नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२९👇- बडगुजर. इन


नर्मदे हर…..
दोन दिवस नेट प्रॉब्लेम असल्याकारणाने नर्मदा परिक्रमा लेख लिहिता व पाठवता आले नाहीत, त्याबद्दल सर्व नर्मदा परिक्रमा वासीयांची चरणस्पर्श करून माफी मागतो…!!

रामानंद आश्रमात जाण्या आधी रस्त्यात मला एक म्हातारे गृहस्थ भेटलेत. त्यांनी सांगीतलं रामानंद आश्रमात अवश्य जा, तिथे तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. तिथे सत्संगांची एक पद्धत आहे. तिथे एक पाळणा आहे, त्या पाळण्यावर आपण आपले प्रश्न लिहायचे आणि नाव मात्र लिहायचं नाही. स्वामी अभिराम दास महाराज आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात.आणि त्या सत्संगाला बरीच मंडळी मुद्दाम म्हणून उपस्थित राहतात म्हंटल्यावर मला तिथे जावसं वाटलं. शिवाय संत महात्म्याचं दर्शन होणार.

खरं तर काय प्रश्न विचारावा असाच प्रश्न पडला, कारण माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हळू हळू आणि आपोआप मिळत होती. म्हंटलं, बघू, वेळेवर जर वाटलं काही विचारावसं तर विचारू नाहीतर राहिलं. आमच्यापैकी अनेकांनी परिक्रमा पूर्ण होईल का असं विचारलं होतं. मला ते अजिबात विचारवासं वाटलं नाही.

आमच्यातील एकाने “गुरू कसा करावा” असा प्रश्न केला. त्याचं उत्तर देताना ते म्हणाले, “आपको खुद गुरू करनेकी जरूरत नही है. जब आपके नसीब मे गुरू का आना लिखा होगा, तब आपका गुरू आपको खुद ढुंढ लेगा. आप गुरु ना ढुंढ सकते है, ना आप उनकी योग्यता परख सकते है. जिस गुरू की योग्यता आप ने परख ली हो वो आपका गुरू हो ही नही सकता”. इथे मला माझा अनुभव आठवला. परिक्रमेच्या आधी मला गुरुमंत्र मिळाला होता. हा अनुभव खरं तर मी आधी ही सांगितला आहे, आपल्या या लेखमालिकेच्या दुस-या भागात, पण संदर्भ लागावा म्हणून पुन्हा सांगते.

मी परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे मी इंदोर ला आले. माझी आत्या इंदोर ला असते तिच्याकडे मी मुक्कामाला होते. माझ्याकडे सगळेच नाना महारांजाचे अनुग्रहीत आहेत, पण अजून माझा अनुग्रह झाला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी मी अनुग्रह घेणार होते, नाना महाराज ज्या भक्ताना अनुग्रह देणार होते त्या वहीत माझं नाव आणि अनुग्रह घेण्याची तारीख ही नमूद झाली होती, पण पुन्हा तेच….आपण काहीच ठरवत नसतो… नाना महारांजाची तब्येत बिघडली, त्यांनी देह ठेवला, आणि माझा अनुग्रह घ्यायचा राहून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं… तेव्हा मी १५-१६ वर्षांची असेन. मी ठरवलं, आता अनुग्रह घ्यायचाच नाही. माझे गुरू नानाच…. मला दुस-या कुणाच कडून अनुग्रह घ्यावासाच वाटला नाही… आणि मी घेतला ही नाही. मनात मात्र मी नेहेमीच नानांनाच माझे गुरू समजत राहीले. तर गंम्मत अशी झाली की आत्ता म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू करण्याच्या दोन दिवस आधी मला आत्यानी विचारल, “काग?, तुझा मंत्र झालाय नं घेऊन?” आणि मला अचानक मंत्र घ्यावासा वाटू लागला. रात्री साडे अकरा ला मला खूप बेचैनी वाटू लागली आणि गुरुमंत्र हवाच हे प्रकर्षाने जाणवू लागलं. मी माझ्या आत्येभावाला सांगितलं… त्याने सकाळी बाबासाहेब तराणेकर (नानांचे नातू) यांना फ़ोन केला. माझी आधी भेट झाली होती, मी परिक्रमेला जाणार हे सांगून नानांचा आणि बाबा साहेबांचा आशिर्वाद घेऊन आले होतेच पण आता मला गुरुमंत्र हवा होता. बाबासहेबांना परगावी जायचे असतानाही, लेकरू परिक्रमेला जातय म्हणून वेळात वेळ काढून, त्याच दिवशी मला गुरुमंत्र दिला. माझ्या परिक्रमेला निघण्याच्या आधीच माझ्या गुरुंनी मला पंखाखाली घेतलं..स्वामी अभिरामदास महारजांनी अगदी चपखल सांगीतलं होतं.

माझ्या मनात अचानक माझ्या आयुष्याबद्दल विचार येऊ लागले. आयुष्यात मी जे काही केलं ते अगदी मनापासून केलं. लग्न झालं तेव्हा जेमतेम बीएससी होते, तिस-या वर्षीची परिक्षा सुद्धा लग्ना नंतर दिलेली. त्या नंतर एम एस सी करायला घेतलं, दिवस राहिले, आणि मला एम एस सी बंद करावं लागलं. मग कंप्युटर कोर्स, शाळेची नोकरी, दोन विषयात एडिशनल बीए, बीएड, पुन्हा एकदा एमएससी आणि मग पी.एच.डी. हे सगळ अगदी जीव लावून केलं मी. मात्र यातली प्रत्येकच गोष्ट पूर्ण केल्यानंतर मला जाणवायचं हे आपल्या अयुष्याचं ध्येयं नव्हतच मुळी! मग आपल्या आयुष्याचं ध्येय काय आणि ते नक्की कसं सापडेल?.. हाच प्रश्न विचारायचा, बघूयात काही उत्तर मिळतय का? ठरलं! मी हाच प्रश्न अभिराम दास जी त्यागी महाराजांना एका कागदावर लिहून दिला, खाली नाव लिहिलं नाही, “एक परिक्रमावासी” इतकच लिहिलं.

अभिरामदास महाराज जेव्हा मंडपात आले तेव्हा त्यांनी सगळ्या भाविकांकडे मोठ्या प्रेमाचा कटाक्ष टाकला. मी मान खाली करून बसल्या जागेवरूनच त्यांना नमस्कार केला तसा त्यांनी आश्वासक नजरा माझ्याकडे टाकल्या, “हा बच्चा, मै समझ रहा हू” असं काहीसं त्यांच्या नजरेतून मला जाणवलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी भगवद गीतेच्या १२व्या अध्यायातले अनेक दाखले दिले.

“तुम जो कुछ कर रहे हो वो दिलसे कर रहे हो, उसे ईश्वर के लिये करो, ये समझ के करो की ये तुम्हे तुम्हारे इश्वर ने दिया हुआ कार्य है जिसे तुम्हे कोई अपेक्षा ना करते हुये करना है. इस कार्य करने मे ही तुम्हारा भला है. तुम अपने सही रास्ते पर चल रहे हो. तुम परिक्रमा मे आये हो, ये भी तो एक दिशा है! परिक्रमा मे आना अपने आप मे ही आपको मार्गदर्शन कर रहा है. आध्यात्मिक अभ्यास पर ध्यान बनाये रखे, आपका मार्ग आपको मिल रहा है, आपके उसके काफ़ी करीब है.”

जो सहज प्रश्न माझ्या मनात होता त्याचं सहज उत्तर मला मिळालं होतं. असाच एक प्रसंग भालोद गुजरात मधे पण आला. पण ते त्यावेळी सांगेन. रामानंदस्वामी आश्रम खूप छान देखरेख ठेवून अद्ययावत आहे. इथे कुणीही साधकानी यावं, आपली साधना करावी, अगदी विनामुल्य. साधकांसाठी इथे वाचनालयाची सोय आहे. सन्यास्यांसाठी वेगळी सोय आहे. साधनेला अतिशय पोषक आणि शांत वातावरण आहे. शिवाय इथे राम मंदिर खूप प्रसन्न आहे आणि स्फ़टिक लिंगांचं शिवमंदिर आहे. एकंदरीतच आश्रम खूप रमणीय आहे.स्वामी अभिरामदासजी महाराज स्वत: जातीनी लक्ष देऊन सगळ्या सोयी बघतात. त्यांच्या दिनचर्येत सकाळची पूजा अर्चा, व्यायाम अणि सत्संग असतो तर संध्याकाळी ते आश्रमा पासून २ -३ किलोमिटर असलेल्या गोशाळेत पायी जाऊन गो पूजन करतात आणि तिथेच जवळ असलेल्या शिव मंदिरात सुद्धा आरती आणि अभिषेक करतात. प्रेमळ, आणि सात्विक संत आहेत स्वामी अभिरामदास महाराज. याच महाराजांचा अजून एक अनुभव म्हणजे मी ज्यावेळी त्यांच्याशी बोलत होते, म्हणजे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्या नंतर, सत्संग झाल्यानंतर, मी नमस्कार करायला गेले त्यावेळी ते जे वाक्य मला बोलले तेच वाक्य पूर्ण परिक्रमेत अजून तीन सन्यास्यांकडून मला ऐकवायला मिळा्लं. ते वाक्य होतं “सब ठिक है बेटा, बस राम को मत छोडना”.. अगदी हेच शब्द, खलघाट ला जात असताना एका तेजस्वी सन्यास्यानी मला बोललेलं मी मागच्या अनुभवात सांगितलेलं आहे. आज ते वाक्य जेव्हा दुस-यांदा आणि जसं च्या तसं ऐकलं तेव्हा त्यात काहीतरी संकेत आहे असं वाटलं मात्र उत्तर नीट सं मिळालं नाही, कारण ते पुढे मिळणार होतं.

आज इथून पुढे खरंतर कुंभेश्वर ला जायचं होतं पण आज अजिबात ऊन नव्हतं, वातावरण थंड आणि रोगट वाटत होतं. चालायचा कंटाळा आणि आळस येत होता. याचं कारण ही होतं. ओखी नावाचं सायक्लोन येऊ घातलं होतं. आम्ही मैया किनारी चालत होतो. कधीही पाऊस पडेल असं वातावरण झालेलं. रस्त्यात छोटे छोटे पाडे दिसत पण सगळेच गरीब, तरीही मध्य प्रदेशातल्या गरीबी पेक्षा ही गरीबी जरा कमी होती. आता आज जास्त चालणं योग्य नव्हतं कारण रस्त्यात कुठे पावसाने धरलं तर आश्रय ही मिळणार नव्हता.

इथे कुणीतरी आम्हाला सांगितलं की वांदरीया नावाच्या गावाला पण रामानंद आश्रम आहे. आम्ही तो शोधत शोधत निघालो. एक छोटासा आश्रम सापडला. छानसा बगीचा एक किचन दोन खोल्या आणि व-हांडा. आम्ही वऱ्हांड्यात आसनं लावतो न लावतो तोच धो धो पावसाला सुरवात झाली. जसा काही हा पाऊस आम्ही पोहोचण्याचीच वाट बघत असावा. आम्ही सुखरूप पोहोचावं म्हणूनच की काय आम्हाला कुंभेश्वर पर्यंत न जाण्याची बुद्धी झाली असावी.

पाऊस थांबल्यावर आम्ही मैया किनारी गेलो तेव्हा समजलं, जे झालं ते योग्यच झालं. इथे किना-याचि वाट दगडांचीच होती आणि पावसात त्यांच्या खालची वाळू वाहून जाते, त्यामुळे चालणं कठीण. बरच झालं आम्ही वांदरीया ला थांबलो. असं काहीतरी संकेत ती मैया आपल्याला देतच असते. अगदी व्यवस्थित लक्ष ठेऊन असते आपल्यावर.

इथे वांदरीयाच्या आश्रमात आधी आम्हाला आसनं व-हांड्यात लावायला सांगितली होती. आत एक खोली रिकामी होती. बाहेर खूप थंडी ही होती पण तिथला गडी माणूस काही आम्हाला आत डोकावून पण बघू देईना. आम्हाला आज इथे उघड्यावर थंडीतच झोपायला लागणार होतं. आम्ही सहा सात जण होतो आणि हा गडी माणूस एकटाच होता. आम्ही स्वयंपाकाला त्याची मदत केली. कढी खिचडी आणि उपासाची बटाट्याची भाजी असं भोजन प्रसादी चं जेवण तयार झालं. त्या गडी माणसाला काय वाटलं माहित नाही, पण जेवण झाल्यावर त्याने खोलीचं दार आम्हाला उघडून दिलं, म्हणाला, “बाहर थंडा है, अंदर आसन लगा लो.”

आत एक खूप मोठं मारुती रायांचं फ़्लेक्स लावलं होतं.खूप बोलकं चित्र होतं ते. असं वाटलं ते म्हणताहेत, “मला केव्हाही आवाज द्या, मी आहेच पाठीशी!” आणि असच एक मारुतीरायांचा फ़्लेक्स मला जोगी टिकरीया ते अमरकंटक रस्त्यावर असलेल्या देवरा नावाच्या गावी, जिथे आम्ही मुक्काम केला होता त्या धर्म शाळेत पण होते. तेव्हा ही हे मारुती राया “मी आहेच पाठीशी, हवं तेव्हा आवाज दे” असं म्हणताहेत असं वाटलं होतं. आणि याहूनही पुढे, म्हणजे साधारण बरगी कॉलनी च्या पुढे मला एक वेगळाच अनुभव आला. कदाचित मला मारुती रायांचं दर्शन झालं, पण नक्की माहित नाही. तो अनुभव मात्र आता इथेच सांगते.वाचकांची लागलेली लिंक सारखी तोडावी लागतेय, ते मनाला पटत नाहीये.

तर तेव्हा माझ्यासोबत सुरेखा ताई वगैरे मंडळी नव्हती. नारेश्वर ला माझ्या नर्मदा माईनी मला माझे “नर्मदा वडील” दिले. तो अनुभव मग सांगते आधी हा मारुती रायांचा अनुभव सांगते हं. हे नर्मदा वडील, त्यांना मी “बाबा” म्हणते, ते माझ्या सोबत असतानाची गोष्ट.त्यांचा पाय फ़ार दुखत होता. अगदि २ किमी चाललो ना की ते बसून जात, इतका त्रास होत होता. मग मी त्यांना म्हंटलं “ तुम्ही एखादा रिदम धरून चाललात तर कदाचित पाय कमी दुखेल” त्यांनाही ते पटलं, आणि दोघांनी हनुमान चालिसा चा रिदम ठरवला. हनुमान चालिसा एकदा म्हणायला साधारण ४ मिनिट लागतात. आम्ही ठरवलं, ११ वेळा अहुमान चालीसा होईस्तोवर थांबायचं नाही. म्हणजे साधारण ४५ मिनिटे सलग चालायचं. असं केलंलं हे तंत्र बरच उपयोगी पडलं. मग आम्ही तेच वारंवार करू लागलो. या वेळी अधुन मधून आम्हाला एक परिक्रमावासी दिसत असे. त्यांच्या जटा होत्या, काळी सावळी पण सुदृढ शरीर, ६ फ़ूट उंची, कमरेला पांढरा पंचा, हाती कमंडलू, असे बाबा दिसत होते. ते आम्हाला अधुन मधूनच दिसत. शक्यतो आम्ही जेव्हा ४५ मिनिटाचा टप्पा पार करून आराम करत असू तेव्हा ते आमच्या पुढे जात असत. मात्र आम्ही त्यांच्या पुढे गेलेलं मला आठवत नाही. तर एका ठिकाणी आम्ही आराम करत असताना ते पण तिथे आले आणि आमच्या समोरच्या खडकावर बसले. नर्मदे हर झालं. मी त्यांना विचारलं “महारज जी, परिक्रमा मे हो?, कहासे उठायी आपने परिक्रमा?” ते म्हणाले “हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. माझे प्रश्न पुन्हा सुरु झाले, मी विचारलं “कोई और भी रास्ता है क्या? आगे पिछे तो आप दिखते नही हो, बस बीच बीच मे दिखते हो?” आम्ही रस्ता मार्गाने जात होतो. मला वाटलं हे महाराज किना-यावरून जात असतील आणि अधून मधून रस्त्यावर येत असतील, म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले “रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा,अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”, मला काही कळेना, मी कधी या बाबांना बोलावलं? म्हंटलं जाऊ दे, हा कुणी ब्रम्हचारी बैरागी बाबा दिसतोय, बोलला असेल असच काहीबाही. ते साधू महाराज निघून गेले. मी आणि बाबा पण थोड्या वेळाने निघालो, मात्र मनात विचार येतच राहिला.. मी या बाबांशी तर बोलले पण नाही आधी, मग मी बोलावलं आणि खूप दा बोलवलं,असं ते बाबा का म्हणाले? उत्तर सापडे ना.. म्हंटलं जाऊ दे, आपण आपला हनुमान चालिसा सुरू करू…. अहो काय सांगू, असा विचार मनात येतो न येतो तोच समजलं, आता पर्यंत किमान ५५ वेळा तरी हनुमान चालिसा म्हणून झाला असेल! इतका धावा तर आपण त्या मारुती रायांचाच करतोय…अगदी निरपेक्ष भावनेनी! ““हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा,अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”.. बाबांचे शब्द माझ्या कानात घुमू लागले आणि समजलं…हे तर खुद्द मारुती राया! काय नशीबवान आहे हो मी? नर्मदा परिक्रमा घडते काय, अश्वत्थामा, नर्मदा माई आणि आता मारुती राया दर्शन देतात काय…अजून काय हवय सांगा? असो..

तर आता पुन्हा परत येऊ रामानंद आश्रमातल्या त्या मारुती रायांच्या फ़्लेक्स पाशी. तिथे खूप शांत झोप लागली. आणि दुस-या दिवशी आम्ही कुंभेश्वर ला निघालो. कुंभेश्वर हून आम्हाला पुढे जाताच येईना. आम्हाला तिथेच ३ दिवस थांबून रहावं लागलं..का?पण तिथे राहून आम्हाला ३०००० वर्ष नर्मदा किनारी राहण्याचं पुण्य मिळालंय…..कसं ते पुढच्या भागात सांगते.

©सुरूची नाईक:विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार-9309926559
संकलीत
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*