आज ११ ऑगस्ट: सन १९७९ साली,मोर्वी(मोरबी)धरण फुटून हजारो लोक मृत्युमुखी पडले.
मोर्वी किंवा मोरबी,गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातले ऐतिहासिक शहर…या शहराला पूर्वी सौराष्ट्राचं पॅरिस म्हटलं जायचं.इथल्या मच्छू नदीच्या काठावरचा राजवाडा, परवाच पडलेला झुलता पूल.संस्थानकालीन नक्षीदार वेशी यांनी मोर्वी सजलं होतं. सत्तरच्या दशकात या शहराला असाच जबरदस्त धक्का बसला होता. सन१९७९ साली घडलेली एक महाभयानक घटना,आजही अंगावर काटे उभे करते.
११ ऑगस्ट १९७९ चा दिवस,गुजरातमध्ये पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु होता.१२ ऑगस्टच्या आदल्या चोवीस तासांत सुमारे २३ इंच पाऊस पडला.मोर्वी शहराच्या मध्यातून वाहते मच्छू नदी.नदी आणि शहर हे समपातळीवर.त्या आधी केव्हाच असा पाऊस पडला नव्हता.मच्छू नदीच्या (Macchu River Morbi) वरच्या अंगाला मच्छू १ आणि मच्छू २ अशी दोन धरणं होती.मच्छू २ हे धरण १९७२ मध्ये बांधलं गेलं होतं.मोरबीपासून सहा किलोमीटर अंतरावर असणारं हे धरण मातीचं. त्या आठवड्यात झालेल्या महाभयंकर पावसामुळं मच्छू १ च्या धरणाच्या भिंतीवरुन सुमारे दहा फूट अंतरावरून पाणी वाहू लागलं.हे पाणी मच्छू दोनच्या धरणक्षेत्रात शिरलं आणि हाहाःकार उडाला.हा पाऊस पाहून धरणाच्या डेप्युटी इंजिनिअरनं सकाळी ११ च्या सुमारास काही गावांना इशारा दिला होता,पण पाणी कमी होत नव्हतं.अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाण्याचा जादा ताण पडून मच्छू २ चा डावीकडचा ७६९४ फूट आणि उजवीकडचा ४५९९ फूट मातीचा बंधारा वाहून गेला. काही वेळातच फुटलेल्या धरणाचं पाणी मोरबी,मलिया ही शहरं आणि आसपासच्या एकूण सुमारे ८० हजारांची लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये शिरलं.एकट्या मोरबी शहरात त्या दिवशी शिरलेल्या पाण्याची उंची साडेचार मीटर होती.या धरणाला वीस दरवाजे होते. त्यापैकी १८ दरवाजे उघडले होते असं नंतर सांगण्यात आलं. पण त्याबद्दलशी शंका होती.मच्छू १ आणि मच्छू २ ही धरणं पाण्यानं भरली आहेत हे माहित असूनही खालील गावांना इशारा देण्याचं काम झालं नव्हतं. पावसामुळं फोन लाईन्स बंद असल्यानं मोर्वीच्या डीवायएसपींनाही धरणावरुन संपर्क होऊ शकला नव्हता.
एकूण मच्छू धरणाच्या बांधकामापासूनच प्रशासकीय गोंधळ होता,वास्तविक एक लाख क्युसेक्स एवढ्या क्षमतेचं धरण (Dam) बांधावं अशी सूचना सेंट्रल वाॅटर अँड पाॅवर कमिशननं केली होती. मात्र लोकप्रियता मिळवण्याच्या नादात तत्कालिन सरकारनं ही क्षमता दुपटीनं वाढवली. याचा परिणाम काय तर १२ ऑगस्ट १९७९ रोजीच्या त्या महाप्रलयात झालेले हजारो जणांचे मृत्यू.या महापुरात नक्की किती जणांनी प्राण गमावले याचा अंदाज बांधणंच कठीण होतं. त्यामुळे मृतांचा खरा आकडा कळू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे.दैनिक सकाळनं त्यानंतरच्या एका वृत्तात एक हजारांहून अधिक मृतदेह सापडल्याचं नोंदवलं होतं.गुजरात सरकार आणि विरोधी पक्ष १५ हजारांहून अधिक जण मरण पावल्याचं सांगत होते,आकडा काहीही असला तरी मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली होती हे नक्की.या दुर्घटनेत जेआरडी टाटांसारखे उद्योगपती,अन्य राज्ये यांनी आर्थिक मदत केली-मदत कार्यात लष्कराचा अर्थातच मोठा वाटा होता.राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मृतदेह शोधून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं मोठं काम पार पाडलं होतं.
सदर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्त्रोत:गूगल/इंटरनेट..
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢


Leave a Reply