नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती-👇भाग👇४९👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती-👇भाग👇४९.👇

*नर्मदे हर हर..

*छीतरी ला उघड्यावरचा मुक्काम झाला असं मी मागच्या भागात सांगितलं. तिथे बांधकाम अजून सुरूच होतं. नाही म्हणायला डोक्यावर छत होतं पण वारा अडवायला म्हणून काही नाही.

*सोसाट्याचा वारा आणि जानेवारी महिना. आम्ही हळू हळू जंगलाकडे जात होतो. तिथे त्या संध्याकाळी कोल्ह्यांची फौज बघितली आम्ही. बरीच दूर होती पण रात्री ती जवळपास वावरू शकतात याची खात्री पटली होती, आणि आज आम्हाला दारं किंवा भिंती नावाचा प्रकारच मिळाला नव्हता. आम्ही जिथे झोपलो होतो तिथून समोर आणि उंचावर दिसत होतं मंडू, म्हणजेच मांडवगड. राणी रुपमतीचं राज्य! आणि हा भला मोठा पहाड आम्हाला चढून जायचा होता.

*रात्री श्रीमाली साहेब आम्हाला स्वत: भेटायला आले आणि त्यांनी बराच खाऊ आमच्यासाठी आणला. आमचा सगळ्यांचा बालाभोग होईल इतका. दुस-या दिवशी सकाळी आम्ही मांडू साठी निघालो. भला मोठा घाटाचा रस्ता मजल दर मजल करत पार करेस्तोवर आम्हाला दुपारचे दोन वाजलेत. घाट चढून वर आलो ते निळकंठ महादेवाचं अतिप्राचीन मंदिर दिसलं. ब-याच पाया-या खाली उतरून पाण्याच्या झा-याखाली असलेल्या या मंदिरात गेलो तो सगळा थकवाच नाहीसा झाला. तिथे एक तरुण सन्यासी रामायण वाचत बसला होता. येणारे जाणारे त्या संन्याश्याला नमस्कार करून जात होते. तिथे एक अखंड जल कोष आहे, त्यातलं पाणी कितीही दा काढून घ्या, ते संपतच नाही.. ते पाणी पिऊन मी या सन्यासी महाराजांच्या समोर बसले. इतर लोकांसारखी मला अजिबात घाई नव्हती, किंबहुना या मंदिराची रचना आणि याचं राजकीय महत्व,तसच हा जलकोष आणि याच रहस्य मला माहित करून घ्यायचं होतं आणि अजूनही एक महत्वाची गोष्ट होती. ती म्हणजे या सान्याश्याच्या डोळ्यातले रामायण वाचाताचे भाव मला तिथून पुढे जाऊ देत नव्हते.एक एक शब्द आणि ते उच्चारताना त्यांच्या डोळ्यातलं प्रेम इतकं विलोभनीय होतं की ज्याला ते दिसेल तो पुढे जाउच शकणार नाही.

*मला बसलेलं पाहून त्या सन्याश्याने हातानेच “थांबा” अशी खुण केली आणि आम्ही थांबलो. त्याचं वाचन झालं तोवर अजून अर्धा तास तरी झाला असेल. नर्मदे हर झालं. चौकश्या झाल्या आणि मग त्याने आम्हाला मागच्या बाजूला नेलं. तिथे त्यांची खोली होती. चहा झाला, भोजन प्रसादी चा आग्रह झाला, पण त्यांना आमच्यासाठी वेगळी प्रसादी तयार करावी लागेल म्हणून आम्ही नको असं सांगितलं तर जवळ जवळ किलोभर द्राक्ष आणि डझनभर संत्री आमच्या पुढ्यात आणून ठेवली. खूप सत्संग झाला. ते महाराज म्हणाले “लोग चले जा रहे थे, लेकीन आप तो बैठ ही गये? ऐसा क्यू?” मी पण जे होतं ते सांगितलं, “आप जिस प्रेम से रामायण पाठ कर रहे थे वह सुनकर और देखकर रुकने का मन किया इसलिये रुक गये” ते म्हणाले “मै तो रोज ही ऐसे ही रामायण पाठ करता हू. कितने ही परिक्रमावासी आते है, दर्शन कर के चाले जाते है, आप मे कोई तो बात होगी जो आप रुक गये, इसे समझने की कोशिश नही करोगी आप?” मी काय कोशिश करणार? मला पामराला काय समजणार? मी म्हटल “आप ही बताइये”…मी विचारण्याचीच देरी की काय,महाराज बोलू लागले. “माताजी सब कूछ जो केवल संयोग लगता है वो संयोग नही होता, उस हर क्रिया के पिछे संदेश होते है. आप को यहा रुक कर रामायण सुनने मे भी संदेश है, शायद पहले से कोई इशारा आपको मिल चुका है, और मेरे जरीये आप को याद दिलाया जा रहा है” म्हणजे मला काहीतरी संदेश मिळालाय आधीच आणि आता त्याची पुन्हा आठवण हे संन्यासी करून देणार, असं हे म्हणत होते आणि तरी मला समजत नव्हतं, की नक्की त्यांना मला काय सांगायचंय, कसली आठवण करून द्यायचीये.. मी विचारात मग्न झालेले पाहून ते मला म्हणाले “अरे माताजी कहां खो गये आप? इधर उधर खोने से कोई मतलब नही, आप को तो वही खोना है जहा पे आप बैठ कर हमे सुन रही थी. जिस प्रेम के साथ हम रामायण पढ रहे थे, उसी प्रेम से तुम रामायण सुन रही थी ना? जैसे तुमने मुझे देखा था वैसे ही मैने भी तुम्हे देखा था. हम दोनो मे दो चीजे बिलकुल एक सी थी, एक प्रेम और दुसरा राम. प्रेम की तो कोई कमी मुझे आप मे नही दिखती, क्युं की आप मा हो लेकीन आपको राम से दूर नही होना है.. उन्हे कभी नही छोडना”

*त्या सान्यास्याचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर काटा आला आणि कालचक्र फिरावं तसं झालं. मला एकदम आठवला तो खलघाट चा राजबिंडा सन्यासी, आणि त्यांनी मला दिलेला संदेश, भाग ११ मध्ये मी सांगितलय बघा या बद्दल. या सन्याश्या कडून मी ऐकलेलं पाहिलं वाक्य होतं “फक्त एक करा, राम सोडू नका”…राम, राम राम मैयाजी असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून गेल्या नंतर मी रात्री बारा पर्यंत रामाच्या मूर्ती समोर बेभान होऊन बसले होते…तो, रामा ची जाणीव करून देणारा पहिला सन्यासी… दुसरा सन्यासी म्हणजे अभिराम दास त्यागी महाराज, रामानंद आश्रमातले, २८ व्या भागात मी यांच्या बदल लिहिले आहे मग लाल पुरी महाराज, हेच वाक्य फक्त हिंदीतून सांगणारे आणि राम हृदय वाचून दाखवणारे…आणि आता हा चौथा.. पुन्हा तेच वाक्य, अगदी तेच शब्द मला चवथ्यांदा सांगत होता हा.. “राम को मत छोडना…” वरून पुन्हा आधी मिळालेल्या संदेशांची आठवण ही करून देत होता… कसं शक्य आहे? चार वेगवेगळे संन्यासी, चार वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याशी बोलतात, मात्र एकच वाक्य, अगदी शब्दशः सारखं वाक्य मला सांगतात… कसं शक्य आहे? आणि राम सोडायचा नाही म्हणजे नक्की काय करायचं? त्याचं उत्तर काही सापडेना, पण हो, रामायण वाचा, जसं जमेल तसं,एकदा तरी पूर्ण, आणि शक्य असल्यास ११ दा पूर्ण , असं मला ह्या संयास्यानी सांगितलं आहे.. अजून माझं पूर्ण वाचून झालं नाहीये पण त्यात माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर असणारेत असं ही हे सन्यासी म्हणाले.. मी निर्बुद्ध आहे, जेवढं स्पष्ट सांगितलं तेवढच समजलंय मला, पण त्या मैयांनी जेव्हा चारदा मला एकच संदेश वेगवेगळ्या संन्याश्यान् करवी दिलाय त्या अर्थी त्यात काहीतरी नक्की आहे इतकच मला समजतंय.

*तिथून पुढे मंडू चं निसर्ग सौंदर्य बघत बघत मुक्कामी पोचलो, भोजन प्रसादी आदी झाली आणि झोपी गेलो. दुस-या दिवशी पुन्हा पुढचा प्रवास सुरु. आज सकाळी लवकर निघालो खरं पण बालभोग काही झाला नव्हता. वाटलं वाटेत काही तरी खाऊ पण इच्छा च झाली नाही. बरच अंतर चालत आलो, आणि मग एका झाडाखाली बसलो. आमच्या जवळ शेंगदाणे होते. पावभर शेंगदाणे ठेवायचे कुठे म्हणून मी ते रात्रीच पाण्याच्या बाटलीत ठेवले होते, म्हटल भिजवून सकाळी खाऊयात, तर तेच खात आम्ही झाडाखाली बसलो होतो. ते भिजवलेले दाणे खाता खाता मला नं बदामांची आठवण आली. मी बाबाला म्हणाले “दाण्या ऐवजी बदाम असते तर किती मजा आली असती नाही?” बाबा ही म्हणाला मला “बेटा हे गरीबांचे बदामच आहेत,खा आता”..

*आम्ही असं बोलत असतानाच आमच्या समोरून एक पांढ-या रंगाची कार गेली बरं का. त्यात बसलेली बाई खूपच सुरेख होती दिसायला. गोरी पान, लांब केस, पांढरी साडी, कुणाचं ही लक्ष वेधून घेईल अशी.. मी तिच्याकडे बघत होते आणि कार पुढे निघून गेली… आणि गम्मत माहितीये का, थोडं पुढे जाऊन ती कार थांबली, बाई खाली उतरली, डिकी उघडून एक पिशवी घेतली तिनी आणि आमच्या दिशेला येऊ लागली.. मी लगेच बाबाला म्हटलं “ ए बाबा, ती खाऊ घेऊन येतेय का रे आपल्यासाठी, किती सुंदर आहे नं ती?” भूक लागली असल्यामुळे असेल, मला तर खाउच असेल असं वाटलं. ती आली, “ मैने अगर कोई खाने की चीज दीयी तो लोगे आप?” खूप आनंदाने मी लगेच हो म्हणून सांगितलं, आणि ती पिशवी तिनी माझ्या हाती दिली. आमच्यातले दाणे पण खाल्ले तिनी, म्हणाली “मै राखी व्यास,रतलाम से हु, घुमने आई हु,इसमे रतलाम की सेव है, सोचा आपको पसंद आयेगी”…वावा तिखट शेव होती त्यात…ती बाई आमचा निरोप घेऊन गेली आणि लागलीच मी शेवेची पिशवी बाहेर काढली,पण हे काय, खाली अजून एक पिशवी होती,ती कशाची आहे हे बघण्यासाठी मी ती दुसरी पिशवी ही बाहेर काढली आणि बघते तर काय,चांगले एक किलो बदाम होते त्यात….अहो आत्ता दाणे खाताना मी बदामाची आठवण काढली होती नं, अगदी १५ मिनिटापूर्वी…. आणि मिळाले होते मला बदाम! मला माझीच लाज वाटू लागली… किती? किती मागतेय मी मैयाला, आणि ती सुद्धा देतेय नुसती… काय हे?.. पण माणूसपणात अडकून आहोत आपण.. किती समजलं, कळलं तरी वळत नाहीच….“आई आता मला कसलीच इच्छा होऊ देऊ नको, हे ही मी मागितलंच तिला..!

*पुढे गेलो तो अनेक परीक्रमावासियांची भेट झाली. हा चढलेला पहाड आता उतरायचा होता. कठीणच होता तसा. उतरताना गुडघे जातात अगदी असं ऐकलं होतं. पण जायचं तर होतं. आम्ही निघालो. थोडं अंतर उतरून होत नाही तर दोन लहान लहान मुलं बसलेली दिसलीत. लहान मुलं दिसालीत नं की माझ्यातली शिक्षिकाच जागी होते.. “ क्या नाम है बेटा? कहां राहते हो? स्कूल जाते हो? माझे प्रश्न सुरु झाले.. त्यांनी ही उत्तरं दिली. ते बगवानिया चे, म्हणजे उतरल्या उतरल्या लागतं ते गाव, मांडू च्या पायथ्याचं. “ यहा क्या कर रहे हो? माझे प्रश्न पुन्हा सुरु झाले, त्यावर त्यातला एक म्हणाला, बकरी चराने आया हु, तर दुसरा त्याला म्हणतो “ए तुम झूठ क्यू बोला, तेरे पास बकरी नही है? मग मी पुन्हा विचारलं, किसालीये आये हो बेटा, अपने दोस्त के साथ आये हो क्या? तर तो चटकन म्हणतो “तुमको लेने आया हू, धीरे धीरे मत चलो, मेरे पिछे चलो”… मला गंमतच वाटली त्याची, पण खाली उतरल्यावर समजलं, तो खरच आम्हाला घ्यायला आला होता. त्याच्या आईनी सांगितलं होतं, परिक्रमावासी को ले आना.. आमच्यासाठी त्याच्या घरी भोजन प्रसादी तयार होती. आणि गम्मत सांगू का, हा भला मोठा पहाड आम्ही फक्त १ तास १० मिनिटात उतरलो होतो.. काहीही त्रासाविना!

आता तो कोण होता? का त्याच्या आईनी आम्हाला घेऊन ये असं सांगितलं? आम्हीच कसे काय, इतरांना तो का घेऊन गेला नाही, ते काही काही माहित नाही.. आज दिवस भरात आलेल्या अनुभवांनी मी सुन्न झाले होते, माझ्या मनानी विचार करणं थांबवून दिलं होतं, आणि तेच कदाचित आवश्यकही होतं. कारण पुढे जे काही वाढून ठेवलं होतं अजूनच वेगळं होतं. माझ्या आयुष्याची दिशा बदलली ती महेश्वर पासून…इथे माझी भेट “साक्षी” शी झाली.. भेट काय, मीच झाले साक्षी, असं म्हणा हवं तर! आम्ही धामानोद च्या आधी मुक्काम केला आणि महेश्वर कडे निघालो.पण तिथे नेमकं काय झालं? कसं झालं याची कल्पना देते.. मी नागपूरची राहणारी हे मी तुम्हाला सांगितलंय… पण आता मी इंदोर ला असते हे ही तुम्हाला माहितीये… मी इंदोर ला कशी आली हे मात्र तुम्हाला माहित नाहीये… आणि याचं उत्तर आहे “अचानक”… मी ध्यानी मनी ही नसताना नागपूर सोडून दिलं…कायमचं सोडलं नागपूर,का? त्याचं उत्तर महेश्वर च्या अनुभवात आहे. असं काय घडलं महेश्वर ला? काय काय बदल झालेत माझ्या आयुष्यात? आणि ही साक्षी कोण? सांगते पण पुढच्या भागात. ©सुरूची नाईक:विदर्भ गट
〰️↕️〰️
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,*

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*