नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५३ – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५३

*नर्मदे हर हर..
*मित्रांनो, माझ्या प्रिय वाचकांनो आज आधीबोबडी तुम्हा सगळ्यांचे मला आभार मानायला हवेत. मागचा भाग म्हणजे आपल्या अनुभव कथन मालिकेचा ५२ वा भाग होता.नर्मदा मैयाच्या एका लहानश्या लेकराचे बोबडे बोल हे अर्धशतका पर्यंत जाऊन पोहोचतील असं कधीही मला वाटलं नाही, मात्र तुम्ही वाचकांनी दिलेल्या प्रतिसादातून मला दर वेळी नवी उर्जा मिळत गेली आणि प्रत्येक वेळी एका नव्या भागाचं सृजन होत गेलं. त्यामुळे या अनुभवकथन मालिकेच्या वृद्धी चं सगळं सगळं श्रेय माझ्या वाचकांना, आणि माझ्याकडून तुम्हाला आवडेल अशा भाषेत, तुम्हाला आवडेल अश्या शैलीत लिहवून घेण्याचं कार्य करणा-या माझ्या नर्मदा माई ला. मला समजलेली (खर तर अजूनही नक्की माहित नाही) नर्मदा मैया तुमच्या समोर माझ्या माध्यमातून मांडून ती माई मला पुन्हा एका पुण्याकर्माशी जोडतेय आणि तिची कृपा दृष्टी माझ्यावर कायम ठेवते आहे हेच खरं. या अनुभव मालिकेचे किती भाग आहेत असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. त्याचं उत्तर अजूनही माझ्याकडे नाहीये, कारण अजूनही माझं लिखाण पूर्ण झालेलं नाहीये. ते आता त्या मैयावर सोडून मी फक्त लिहिण्याचे कार्य सुरु ठेवतेय. तिला जितकं माझ्याकडून लिहवून घ्यायचं असेल तितकं ती लिहवून घेईल, काही राहिलंच शिल्लक तर “नर्मदे हर”.. अजून काय…नाही का?

*परिक्रमेच्या वाटचालीचा आढावा घेत असता ओंकारेश्वर पासून निघून, शूलपाणीची झाडी, समुद्र पार करून महेश्वर पर्यंत येणं म्हणजे जवळ जवळ अर्धी परिक्रमा होत आलीये. आणि आता महेश्वर च्या पुढे जाऊन अमरकंटक आणि मग फिरून पुन्हा ओंकारेश्वर अशी अर्धी अजून बाकी आहे. ही अनुभव मालिका मी रोजनिशी सारखी लिहिलेली नाही त्यामुळे तारीख वार वेळ यावर भर नं देता अनुभव आणि निसर्ग यावर काय तो भर दिलेला आहे. बरेचदा एका पाठोपाठ एक असे सतत अनुभव येत राहिलेत आणि बरेचदा काहीही अनुभव न येता दिवस सरत गेले. जेवढे जमतील तेवढे लिहिले आणि बाकी चे मैयार्पण झालेत. त्यामुळे आता पुढे येणारे अनुभव आणि आतापर्यंत आलेले अनुभव एकसारखेच असतील, तितकेच प्रभावी असतील किंवा काहीतरी नवीन असतीलच असं सांगता यायचं नाही. अमुक अनुभव मोठा आणि अमुक लहान हे असं वर्गीकरण परिक्रमावासी ला करताच येत नाही. कारण आलेला प्रत्येक अनुभव हा त्या त्या वेळी मिळत असलेल्या समाधानाचं प्रतिक असतो. त्या त्या परिस्थितीशी तितकाच जुळलेला असतो. अगदी रस्ता चुकणे, आणि कुणीतरी येऊन रस्ता सांगणे हा अनुभव प्रत्येकालाच येतो, तरीही त्या वेळेची परिस्थिती मात्र भिन्न असते आणि म्हणून तो अनुभव एक वेगळा अनुभव म्हणून गाठीशी राहात असतो. हे सगळं मी का सांगतेय? तर एक वाचक म्हणून तुम्ही जेव्हा माझ्या अनुभवांच्या माध्यमातून मैयाची अनुभूती घेता त्यावेळी तुमच्या जाणीवेशी मी देखील नकळत जोडली जातेच नं? तुमच्या त्या जाणीवा जश्या आतापर्यंत जपल्या गेल्या तश्या आताही जपल्या जाव्या, आणि आता पर्यंत, म्हणजे अर्ध्या वाटे पर्यंत तुम्ही जशी साथ मला करत आला आहात तशी साथ मिळत राहावी या साठी हा सगळा उहापोह. यापुढे काय असा प्रश्न तुमच्या मनात प्रत्येकच भागा अखेरीस असतो, तसाच तो माझ्याही पुढे असतोच…. अनुभव माझे असतात पण ते मांडताना प्रामाणिक पणा खेरीज दुसरं काहीही येवू नये, अहंकाराचा स्पर्श देखील येऊ नये हेच सतत मनात असतं…त्यामुळे त्या माई ला स्मरून, आणि तिच्यावर सोपवून मी फक्त कागदावर उतरवण्याचे काम करत असते… आणि म्हणूनच मी देखील तुमच्या इतकीच अजाण असते. तरीही नम्र विनंती इतकीच की हे प्रेम असं कायम राहू द्या…

*आज अजून एका मैया बद्दल लिहिणार आहे. जिच्यामुळे या लेख मालिकेला सुरवात झाली ती माझी सखी अमृता. डॉ. अमृता इंदूरकर, माझी बाल मैत्रीण. मला आलेले अनुभव आले, मी अनुभवले असं म्हणून मी शांत होते. ते लिहून काढायचे वगैरे काहीही माझ्या मनात नव्हतं, मात्र ह्या माउली ने माझ्या जवळ हट्टच धरला. “ ते काही नाही सुरु, तू तुझे अनुभव लिहायलाच हवेत. तू परिक्रमा करून आलीयेस, काहीतरी मिळालय नं तुला? मग ते स्वत;पुरतं ठेवतेयस? काय अर्थ मग त्या परिक्रमेला? वाटून टाक… आणि मोकळी हो….”.. असच अजून एक हक्काचं माणूस म्हणजे माझा बालमित्र घना, श्री घनश्याम सहस्रभोजनी. तू छान लिहितेस, लिहून तर बघ… लिहिलंस का? असं सारखं विचारून पाठपुरावा करणारा घना आणि अमृ यांच्या या उद्गारांनी मला जाणवलं… जे काही मला मिळालय त्याची उजळणी जर मी करत राहिली नाही तर ते मला अंमलात कधीच आणता येणार नाही. आणि ते जर चारित्र्यात उतरलं नाही तर काय अर्थ आहे? कठीण आहे मान्य आहे… पण निदान या लिखाणामुळे मी पुन्हा पुन्हा त्या त्या अनुभवातून जाते आणि पुन्हा पुन्हा अनेक वळणावर न वळता, माझ्या मार्गाची मला आठवण होते. कारण हे अनुभवण, शिकणं आणि आपण तसं घडत जाणं ह्या तीनही वेगळ्या प्रक्रिया आहेत, आणि त्या पार पाडण्यासाठी काल नामक सहाय्याची गरज लागणार आहेच. तेव्हा या कालचक्रात मला माझ्या मैयाशी जोडून ठेवून, माझ्या मार्गाची जाणीव करून देणारे हे अनुभव या लेखमालिकेच्या स्वरूपात पुढे आणणा-या माझ्या अमृता माईचे, आणि “घनशाम बाबा” चे शतश: आभार!

*आता त्या लोकांचे आभार ज्यांच्या भरवश्यावर ही परिक्रमा पूर्ण होवू शकली. नर्मदा माई ज्यांच्या ज्यांच्या म्हणून रुपात येऊन मला जेवू खाऊ घालून गेली, ज्यांच्या ज्यांच्या म्हणून घरी माझा दाणा पाणी त्या मैयांनी लिहून ठेवलं होतं त्या सगळ्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम फक्त काय तो मी करू शकते .. आभार ही तर औपचारिकता आणि ती करावीशी वाटत नाही कारण या ऋणातून मला बाहेर पडायचं नाहीचे मुळी.

*मला आठवतो तो खापारामाळचा शांतीलाल पावरा, त्याची बायको.. स्वत: उपाशी राहून आम्हाला खाऊ घालायला तयार असलेली… मी नाही विसरू शकत माझ्या बाबाला, माझी अतोनात सेवा केली होती त्याने मी आजारी असताना, नारेश्वर ला…. मोलगी चे नाईक काय किंवा बगवानीयाची ती दोन लहान मुलं काय……ते म्हातारे लाल पुरी बाबा, आमच्या साठी भर थंडी अंगावर आभाळ पांघरून झोपतात, ती कुक्षी मा.. माझा वाढदिवस साजरा करते, मला कपडे करते… त्या मध्यप्रदेशातल्या परिक्रमावासी मैया बलाबला कुंड ला येऊन माझी चौकशी करणा-या, राज घाट ला रात्री ११ वाजता फक्त मला भेटायला येणारे मांगीलाल चे जावई, ५० किमी पर्यंत जेवणाचा डबा घेऊन येणारी मोनिका, मांगीलाल, हरी ओम भाई, किती किती नावं घेऊ? ही संपता न संपणारी यादी आहे. या प्रत्येकाकडून माझी काळजी घेतली गेलीये, माझं संगोपन केलं गेलय, माझं पालन पोषण केलं गेलंय, मला योग्य वाटेवर नेऊन ठेवण्याच्या या प्रक्रियेत बहुमोलाचा वाटा या प्रत्येकाचा आहे आणि म्हणून हे श्रेय त्या प्रत्येकालाच!माझ्या आई वडिलांची पुण्याई म्हणून ही संधी मला मिळाली. माझे पाठीराखे भाऊ, माझी नवी नवेली भावजय, हे सगळे माझ्या निर्णयाच्या मागे खंबीर पणे उभे राहिले म्हणून हे शक्य झालं. परिक्रमेला जातेय म्हटल्या वर डोळ्यात पाणी आलेली आणि मायेनी डोक्यावरून हात फिरवणारी, आशीर्वाद देणारी माझी ९५ वर्षाची आजी, माझा परिवार, माझा नवरा, सासू सासरे, दीर जाऊ, माझा लेक आणि माझ्या लहानग्या पुतण्या यांचं सहकार्य मिळालं आणि म्हणूनच घर सोडून पाच महिने मी घराबाहेर राहून हे कार्य सिद्धीस नेऊ शकले.

सरते शेवटी बोलेन ते थोरल्या मोठ्यांचे आशीर्वादाबद्दल. चितळे बाबा, आणि “तुझी वाट लागलेली आहे.. निश्चिंत रहा” असं पहिल्याच दिवशी सांगणा-या चितळेमाई, ताई तू याच वर्षी जाणार परिक्रमेला म्हणणारे अरविंद काका मुळे, या सगळ्यांच्या ऋणात मला राहू दे गं मैया … असच म्हणेन..

गुरु गोविंद दोनो खडे, का के लागू पाय
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताये….

*आणि अश्या माझ्या सद्गुरूला मी काय सांगावं? त्याच्या चरणी फक्त नतमस्तक होता येतं… आणि मग आपसूक काय घडायचं ते घडत जातं… परीक्रमा ही अशीच घडत गेली, आणि ही अनुभव मालिका ही अशीच उतरत गेलीये…याहीपुढे येणारा प्रत्येक क्षण हा असाच येत जाणारे, आपसूक.. आपण फक्त निमित्तमात्र.. आपण फक्त चालायचंय. ती मैया आणि सद्गुरू चालवतील तसं.. आपण फक्त भिनू द्यायचाय तिचा जयघोष, आपल्या देहात्म्याच्या कणाकणात… जीव, प्राण, आत्मा रोम रोम तेजाळून निघताहेत या … आई म्हणून आपण फक्त हाक माराचीये तिला….. नर्मदे हर.. अशी!

*या ५३ व्या भागात मी अनुभव सांगितला नाहीये याची मला जाणीव आहे. तुम्ही वाट बघताहेत हे माहितीये आणि म्हणून हा भाग इथेच संपवतेय. पुढच्या भागात मंडळेश्वर ला जाताना चा अनुभव, आपण आपल्या गुरुस्थानाकडे कसे नकळत खेचल्या जातो तो अनुभव, आणि एक रहस्य सांगणारे….22 किमी अन्न आणि पाण्याविना आम्ही कसे चालू शकलो याचं, थोडा धीर धरा… पुढच्या रविवारी येतेय भाग ५४ घेऊन..
नर्मदे हर.. हर..हर
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
©सुरूची नाईक–विदर्भ गट
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*