आज १७ ऑगस्ट:महान क्रांतिकारक शहीद मदनलाल धिंग्रा यांचा बलीदान दिन.
क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचा बलीदान दिन: ज्या इंग्रजांनी आपल्या क्रूर आणि जुलमी राजवटीच्या जोरावर दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. ते जुलमी राज्य उलथवून टाकण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले.तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली.
वीर क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा: भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर,पंजाबमधील आद्य क्रांतिकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
मदनलाल धिंग्रा यांचा 17 ऑगस्ट हा बलीदान दिन..!
मदनलाल यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्याच भूमीवर जाऊन सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्याचा समोरून निधड्या छातीने पाच गोळ्या घालून खून केला.या खूनानंतर अवघ्या एका महिन्यात मदनलाल यांना फाशीची शिक्षा सुनावली.18 फेब्रुवारी 1883 रोजी जन्मलेले मदनलाल 17 ऑगस्ट 1909 रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी भारत मातेसाठी फासावर लटकले.प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीवर राहून,त्यांच्याच उच्चाधिकार्यास मारण्याचा पहिला मान मदनलाल धिंग्रा यांनी मिळवून इतिहासात आपले नाव सुवर्णक्षरांनी कोरून ठेवले.
मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील दित्तमल धिंग्रा हे सुप्रसिद्ध सिव्हिल सर्जन होते. ते ब्रिटिश सत्तेचे विश्वासू म्हणून ओळखले जात.परंतु,मदनलाल हे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या वृत्तीच्या विरोधात होते, त्यामुळे वडील मदनलाल यांच्यावर नाराज होते.
मदनलाल यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर येथेच झाले.त्यानंतरचे शिक्षण त्यांनी अमृतसरमधील एमबी इंटरमिजिएट कॉलेजमध्ये घेतले आणि नंतर लाहोरमधील सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु,सन 1904 मध्ये विद्यार्थीदशेत असतानाच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांना लाहोरमधील महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कुटुंबाने मदनलाल यांच्यासोबतचे संबंध तोडले. त्यामुळे मदनलाल यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. प्रथम त्यांनी लिपिक म्हणून काम केले. नंतर ब्रिटिश पर्यटक आणि शिमल्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी टांगा चालवण्याचे काम केले. त्यानंतर 1906 मध्ये त्यांच्या मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार मदनलाल उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेथे त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये यांत्रिक तंत्रज्ञानाचे शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळाली.
लंडनमध्ये शिकत असताना मदनलाल हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांना भेटले. मदनलाल हे लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत होते. इंडिया हाऊस हे भारतीय विद्यार्थ्यांच्या राजकीय चर्चांचे केंद्र होते.
भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला. तसेच राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका यासाठी अनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे अभिनव भारत या क्रांतीकारकी संघटनेचे सदस्य बनले.दरम्यानच्या काळात इंग्रजांनी खुदीराम बोस, कन्हैलाल दत्त,सतींदर पाल आणि काशीराम या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिल्याबद्दल आणि इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अन्यायामुळे इंडिया हाऊसमधील सर्व भारतीय तरुण देशभक्त खूप संतापले होते. हे सर्व पाहून मदनलाल यांच्या मनात ब्रिटीश राजवटी विरुद्ध आधीच असलेली आग आणखीनच पेटली. त्याचवेळी त्यांनी बदला घेण्याचे ठरवले.
मदनलाल हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रहात होते. सावरकर जेव्हा तिथे होते. तेव्हा त्यांना एका भोजन प्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळया टेबल वर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही. आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलाल यांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की, ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांचीही पहिली भेट. मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.
कर्जन वायली याचा खून करण्याची पूर्ण योजना आखून 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्रा लंडनमधील ‘द नॅशनल इंडियन असोसिएशन’च्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले. याच कार्यक्रमात कर्झन वायली देखील उपस्थित होता. कार्यक्रम संपल्यानंतर कर्झन वायली हॉलच्या बाहेर येत असताना मदनलाल यांनी अगदी जवळून त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या कर्झन याच्या चेहऱ्यावर लागल्या आणि तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर मदनलाल हे तेथून पळून गेले नाहीत,त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मदनलाल यांना कोर्टात कर्झनच्या हत्येचे कारण विचारण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले, भारताला अमानवी ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी मी माझी भूमिका बजावली आहे. कर्झन वायलीच्या हत्येप्रकरणी मदनलाल यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 17 ऑगस्ट 1909 रोजी ब्रिटिश तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.
या क्रांतिकारी घटनेने आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी कर्झन वायलीची हत्या केल्यामुळे मदनलालचे वडील खूप संतापले होते.मदनलाल यांना फाशी दिल्यानंतर लंडनमधून त्यांच्या अस्थी भारतात आणल्या नव्हत्या.काही काळानंतर शहीद मदनलाल यांच्या अस्थी लंडनहून 13 डिसेंबर 1976 रोजी भारतात आणण्यात आल्या.दिनांक20 डिसेंबर 1976 रोजी अमृतसर येथे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंह यांच्या उपस्थितीत शहीद मदनलाल यांच्या अस्थिंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारत मातेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मदनलाल यांनी फासावर लटकवताना सांगितले की, ‘माझ्या मातृभूमीसाठी मी माझे जीवन समर्पित करत आहे, याचा मला अभिमान आहे. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी मला अनेक वेळा भारतीय म्हणून जन्म घ्यायचा आहे.
शहीद मदनलाल धिंग्रा,महान क्रांतिकारकास यांची आज ११४ व्या पुण्यतिथिनिमित्तांन विनम्र अभिवादन..!🙏🌹


Leave a Reply