढे जात होतो आणि दिसेनाशी झालेली पावलं, म्हणजे पावलांचे ठसे पुन्हा दिसू लागले.. म्हणजे वाघोबा आमच्या पुढे पुढे चालत होते आणि आम्ही मागे मागे… चला हे असं आहे हे बरं आहे, आम्ही पुढे आणि वाघोबा मागे असते तर काय झालं असतं तो विचार न केलेलाच बरा.

या जंगलात वाघोबा आहेत हे तर समजलं होतं आणि पुढे नदी वर गेलो तेव्हा अजून एक गोष्ट बघायला मिळाली. इथे नदी च्या काठावर अनेदा लोक पिकनिक करायला येतात. आजही इथे लोकांची बरीच गर्दी होती. बहुधा सुटीचा दिवस असावा. तर इथे एक लाकडी पूल आहे आणि हा पूल पार करून गेलं की एक छोटासा डोंगर लागतो, या डोंगराच्या वर आहे जयंती माता मंदिर. तर इथे आम्हाला बघून अनेक लोक आमच्याशी बोलायला आले. त्यातल्या एकाने आम्हाला “ध्यान से जाना” असा सल्ला दिला, आणि एक विडीयो दाखवला… अगदी एक दोन दिवस आधी काढलेला, याच लाकडी पुलावरचा. या विडीयोमध्ये वन अधिका-यांनी एका बिबट्याला मारलं होतं कारण हा बिबट्या गावात शिरून माणसावर हल्ला करायचा. त्याला जिवंत पकडणं शक्य होऊ शकलं नव्हतं…. बापरे, म्हणजे इथे बरेच प्राणी आहेत तर.. आता लाकडी पूल पार करून वरची टेकडी चढायची होती आणि लाकडी पूल पार केला की रस्ता एकट आणि जंगलातून जाणारा होता. नदीच्या अलीकडे जितकी हालचाल होती त्यापेक्षा कितीतरी पट जास्त शांतता पलीकडे च्या टेकडीवर होती.

आम्ही टेकडी चढून वर गेलो आणि जयंती माता मंदिर परिसरात सुखरूप पोहोचलो. मंदिर परिसर छानच आहे मात्र इथे आसन लावायची व्यवस्था म्हणजे एक भिंती नसलेला वरांडा आहे फक्त. आधीच थंडी चे दिवस, त्यात जंगलाचा भाग असल्याने अजूनच थंड वातावरण होतं. आश्रमातल्या मंडळीनी सगळ्यांनाच दोन दोन जाड चादरी आणि जास्तीचे पांघरूण दिले होते. त्यामुळे थंडी आटोक्यात आली होती.. रात्री दाल बाटीची भोजन प्रसादी घेऊन आम्ही झोपी गेलो.

रात्री झोपेत मला अचानक वेगळीच भीती वाटू लागली. आज काहीतरी अघटीत होणार असं राहून राहून वाटू लागलं. झोप उघडली ती भीतीमुळेच, पण काय ते समजेना…..मला खूप बेचैन होऊ लागलं.. जीव घाबरायला लागला, खूप घाम यायला लागला.. खूप काळजी वाटायला लागली. जवळ जवळ तास भर मला अशी भीती वाटत राहिली… कारण काही समजत नव्हतं…पण खूप भीती वाटत होती.. कशाची ते ही समजेना, आणि साधारण तासाभराने मला अचानक छातीत दुखू लागलं, हाता पायाला मुंग्या येऊ लागल्या.. कुणीतरी आपला श्वास दाबून धरतय असं वाटायला लागलं. मी पांघरूण काढून बाहेर फे-या मारू लागले.. बाबाला उठवलं तोवर मी घामाघूम झाले होते.. कपाळावरून घामाच्या धारा येऊ लागल्या होत्या आणि मला काहीही सुचत नव्हतं. कधी छातीतली कळ जीव काढायची… आत… खूप आत कुठेतरी जोरात हिसका मारावा तसं व्हायचं तर कधी पोट आवळून यायचं… बाबाला वाटलं दाल बाटी मुळे झालं असेल, पण मी बाटी खाल्लीच नव्हती..बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवत होता..

माझ्या डोळ्यासमोर फक्त माझं लेकरू दिसत होतं, आणि मी आता जाणार.. यातून माझी सुटका नाही असं वाटू लागलं होतं. आता आजूबाजूचे परिक्रमावासी ही जागे झाले होते. कुणी पाठ चोळतय तर कुणी मला वारा घालतय… मी मात्र उभे होते, की बसले होते, की लोळत पडले होते ते काही आठवत नाही.. तळमळत होते मी इतकं मात्र आठवतंय. साधारण एक ते पावणे तीन (पावणे तीन नंतर ची वेळ आठवते… आणि एक वाजलेला बघितल्याचं आठवतं, झोप उघडली तेव्हा घड्याळ पाहिलं होतं मी. नक्की त्रास केव्हा सुरु झाला आणि केव्हा संपला ते आठवत नाही) हा प्रकार असाच सुरु होता. बाबा डॉक्टर चा शोध घ्यायला गेला असावा… तोवर लिंबू सरबत, पाणी पाजून झालं होतं मला..आणि अचानक मला मळमळू लागलं… मला उलटी झाली आणि थोडं बरं वाटलं… हे असं मला अपचनामुळे झालं असेल असं सगळ्यांचं मत झालं पण मी सकाळपासून फक्त वरण भात खाल्ला होता.. त्यामुळे अपचन नाही हे मला माहित होतं. शिवाय ज्या वेळी मला अस्वस्थ वाटायला लागलं त्यावेळी मला काहीही शारीरिक त्रास झाला नव्हता.. तो त्रास मला जवळ जवळ तासाभरानी सुरु झाला होता. आणि अचानक बंदही झाला.

बाबानी माझ्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा म्हटली.. आणि कधीतरी मला झोप लागली. दुस-या दिवशी मात्र मी अगदी ठणठणीत होते, काहीही न झाल्यासारखे. २६ किमी ची लक्कडकोट ची झाडी मी पार करू शकले इतकी ठणठणीत! किती विचित्र नं.. इतका त्रास की जीव जातो की राहतो समजेना… तो अचानक झाला अन अचानक बंदही झाला. काय कारण असावं? कारण होतं.. ते मला नंतर समजलं.. सांगते.

हे असं विचित्र पणे तब्बेत खराब होण आणि पुन्हा ठीक होणं हे मला जरा वेगळच वाटत होतं. फोनला रेंज नव्हती तोवर मी शांत होते आणि नंतर लगेच मला हे माझ्या आई वडिलांना सांगावसं वाटलं म्हणून मी घरी फोन लावला. मात्र पुन्हा एक भीतीचं सावट पसरलं. घरी कुणी फोन उचलेच ना. आईला लावून झाला, बाबांना लावून झाला, भावाला लावून झाला, घरचा फोन लावून झाला… कुणीही फोन उचलेना… मग माझ्या नवा-याला लावला.. माझ्या मुलाला लावला… ते ही फोन उचलेना.. मी आता काल रात्रीपेक्षा ही जास्त घाबरले होते. आपल्या घराचं कुणीच का फोन उचलत नाहीये? काहीतरी गडबड आहे नक्की हे समजत होतं आणि काय ते जाणून घ्यायचं होतं पण अजिबात हिम्मत होत नव्हती. “सगळं ठीक आहे, तू काळजी करू नको” फक्त हेच ऐकायचं होतं मला…पण आपण ठरवतो तसं नसतं होत ….. माझ्यासाठी काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं…

काळजी पोटी की काय देव जाणे, आता माझं अंग तापांनी फणफणलं होतं.. आता मला फक्त माझ्या बाबांशी बोलायचं होतं एकदा.. मी पुन्हा एकदा फोन लावला आणि या वेळी माझ्या भावजयीनी फोन उचलला. “रेणू, काय झालय? फोन का उचलत नाहीयेत कुणी?” मी रागावलेच तिला! आणि तीनी सांगितलेल्या बातमी ने मी मला आवरू शकले नाही.. “ताई बबन काका आजोबा काल रात्री गेलेत…तुला सांगावं की नाही समजत नव्हतं, सगळे तिकडेच गेलेत, बाबा आलेत की मी सांगते तुझ्याशी बोलायला”….

माझे काका आजोबा गेले होते… मला वाटणारी भीती अवाजवी नव्हती…काल रात्री पासून ही भीती वाटत होती मला…. काहीतरी होणार असं राहून राहून वाटत होतं…..लहानपणापासून त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेले मी..त्यांनाही माझं खूप कौतुक…आणि परिक्रमेत असताना मला ही अशी बातमी मिळावी? फार फार वाईट वाटत होतं मला… मात्र हा अनुभव इथेच संपत नाहीये… माझं जेव्हा माझ्या रेवती काकूशी बोलण झालं तेव्हा वेगळाच उलगडा झाला. तो असा की आजोबा गेले ती वेळ आणि मला त्रास झाला ती वेळ अगदी एक.. रात्री साधारण एक ते तीन च्या दरम्यान मला त्रास झाला.. अगदी छातीत दुखून जीव जातो की काय इथवर त्रास, आणि तिकडे नागपूर ला त्याच वेळी फक्त थोड्या वेळाच्या अस्वस्थते नंतर आजोबांनी देह ठेवला…जणू ती त्यांची आणि माझी शेवटची भेट! हे नक्की काय आहे ते मला सांगता येत नाहीये आणि आजही हे लिहिताना माझे अश्रू घळघळा वाहतात आहेत.

मी बाबाला (माझ्या सोबत च्या नर्मदा बाबाला) म्हणाले मला घरी जायचय तर मोठ्या धीराने त्यांनी मला समजवलं “ आजोबांना तू परिक्रमा सोडून आलेलं आवडणार नाही.. तू जायचं नाहीस…” मी नाही गेले परत घरी मात्र मला झालेला त्रास, आजोबांची ही बातमी, कशामुळे कोण जाणे पण माझी तब्ब्येत अधिकच बिघडली. पुढचे तीन चार दिवस ती अधिकच बिघडत गेली. मात्र पामाखेडी, फतेह गड, आणिक मध्ये एक गाव येतं तिथेले जमीनदार, आणि पुढे नेमावर या सर्व ठिकाणी मैया माझ्या सोबत आहे हे तिनी जाणवून दिलं. नेमावर ला तर कहरच झाला, पाऊलही उचलता येईना अशी अवस्था, आणि अशा वेळी जे झालं ते पुन्हा एकदा आपल्याला निशब्द करून ठेवतं… मी नेमावर मध्ये पाय ठेवताच असा विलक्षण अनुभव आला … पण आता नाही सांगत.. पुढच्या भागात सांगेन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*