नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३७.👇
नर्मदे हर……
आम्ही नावेत बस लो होतो. माझ्या पायाला चटके बसत होते, अंगात ताप होताच. समोर सोपान दादा होते आणि त्यांचा मला खूप आधार वाटत होता. माझा नावेतला हा पहिलाच प्रवास. नक्की काय असतं ते मी पहिल्यांदाच बघणार! बघणार असं म्हणंणं चुकिचं आहे कारण लाटांशिवाय काहीच दिसत नव्हतं. आणि लाटा बघितल्या की गरगरायला होत होतं, का ते सांगते. समोरून येणारी लाट ही चांगली मोठी आणि उंच दिसायची. असं वाटायचं ही आता आपल्या अंगावर आदळणार पण पाण्याच्या फ़ोर्स मुळे की नाविकाची कमाल म्हणायची माहित नाही, ती लाट आमच्या नावे खाली जायची आणि आमची नाव चांगलीच उंच फ़ेकली जायची. ती समोरून येणारी लाट जेव्हा मागे निघून जायची त्यावेळी समोर दुसरी लाट तयार असायची मात्र आधीची लाट निघून जाता जाता आमची नाव जशी वर उचलल्या जायची नं लाटेमुळे, तशीच चांगलीच खाली पण आदळल्या सारखी व्हायची. म्हणजे, अशी कल्पना करा की ज्या वेळी समोर लाट आहे त्यावेळी नाव अशी खोलगट भागात आहे, म्हणजे आपण एखादी वस्तू पाण्यात सोडली की कसं क्षणभर ती वस्तू तळाशी जाते आणि पाणी चारी बाजूला उसळतं नं तसं काहितरी…असं वाटू लागायचं की पाणी खाली गेलय, आणि लाट आली की उसळी बसून नाव वर उचलल्या जातेय…..आकाश पाळण्यात बसल्यावर कसा पोटात गोळा येतो, तसं होत होतं… सगळी मंडळी फ़क्त आणि फ़क्त देवाचा धावा करत होती. माझा हनुमान चलीसा, नर्मदाष्टक आणि जे येत असेल नसेल ते सगळं म्हणून झालं होतं..आणि पुन्हा सुरुच होतं…आणि अशा वेळी, अचानक आमची नाव खूप जोरात हलली..हिसका बसला, आता ही नाव उलटून, भर समुद्रात जलसमाधी मिळते की काय असं वाट्लं…
झालं असं होतं की आमच्या पुढे तीन नावा होत्या. या नावाड्यांची एक पद्धत आहे नाव हाकायची. समोरचा नावाडी मागच्या नावाड्याला टाॅर्च नी वाट दाखवतो. खरंतर या वेळी परिक्रमावासिंनी आपले टाॅर्च बंद ठेवावे अशी सक्त ताकीद दिली असते. पण तरीही या सूचनेचं गांभीर्य माहित नसल्या मुळे काही परिक्रमावासी टाॅर्च लावून समुद्र बघण्याचा प्रयत्न करतातच. तसच झालं. हे नावाडी अगदी सिरियली टाॅर्च दाखवतात मागच्या नावाड्याला. म्हणजे पहिल्यानी दुस-याला दाखवल्यावर मग दुसरा तिसऱ्याला दाखवेल… असं काहीतरी आहे. जिथे कुठे थोडं वळण घ्यायचं असतं तेव्हा हा टोर्च चा सिग्नल जास्त उपयोगी पडतो. तर झालं असं की पहिल्या आणि दुस-या नावे नंतर तिसरी नाव ही वळली. आता आमची नाव वळायची होती. टाॅर्च प्रमाणे आमच्या नावाड्याने नाव वळवली देखिल. मात्र हा टाॅर्च नावाड्यानी दाखवलेला नसून तो नावेतल्या कुण्या तरी परिक्रमावासी नी सुरू केला होता. त्यामुळे आमची नाव योग्य वळणापेक्षा थोडी आधी वळली आणि त्या ठिकाणी बेटासारखं काहितरी होतं त्याला जाऊन किंचित आदळली. नशीब म्हणा की हा भाग नावाड्याच्या चटकन लक्षात आला आणि त्याने प्रसंगावधान राखून ती नाव जोरात आदळू न देता दुसरीकडे वळवली मात्र तरीही हिसका बसलाच! हा लहानसा हिसका देखील खरं तर इतका जोरात होता की जोरात नाव आदळली असती तर काय झालं असतं ही कल्पना करण्याचं धाडस माझ्याकडून आजही होत नाहीये. त्यावेळी मनात कुणी म्हणजे कुणीच नव्हतं. देवाची आठवणं काय असते ते तेव्हा अनुभवलं. देव आठवले की कुणिच कसं आठवत नाही हे ही तेव्हाच समजलं, आणि हो.. भालोद ला प्रतापे महाराज म्हणाले होते ती ईशवराला आळ्वण्याची तळमळ किती तीव्र असू शकते ते ही तेव्हा चांगलच समजलं.
तो हिसका सावरल्या नंतर नाव बर्यापैकी शांतपणे हाकल्या जात होती. एव्हाना मला चटके बसणं कमी झालं होतं कारण या हिसक्यामुळे आणि लाटांमुळे संपूर्ण नावेत पायाशी पाणी जमा झालं होतं. तापलेला भाग थोडा थंड झाला होता, किंवा हिसका, लाटा या प्रकारात मी बसणारा चटका विसरत होते.. नक्की काय होतं ते आता आठवत नाही. पण नाव थोडी शांत झाल्यावरची गंमत सांगते. माझ्या समोरचे सोपान दादा अचानक “ ताई सोडा, सोडा प्लीज” असं ओरडून मला म्हणाले.. मला कळलच नाही की ते असं काय म्हणताहेत? मात्र मग लक्षात आलं. मी माझ्या अंगावरचं ब्लॅंकेट घट्ट धरून, ओढून घेतलं होतं आणि मी सोपान दादांच्या मागे बसले होते.. अहो, त्या ब्लॅंकेट सोबत मी सोपान दादांच्या शर्टाची कॉलर अनावधाने इतकी गच्च आवळली होती की ते ओरडून म्हणत होते “ताई आता गळफ़ास लागेल,सोडा”… मी सोडल्यावर ते म्हणाले “म्हणजे आज आमचा शेवट होताच.. नर्मदा मैयात बुडून मेलो असतो एकतर नाही तर सुरुची मैयाने दुसरा मार्ग ठेवलाच होता”…वाचलो बाबा.. असो…
मग हळू हळू उजाडू लागलं तेव्हाचं दृश्य खूपच रमणीय आणि अवर्णनीय होतं. एकीकडे चंद्र होताच आणि आता सूर्य ही उगवणार.. या दोन्हीची जणू साक्ष द्यायला आमची नाव भर समुद्रात हळूवार वाहातेय..त्या वेळेला कुणीतरी मोबाईल काढून गूगल मॅप का अजून कुठलंस ऐप आहे महित नाही पण त्याच्या वर आपण कुठे आहोत ते पाहिलं.. आणि ते जेव्हा समजलं तेव्हा त्या नावाड्यांबद्दल मनात खूप आदर निर्माण झाला. हे नावाडी आपल्या कामात इतके पारंगत असतात की रात्री अंधारात नाव चालवताना सुद्धा त्यांना दिशांचं जबरदस्त भान असतं की ते आकाशातल्या ता-यांच्या पोझीशन वरून नावेची दिशा कायम करतात. त्या ऐप वर असं दिसत होतं म्हणे की आपली नाव ना समुद्रात आहे ना मैया मधे. अगदी मैया आणि समुद्र भगवानांचं पाणी जिथे एक होतय त्या पट्ट्यावर आपली नाव प्रवास करतेय. एकीकडे ४० परिक्रमावासीयांचे जीव त्या नावाड्य़ांच्या जीवावर प्रवास करत असतात. त्या चाळिसांची जबाबदारी त्यांच्यावर असतेच आणि ह्या चाळीस परिक्रमावासिंयांच्या श्रद्धेची सुद्धा जबाबदारी ते चोख निभावत असतात. इतका पायी प्रवास केल्यावर या परिक्रमावासिंची परिक्रमा खंडीत होऊ द्यायची नसते. मैयातून नाव नेल्या जात नाही आणि समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांच्या वाटेला ते नाव जाऊ देत नाही. ही नाव अगदी बरोबर मैया आणि समुद्र जिथे मिळतात तिथून जाते.
५ तासाचा हा प्रवास आता संपत आला होता. थंडी अजूनही तशीच होती. आता सगळेच थकले होते आणि त्यामुळे सगळेच शांत होते. रात्रीच्या लाटांमुळे सगळे पूर्ण ओले झाले होते. आता ते खारं पाणी अंगाला टोचल्यासारखं वाटत होतं. अंगावर रेती रेती झाली होती. कधी एकदा मिठी तलाई ला जाऊन आंघोळ करते असं झालं होतं. ताप होता की नव्हता काही माहीत नाही पण खूप थकवा आला होता. झोप झाली नव्हती, भूक लागली होती पण तोंडाला चव नव्हती. आम्ही पोचलो एकदाचं. आता उतरायचं खाली.. पण इथे पुन्हा तेच.. खाली दलदल. अगदी गुडघ्या पर्यंत पाय गचकन खाली जाईल इतकी दलद्ल होती. सोपान दादांनी मला पुन्हा मदत केली. आधी पेक्षा मी आता जास्त थकले होते. नावेतून खाली उतरणं कठीणच होतं, पण उतरले कशीबशी सोपान दादांच्या मदतीनी. काठीचा आधार घेत घेत दलदल पार केली आणि मिठी तलाई ला येऊन पोचले.
इथे प्रचंड गर्दी. सगळेच परिक्रमावासी एकच घाई करत होते. अजिबात जागा नाही. स्त्रीयांसाठी आंघोळीची वेगळी व्यवस्था नव्हती. अगदी प्रात:विधी आटोपायला पण सोय नव्हती. जी होती फ़ार अस्वच्छ होती. शेवटी आंघोळ न करता फ़क्त कपडे बदलायचं ठरवलं आणि पुढे कुठे नीट स्वच्छ आंघोळ करू असं ठरलं. कपडे बदलायला म्हणून बॅग उघडली. ती प्लास्टीक च्या पोत्यात बांधली होती म्हणून आतले कपडे कोरडे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. एकूण एक कपडा ओला गच्च होता. चादर, लुंगी, कपडे, अगदी स्लिपिंग बॅग पण पाण्यात भिजवून ठेवावी इतकी ओली झाली होती. आता कपडे सुद्धा बदलता येणार नव्हते. उपाय काही नाही. शेवटी सगळे कपडे धुतले. स्लिपिंग बॅग, सामान ठेवण्याची बॅग सगळं सगळंच धुतलं. अंगावर सुद्धा रेती रेती झालेली, त्यामुळे दोन तीन बादल्या पाणी तसच अंगावर घेतलं… आता सगळे कपडे ओले.. अंगावरचे देखिल… ते वाळेपर्यंत वाट बघून पुढचा प्रवास करायचा होता.. ईलाज नाही.
सोपान दादा आणि मंडळींची सोबत येवढीच होती. इथून पुढे जे मिळेल ते मिळेल. पण माझं नेहमीचं वाक्य मी पुन्हा एकदा म्हणेन. माई फ़ार कनवाळु आहे. ती तुम्हाला वा-यावर सोडत नाहीच. थोडी परिक्षा घेते मात्र तुम्ही तिला शरण असलात तर ती तुम्हाला कुरवाळून घेतल्याशिवाय राहात नाही.
या वेळी माझी तब्ब्येत बरीच बिघडली होती. आणि हे सांगायला सुद्धा माझ्याजवळ कुणी नव्हतं. पण माझी इतकी काळजी घेतल्या गेली की मला घरच्या मंडळींची कमतरता पण भासली नाही. सांगते कसं ते.
मला दोन ते तीन दिवस बराच ताप होता.मी तापातच नारेश्वर ला पोचले. तिथे गेल्यावर मला जेवायची देखिल ताकत नव्हती. कशीबशी बॅग ठेवली, आसन लावलं आणि झोपले. मी थंडी नी कुडकुडत होते. आश्रमाच्या हॉल मधे माझ्या खेरीज एक दोन परिक्रमावासी अजून असतील, बाकी आश्रम रिकामाच. मी बहुधा कण्हत असावे, कारण माझ्या बाजूचे एक काका मला अधून मधून “बरं वाटत नाहीये का?” असं विचारत होते. त्यांनी त्यांचं पांघरूण माझ्या अंगावर घातलं आणि म्हणाले “तुम्हाला ताप आहे बहुतेक ताई, औषध घेतलं आहे का…” मी औषध घेतलं नव्हतं.. पण घेणं गरजेचं होतं. त्या काकांनी माझ्यासाठी खालून ताट वाढून आणलं, मला औषध दिलं. माझ्यासाठी रूम सुद्धा शोधून दिली. माझं सगळं सामान रूम मधे नेऊन दिलं. मी फ़क्तच आराम केला, पण रात्री पुन्हा मला फ़णफ़ण ताप चढला. आता डॉक्टर बोलावणं भाग होतं. डॉक्टर शोधणं त्यांना बोलवणं सगळच काकांनी केलं. रात्री माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या पण ठेवल्यात. कोण कुठले हे काका, पण काय संबध असतो नाही? दुस-या दिवशी जेव्हा मला बरं वाटलं तेव्हा मी त्यांना नमस्कार केला तर रडलेच ते. म्हणाले मला देवानी मुलगी दिली नाही. ती आज नर्मदा माईनी दिली. आता इथून पुढे तुझी परिक्रमा होईस्तोवर मी तुझ्या सोबत असेन. आणि इथून पुढे तू माझी लेक आहेस..तेव्हापासून मी त्यांना “बाबा” असं च म्हणते. आणि हो, त्यांनी मला सक्त ताकिद दिलीये, की त्यांना “अहो बाबा” न म्हणता “ए बाबा” म्हणायचं. तर तेव्हा पासून हा माझा नर्मदा बाबा शेवटपर्यंत माझ्या सोबत होता.
इथून पुढे मंदार वाळिंबे आणि वंदना ताई परांजपे हे दोघं सोबत होते.
मालसर, शिनोर गुजरात चा प्रवास करत तिलकवाड्यापर्यंत आम्ही सोबत होतो. मालसर ला जाताना वाटेत आम्हाला चुडैल माता मंदिर लागलं. मी या आधी चुडैल मातेचं मंदीर बघितलं नव्हतं. गुजरात चा हा भाग तसा ब-यापैकी निसर्ग रम्य आहे आणि गुजरात मधले आश्रम सुद्धा बरेच पॉश आहेत. तसाच एक आश्रम मालसर चा. कणकेश्वरी आश्रम. खरं तर वंदना ताई आम्हाला दुस-या एका आश्रमात घेऊन जाणार होत्या, पण तिथे आम्ही गेलोच नाही. जागा बघता बघता वाटेत आम्हाला एक खूप आकर्षक, मीतभाषी आणि खरोखर प्रसन्न आणि सुंदर अशी कणकेश्वरी आश्रमाची सेवीका दीपिका भेटली. खूप आदरानी ती आम्हाला कणकेश्वरी आश्रमात घेऊन गेली. तिथे पाऊल ठेवलं आणि आम्ही चौघही अवाक होऊन बघत राहिलो… मालसर मधे आम्ही खरं तर राहणार नव्हतो, पुढे जाणार होतो, पण आम्ही चौघही एकमताने तिथे थांबून गेलो.. सकाळी साडेनऊ वाजताच मुक्काम केला … अगदी ६ ते ७ किमी चालून चक्क थांबलो! असं काय होतं तिथे? सांगते 38 व्या भागात.
©सुरूची नाईक–विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार
9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply