❒♦व्ही.व्ही.गिरी.♦❒
━━•●◆●★★●◆●•═━
●जन्म:~१०ऑगस्ट १८९४
●मृत्यू:~ २४ जून १९८०
★वराहगिरी व्यंकट गिरी★
यांचा जन्म ओडिशात बऱ्हमपूर जिल्ह्यात झाला. स्थानिक कॉलेजात शिकल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी डब्लिनला तिथल्या विद्यापीठात गेले. पण १९१६ मध्ये काँग्रेसच्या चळवळीत व कामगार क्षेत्रात काम करण्यासाठी ते आयर्लंडमधून भारतात परतले. भारतात रेल्वे कामगारांची पहिली देशव्यापी युनियन बांधण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केलेच, शिवाय `आयटक’ या कामगार संघटनेचे ते दोन वेळा अध्यक्षही झाले. १९३७ मध्ये ते मद्रास विधानसभेचे सदस्य व कागारमंत्रीही झाले. १९४६ पर्यंत ते मंत्रिपदी राहिले.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच त्यांची सिलोनमधील (आताची श्रीलंका) भारतीय उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली. १९५१ मध्ये ते संसदेवर गेले व पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री झाले. १९५७ नंतरची दहा वर्षे ते उत्तर प्रदेश, केरळ व म्हैसूर राज्यांचे राज्यपाल झाले. १९६७ मध्ये त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे दोनच वर्षांत तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांचे निधन झाले व गिरी हंगामी राष्ट्रपती बनले.
या काळात काँग्रेसमध्ये दुहीचे वारे वाहू लागले होते. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना न जुुमानणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेसजनांचा वेगळा गट तयार झाला होता. १९६९ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्याला शह म्हणून इंदिराजींनी गिरींना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले व ते विजयीही केले. अशा तऱ्हेने केवळ राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून गिरींच्या गळ्यात देशाच्या सर्वोच्च पदाची माळ पडली.
२४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४अशी पाच वर्षे ते राष्ट्रपती होते. या काळात त्यांनी केवळ इंदिरा गांधींचे 'हुकुम' पाळले. १९७२ मध्ये गिरींनी एकतर्फी निर्णय घेऊन इंदिरा गांधींना
‘भारतरत्न’ बहाल केले. त्याची परतफेड इंदिरा गांधींनी गिरींना १९७५ मध्ये ‘भारतरत्न’ देऊन केली.
गिरींचे २४ जून १९८० रोजी मद्रासमध्ये ह्रदयविकाराने निधन झाले. त्याच्या आदल्याच दिवशी दिल्लीत संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाल्याने गिरींच्या मृत्यूला वर्तमानपत्रांतही फारशी जागा मिळाली नाही.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात गिरींनी वकिली सोडून उडी घेतली व तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासही भोगला.सन १९२७ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ)च्या परिषदेसाठी ते भारतीय कामगारांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिले व लंडनला दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी भारतीय श्रमजीवींची भूमिका ठामपणे मांडली. १९४२च्या `छोडो भारत' चळवळीच्या काळातही यांना ब्रिटिशांनी अटक करून वेल्लोर व नंतर अमरावतीच्या तुरुंगांत डांबले. स्वतंत्र भारतात कामगारमंत्री म्हणून औद्योगिक तंटे सोडवण्यासाठी त्यांनी एक सूत्र तयार केले. ते 'गिरी अॅप्रोच' म्हणून प्रसिद्ध झालेत.
⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑


Leave a Reply