नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३०👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३०.👇

आज आम्ही कुंभेश्वर ला पोहचणार होतो. इथे आमची राहण्याची व्यवस्था सौ जागृती सोमण यांच्या घरी केली होती. जागृती अतिशय लाघवी मुलगी, माझ्याच वयाची साधारण, किंचीत लहानच. आणि तिचे यजमान म्हणजे रवी भाऊ, ते ही अतिशय जीव लावणारे होते. आम्ही इथे पोचलो आणि पावसाला सुरवात झाली. पुन्हा एकदा जाणवलं, पाऊस आम्ही पोहोचण्याची वाट बघत होता. आम्ही मैया किना-यानी आलो होतो, त्यामुळे घाट चढून वर आलो आणि समोर आनंदी चेह-याच्या जागृती मैया नी आमचं स्वागत केलं. इथे ३ दिवस राहण्याचं महत्त्व आहे. इथे एकदा नर्मदा स्नान झालं की १०००० वर्ष काशी ला राहण्याचं पुण्य मिळतं. आमचं २ दा स्नान झालं. पण बाकी दिवस मात्र थंड वातावरण असल्याने घरातच स्नान केलं, मैयावर स्नान केलं नाही. २०००० वर्ष रहिल्याचं पुण्य मिळाल, अजून किती हवं आता? असो. इथे शनी देवाचं मंदिर तर आहेच मात्र त्यांच्या दोन्ही बायकांची पण मंदिरं आहेत. त्यांची नाव आहेत छोटी पनोती, आणि मोठी पनोती. तुमचे होत नसलेले कार्य यांच्या दर्शनाने पूर्ण होतात. आपण बरेचदा “ पनोती लागली” असं म्हणतो बहुधा त्याचं कारण हेच असावं. या पनोती देवींची कृपा कुठेतरी कमी पडत असावी नक्की.

कुंभेश्वर ला असताना ओखी वादळाचे वारे जोरात वहात होते. असं समजलं होतं की विमलेश्वर ला २०० परिक्रमावासी अडकून पडले आहेत कारण वादळामुळे नावा समुद्रात सोडल्या जात नाहियेत आणि अजून पुढचे १०- १२ दिवस नावा सोडल्या जाणार नाहीयेत. बाकी जे परिक्रमावासी आमच्या पुढे चालताहेत ते पण काही दिवसात विमलेश्वर ला पोहचणार आहेत, तेव्हा तिथे अजून जास्त परिक्रमावसी होतील आणि गर्दी खूप होईल. त्यामुळे आम्ही असू तिथेच ३ दिवस, मग पुढे पुन्हा ३ दिवस असं थांबत थांबत पुढे जायचा विचार केला. जे लोक अडकले आहेत ते आधी मोकळे झाल्याशिवाय आम्हाला नावेत बसायचा नंबर मिळणार नाही. त्यामुळे घाई करण्यात काही अर्थ नव्हता. कुंभेश्वर च्या पुढे जिथे जिथे ३ दिवस राहण्याचं महत्त्व आहे तिथे तिथे आम्ही राहिलो. ओखी वादळामुळे होणा-या नुकसानाची चर्चा सुरू होती, आम्हाला मात्र अगदी पुण्याची कमाई या वादळाच्या येण्यामुळे घडून आली. अन्यथा, चातुर्मास करायचा नाही म्हणून आम्ही ३-३ दिवस न थांबता चातुर्मासाच्या आधी परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो.

इथून पुढे शुकदेव ला जायचं होतं. शुकदेव मंदिर खूप छान आहे. इथे येऊन प्रसन्न ही वाटत आणि नकळत त्या वैराग्याची मागणी मागावी असं होऊन जातं.

शुकासारिखे पूण वैराग्य ज्याचे

…..पूर्ण वैराग्याचे धनीच ते…लहान पणी शिकलेला श्लोक आठवून गेला. इथे ज्या मैयाजींनी आम्हाला भोजन प्रसादी खाऊ घातली तिच्या दोन लहान लहान कन्यका तिला सोडीनात, काम करू देई ना, आम्ही तीला म्हंटलं तू लेकींना बघ, आम्ही करतो प्रसादीचं, तर ते तिला पटेना, दोन लहान लहान मुली सांभाळत, चुली जवळ त्यांना बसवून मैयाजींनी स्वयंपाक केला. खरच इतकं करतात हे लोक आपल्यासाठी नं!

दुस-या दिवशी काय झालं कळेना, पण आतापर्यंत मागे पुढे, एकत्र राहणारे आम्ही ६ लोक वेगवेगळे झालो. मयूरेश, स्मीता आणि सुरेखा पुढे निघाले, मी काका आणि काकू मागून निघालो. इथे आम्हाला शेतातून रस्ता होता. मात्र इथे गम्मतच झाली. आम्ही दोन्ही गृप्स रस्ता चुकलो. चुकलो म्हणजे काय, एखादी वाट धरली की बरच लांब पर्यंत जायचं आणि ती वाट अचानक कुठल्या तरी केळीच्या बागेपाशी येऊन बंद व्हायची, म्हणजे पुढे वाटच नाही, मग पुन्हा मागे यायचं, दुसरी वाट धरायची, मग ती पण अशीच बंद!, अशा ३ ते ४ वाटा करून झाल्या, चांगल १२-१३ किमी अंतर चालून सुद्धा आम्ही पुन्हा जिथून सुरू केलं तिथेच! आज मुक्कमावर पोहचू की नही असं वाटू लागलं. आता काय करावं समजेना. इथे या बागांमधे चिटपाखरू नाही, विचारायचं तरी कुणाला? एक अजून वाट होती जरा दूरून, म्हंटलं ती पण करून पाहू, आता दुसरा उपाय तर नाहीये. त्या वाटेवर पुढे गेलो, तिथे एक घर होतं. ते घर बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू, वाटलं चला, म्हणजे काही नाही मिळाली वाट पुढे तर निदान इथे मुक्कम तरी करता येईल. ते घर पाहून आम्हा तिघांनाही आधार मिळाल्यासारखं वाटलं आणि त्या दिशेने आम्ही चालू लागलो. घराजवळ पोहचलो तर घर बंद, गेल कित्येक दिवस य घरात कुणीच आलं गेलं नसावं. समोरच्या खिडक्या बंद, बाहेरून त्यावर कोळीष्टकं जमलेली, अंगणात गवत उंचं च उंच वाढलेलं,आणि सगळ्यात कमाल म्हणजे कमालीची भयाणता आणि गूढता तिथे आम्हाला तिघांनाही जाणवली. अचानक नकारात्मक लहरी यायला लागल्या असे वाटू लागले. आता इथून कसंही करून बाहेर पडायचं, बस! आम्ही पुन्हा एकदा मागे वळलो.

जिथून आम्ही त्या शेतात आलो होतो तिथपर्यंत पुन्हा मागे गेलो, आणि नर्मदे हर चा धावा सुरू केला. तिस-या मिनिटाला एक माणूस मागून आला आणि म्हणाला, जो रस्ता बंद किया दिखेगा वहा से जाओ. आता गम्मत अशी झाली होती की ५ वाटा होत्या, त्यातल्या ४ आम्ही धुंडाळून झाल्या होत्या आणि एका वाटेवर झाडं, ओंडकी टाकून ती वाट बंद केली होती, मात्र तिथे पुढे वाट आहे अशी शंका ही आम्हाला आली नाही इतकी वाट लहान होती, वाटलं पुढे एखादी बाग असेल. पण तीच वाट बरोबर होती. त्या वाटेवर पुढे केळी ची बाग होती, पण ती बाग ओलांडून मग पुढे रस्ता होता. केळींचे घड च्या घड लागलेल्या बागांतून, कमरे पर्यंत वाकून, त्या झाडांखालून गेल्या नंतर, म्हणजे साधारण अर्धा किमी असं चालल्या नंतर आम्हाला एक ओढा लागला, तो पार करून समोर चा छोटासा टेकडी सारखा उंचवटा पार करायचा होता, मग आम्ही कोटेश्वराच्या रस्त्याला लागणार होतो.

हा ओढा जरी तसा लहान असला तरी तिथे खूप चिखल होता. गुडघ्यापर्यंत अगदी. बुट काढून मी चप्पल घातली. ती फ़सली आणि तुटली, शेवटी अनवाणी चालण्याशीवाय पर्याय नव्हता. कसा बसा तो ओढा, तो डोंगर अनवाणी पार करत करत आम्ही पुढे गेलो खरं, पण तेव्हा पायात जे काटे बोचले, अगदी बाभळी चे काटे बोचले तेव्हा अनवाणी परिक्रमा करणा-यांचा धैर्याचं आणि साधनेचं सामर्थ्य काय असेल याची कल्पना आली. या काट्यांनी मल २-३ दिवस त्रास दिला. पुढची परिक्रमा अनवाणी च करायची अशी कल्पना यावेळी तिथे पहिल्यांदा सुचली. गम्मत आहे नं, मला काट्यांचा त्रास होत होता मात्र परिक्रमा करावीशीच वाटत होती. किंबहुना काटे बोचून पाय दुखत होता तरी पुढच्या वेळी अनवाणी चालण्याची तयारी मनानी कशी काय दाखवली कोण जाणे?मात्र इथेच पुढे एक गम्मत झाली. माझी चप्पल तुटली होती. आश्रमात गेल्यावर बरेच दा जिथे शौचालयाची सोय नसते तिथे बाहेर जंगलात जाव लागायचं अशा वेळी स्लीपर चं काम पडायचं. आता माझ्याजवळ स्लीपर नव्हत्या, आणि दर वेळी फ़्रेश व्हायला जायचं म्हणजे रात्री बूट घालून जावं लागणार होतं. पण ईलाज नव्हता. ज्या चपला असतील त्या घालून जायचं असं मी ठरवलं. आश्रमा बाहेर ब-याच चपला होत्या, आणि मी त्या फ़क्त च थोड्या वेळा साठी वापरणार होते, त्यामुळे खरं तर कुणी आक्षेप घ्यावा असही काही नव्हतं, मात्र इथे एक गम्मत झाली आणि एक, नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन ते चार दिवस ती गम्मत होत राहिली, कारण तो निव्वळ योगायोग नव्हता. सांगते. कुणाच्या चपला त्या व्यक्ती ला न विचारता घालून जाणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. “घालून जाऊ न कुणाच्या तरी “असा विचार मी केलाच होता खरं पण माझं मन धजलं नाही आणि त्या दिवशी अनवाणीच जंगलाच्या दिशेने गेले. मात्र रस्त्यात मला एक बाई भेटली, ती कुणी गावातली असावी, नुकतीच ती झाडीतून बाहेर आली होती, “मैयाची मेरी चप्पल पहन लो, काटे गड जायेंगे” असं म्हणत तिने तिच्या चपला दिला. दुस-या दिवशी पुजारी महारांजानी दिल्या, आणि तिस-या दिवशी एका परिक्रमावासीं नी दिल्या… मी एकदाही रात्री अनवाणी गेले नाही.

पुढे कोटेश्वरानंतर मात्र मी एकटीने चालण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बाकी लोक आगे मागे असत.. मात्र चालताना मी सर्वात पुढे असायची, अगदी साधारण ३-४ किमी पुढे. असं होतं परिक्रमेत. बरेचदा आपण आपल्या ध्येयापासून दूर जातोय, आणि अयोग्य (म्हणजे आपल्या ध्येयपूर्ती च्या दृष्टीने अयोग्य) असलेल्या लोकांमधे आपण आपले ध्येय विसरतोय असं वाटू लागलं की मैया आपल्याला त्या समूहापासून दूर करते. तसच झालं, मात्र किंचितही एकटेपण किंवा भिती वाटली नाही. याऊलट जेव्हा जेव्हा मी एकटी चालायचे तेव्हा तेव्हा मला वेगळे आणि विलक्षण अनुभव मिळत जायचे.

पुढे, म्हणजे कोटेश्वराहून पुढे सिसोदरा आणि त्याहीपुढे कांदरोज नावाचं गाव होतं, आज तिथवर जाता यावं असं वाटत होतं. दुपारचे ३-३.३० वाजले असतील, कांदरोज अजून ८-१० किमी दूर होतं. पहिला टप्पा सिसोदरा, इथे आल्यावर मग पुढे जाता येईल का हा विचार करायचा. मी निघाले. थोडं अंतर चालून झाल्यावर रस्त्यात एका ठिकाणी चार बायका बसल्या होत्यात, त्यांना सिसोदरा कुठेय ते विचारलं.. ” हमारे साथ चलो, हम भी उधर ही जा रहे है” असं म्हणत त्या उठल्या आणि चालू लागल्या. जणूकाही मी आली की उठायचं असं ठरवलं होतं त्यांनी, इतक्या पटकन उठल्या त्या. गप्पांमधे समजलं, त्यातल्या एकीचं माहेर नागपूर चं होतं… ती माझ्याशी छान मराठीत, अगदी नागपूरी मराठीत बोलू लागली. मी एकटी नसून माझ्या गावचं माणूस मला सोबतीला मिळालं होतं… सिसोदरा कधी आलं समजलच नाही. तिनी मला घरी बोलावलं पण तिचं घर बरच लांब असल्याने मला ते शक्य झालं नाही..पुढे कांदरोज ची वाट दाखवून त्या चौघी आपापल्या घराकडे वळल्या.

आता रस्ता बराच एकट होता. घाट होता. इथे चौकात मला दोन माणसं दिसलीत, त्यांना विचारून मी रस्ता निश्चित करून घेतला. ती दोघं म्हणाली “ मैया जी आप १.३० घंटे मे पोहोच जाओगे, लोग छोटा रास्ता बतायेंगे तो वो मत लेना” कुणी काही सांगितलं की त्याला प्रतिप्रश्न न करता जे सांगीतलय ते ऐकायचं असं एव्हाना ठरलं होतं, कारण आपल्यापेक्षा स्थानीय लोकांना माहिती जास्त आणि चांगली असते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी चालू लागले. साधारण एखाद तासाने ही मंडळी माझ्या मागून पुन्हा आलीत आणि मला रस्त्यात थांबवलं. “ मैयाजी, बस अब थोडाही बचा है, अब थोडा विश्राम कर लो” तसा अजून अंधार पडायला वेळ होता. मी थकले पण नव्हते, आणि विश्राम करण्यासारखं ते स्थानही नव्हतं. म्हणून मी विश्राम करत नाही असं म्हणताच त्या मोटर सायकल वर मागे बसलेल्या माणसाने पिशवीतून एक छोटासा स्टूल बाहेर काढून माझ्या पुढे ठेवला. “मैयाजी पाच मिनिट तो बैठो” असं म्हणत लगेच एक थरमास आणि चहाचे तीन कप काढले, आणि आम्हा तिघांसाठी चहा ओतला… “आप को चाय पिलाना था” असं म्हणत चहा माझ्या हाती दिला. विचारलं तेव्हा समजलं, मला मघाशी ही दोघं ज्या चौकात भेटली होती, तिथून ८-१० किमी दूर आणि चौकापासून माझ्यापर्यंत ३ ते ४ किमी असे १४ किमी दुरून या दोघांनी माझ्यासाठी चहा आणि बिस्किटं आणली होती! फ़क्त चहा देण्यासाठीचा हा आटापिटा…का तर मैयाजी एकट्या चालताहेत, रस्त्यात काही नाही, त्यांची सेवा करायला हवी, ही एक सदभावना! काय म्हणावं याला?

याच रस्त्यावर पुढे एक हनुमानाचं मंदिर लागलं, आणि तिथे पण एक छानसा अनुभव आला… बरेचदा काही अनुभव फ़क्त अनुभवावे असे असतात…त्यातलाच एक…. म्हणाल तर काही झालंच नाही, आणि म्हणाल तर सारं विश्व माझं झालं, असा हा अनुभव…आणि हो,कांदरोज् ला पोहचल्याक्षणी मी आनंदाने रडूच लागले, हो, असच काहीतरी दिसलं मला तिथे…. पण या भागात नाही हं सांगणार… पुढच्या म्हणजे २९व्या भागात सांगते.. तोवर नर्मदे हर!
©सुरूची नाईक:विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*