आज ११ ऑगस्ट:रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉ.चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांची नियुक्ती – बडगुजर. इन

आज ११ ऑगस्ट:रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉ.चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख [डॉ.सी.डी.देशमुख] यांची नियुक्ती.
चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी डी देशमुख हे लहानपणापासूनच अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीचे म्हणून ओळखले जात असत. समकालीन इतिहासाची पाने उलटल्यास शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि साहित्यिक योगदान देणाऱ्या महाराष्ट्रामधील काही मोजक्याच रत्नांमध्ये त्यांचा समावेश होतो. किंबहुना, सर्वच गोष्टीमध्ये अग्रेसर असणाऱ्या सी डी देशमुखांना त्यांचे योगदान लक्षात घेता अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.आजच्या पिढीला सी डी देशमुख कोण असा प्रश्न केल्यास बहुतांश लोकांना गुगलचा किंवा अन्य स्त्रोतांचा आधार घ्यावा लागेल. एखाद्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू असतो असे त्यांचे योगदान होते. त्यांची थोरवी त्यांच्या त्यागात होती…अभ्यासात होती…झटपट निर्णयप्रक्रिया पार पाडण्यामध्ये होती…प्रशासकीय बाण्यामध्ये होती…त्याचबरोबर साहित्य संस्कृती जपण्यामध्ये होती…
शैक्षणिक प्रगतीचा आलेख: सी.डी.देशमुखांनी त्यांचे मॅट्रिकचे शिक्षण १९१२ मध्ये त्यावेळच्या बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून सर्वोच्च गुणांनी प्राप्त केले. संस्कृतमधून नाना जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणारे ते पाहिले विद्यार्थी होते,पुढे सन १९१७ मध्ये त्यांनी इंग्लंडच्या जिजस महाविद्यालय केंब्रिज मधून विज्ञानाची पदवी घेतली. वनस्पती शास्त्रामध्ये उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर त्यांना ‘फ्रँक स्मार्ट पारितोषिक’ मिळाले होते.

प्रशासकीय कार्यामध्ये योगदान: सन १९१८ मध्ये इंग्लंडमध्ये घेतली जाणारी भारतीय नागरी सेवा ( इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या काळामध्ये या परीक्षेला जागतिक महत्त्व असल्यामुळे सी.डी.देशमुख यांना विशेष नावलौकिक मिळाला.याची पोच पावती म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांना प्रशासकीय सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता,पुढे इंग्लंडच्या राजाने त्यांना ‘सर’ या पदवीने सन्मानित केले. भारत सरकारच्या वित्त, शिक्षण, आरोग्य, जनकल्याण खात्याचे सचिव म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले. ऑगस्ट १९४३ मध्ये पहिले भारतीय म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची जबाबदारी स्वीकारली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विशेष अर्थ खात्याचे राजदूत म्हणून अमेरिकेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
राजकीय योगदान: प्रशासकीय कारकिर्दीची अखेर राजकीय आखाड्यामध्ये प्रवेश करत झाली.तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या आग्रहात्सव त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली,आणि जिंकलीही.१ जून १९५० ला केंद्रामध्ये त्यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्या पदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत ते सक्रिय मार्गदर्शक भूमिकेत होते. भारतीय जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण,कर आणि करेतर सुधारणा इत्यादी कामे करण्यात त्यांचे मोठे योगदान लाभले.

राजीनाम्याचे अस्त्र: देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या मागण्या वाढू लागल्या. राज्यांची निर्मिती कशी असली पाहिजे यासंदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण होवू लागले. त्यातूनच भाषावार प्रांतरचनेची संकल्पना पुढे आली.गुजरात आणि महाराष्ट्र त्याला अपवाद होते.फक्त मुंबई राज्य गुजरात आणि महाराष्ट्रसह द्विभाषिक होणार व इतर राज्यांची भाषावार प्रांतरचना होणार असल्याचे सी.डी.देशमुखांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या पदाचा त्याग केल्यामुळे सर्व स्तरामधून त्यांचे कौतुक झाले,त्यानंतर ते यूजीसीचे अध्यक्ष झाले.दिल्ली विद्यापीठाचे उपकुलुगुरू म्हणूनही त्यांनी काम पाहिले.नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजेच एनबीटीचे ते पाहिले संस्थापक अध्यक्ष होते.भारतीय सांख्यीकी संस्थेचेसुद्धा ते अध्यक्ष होते.
सन१९५७ मध्ये कोलकत्ता विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली.सन १९५९ मध्ये आशियाचा नोबेल समजणारा ‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकारनेसुध्दा त्यांना ‘पद्म विभूषण’ पुरस्कार दिला,Able जावून त्यांनी राष्ट्रपती पदाची निडणुक लढवली आणि त्यामध्ये त्यांना अपयश आले,त्यांनी ‘The course of my life’ हे आत्मचरित्र लिहिले.
स्त्रोत:गुगल/इंटरनेट
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*